ओम राऊत यांस,
तुमच्या नावाआधी प्रिय किंवा तत्सम शब्द लिहावा इतकाही आदर मनात नाही. तुमच्या चित्रपटाने जशी पातळी सोडली आहे तशीच समाजमाध्यमांची पातळी घसरू नये यासाठी तुम्हाला अहो-जाहो करीत आहे, बाकी तुमच्याबद्दल मनात कसलाही आदर, सन्मान नाही. कारण गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत प्रभुश्रीराम यांच्या नावावर तुम्ही चित्रपटगृहात जो काही डोंबाऱ्याचा खेळ दाखवताय त्याचा निषेध करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. संपूर्ण देशातील वातावरण गढूळ करणारा तुमचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट जेव्हा घोषित झाला तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल नकारात्मक गोष्टी कानावर पडत होत्या. त्यानंतर टीझर आला, लोकांनी त्याला विरोध केला, तुम्ही म्हणालात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवा. तुमचं हेदेखील म्हणणं प्रेक्षकांनी ऐकलं. चित्रपटाचे २ टीझर काढले अन् तेव्हा या महाकाव्याचा तुम्ही कशा प्रकारे खेळखंडोबा केलाय, हे प्रेक्षकांच्या ध्यानात आलं. तरी प्रेक्षकांनी तुमच्यावर आंधळा विश्वास टाकून मोठ्या संख्येने तिकिटं बुक केली अन् जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मात्र तुम्ही या प्रेक्षकांचा विश्वासघात केल्याचं प्रकर्षाने जाणवलं.
त्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण किती अस्थिर झालं हे गेले तीन दिवस आम्ही अनुभवत आहोत. ओम राऊत, ज्या रामायणामुळे तुमच्या-आमच्यासह सगळ्या भारतीयांची स्वतंत्र अशी ओळख आहे त्याचाच इतका वाईट पद्धतीने अपमान तुम्ही केला आहेत की त्याबद्दल टीका करण्यासाठी शब्दसंग्रह अपुरा पडेल. उजव्या विचारसरणीचे लोक असोत की डाव्या विचारसरणीचे किंवा इतर कुणीही असो सगळ्यांनी एकत्र येऊन तुमच्या या चित्रपटावर जबरदस्त टीका केली किंबहुना अजूनही करीत आहेत. बाकी हनुमान यांच्यासाठी चित्रपटगृहातील एक जागा राखीव ठेवण्याचा मार्केटिंग स्टंट पाहून तुमच्या बुद्धीची अन् कल्पकतेची कीव करावीशी वाटली. चित्रपटातील लंकेचं छायाचित्रण, रावणाचे चित्रण, अभद्र भाषा, व्हीएफएक्स बद्दल तर साऱ्या जनतेनेच तुमचा समाचार घेतला आहे, त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलत नाही.
राहून राहून आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की इतक्या लोकांच्या भावनांना पायदळी तुडवूनही तुम्ही तुमच्या या घोडचुकीवर स्पष्टीकरण देत आहात. तुम्ही अन् तुमचे लेखक यांच्या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच्या अन् आत्ताच्या मुलाखती एकदा तुम्हीच स्वतः बघा अन् आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्या की लोकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा? तुम्ही त्यांच्या विश्वासास पात्र आहात का? बरं ही गोष्टदेखील आपण बाजूला ठेवू या. याहून आणखी भयंकर गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर करून अत्यंत निलाजरेपणाने तुमच्या चित्रपटातील कलाकार या भ्रष्ट कलाकृतीचं समर्थन अन् सेलिब्रेशन करीत आहेत. तुमचं हे कृत्य पाहून एकच गोष्ट सांगावीशी वाटते की जनाची नाही तर निदान मनाची तरी बाळगा. पहिल्या तीन दिवसांत केलेली कमाई अन् त्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनला बसलेला फटका यावरून हे स्पष्ट होतं कि लोक तुमच्यासाठी नव्हे तर प्रभूश्रीराम यांच्यासाठी चित्रपटगृहात आले अन् त्यांचा तुम्ही भ्रमनिरास केलात.
