सासाऱ्यांनी चाकरी केली, पतीने चाकरी केली पण माझा मुलगा ते करणार नाही असं शिवाजींच्या जन्माआधीच ज्यांनी ठरवलं आणि तेव्हापासून शिवाजींना घडवण्यास सुरुवात करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. ‘शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी’ असं म्हणतात कारण आपल्या घरात ‘जिजाऊ’च नाहीय. शिवाजी होणं जेवढं कठीण होतं त्याहून कठीण जिजाऊ होणं आहे. जिजाऊंनी ठरवलं म्हणून शिवबा घडला. शिवजी खूप मोठे झाले कारण जिजाऊ त्यांच्याहून मोठ्या होत्या. शिवाजी जेव्हा सुभेदार म्हणून पुणे परगण्यात आले तेव्हा जिजाऊ शिवबांना कारभार चालवण्यासाठी एक ठराविक रक्कम देत. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, पॉकेटमनी देत. पण ते पैसे परगण्याचा खर्च चालवण्यासाठीच दिले जायचे. त्यातच शिवाजी महाराजांना सगळं ‘मॅनेज’ करायचे. म्हणजे अगदी प्रजेला दुष्काळाच्या काळात द्याव्या लागणाऱ्या नुकसानभरपाईपासून ठरलेले खर्च सगळंच कागी. बरं हे सर्व मॅनेजमेंट महाराज कितव्या वर्षी करत होते तर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी. तीन वर्षांपर्यंत हा अशाप्रकारे सर्व डोलारा संभाळत शिवबांनी कारभार चालवला मग पंधराव्या वर्षी जेव्हा त्यांनी रायरेश्वरासमोर शपथ घेतली तेव्हा कुठे त्यांची या ‘पॉकेटमनी’ प्रकारातून सुटका झाली. गंमतीचा भाग वगळता वयाच्या बाराव्या वर्षापासून पैसा कसा वापरावा हे मुलाला शिकवणारी जिजाऊ कुठे आणि आज ‘पॉकेटमनी’ ही परदेशी कन्सेप्ट वाटणारे आई-बाबा कुठे. आज अनेकांना ‘मॅनेजमेंट’ शिकण्यासाठी मॅनेजमेंट कोर्सेस करावे लागतात. पण मॅनेजमेन्ट कोर्स पुर्ण करुन नाही शिकता येतं ते असं आचरणात आणून शिकवावं लागतं हे जिजाऊंना ठाऊक होतं म्हणून आपला राजा मोठा झाला.
शिवाजी महाराजांवरील कोणतही पुस्तक वाचलं अगदी कादंबऱ्यांपासून ते ज्यावरुन वाद उद्भवला असं ‘शिवाजी कोण होता?’ असं कोणतही पुस्तकं वाचलं तरी कळेल तरी समजेल शिवाजी महाराजांच आयुष्य पुस्तक असेल तर जिजाऊ ते पुस्तक लिहीणारी शाई होती.
जिजाऊ जेवढ्या हळव्या होत्या तितक्याच त्या कणखरही होत्या. यासंदर्भातील अनेक दाखले इतिहासात सापडतील. खास करुन महाराज आग्र्यात अडकलेले असतानाची जी वर्णने आहेत त्यावरून जिजाऊंमधील हळवी आई आणि कणखर राहून राज्यकारभार करणारी राज्यकर्ता अशा दोन्ही बाजू एकाच वेळेस दिसून येतात. खरं तर असं बॅलेन्स राहाणं खूप कठीण असतं, म्हणजे एकीकडे आपल्या पोटच्या पोराची काळजी दुसरीकडे राज्यकारभार पाहायचा. बरं हे सगळं करत सर्वांना धीर देत लढत राहायचं. बाकी सगळं बाजूला राहू द्या केवळं असा एखादा प्रसंग आपल्यावर ओढावला तर हे जिजाऊसारखं ‘अंडर टेन्शन’ असतानाही मल्टीटास्कींग पद्धतीने एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत राहणं आपल्याला जमेल का इतकाच विचार करा.
शिवाजी महाराज वयाच्या बाराव्या वर्षापासून नावाआधी छत्रपती लावायचे. या ‘छत्रपती’वरील छत्र म्हणजे जिजाऊच. म्हणूनच जिजाऊ समजल्या की महाराज सहज समजतात पण जिजाऊ समजून घेणं येड्यागबाळ्याचं काम नाही.
राजमाता जिजाऊ यांना कोपरापासून ढोपरापर्यंत दंडवत घालतं जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…