– चंदन हायगुंडे
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी (भाजप)चे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून स्वतः पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील येथून निवडणूक लढविणार हे जाहीर झाले. शिवसेना भाजप युती असताना हा मतदारसंघ शिवसेनेकडे असायचा. यावेळी मात्र युती होऊनही हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे ठेवल्याने सेनेतील इच्छुकही नाराज होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत इच्छुक व त्यांचे समर्थक राजकीय कुरघोड्या करणे नवल नाही.
मेधा कुलकर्णींचे तिकीट कापल्याचे निमित्त साधून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे (जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत) यांनी पत्रकारांना मेसेज पाठवून त्यात म्ह्टले कि “पुणे शहरातील ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपाच्या बरोबर राहिला आहे…. असे असून सुद्धा कोल्हापूर येथील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणारी, दादोजी कोंडदेव आणि गडकरी यांच्या पुतळ्यांना न्याय न देणारी अशी पुण्याबाहेरील ब्राह्मणद्वेष्टी व्यक्ती जर पुण्यातून उभी राहत असेल तर ब्राह्मण समाज त्याला विरोध करणार. जातीचे राजकारण करून आरक्षणाचं राजकारण करून खुल्या वर्गातील लोकांना सर्वच संधी नाकारणाऱ्या पक्षाबरोबर जायचे का नाही याचा विचार करावाच लागेल. गरज पडलीच तर उमेदवार सुद्धा उभे करू ब्राह्मण महासंघाकडून”
या मेसेज मधून चंद्रकांत पाटलांना “ब्राह्मणद्वेष्टी व्यक्ती” ठरविणाऱ्या या ब्राह्मण महासंघाची भूमिका केवळ राजकीय नसून जातीवादी आहे हे समजायला फार डोकं लागत नाही. सदर ब्राह्मण महासंघ राजकीय पक्ष नाही. परंतु कसबा मतदारसंघातून भाजपाने मुक्ता टिळक यांचे नाव जाहीर केले तेंव्हा यांच महासंघाच्या व्यक्तीने मीडियाला पाठवलेला मेसेज असा, “कोथरूड तर आहेच पण वेळ आलीच तर कसबा पण लढू . मुक्ताताईंच्याच कारकिर्दीतच गडकरी पुतळा तोडला गेला …तो आठ दिवसात पुन्हा बसणार होता. असे अनेक विषय आहेत कि जेथे भावना दुखावल्याच गेल्यात आमच्या ….”
या मेसेज मधून या ब्राह्मण महासंघाचा आपण केवळ ब्राह्मणेतर उमेदवाराचा विरोध करीत नाही तर समाज बांधवांशी संबंधित मुद्द्यांच्या आधारे भूमिका मांडत आहोत असे भासविण्याचा प्रयत्न दिसून येतो. परंतु समाज मूर्ख नाही. राजकीय कुरघोड्या करताना त्याच्याआडून संकुचित जातीवादी भूमिका घेण्याचा छुपा डाव समजून घेणे कठीण नाही.
एकीकडे असा जातीवादी डाव खेळायचा आणि दुसरीकडे जातीवादाच्या विरोधात प्रखरपणे काम करणारे विज्ञाननिष्ठ क्रांतिवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कोणी आक्षेपार्ह मत व्यक्त केले तर या ब्राह्मण महासंघाचे लोक त्याचाही तीव्र निषेध करताना दिसतात. या ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे स्वतःला “हिंदुत्ववादी” म्हणवतात मात्र प्रत्यक्ष कृतीत हिंदुत्व चळवळीतील “सर्व हिंदू बंधू बंधू” या विचाराच्या विरोधात जाऊन भूमिका मांडतात. हा विरोधाभास म्हणजे एक “जातिभेदाचा मानसिक रोग” आहे जो सावरकरांच्याच विचारांच्या माध्यमातून समजून घेऊ.
