-श्रुति गणपत्ये
समाजाच्या गुंतागुंतीतून तयार झालेला गुन्हेगार अशी कथा घेऊन “मेअर ऑफ ईस्टटाऊन” नावाची खूपच चांगली मर्डर मिस्ट्री सध्या डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. याच प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या भारतीय मर्डर मिस्ट्रीमध्ये “नोव्हेंबर स्टोरी”मध्ये गुन्हेगार हा न्यूनगंडाने पछाडलेला असतो, त्यातून त्याची विकृती जन्म घेते आणि पुढचे गुन्हे घडतात. या दोन्ही कथांमधलं साधर्म्य म्हणजे दोन स्त्रिया आपले अधिकार, हुशारी वापरून गुन्ह्यांचा तपास करतात.
“मेअर ऑफ ईस्टटाऊन”मध्ये अमेरिकेतल्या ईस्टटाऊन नावाच्या लहानशा शहरामध्ये खून, मुली गायब होणं अशा घटना घडतात आणि त्याचा शोध घेण्याची जबाबदारी डिटेक्टिव मेअरवर (केट विन्स्लेट) येते. बऱ्याच दिवसांनी केट विन्स्लेट ही मालिकेमध्ये दिसली. खरंतर ही भूमिका साधारण वयाची ५०शी ओलांडलेल्या, आजी झालेल्या एका बाईची आहे. पण केटने ती उत्तम साकारली आहे. वैयक्तिक प्रश्न आणि करियर यांची झालेली सरमिसळ ती सोडवण्यासाठी तिची सुरू असलेली धडपड, त्याचवेळी करिअरमध्ये अत्यंत प्रामाणिक आणि संशय आला म्हणून स्वतःच्या नवऱ्यालाही न सोडणारी अशी डॅशिंग केट भूमिकेला चांगलाच न्याय देते.
या शहरामध्ये बहुतेक लोक एकमेकांना ओळखतात, एकमेकांचे नातलग, मित्र-मैत्रीण असतात. प्रत्येक समाजाचे काही प्रश्न असतात. तसेच इथे तरुणांमध्ये ड्रग्ज, गुन्हेगारी, कुमारी माता, बाल गुन्हेगारी हा एक मोठा प्रश्न आहे. कौटुंबिक व्यवस्थेला छेद देऊन ठेवलेले संबंध, त्यातून निर्माण झालेल्या विचित्र समस्या, त्याचा कुटुंबावर होणारा परिणाम आणि या सगळ्यातून जन्माला आलेला गुन्हेगार अशी ही कथा आहे. केटचा स्वतःचा मुलगा हा ड्रगच्या आहारी गेलेला असतो आणि एक दिवशी तो आत्महत्या करतो. त्याला एक छोटा मुलगा आहे आणि त्याची आई सुद्धा ड्रगच्या आहारी गेलीये आणि मुलाचा ताबा मिळावा म्हणून भांडतेय. केटचा नवऱ्याशी घटस्फोट झालेला आहे, पण तो तिच्या घरासमोरच राहतो आणि आता दुसऱ्या बाईशी लग्नं करणार आहे. मुलाच्या आत्महत्येला केट स्वतःला जबाबदार मानत राहते आणि आपलं दुःख लपवण्याच्या नादात ती हट्टी, सहज गोष्टी न स्वीकारणारी, दुराग्रही अशी होते.
ज्या मुलीचा खून होतो ती एरिन, कुमारी माता आहे आणि शिक्षण अर्धवट झाल्याने काम नाही. तिचे वडील व्यसनाधीन आहेत आणि लग्नाशिवाय जन्मलेल्या नातवाची जबाबदारी घेऊ इच्छित नाही. ज्या बॉयफ्रेंडमुळे एरिनला मूल झालंय त्याचे आईवडील त्या बाळाचा खर्च उचलतात. पण त्याच्या बापालाही जबाबदारीची जाणीव नाही. या गोष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक कुटुंबाची अशी काहीना काही समस्या आहे आणि ती समस्या थेट मूळ कथानाकाशी जाऊन मिळते. आधुनिक म्हटल्या जाणाऱ्या अमेरिकेतील हे सामाजिक प्रश्न, उद्ध्वस्त कुटुंब व्यवस्था, व्यसनाधीनता, मुक्त शरीर संबंधातून निर्माण झालेल्या समस्या अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणजे ही मालिका आहे.
