– मनोज पांडे
मतदार आता राजा बनण्याचे दिवस सुरू झाले आहेत. आजपासून पन्नास दिवसांनंतर वेगवेगळ्या मतदारसंघाचे व पर्यायाने राज्याचे आणि गावांचे गड, बालेकिल्ले, तटबंदीत रूपांतर झालेले आपल्याला पाहायला मिळतील. पण एवढं होऊन एक मोठा फॅक्टर मतदानाच्या दिवशी विलक्षण महत्वाचा ठरतो तो म्हणजे त्यात गड-किल्ल्यांच्या आजूबाजूला असणारी कुंपणे आणि त्यावर बसलेले मतदार. हे कुंपणावर बसलेले मतदार सर्वार्थाने अल्पसंख्य म्हणजेच ५ ते १० टक्के असले तरी त्यांची ताकद उमेदवाराला झेपावू किंवा झोपवू शकते. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत मतदार कुंपणावर असेल तर विशेष नाही पण यंदा प्रथमच उमेदवारही कुंपणावर आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाहू या, कसे ते.
शिवसेना भाजपा यांच्यातील युतीबाबतीतील तुतूमीमीमुळे आणि त्याचबरोबर मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सोबत असेल का स्वतंत्र याची अनिश्चितता असल्याने अनेक मतदारसंघात संभाव्य उमेदवारांना धड निर्णयच घेता येत नाही. युतीतून उमेदवारी अर्ज भरला आणि सेना भाजपा स्वतंत्र लढल्यास जय पराजय याचं गणित अवघड होऊन जाईल आणि त्यातच आघाडी एकत्र लढले तर एकदम वेगळं चित्र होईल. शहरी पट्ट्यात शिवसेना आणि भाजपाचे कडक मतदारसंघ आहेत हे मान्य. उदा. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. बालेकिल्ला. इथे एकनाथ शिंदे यांची अंबरनाथ पासून कळव्यापर्यंत मजबूत पकड आहे. या ठिकाणी सेनेकडे स्वतःचा दोन अडीच लाखांचा काटोकाट कोटा आहे. त्यात भर पडते भाजपाच्या मतांची. पण हा एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला होता. तो युतीधर्मातून सेनेकडे केव्हा गेला हे भाजपाला कळलेही नाही. पण भाजपाला तो परत घेण्याचे वेध लागलेत. युतीची एकूण गोळाबेरीज चार लाखांच्या वर जाते. गेल्यावेळेस श्रीकांत शिंदे यांना मिळाली ४ लाख ४० हजार मते. मात्र यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने मनसेला गळाला लावलंय अशी चर्चा सुरू झाली आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघात कल्याण ग्रामीण, डोंबिवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला न मिळणारी मतं मनसेला मिळतील आणि “एकच फाईट वातावरण टाईट” सारखं काही तरी जमून जाईल अशा आशेवर विरोधक आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात आघाडीत मनसे आल्यास तीन लाख मतांचा टप्पा सहज पार करून सेनेला घाम फुटू शकतो अशी परिस्थिती होऊ शकते. त्यात कुंपणावरची मते कुठे पडतात हे त्यावेळेस असलेल्या देशातील हवेवर अवलंबून आहे. भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभी ठाकली तर भाजपाचा उमेदवार कोण असेल याबाबत प्रचंड अनिश्चितता आणि सस्पेन्स आहे.
राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यापासून जगन्नाथ पाटील यांच्यापर्यंत आणि आनंद परांजपे, संजीव नाईक यांच्यापासून राहुल दामले यांच्यापर्यंत अनेक लोक कुंपणावर आहेत. कुंपणावर असणे म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे इतकेच इथे अपेक्षित नाही तर नगरसेवकांना, आमदारांना आता खासदारकी साद घालतीये हेही स्पष्ट आहे तशीच स्थिती भिवंडी, ठाणे, ईशान्य मुंबई, नाशिक इथेही आहे. भिवंडीचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांची मध्यंतरी भाजपाच्या व्यासपीठावर अचानकपणे कमी दिसणे आणि त्यांचा पूर्वीच्या पक्ष प्रमुखांशी मोठ्या पवार साहेबांशी संपर्क येणे ही चर्चाही ते कुंपणावर असल्याचेच दर्शवते. निवडणुकीचा मोसम आला की नरेश म्हस्के, महेश तपासे नावं चर्चेत येतात आणि लुप्त होतात.
निवडणुकीत गणित बदलत असताना एकजूट होऊ घातलेल्या आघाडीकडे सरकावे का मोदी, शहा, फडणवीस, ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली लढावे असा निकराचा प्रश्न संभाव्य उमेदवारांना सतावतोय. अर्थात शिवसेनेने वेगळे लढूनही जर राज ठाकरे यांचे आघाडी सोबत जाण्याचे तळ्यात मळ्यात झाले तर मात्र भाजपा संघटना, मनुष्यबळ आणि आर्थिक ताकदीने चित्र पालटवू शकते. म्हणजेच संभाव्य उमेदवारांना निर्णय काय घ्यावा याचा थांगपत्ताही लागत नाही ही सद्य स्थिती झाली आहे.