ज्या काळात स्टॅण्डअप कॉमेडी नावाचा प्रकार महाराष्ट्राला फारसा माहीत नव्हता, त्या काळात पु. ल. देशपांडे हे या प्रकारातले ग्रेट एंटरटेनर होते. मात्र, त्यांची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. याशिवाय ते शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, पट्टीचे वक्ते होते. यापैकी कोणती ओळख अधिक ठळक करावी आणि कोणती फिकट करावी, असा प्रश्न सूज्ञ मराठी माणसाला पडू शकत नाही. कारण, ज्यांना पुलं देशपांडे कळलेत तो पुलंच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक धाग्यांपैकी कोणतातरी एकच धागा आपलासा करून बसणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला जे काही पैलू होते, त्या सगळ्याच पैलूंना आलेल्या चकाकीमुळेच पुलं नावाचा हिरा मराठी साहित्य-संस्कृतीमध्ये चमकताना दिसतो. पुलंचे स्मरण दरवेळी त्यांच्या पुस्तकांवरून, सादरीकरणावरून होते, ते करणेही फारच सोयीचे आहे. मात्र, त्यांची वैचारिक, सामाजिक आणि राजकीय भूमिका काय होती? याबाबतची चर्चा फारशी होताना दिसत नाही. ‘हशा-टाळ्या पलीकडचे पुलं’ समजून घ्यायला महाराष्ट्र कमी पडला आहे का, या प्रश्नावर त्यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्ताने विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गांधीवादी-समाजवाद्यांशी वैचारिक नाते

पुलं देशपांडे हे प्रामुख्याने कला क्षेत्राशी निगडीत व्यक्तिमत्त्व असले तरीही राजकारण-समाजकारणापासून विलग करून त्यांचे चित्र डोळ्यांसमोर उभे करता येत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही त्या-त्या काळाचे अपत्य असते. त्यामुळे तिच्यावर त्या काळात घडलेल्या राजकीय-सामाजिक घटनांचा आणि विचारांचाही प्रभाव असणे स्वाभाविक आहे. तिने वेगवेगळ्या गोष्टींबाबत भूमिका घेणेही स्वाभाविक आहे. बरेच लेखक-कलाकार आपली राजकीय-सामाजिक भूमिका काय आहे, हे उघड करणे टाळतात. किमानपक्षी भूमिका घेणे तरी टाळतातच. मात्र, पुलं त्यापैकी नव्हते. आपला जन्म शहरी मध्यमवर्गीय घरात झाला आणि आपली वाढ स्वातंत्र्य चळवळीच्या आणि गांधीजींचे नेतृत्त्व प्रस्थापित होण्याच्या काळात झाली, या त्या दोन गोष्टी पुलंनी वारंवार सांगितल्या आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी सांगितले की, “महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांचा पुलं देशपांडेंवर विशेष प्रभाव होता. दुसरी गोष्ट त्यांची पत्नी ही समाजवादाचा पुरस्कार करणाऱ्या ‘राष्ट्र सेवा दल’ या संघटनेची कार्यकर्ती होती. त्यामुळे या तिघांच्या प्रभावामुळे ते डाव्या आणि गांधीवादी विचारसरणीच्या बाजूला झुकणे स्वाभाविक होते. सुरुवातीची त्यांची कारकीर्द फारशी वैचारिक आणि तात्त्विक अशी दिसत नसली तरीही सुनीता देशपांडेंसोबत विवाह झाल्यानंतर त्यांच्या एकूण जीवन व्यवहाराला हाच विचार जवळचा वाटला.” पुढे ते म्हणाले की, “ते उत्तम कलावंत होते. त्याकाळी त्यांच्यातल्या कलेला उत्तम दाद या लोकांकडूनच मिळत होती. मात्र, त्यांच्या लिखाणातून गांधीवादी-समाजवादी अशी सगळीच मूल्ये पूर्णपणे उमटतात असे दिसत नाही. मात्र, त्यांनी आपल्या कलेतून उपलब्ध झालेले संचित या विचारांकरिताच दिल्याचे दिसून येते. जे आपल्याला करता येत नाही, ते ही मंडळी करत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण इतके करू शकतो, असे म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येते.”

