श्रुति गणपत्ये
कोणतच क्षेत्र वाद-विवादांपासून दूर नसतं. महत्त्वाचं असते ते वाद कोणत्या विषयावर होतोय आणि त्यातून काही चांगला बदल होऊन समाज पुढे जातोय का? सध्या या सोनी लिव्ह ओटीटी प्लॅटफॉर्मवर “अ‍ॅनी बोलिन” ही मालिका सुरू आहे आणि त्यानिमित्ताने वर्णभेदाचा वाद पुढे आला आहे. ही गोष्ट इंग्लंडचा राजा हेन्री-८ च्या दुसऱ्या बायकोची आहे. पहिली बायको असताना अ‍ॅनी बोलिनशी लग्न करण्यासाठी चर्च परवानगी देत नाही म्हणून चर्च व्यवस्थाच रद्द करण्याचे धाडसी पाऊल राजा उचलतो त्याला खरंतर मुलगा म्हणजे वारस पाहिजे होता. पण त्याच्या एकूण सहा लग्नांतून तो मिळाला नाही. त्यात अ‍ॅनी ही आपलं अस्तित्व टीकवण्यासाठी कट-कारस्थान करणारी म्हणून इतिहासात ओळखली जाते. पण वाद पुढे आहे. अ‍ॅनी ही ब्रिटीश राणी होती अर्थात वर्णाने गोरी. पण या मालिकेमध्ये वर्णाने काळ्या असलेल्या जुडी टर्नर स्मिथ या अभिनेत्रीने तिचं काम केलं आहे. त्यामुळे ऐतिहासिक गोष्टी चुकीच्या दाखवल्याचा आरोप करत अनेक प्रेक्षकांनी यावर आक्षेप घेतला. गोरी राणी काळी का दाखवली, असा वाद सुरू झाला आहे. त्या काळामध्ये कृष्णवर्णीयांचा समाजामधली दर्जा खूपच खालचा होता. त्यांच्या संघर्षाची कहाणी सर्वश्रुत आहे. पण किंग हेन्री-८ च्या काळामध्ये कृष्णवर्णीय नव्हतेच असं मूळीच नाही. उलट मिरांडा कौफमन या इतिहास संशोधक महिलेने “ब्लॅक ट्यूडर्सः द अनटोल्ड स्टोरी” नावाचं पुस्तक लिहून हेन्रीच्या काळामध्ये कृष्णवर्णीयांचं अस्तित्व काय होतं याचं वर्णन केलं आहे.

अर्थात हा वाद पहिल्यांदाच झालेला नाही. याआधी नेटफ्लिक्सवर “ब्रिजरटन” नावाची मालिका आली होती. त्यात प्रमुख सरदाराची भूमिका करणारा अभिनेता रेगे जॉन पेज हा काळ्या वर्णाचा आहे. इंग्लंडचा जो काळ त्या मालिकेमध्ये दाखवला आहे त्या काळात काळ्या लोकांना सरदार पद मिळत नव्हतं त्यामुळे हे चुकीचं असल्याचा आक्षेप अनेकांनी घेतला होता. त्यावर नेटफ्लिक्सचं उत्तरही चांगलं होतं. आमचे कार्यक्रम सर्वसमावेश करण्यासाठी “कलर ब्लाइंड कास्टिंग” म्हणजे कोणत्याही वर्णभेदाशिवाय कलाकारांची निवड केल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

“कलर ब्लाइंड कास्टिंग” या संकल्पनेवर हॉलिवूडमध्ये गेली अनेक वर्ष चर्चा, वाद-विवाद सुरू आहेत. अभिनेत्याचं काम महत्त्वाचं की त्याचं दिसणं? कारण वरील दोन्ही मालिकांमध्ये कृष्ण वर्णीय राणी किंवा सरदार त्या काळात नव्हता हे सगळ्यांना माहित आहे. पण या दोघांची कामं मात्र उत्तम झाली आहेत. विशेषतः रेगे जॉन पेज हा दिसायलाही इतका हँडसम आहे की ब्रिजरटनच्या दुसऱ्या सीझनमध्ये तो काम करणार नसल्याने अनेक महिला प्रेक्षकांनी खूप हळहळ व्यक्त केली. हा प्रश्न केवळ काळा-गोरा मर्यादीत नाही. वेगवेगळ्या वर्णाचे लोक जगामध्ये आहेत, त्यांचा प्रत्येकाचा इतिहास आहे आणि कथाही आहेत. अमेरिकन समाजामध्ये नोकरी-धंद्याच्या शोधात संपूर्ण जगभरातून लोक जातात आणि त्यांना संधीही मिळतात. अर्थात गोऱ्या लोकांची मक्तेदारी त्याने कमी होत नाही.

