सुचित्रा प्रभुणे
थंडीचा जोर वाढत होता आणि चांगलाच काळोखही पडला होता. पण पेंग्विन्सची स्वारी काही बाहेर येण्याची चिन्ह नव्हती. आज दर्शन देणार की नाही, अशी शंका मनात येताच, गाईडने हलक्या आवाजात सूचना दिली की, ते पाहा ते येत आहेत. आणि खरोखरीच आठ ते दहा जणांचा छोट्या पेंग्विन्सचा घोळका बाहेर आला.
एका खासगी कामानिमित ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराला भेट देण्याचा योग आला. याच काळात तिथे लॉंग विकेंड म्हणजेच शनिवार ते सोमवार अशी सुट्टी मिळाल्यामुळे तिथे राहणाऱ्या माझ्या बहिणीने तिथूनच जवळच असलेल्या फिलिप आयलंड या ठिकाणी जाण्याचा बेत आखला. स्वच्छ काळे डांबरी रस्ते, दुतर्फा झाडेच झाडे आणि विशेष म्हणजे शांतेत सुरू असणारी वाहनांची ये-जा. कुठेही साधा हॉर्न नाही. खरं तर हॉर्न नाही या गोष्टीचे राहून राहून आश्चर्यच वाटत होतं.
तेव्हा बहिणीनं सांगितलं की, इथे ड्राईव्हिंगचे काही नियम आहेत आणि जोपर्यंत ते तुमच्या अंगवळणी पडत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला ड्राईव्हिंग लायसन्स मिळत नाही. त्यात विनाकारण हॉर्न वाजवणं हा दंडात्मक गुन्हा आहे. अमुक वेगाने अमुक अंतर राखून ड्राईव्हिंग करणं हा नियम तिथले सर्व लहान-थोर माणसं पाळत होती. माझ्यासारख्या भारतीय मनासाठी हा खूप मोठा सांस्कृतिक धक्का होता, असे समजायला हरकत नाही. कारण आपल्या इथे हॉर्नशिवाय गाड्याच हलत नाहीत. असो.
आमचा दोन तासांचा प्रवास कसा आणि कधी संपला हेच समजलं नाही. आम्ही फिलिप आयलंड्सच्या आमच्या मुक्कामी पोहोचलो. या दोन दिवसांच्या मुक्कामी बऱ्याच कार्यक्रमांची रेलचेल होती. पण मला सर्वांत आकर्षण होतं ते पेंग्विन्स परेड पाहण्याचं.
लहानपणी भूगोल शिकत असताना अंटार्क्टिका धड्यात या पेंग्विन्सची प्रथम ओळख झाली. थंड प्रदेशात राहणारे, काहीशी लांब चोच असलेले काळ्या-पांढऱ्या रंगातील तुकतुकीत कांतीचे, सुबक चालीने चालणाऱ्या या प्राण्याने तेव्हाच मनात घर केले होते. तसा हा प्राणी डिस्कव्हरी वाहिनीतून खुपदा भेटायचा. पण ‘याची देही याची डोळा’ पाहायला मिळेल,ही शक्यताच कमी होती.
ही परेड पाहायला जगभरातून अनेक पर्यटक येतात. ही परेड ज्या बीचवर आयोजित केली जाते, तिथे साधारणपणे २५०-३०० लोक सहज बसू शकतील, अशी आसन व्यवस्था होती. एखाद्या स्टेडियमवर जशी चढत्या क्रमानं बसण्याची व्यवस्था असते, अगदी तशीच इथेही होती. त्या त्या विभागामध्ये कार्यक्रमाचे स्वयंसेवक लोकांना मार्गदर्शन करीत फिरत होते. बीचवर अक्षरश: कडाक्याची थंडी होती. जवळपास आठ ते सहा डिग्री इतकं तापमान होतं. संध्याकाळचे सात वाजले तरी चांगला उजेड होता. जसजसे घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, तसतसे तिथल्या गाईडनं सर्वांना सूचना दिल्या की, साधारणपणे आठच्या सुमारास जेव्हा पूर्ण काळोख होईल, तेव्हा हे पेंग्विन्स आपापल्या समूहासह बाहेर येतील. त्यावेळी कोणीही मोबाईलमधून त्यांचे फोटो काढू नयेत.