हेही वाचा : या माणसाने आम्हाला हसवले

पुलं देशपांडे यांनी साने गुरुजी, विनोबा भावे, डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, नाथ पै, हमीद दलवाई, राम नगरकर, ग. दि. माडगूळकर इत्यादींचा गौरव केल्याचे दिसून येते. ही सगळी प्रामुख्याने गांधीवादी-समाजवादी-प्रागतिक विचारांचीच माणसे होती. मुस्लीम धर्मात सुधारणा व्हावी म्हणून ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना करणाऱ्या हमीद दलवाईंवर लिहिलेल्या एका लेखात पुलं म्हणतात की, “हमीदला केवळ मुसलमान स्त्रीचेच दु:ख जाणवले होते असे नाही; फक्त त्या स्त्रियांच्या यातनांची त्याला अधिक माहिती होती. त्या स्त्रियांच्या दु:खांना कुठे वाचाच फुटत नाही, ती फोडायला कुणी धजावत नाही याची त्याला खंत होती. वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्याला धर्म या नावाखाली चालणाऱ्या अज्ञानाच्या जोपासनेची आणि अन्यायांची जाण आली होती.” पुढे ते म्हणतात की, “हमीद गेला याचा अर्थ असले दुर्मीळ हात गेले. हमीद अनेक दृष्टींनी अकाली गेला. विरोधकांना त्याला हरवता आले नसते. एका दुर्धर रोगाने ऐन बहरात त्याचे जीवनपुष्प कुस्करून टाकले. या दु:खाबरोबरच भारताच्या जीवनात एक नवे क्रांतिपर्व सुरू होते आहे, अशा काळातले हमीदच्या निधनाचे दु:ख मनाला अधिक यातना देणारे आहे. केवळ मुसलमान समाजाचेच नव्हे, तर साऱ्या भारतीयांचे हे दु:ख आहे. आजवर या ना त्या पूर्वग्रहामुळे एकमेकांपासून दूर राहिलेले भारतातील सामाजिक आणि राजकीय चळवळीचे प्रवाह एकमेकांत मिसळण्याचा एक ऐतिहासिक क्षण आला आहे. अशा क्षणांना पकडून त्यांचे युग करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या हमीदच्या हातांसारख्या हातांची कधी नव्हती इतकी आज गरज आहे. ते सामर्थ्य आता हमीदच्या विचारांतून मिळवावे लागणार आहे.” (संदर्भ : ‘मैत्र’- मौज प्रकाशन गृह, मुंबई / हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार)

राजकारणावर सडेतोड मते

‘राजकारण आणि संस्कृती उत्तरार्ध’ या लेखात पुलं देशपांडे म्हणतात की, “वस्तुतः केवळ राजकारणी लोकांना सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रांत ढवळाढवळ करण्याचा काय अधिकार पोचतो! वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या आहारी जाऊन ‘येन केन प्रकारेण’ निवडणुका जिंकणे व सत्तास्थाने काबीज करणे, हेच ज्यांचे ध्येय, त्यांना नीती-अनीती, धर्माधर्म, सुसंस्कृतपणा, रानटीपणा यांचे कसलेही सोयरसुतक नसते. निवडणुकांचे राजकारण हे केवळ निनैतिकच नसते, तर ते सर्व नैतिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनमूल्यांची पायमल्ली करणारे असते; ही गोष्ट आपल्या देशापुरती तरी आता सिद्ध होऊन चुकली आहे. सांस्कृतिक जीवनमूल्यांची भेसुर विटंबना करणाऱ्या या अशा राजकारणी लोकांकडे जनतेच्या सांस्कृतिक व शैक्षणिक विकासाची जबाबदारी राहू देणे म्हणजे सिद्ध होऊन चुकलेल्या पापाचरणाला अमरपट्टा बहाल करणे होय!”

इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाही आणि बाळासाहेब ठाकरेंच्या ‘ठोकशाही’लाही विरोध

१९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर पुलं देशपांडे त्या विरोधात सक्रिय भूमिका घेऊन उभे राहिले. कलावंताचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य त्यांना प्रिय होते. त्यामुळे त्यांनी आणीबाणीनंतर काँग्रेसविरोधात प्रचारच केला. तत्कालीन परिस्थितीत जसा विरोधी प्रचार त्यांनी काँग्रेसविरोधात केला अगदी तसेच महाराष्ट्रात हिंदुत्ववादी युतीचे सरकार असताना ते ‘ठोकशाही’वरही बोलले होते. “लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा ”लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो’ वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? ‘निराशेचा गाव आंदण आम्हासी’ ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते”, असे वक्तव्य पुलंनी केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हे वक्तव्य आवडले नव्हते. त्या दोघांमधील संबंध एरवी सलोख्याचे असले तरीही पुलंनी केलेल्या वक्तव्याविरोधात बाळासाहेब ठाकरेंनी केलेले वक्तव्यही चर्चेत आले. “झक मारली अन् पुलंना पुरस्कार दिला. आम्ही ठोकशाहीवाले तर आमचा पुरस्कार कशाला स्वीकारता?”, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यांनी पुलंना ‘मोडका पूल’ असेही म्हटले होते. हिंदुत्ववादी विचारसरणीसोबत पुलंचे संबंध कसे होते, याबाबत बोलताना जयदेव डोळे यांनी म्हटले की, “सावरकर आणि देवल दोन हिंदुत्ववादी आणि संघपरिवारातील माणसं सोडली, तर या परिवाराला आपल्यापासून चार हात दूर ठेवणंच पुलंनी पसंत केले. सावरकरांना त्यांनी ऐकलेलं-पाहिलेलं होतं. महाराष्ट्रावर सावरकरांची भुरळ पडलेला तो काळ होता. आता आपल्याला उपलब्ध असलेले सावरकरांच्या कर्तृत्वाचे ऐतिहासिक वस्तुनिष्ठ मूल्यमापन त्या काळात झालेले नव्हते. त्यामुळे पुलं देशपांडे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून एकाच वेळी साने गुरुजींच्याही प्रेमात होते आणि एकाच वेळी ते सावरकरांच्याही प्रेमात होते. कारण या दोघांच्या विचारातील विरोधाभास ७०-८० वर्षांपूर्वी मराठी समाजाला फारसा समजत नव्हता, तो पुलंच्याही स्वभावात आणि वागण्यातही दिसून येत होता.”

