सध्या सगळीकडे एक प्रकरण भलतंच गाजत आहे, मीडिया, सोशल मीडिया.. सर्वांनाच सीमा हैदर प्रकरणाने पछाडलं आहे. सीमा हैदर नावाची कुणी एक पाकिस्तानी बाई आपल्या चार मुलांसोबत आपल्या प्रियकरासाठी भारतात येते. इतकंच नाही तर भारतात येण्यासाठी भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या सीमा अवैध मार्गाने ओलांडते आणि त्या देशांना कळतही नाही. तिची चार मुले आणि ती असे पाच पाकिस्तानी नागरिक अवैध मार्गाने भारतात येतात. केवळ येतात एवढेच नव्हे तर इथे कायमस्वरूपी वास्तव्य करतात… विशेष म्हणजे प्रशासनाला जाग येण्यापूर्वी भारतीय मीडिया आणि स्थानिक त्यांना सेलिब्रेटी ठरवतात. या सगळ्या प्रकरणाला एक गोंडस नावं दिल जात ते म्हणजे प्रेमाचं – ‘गदर’ एक प्रेम कहाणी या चित्रपटाचा दाखला देवून ही बाई भारतात शिरते. या देशात तिचे मोठ्या जल्लोषात आदरातिथ्य होत आहे. या प्रसंगामुळे प्रश्न इतकाच पडतो की भारताच्या सीमा खरंच सुरक्षित आहेत का?

२०२० मध्ये ऑनलाईन पबजी खेळाच्या माध्यमातून २७ वर्षीय सीमा हैदर आणि २२ वर्षीय सचिन मीणा यांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. मार्च महिन्यात या दोघांनी नेपाळमध्ये पशुपती मंदिरात विवाह केला. आणि आता सीमा हैदर आपल्या आधीच्या पतीपासूनच्या चार मुलांसह कोणालाही कानोकान खबर न लागता नवीन संसार थाटायला अवैध मार्गाने भारतात आली आहे. ती भारतात आली. पुढे काय असा प्रश्न निर्माण होतो. एका वकिलाच्या तक्रारीवरून तिला, तिचा भारतीय प्रियकर सचिन मीणा आणि त्याचे वडील यांना अटक झाली आणि जामीनही मिळाला. तिचा आणि सचिन मणीचा गुन्हा इतका क्षुल्लक होता की त्यांना चौदा दिवसाच्या कोठडीची शिक्षा झाली आणि जामीनही मंजूर करण्यात आला. त्या नंतर मात्र नव्या नवरीचे गावकऱ्यांकडून विशेष लाड पुरविले गेले. तिची ‘मुहँ दिखाई’ रसम झाली, तिला शगुन दिला गेला, सासरच्यांकडून घराच्या किल्ल्या तिच्याकडे सुपूर्त करण्याचे व्हिडीओ करण्यात आले. प्रेमाचा आनंद इतका होता की तो गगनात मावेनासा झाला.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Eknath shinde 170 seats mahayuti
विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!

अधिक वाचा : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)

सीमाचे धाडस, प्रेम यांचे कौतुक चहू बाजूने होत आहे. खुद्द ‘गदर’ व ‘गदर २’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याकडून सीमाच्या धाडसाचे कौतुक झाले. आज ती सावित्री, सती, आदर्श भाभी, अशा सगळ्याच विशेषणांनी नावाजली गेली आहे. तिचा आधीचा (कायद्याने आजही) नवरा असणाऱ्या पाकिस्तानी गुलाम हैदरने तिची आणि आपल्या मुलांची मागणी भारत सरकारकडे केली, तिच्या मागणीसाठी पाकिस्तानमधून भारताला धमक्याही आल्या, पाकिस्तान मधील हिंदूंची मंदिरेही याचे निमित्त करून तोडण्यात आली. तरीही सीमा हैदर आणि सचिन आपल्या निर्णयावर ठाम आहेत, आणि ते प्रेम निभावणार असल्याचे सांगत आहेत, तिच्या चार पाकिस्तानी मुलांचाही किराणा दुकानात काम करून उदरनिर्वाह करणारा, महिना १४ हजार कमावणारा सचिन सांभाळ करणार आहे. या अमर प्रेमासाठी देश धोक्यात आला तरी काही हरकत नाही.

सीमाच शिक्षण खरंतर पाचवी पर्यंत झालं आहे. परंतु तिचे कॅमेरा समोरचे वागणे- बोलणे, बोलण्यातील इंग्रजी शब्दांचा प्रयोग हे अनेकांना कोड्यात टाकणारे आहे, तरी हे आजकाल कुणीही करू शकतं म्हणा, त्याप्रमाणे सीमाही करते आहे. ती पाकिस्तान मधील जमीन १४ लाखांना विकून भारतात आपल्या प्रियकराकडे आली आहे. त्यामुळे तिचा त्याग मोठा आहे, असं लोक म्हणतात. म्हणूनच देशाच्या सुरक्षिततेपेक्षा तिचा स्वीकार करणे गरजेचे आहे, असे एका मोठ्या गटाला वाटते. त्याचप्रमाणे सचिन याने कायद्याने भारताचा नागरिक असूनही देशाच्या सीमांच्या सुरक्षतेचा विचार न करता, या पाकिस्तानी सीमाला सगळे कायदे-नियम मोडून आपलसं केलं आहे, तेही समर्थनीयच, असेही या प्रेमकथेच्या समर्थकांना वाटतं.

