भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान पूर्णपणे दिशाहीन झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या गाडीसारखी पाकिस्तानची अवस्था झाली आहे. नेमकं काय करावं, कुठल्या दिशेने जावं हेच पाकिस्तानला समजेनासं झालंय. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून त्यांचे मंत्री बेताल वक्तव्य करत सुटले आहेत. खरतंर कलम ३७० हा भारताचा अंतर्गत विषय आहे. भारतीय संविधानात तशी तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी पाकिस्तानशी काहीही सल्लामसलत झालेली नव्हती. त्यामुळे या कलमाशी पाकिस्तानचा काडीमात्र संबंध नाही. तरीही काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरु आहे.

मूळात जम्मू-काश्मीर हे पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरचं राज्य. तिथे मुस्लीम लोकसंख्या लक्षणीय आणि भारताच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी काश्मीरसाठी काही खास तरतुदी केल्या. या सर्व बाबी पाकिस्तानच्या पथ्यावर पडणाऱ्या होत्या. पाकिस्तानने त्याचा फायदा उचलत काश्मीरचा इतकी वर्ष आयुधासारखा वापर केला. आज मोदी सरकारने कलम ३७० हटवून तेच शस्त्रच निकामी केले. त्यामुळे पाकिस्तानचे खवळणे सहाजिक आहे. काश्मीर संबंधी भारत सरकारने इतका मोठा निर्णय घेण्याआधी पाकचे पंतप्रधान इम्रान खान चर्चेची, संवादाची भाषा बोलत होते. पण आता तेच इम्रान खान पाकिस्तानी संसदेपासून ते जाहीर सभांमधून, मुलाखतींमधून युद्धाचे इशारे देत आहेत.

कालच त्यांनी काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानी संसदेला संबोधित केले. भारताने ऐतिहासिक चूक केली आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न आहेत हे जगाने लक्षात ठेवावे. युद्ध कोणीही जिंकणार नाही. पण त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील असा इशारा इम्रान यांनी दिला. इम्रान खान अलीकडे अणूबॉम्बबद्दल ज्या सहजतेने बोलतायत त्यावरुन ते अणूबॉम्बला सुतळी बॉम्ब समजतात की काय, असं वाटू लागलंय. पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत. उद्या आम्ही त्याचा वापर करु शकतो अशी अप्रत्यक्ष धमकी देऊन इम्रान खान काश्मीरकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आटापिटा करत आहेत.

१९६५ आणि १९७१ लागोपाठ दोन युद्धात पराभव झाल्यानंतर आपण भारताबरोबर जिंकू शकत नाही. हे पाकिस्तान कळून चुकलं. त्यामुळे तिसर युद्ध टाळून भारतावर धाक निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने अण्वस्त्राची निर्मिती केली. १९९८ साली भारताच्या यशस्वी अणूचाचणीनंतर काही दिवसातच पाकिस्ताननेही अणूबॉम्बची चाचणी केली. पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी भारतात दहशतवादी कारवाया केल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देऊ नये म्हणून वेळोवेळी पाकने अण्वस्त्रांची धमकी दिली. २०१६ साली मोदी सरकारने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक आणि त्यानंतर बालाकोटमध्ये एअर स्ट्राइककरुन पाकिस्तानच्या अण्वस्त्राच्या धमकीला भीक घालत नसल्याचे दाखवून दिले. तरीही इम्रान खान अण्वस्त्राचा धाक दाखवत आहेत.

अणूबॉम्ब टाकल्यानंतर हिरोशिमा आणि नागासकीमध्ये काय घडलं?
१९४५ साली अमेरिकेने अणूबॉम्ब काय असतो? त्याची विनाशकारी शक्ती जगाला दाखवून दिली. ६ ऑगस्टला हिरोशिमा आणि ९ ऑगस्टला नागासाकी या जपानच्या दोन शहरांवर अमेरिकेने अणूबॉम्ब टाकले. या हल्ल्यानंतर जपानच्या दोन्ही शहरातील दोन लाखापेक्षा जास्त माणसे मारली गेली. हिरोशिमावर युरेनियम असलेला (लिटिल बॉय) तर नागासाकीवर प्लुटोनियमचा (फॅट मॅन) अणूबॉम्ब टाकण्यात आला. त्यासाठी अमेरिकेने B-29 फायटर विमानांचा वापर केला. पुढच्या दोन ते चार महिन्यांनी या अण्वस्त्र हल्ल्याचे भयावह परिणाम दिसून आले. हिरोशिमामध्ये १ लाख ४० हजारच्या आसपास तर नागासाकीमध्ये जवळपास ७० हजार निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला. पहिल्याच दिवशी निम्मी माणसे मारली गेली.

अणूबॉम्बच्या स्फोटानंतर त्यातून झालेल्या किरणोत्सर्गाने पुढचे काही महिने माणसं मरत होती. अनेकांना कॅन्सर आणि अन्य दुर्धर आजारांनी ग्रासले. अनेक मुले व्यंग घेऊन जन्माला आली. पुढच्या पिढयांवरही या अणूबॉम्बचा परिणाम झाला. तत्कालिन सोव्हिएत युनियनमध्ये असणाऱ्या युक्रेनच्या चर्नोबिल शहरात १९८६ सालच्या एप्रिल महिन्यात अणूभट्टीमध्ये दुर्घटना झाली होती. अणूबॉम्बच्या स्फोटानंतर वातावरण जो किरणोत्सर्ग पसरतो. तितका किरणोत्सर्ग या अणूभट्टीच्या दुर्घटनेतून झाला होता. ही इतकी भीषण दुर्घटना होती कि, ६० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. दोन लाख लोक विस्थापित झाले. संपूर्ण चर्नोबिल शहर आणि आसपासचा परिसर रिकामा करावा लागला. आजही तिथे कोणी राहायला जाण्यास तयार नाही. अणूबॉम्बबद्दल बोलताना इम्रान खान यांनी या साऱ्याच अभ्यास करावा नंतर धमकीची भाषा करावी. कारण अण्वस्त्र हल्ला करणं बोलण्याइतकं सोपं नाही.

Story img Loader