आज जो डोंबाऱ्याचा खेळ दाखवून तुम्ही स्वतःच्या तुंबड्या भरल्या आहेत. त्या केवळ प्रभुश्रीराम यांच्या कृपेमुळे. त्यामुळे प्रेक्षकांचं बाजूला ठेवा. किमान त्यांच्याबद्दल एक टक्का जरी मनात आदर असेल तर हे आकडे दाखवण्यापेक्षा तुम्ही प्रेक्षकांची जाहीर माफी मागायला हवी. अन् तुमच्या या चित्रपटाला डोंबाऱ्याचा खेळ म्हणणं हे सुद्धा एक प्रकारे त्या लोकांचा अपमान करण्यासारखं आहे. डोंबारी किमान कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता मनोरंजक खेळ दाखवून इमानदारीने स्वतःचं पोट भरतो. त्यामुळे त्याच्यासमोर तुम्ही म्हणजे आपल्या सांस्कृतिक मूल्यांचा, परंपरेचा अन् इतिहासाचा नरसंहार करणारे आक्रमणकर्तेच.
अन् ज्या तरुण पिढीच्या नावावर तुम्ही तुमचा हा अभद्र चित्रपट खपवू पाहात आहात ते न करता तुमच्या आलिशान गाड्या अन् वातानुकूलित घरातून बाहेर पडा आणि रस्त्यावर या म्हणजे तुम्हाला कळेल की तरुण पिढीला नेमकं काय हवं आहे. याशिवाय ओम राऊत तुम्ही रामायण सामान्यांना कळतच नाही, हे विधान मध्यंतरी करून ज्या प्रेक्षकांना मूर्खात काढलं होतं त्याच प्रेक्षकांच्या पैशांवर तुम्ही तुमचे हे चित्रपट काढत आहात, हे विस्मृतीत जाऊ देऊ नका. एकूणच काय अतिशय खालच्या थराला जाऊन चित्रपट करून अन् त्याचं प्रमोशन करून तुमच्या या चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा पार केला आहे, पण याहूनही एक मोठा विक्रम तुम्ही रचला आहेत, तो म्हणजे प्रेक्षकांना सर्वात जास्त निराश करणारा अन् संपूर्ण देशाचा अपमान करणारा असा खालच्या दर्जाचा चित्रपट सादर करण्याचा विक्रम.
हे पत्र केवळ तुम्हालाच उद्देशून लिहिण्यामागे कारण म्हणजे दिग्दर्शक हा नेहमी ‘Captain of the ship’ असतो. त्यामुळे या सगळ्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. पुन्हा असा कोणताही चित्रपट काढण्याआधी दहा हजार वेळा तुम्ही विचार करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हो याच तरुण पिढीतील एक युवक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमची ओळख ज्यामुळे आहे अशा श्रद्धास्थानांबद्दल कोणत्याही आधुनिक कलाकृतीची आम्हाला गरज नाही, आम्हाला आमचा इतिहास, परंपरा कशा जतन करायच्या याचे धडे तुमच्यासारख्या कणाहीन लोकांकडून घ्यावेत एवढी वाईट वेळ अद्यापही आपल्या देशावर आलेली नाही. एक कलाकार होण्याआधी एक चांगला माणूस होऊन या गोष्टीवर विचारमंथन करा अन् हा चित्रपट करताना आपल्याकडून झालेल्या चुका लक्षात आल्या असतील तर मोठ्या मनाने, निर्मळ मनाने माफी मागा, प्रेक्षक नक्कीच समजून घेतील.
तुमचाच,
दुखावलेला प्रेक्षक
(टीप : वरील लेखात माझे वैयक्तिक मत आणि विचार मांडण्यात आले आहेत.)