कोणत्याही प्रकारच्या शिट्ट्या वा कसलेसे आवाज करून त्यांना घाबरवू नये. ती बाहेर येऊन त्यांच्या त्यांच्या बिळांमध्ये जातील. तर त्यांना तसे जाऊ द्यावे. तुमच्याजवळ एखादा समूह आल्यास शांत राहावे. ते घाबरतील असे कोणतेच वर्तन करू नये. सातत्याने या सूचनांचा मारा होत होता.
थंडीचा जोर वाढत होता आणि चांगलाच काळोखही पडला होता. पण पेंग्विन्सची स्वारी काही बाहेर येण्याची चिन्ह नव्हती. आज दर्शन देणार की नाही, अशी शंका मनात येताच, गाईडने हलक्या आवाजात सूचना दिली की, ते पाहा ते येत आहेत. आणि खरोखरीच आठ ते दहा जणांचा छोट्या पेंग्विन्सचा घोळका बाहेर आला.
आपल्याच मस्तीत होती ही मंडळी. आपल्याला बघण्यासाठी इतका मोठा जमाव ताटकळत बसला आहे, याचं भान नसलेली, आपल्याच मस्तीत मग्न असलेली हे छोटी छोटी पेंग्विन्स पाहणं म्हणजे गोड अनुभव होता. जो तो आपल्या कळपाला धरून होता. हळूहळू एकेक करीत सारी मंडळी बाहेर येऊ लागली. आणि आपल्या बिळाच्या मार्गावर मार्गस्थ होऊ लागली.
नवलाईची गोष्ट म्हणजे, इतके लोक असूनदेखील ‘पिनड्रॉप सायलेन्स’ होता. कुणाच्याच तोंडातून चक्कार शब्द बाहेर पडत नव्हता. कौतुक, आनंद, प्रेम, उत्सुकता सारं काही ज्याच्या त्याच्या नजरेतून व्यक्त होत होतं. १५ -२० मिनिटे त्यांना मन भरून पाहिल्यानंतर हळूहळू स्टेडीअम रिकामं होऊ लागलं.
या स्टेडीअमपासून मुख्य प्रवेशव्दारापर्यंत येण्यासाठी लोखंडी जाळ्यांचा एक लांबलचक पूल होता. या पुलाच्या सभोवताली असलेल्या दगडांच्या जागेत पेंग्विन्सची असंख्य बिळं होती. या पुलावरून चालताना अगदी जवळून त्यांचं दर्शन होत होतं. इथे मोबाईलमधून फोटो काढण्याची मुभा होती. इथेही तिच स्वयंशिस्तता. शांतपणे त्यांचे फोटो घेणं, त्यांच्या हालचालींचं निरीक्षण करणं, कुठेही गडबड नाही की त्यांना कोणत्या प्रकारे घाबरविणं नाही.
अगदी छोटी मुलेदेखील कोणताही आरडाओरडा न करता मस्तपैकी त्यांचं निरीक्षण करीत चालत होती. इथे प्रत्येकाजवळ पाण्याची बाटली होती. पण हे पाणी पेंग्विन्सच्या अंगावर उडवावं, अशी मजा करण्याचा विचारदेखील कुणाच्या मनात आला नाही. त्याचवेळी मनात सहज विचार आला, आपल्याकडे घडेल का कधी असं?
आता हेच बघा ना, आपल्याकडेदेखील अभयारण्यात पर्यटकांसाठी खूप सूचना दिलेल्या असतात. येथील प्राण्यांना त्रास होईल, असं कोणतंही वर्तन करू नका. पण आपण किती गांभीर्यानं ते पाळतो? उलट एखाद्या प्राण्याला शिट्टी मारून कसा त्रास दिला वा कशा पद्धतीनं त्यांना डिवचलं यात आपला आनंद जास्त असतो. बघा ना, रस्त्यावर एखादा भटका कुत्रा शांतपणे बसला असेल तर त्यानं काहीही केलं नाही तरी त्यांना लाथ मारण्यात खूप जणांना आनंद होत असतो. असो.
पेंग्विन्सच्या या परेडनं स्वप्नपूर्तीचा तर आनंद दिलाच, पण एखादा जमाव इतक्या शांतपणे एखाद्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकतो, याची अविस्मरणीय नोंद मनात ठेवत आम्हीही तिथून निघालो.
suchup@gmail.com