खून आणि मुलींचं गायब होणं याचा तपास सुरू झाल्यावर अर्थातच वेगवेगळ्या लोकांवर संशयाची सुई फिरत राहते. आधी अर्थातच एरिनच्या बॉयफ्रेंडवर संशय जातो मग कधी चर्चमधील फादरवर तर कधी आणखी कुणावर. मग त्याचं विविध प्रकारे गॉसिप होतं. अगदी केटच्या नवऱ्यावरही संशयाची सुई फिरते. पण कथा उलगड गेल्यावर आणि एकेक धागा सापडत गेल्यावरही खरा गुन्हेगार हा अगदी शेवटी सापडतो. तोही केटच्या डोक्यात या केसबद्दल सतत सुरू असलेल्या भुंग्यामुळे. खरा गुन्हेगार नक्कीच थक्क करून जातो आणि घटनांचा अर्थ एकदम बदलतो. शेवटच्या भागापर्यंत उत्कंठा कायम ठेवणारी अशी ही मालिका आहे.
तामिल भाषेतली पण हिंदीमध्ये डब केलेल्या “नोव्हेंबर स्टोरी”मध्ये तमन्नाची प्रमुख भूमिका आहे. ही मालिका इंद्र सुब्रमण्यमने लिहिली आहे आणि दिग्दर्शित केली आहे. गुन्हेगारी जगतातल्या कथा लिहिणारा एक लेखक आता म्हातारपणी अल्झायमरने ग्रस्त झाला आहे आणि संगणक तज्ज्ञ असलेली त्याची मुलगी त्याला सांभाळते आहे. त्यांच्या जुन्या घरी एका बाईचा खून होतो आणि त्यावेळी तो लेखक तिथे सापडतो. त्याला खूनाबद्दल काहीच माहिती नाही किंवा तो आजारपणामुळे सांगू शकत नाही. त्यामुळे बापाला वाचवण्यासाठी मुलगी त्याला तिथून घेऊन जाते आणि मग पोलिसांना फोन करते. बापाला वाचवण्याच्या प्रयत्नात ती नकळत या खूनाच्या तपासामध्ये अडकते कारण बापाने खून केलाय की आणखी कोणी हे तिला माहित नसतं. त्या खूनाचं रहस्य हे लेखकाच्या भूतकाळाशी संबंधित असतं. पण एवढ्या वर्षात त्याचे धागेदोरे इतके पसरतात की खून्यावर सुरुवातीच्या काही भागांमध्येच संशय येऊनही तो असं का करेल हे उलगडत नाही. मग वेगवेगळ्या लोकांवर संशय जात राहतों अगदी त्या लेखकावरही. वर्तमानकाळ आणि त्याचा भूतकाळ अशी कथा उलगडते. शेवट मात्र थोडा बटबटीत, हिंसक केलेला आहे. पण तो अशक्य वाटत नाही. ही मालिका उत्कंठा मात्र कायम ठेवते.
एखाद्या गोष्टीच्या तपासासाठी इंटरनेटच्या माध्यमातून वापरली जाणारी विविध टूल्स या मालिकेमध्ये खूप रोचक पद्धतीने वापरली आहेत. तमन्ना संगणक तज्ज्ञ असल्याने आणि आपल्या वडिलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याने ती पोलिसांच्या तपासाच्या पुढे कसं राहता येईल यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून एक समांतर तपास सुरू करते. अल्झामरग्रस्त वडिलांची काळजी घेताना येणाऱ्या अडचणी, पैशांची चणचण, नोकरीतला ताण हे तिने चांगलं उभं केलं आहे.
गुन्हेगारी मालिका, चित्रपट हे सर्वात जास्त लोकप्रिय असतात कारण बघणाऱ्याला गुंतवून ठेवण्याची त्याची ताकद असते. तसंच असे गुन्हे, घटना समाजातल्या कोणाहीसोबत होऊ शकतात, असंही प्रेक्षकांना वाटत राहतं. त्यातच त्या मालिकेचं यश असतं. त्यामुळेच सीआयडी, क्राइम पेट्रोलसारख्या हिंदी मालिका गेली कित्येक वर्ष सुरू आहेत. वरील दोन्ही मालिका या अशाच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात.
shruti.sg@gmail.com