हेही वाचा : साने गुरुजी स्मृतिदिन : मातृहृदयी की बंडखोर? ‘रडवे’ साहित्यिक की आग्रही धर्मसुधारक?

पुलं देशपांडे – प्रामुख्याने एंटरटेनर

१९४६-४७ च्या सुमारास साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून आंदोलन छेडले होते. त्यासाठी दहा दिवस प्राणांतिक उपोषणही केले होते. या उपोषणालाही पुलं देशपांडे यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. साने गुरुजींची भूमिका नाटक, पथनाट्य, वगनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे कलापथक सक्रिय होते. या कलापथकाला लिहून दिलेले एक गीतही प्रचलित झाले होते. त्या गीताचे बोल असे होते,
हरिचे प्यारे हरिजन आम्ही आलों हरिचरणी
पंढरिराया राउळिं तुमच्या बसूं धरुन धरणीं ॥
चोखामेळ्याच्या भक्तिची शक्ती आम्हाला
मिराबाईचें घुंगुर चरणीं सखुच्या करताळा ||

साने गुरुजींबद्दल लिहिलेल्या ‘स्वप्न आणि सत्य’ या लेखात पुलं देशपांडे म्हणतात की, “गुरुजींच्या वाङ्मयात केवळ काव्यातलाच निसर्ग आहे असे नाही, त्यांनी विज्ञानाच्या उपासनेला फार महत्त्व दिले आहे. गुरुजींनी म्हटले आहे, ‘विज्ञानग्रंथांची भाषांतरे करा, तुम्हाला प्रतिशब्द मिळाले नाहीत तर ऑक्सिजनला ऑक्सिजन म्हणा; कार्बनला कार्बन म्हणा, पण विमाने उडतात कशी? आकाशापर्यंत लोक कसे जातात, हे मुलांना कळू द्या.”

पुलं देशपांडे यांनी चित्रपटात संत चोखोबांचीही भूमिका केली होती. व्यंकटेश माडगूळकर यांची कथा आणि ग. दि. माडगूळकर यांची पटकथा, संवाद आणि गीते असलेला हा सिनेमा १९५० साली ‘जोहार मायबाप’ आणि १९८१ साली ‘ही वाट पंढरीची’ या नावाने प्रदर्शित झाला होता. पुलं देशपांडेंनी समतेच्या आणि मानवतावादी चळवळीला नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी प्रसंगी राजकीय भूमिका घेण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. देवा-धर्माबाबत वैयक्तिक जीवनात ते नास्तिक आणि निधर्मी होते. देवधर्म व कर्मकांडांत ते कधीही गुंतले नाहीत तसेच कोणत्याही माध्यमातून त्यांचा पुरस्कारही केला नाही. मात्र, तरीही विचारसरणीच्या भिंती ओलांडून ते संपूर्ण महाराष्ट्राचे ठरले. याबाबत बोलताना जयदेव डोळे म्हणाले की, “पुलं देशपांडे सर्वात आधी एंटरटेनर होते आणि एंटरटेनर माणूस हा विशिष्ट वर्गांसाठी काहीही करत नाही. त्यावेळी पुलंना शाहीर अमर शेख, आण्णाभाऊ साठे, शाहीर साबळे असे समकालीन लोक होते. एवढी तीन मोठी व्यक्तिमत्त्वे उघडपणे राजकीय विचारसरणी मांडत होती. त्या काळात दलित आणि बहुजन समाजामध्ये या तिघांचीही लोकप्रियता पुलंहून अधिक होती. मात्र, त्यांच्यासारखी थेट राजकीय भूमिका पुलं मांडत नव्हते. दुसऱ्या बाजूला एंटरटेनमेंट हाच त्यांचा पाया असल्यामुळे त्यालाही थेट राजकारणाचा पाया देणे त्यांना योग्य वाटले नसावे. शिवाय त्यांचा चाहतावर्ग हा ग्रामीण, शेतकरी, कामगार, कष्टकरी नव्हे तर शहरी मध्यमवर्ग होता. हा मध्यमवर्ग समाजवादी असो वा हिंदुत्ववादी असो, तोच त्यांचा चाहतावर्ग ठरला.”

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P l deshpande social political ideology purushottam laxman deshpande marathi writer vsh