“पोथीजात जातीभेदोच्छेदक सामाजिक क्रांती घोषणा ! तोडून टाका या सात स्वदेशी बेड्या” या लेखात सावरकर म्हणतात, “… आज आपल्या हिंदुंत जन्मजात म्हणून म्हणविला जातो तो जातीभेद निव्वळ पोथीजात आहे. (मद्रासी ब्राह्मणापेक्षा महाराष्ट्रीय चांभार गोरे असतात. महारात चोखामेळा सारखे संत नि डॉ. आंबेडकरांसारखे विद्वान निपजतात तर उत्तर हिंदुस्थानातील शेकडो ब्राह्मण पिढीजात शेतकीचा धंदा करता करता निरक्षरचे निरक्षर राहतात… ) कोणतीही जन्मजात खरी खरी अशी विशिष्ट उच्चता अंगी नसताही, ‘उच्च जात’ म्हणून एक जुनाट पाटी ठोकलेल्या घरात जन्मला म्हणून हा ब्राह्मण, हा क्षत्रिय ! ही वस्तुस्थिती यथार्थपणे वक्तविण्यास्तव आम्ही “पोथी जात’ हा शब्द बनविला. आजचा जातीभेद हा जन्मजात म्हणविला जात असला तरी तो जन्मजात नसून आहे निव्वळ पोथीजात ! निव्वळ मानीव, खोटा ! यास्तव कोणतीही जात वा व्यक्ती केवळ अमक्या पोथीजात गटात गणली वा जन्मली एवढ्यासाठी उच्च वा नीच मानली जाऊ नये. ज्याची त्याची योग्यता त्याच्या त्याच्या प्रकट गुणावरूनच काय ती ठरविली जावी. आणि त्या स्वभावाचा गुणविकास होण्याची संधी सर्वास समतेने दिली जावी” याच लेखात सावरकर म्हणतात “पोथीजात जातीभेद हा एक मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही कि तो झटकन बारा होतो.”
हे विचार समजून घेतल्यास स्वतःला सावरकरवादी म्हणविणारे लोक जेंव्हा संकुचित आणि जातीवादी भूमिका मांडतात तेंव्हा सावरकरांच्याच भाषेत ते जातीभेदाच्या मानसिक रोगाने ग्रस्त आहेत असे म्हणावे लागेल. सावरकरांना आदर्श मानणाऱ्यांनी या मानसिक रुग्णांचा निषेध करायला हवा. अन्यथा सावरकरांबाबत आक्षेपार्ह मताचा विरोध करणारे सावरकरांचेच अनुयायी सावरकरांच्या विचारांच्या अवहेलनेस कारणीभूत ठरतात असे म्हणावे लागेल.
विविध महापुरुषांनी आणि त्यांच्या अनुयायांनी विविध चळवळीतून जातीवादाच्या विरोधात जे काम केले आणि आजही करीत आहेत त्याचा परिणाम म्हणून आपला समाज जातीवाद संपविण्याच्या मार्गावर अनेक पाऊले पुढे आला आहे. परंतु अजूनही खूप काम बाकी आहे. कधी राजकारणातून तर कधी जातीय अत्याचाराच्या घटनांतून आजही जातीवादाचे भयावह स्वरूप अनुभवास येते.
“जातीव्यवस्थेचे निर्मूलन” मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “जात ही एक जाणीव आहे. एक मानसिक अवस्था आहे. म्हणूनच जातीचा विध्वंस म्हणजे भौतिक अडथळ्यांचा विध्वंस नव्हे. जातीविध्वंस याचा अर्थ जाणिवांमध्ये बदल असा आहे.” डॉ. आंबेडकरांचे हे विचार अत्यंत समर्पक आहेत. जातीमुक्त समाज निर्माण करण्यासाठी मनातून आणि व्यवहारातही आपल्या जाणिवांमध्ये बदल घडवून जातीवादाचा मानसिक रोग नष्ट करणे गरजेचे आहे.