याच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर काही नावं आणि प्रसंग जरूर नमूद करावेसे वाटतात; सरबजीत सिंग, कुलभूषण जाधव, भारतीय हवाई दलातील पायलट अभिनंदन वर्धमान इत्यादी … नावं तशी बरीच आहेत .. पण त्यातल्या त्यात काही ओळखीची … सरबजीत सिंग हा भारत- पाकिस्तान सीमेवरील एका गावातील सामान्य शेतकरी होता. त्याच्या गावच्याच सीमेवर १९९० मध्ये दारूच्या नशेत चुकून पाकिस्तानच्या दिशेला गेला. त्यावेळी पाकिस्तानच्या सैन्याने त्याला पकडून कराची बॉम्ब स्फोटातील दहशतवादी म्हणून घोषित केले. १९९० पासून ते २०१३ पर्यंत सरबजितने आपले अर्धे आयुष्य आरोपी म्हणून पाकिस्तानमध्ये हालअपेष्टा सहन करत घालवले, त्याच्यापाठी त्याचे कुटुंब उध्वस्त झाले, त्याच्यावरील (कदाचित) प्रेमापोटी त्याची पत्नी शेवटच्या श्वासापर्यंत त्याची वाट पाहात होती, दुर्दैवाने त्यांची भेट झालीच नाही, शेवटी २०१३ साली लाहोर तुरुंगात त्याच्यावर झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

अधिक वाचा : विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?

दुसरं नाव म्हणजे कुलभूषण जाधव, निवृत्त नौदल अधिकारी यांचं, ते पाकिस्तान मध्ये गुप्तहेर म्हणून पकडले गेले आहेत, त्यांच्यावरील गुन्हा अजून तरी सिद्ध झालेला नाही. आजही ते शिक्षा भोगत आहेत. हेही कमी म्हणून की, काय आपण पाकिस्तानने भारतात घडवून आणलेले दहशतवादी हल्लेही (26/11, २६ नोव्हेंबरचा मुंबईवरील हल्ला) सहज विसरतो. कित्येक निरपराध आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सीमा प्रमाणे पाकिस्तानचे असेच काही पाहुणे भारतात काही वर्षांपूर्वी आले होते, त्यातला एक कसाब, पाकिस्तानमधून समुद्रमार्गे भारतात आला होता. पुढे त्याचं वेगळं वर्णन करण्याची येथे गरज नाही. या प्रकरणात फक्त फरक इतकाच की लोकांचे प्राण वाचविण्यासाठी तुकाराम ओंबळेंनी कसाबच्या गोळ्या झेलून शरीराची चाळण करून घेतली पण त्याला सोडले नाही. मेजर उन्निकृष्णन, अशोक कामठे, विजय साळसकर, हेमंत करकरे यांनी आपला जीव गमावला, ते बहुदा फारच क्षुल्लक असावेत, कारण ते सरकारी नोकर होते, त्यांना पगार मिळत होता, ते त्यांचं काम होतं… असं कदाचित या प्रेमकथा समर्थकांना वाटत असावं. या साऱ्यांनी काही विशेष केलं नाही, फक्त देशाचं संरक्षण तर केलं, कदाचित हाच त्यांचा गुन्हा, असंही या प्रेमकथा समर्थकांना वाटतंय. ते कधी प्रेमात पडले नाही …ना कोणी त्यांच्या! पण सीमा आणि सचिन यांचं कर्तृत्त्व देशसंरक्षणापेक्षाही मोठं वाटतंय. देश काय आज आहे आणि… उद्याचं कोणी बघितलंय. Beacause ‘ऑल इज फेअर इन लव्ह अॅण्ड वॉर’
…फक्त शेवटी इतकच लक्षात ठेवण्यासारखं ; ज्या भूटा सिंगच्या सत्य कथेवरून गदर हा चित्रपट तयार करण्यात आला , त्या कथेचा शेवट चित्रपटाप्रमाणे गोड नाही, तो रक्तरंजित, आरोळ्या आणि वेदनांचा आहे. आणि या वेदना व्यक्तीसापेक्ष नसून भारताच्या रक्त ओकणाऱ्या इतिहासाचा तो एक महत्त्वाचा भाग आहेत. सीमा हैदर आणि सचिन यांचे प्रेम खरं मानायचे ठरवलं तर मग प्रश्न असा निर्माण होती की ‘भारतीय सीमेच्या रक्षणासाठी वर्षानुवर्षे रणांगणात शहीद होणाऱ्या हजारो, लाखो सैनिकांच्या सावित्रींचे काय? ज्यांनी देशाच्या प्रेमापोटी आपल्या सौभाग्याची आहुती दिली, आणि त्याच सौभाग्यावरील प्रेमापोटी आजन्म वैराग्य ही स्वीकारले… त्या प्रेमाचं ..त्या त्यागाचं काय ?