Indian Cinema History : १४ मार्च १९३१ रोजी सकाळी नऊ वाजता मुंबईमध्ये मॅजेस्टिक सिनेमागृहाच्या बाहेर प्रचंड जनसमूह उसळला होता. औचित्य एकच होते ते म्हणजे भारतातील पहिला बोलपट ‘आलम आरा’ हा प्रदर्शित होणार होता. भारतीय सिनेमासृष्टीतील हा पहिलाच दृकश्राव्य सिनेमा ठरणार होता. या कलाकृतीचा आनंद लुटण्यासाठी शेकडोच्या संख्येने लोकांनी हजेरी लावली होती. प्रसिद्ध अभिनेत्री झुबैदा व मास्तर विठ्ठल यांच्या अप्रतिम अदाकारीने साकारलेला हा अजरामर सिनेमा तब्बल आठ आठवडे सुपरहिट ठरला. सिनेमाचे कथानक पारसी लेखक डेव्हिड जोसेफ यांच्या कादंबरीतील राजकुमार व बंजारा युवती यांच्या प्रेमकथेवर आधारित होते. कथानक उत्तम होतेच, परंतु या सिनेमाचे खरे श्रेय जाते ते अर्देशीर ईराणी यांना. दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली भारतातील पहिला मूक चित्रपट तयार करून भारतीय सिनेमासृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर अनेक चित्रपट तयार झाले व गाजलेही. आता गरज होती ती पुढच्या वाटचालीची. जगाच्या इतिहासात मूक चित्रपटांचा काळ सरून पडद्यावरची चित्रे बोलू लागली होती. भारतातही अशा क्रांतिकारक बदलाची गरज होती व त्या दिशेने पहिले पाऊल टाकले ते अर्देशीर इराणी यांनी. आलम आराच्या रूपाने घडून आलेला हा दृकश्राव्याचा खेळ भारतीय सिनेसृष्टीतील इतिहासात सुवर्णाक्षरांत लिहिला गेला.
आणखी वाचा: विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?
कळसूत्री बाहुल्या म्हणजे सूत्राच्या आधारे त्यांची हालचाल करून सूत्रधार पडद्यामागे राहून पडद्यावर एखादा प्रसंग, कथा, नाट्य रंगवतो. सूत्रधार म्हणजे ‘जो दोरीने नियंत्रण करतो’, इकडे सूत्र म्हणजे दोरी असा अर्थ होतो. भारतीय संस्कृतीतील प्राचीन रंगमंच ज्या संस्कृत नाटकांनी गाजवला, त्या नाट्यसंस्कृतीचे मूळ या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात आहे, असे अभ्यासक मानतात. विशेष म्हणजे भारतीय सिनेसृष्टीच्या विकासाला याच भारतीय संस्कृत नाट्यभूमीची पार्श्वभूमी आहे. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात दृक व श्राव्य यांचे एकत्रित वापराचे तंत्र सिनेसृष्टीत विकासित झालेले नसले तरी, भारतीय कलामंचाला दृकश्राव्य खेळाचा प्रदीर्घ असा इतिहास आहे. कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात असणारा सूत्रधार हा पुढे संस्कृत नाटिकांचा केंद्रबिंदू ठरल्याचे दिसते. संस्कृत भाषेचे व भारतीय संस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक रिचर्ड पिशेल यांनी आपल्या ‘होम ऑफ पपेट प्ले’ या ग्रंथात भारताचा उल्लेख ‘कळसूत्री बाहुल्यांचे माहेरघर’ असा केला आहे.
या प्राचीन कळसूत्री बाहुल्यांचा इतिहास जगाच्या पटलावर जवळपास ४५०० वर्षे इतका मागे जातो. या खेळाचे जुने पुरावे इजिप्त, मेसोपोटेमिया, सिंधू अशा प्राचीन संस्कृतींच्या गर्भात दडलेले आहेत. भारतापुरते सांगायचे झाले तर, सिंधू संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक पुरातत्त्वीय स्थळांवर मातीची खेळणी, लहान मुखवटे, मातीपासून तयार केलेल्या लहान मूर्ती सापडल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील काहींना दोन्ही बाजूंनी छिद्रे असून त्यातून सूत्र टाकून ती कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे हलविण्याची सोय आहे. याशिवाय अनेक प्राचीन भारतीय साहित्यात कळसूत्री बाहुल्यांचे संदर्भ सापडतात. नृत्य, नाट्य यांसोबत मुखवटे व बाहुल्यांची रंगरंगोटी करून नाट्यप्रदर्शनाचे दाखले हे साहित्य देते.
आणखी वाचा: २००० वर्षांपूर्वी स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी मराठी आद्य राणी ‘नागनिका’
कळसूत्री बाहुल्यांचा रंगमंच
किंबहुना प्रसिद्ध मौर्य सम्राट अशोक याच्या शिलालेखांमध्ये कळसूत्री बाहुल्यांच्या रंगमंचाचा उल्लेख सापडतो. तत्कालीन समाजात केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर एखादा धार्मिक-सामाजिक संदेश देण्यासाठी या खेळाचा वापर केला जात होता. याचे पुरावे बौद्ध भिक्खूनींनी रचलेल्या ‘थेरीगाथां’मध्ये सापडतात. थेरीगाथेतील कथेनुसार सुभा नावाची एक रूपवान बौद्ध भिक्खूनी होती. तिच्या रूपावर भाळून एका श्रीमंत तरुणाने तिला उंची वस्त्रे देऊ केली. एखादी बाहुली सांधे व धाग्यांवर नाचते त्याचप्रमाणे हे शरीर नश्वर आहे, या बाह्य, तरुण, सुंदर शरीराचा मोह धरू नकोस. माझा नाद सोड. हा आध्यात्मिक संदेश त्या तरुणाला पटवून देण्यासाठी सुभाने कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाची मदत घेतली होती, असा संदर्भ थेरीगाथेमध्ये आहे.
याशिवाय कळसूत्री बाहुल्यांच्या रीतसर तंत्रज्ञानावर प्रकाशझोत टाकण्याचे काम वात्स्यायनाच्या ‘कामसूत्रा’ने केले आहे. कामसूत्रात विविध प्रकारच्या बाहुल्यांचा उल्लेख आलेला आहे. त्यात प्रामुख्याने लाकडी, मेणाच्या, धाग्याच्या, हस्तिदंताच्या, पिठाच्या, मातीच्या बाहुल्यांचा उल्लेख आहे. त्याच बरोबर बाहुल्या नियंत्रण करण्यासाठी बाहुल्यांच्या आतील यंत्र-तंत्राचा सविस्तर उल्लेख ‘कामसूत्र’ करते.
रोबो आणि कळसूत्री बाहुल्या
किंबहुना उपलब्ध पुराव्यांनुसार भारतातून अनेक आशियाई देशांमध्ये ही कला पोहचली व बहरलीही. जपानसारखा देश आपल्या रोबोटिक्स आणि अॅनिमेशन क्षेत्रातील प्रगतीचे श्रेय या कलेला देतो. परंतु भारताच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या स्वरूपांत, रंगात असलेल्या व हजारो वर्षांची परंपरा व संस्कृती जोपासलेल्या या दृकश्राव्य कलेचे अस्तित्व मात्र याच देशात सध्या धोक्यात आले आहे.