हॉलिवूड किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दुनियेतही ही मक्तेदारी कायम आहे. हॉलिवूडमधल्या वर्णद्वेषावर अनेकदा चर्चा होतेच. कारण अनेक वर्ष प्रमुख भूमिका या कायम गोऱ्या नट-नट्यांनाच मिळाल्या आहेत. हॉलिवूडच्या व्यावसायिक चित्रपटांमध्ये हॅली बेरी सोडली तर प्रमुख भूमिका करणारी कृष्णवर्णीय अभिनेत्री पटकन सांगता येणार नाही. केवळ गोऱ्यांच्या कथा असल्याने गोऱ्यांनाच काम या भूमिकेमुळे अनेक कृष्णवर्णीयांना काम मिळणं कठीण होऊन बसतं. अशावेळी नेटफ्लिक्सने किंवा सोनी लिव्हने घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. पण त्यावर अनेकांचा उलट प्रश्नही असतो. असं केल्याने आपण वर्णभेदाचं अस्तित्वच नाकारतो आहोत. मात्र तसं काही होत नाही. वर्णभेद हा वेगवेगळ्या पातळ्यांवर येतोच कधी उघडपणे कधी छुपेपणाने. आता शेक्सपिअरच्या “ऑथेल्लो”च्या भूमिकेसाठी काळ्या अभिनेत्याला घेतलं जातं कारण ती कथा कुरुप ऑथेल्लो आणि सुंदर डेस्डेमोना यांची आहे. त्याला लगेच “रिव्हर्स रेसिझम” म्हणून हिणवलं जातं. पण ऑथेल्लोप्रमाणे अशा किती कथा आहेत ज्यांचा हिरो हा काळा आहे? फारच कमी. त्यासाठी कृष्णवर्णीयांचा इतिहास पुढे आणायला हवा. पण बहुसंख्य गोऱ्या जनतेला अशा गोष्टी बघायला आवडणार नाहीत, अशी कारणं देऊन निर्माते फारशी उत्सुकता दाखवत नाहीत.

आता गंमत बघा, अलीकडेच करिना कपूर खानला रामायणावर आधारित एका चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेसाठी विचारल्याचं कळताच तिच्या नवऱ्याचा धर्म आडवा आला. मुस्लिमाशी लग्न करणाऱ्या बाईने सीतेची भूमिका करायची नाही म्हणत विनाकारण वाद उकरून काढण्यात आला.

भारतामध्ये पूर्वी नाटकांमध्ये महिलांच्या भूमिका पुरुष करायचे तर त्याला प्रचंड मान्यता होती. बाल गंधर्वांसारख्या नटाला डोक्यावर घेतलं गेलं. पण तेच एखादी बाई नुसतं गाणं म्हणायला जरी नाटकामध्ये आली तरी तिच्या चारित्र्याविषयी शंका घेतली जायची किंवा घाणेरडं बोललं जायचं. तिला नाटकात बाईचं काम करण्यासाठीही मान्यता नव्हती. किंवा असा विचार करा की एखाद्या अभिनेत्रीने पुरुषाचं काम केलं तर? तेही स्वीकारलं जाईल का?

काही वर्षांपूर्वी ब्रिटीश अभिनेत्री ग्लेंडा जॅक्सन हिने “किंग लिअर” या शेक्सपीअरच्या नाटकामध्ये स्त्री-पुरुष वादाला छेद देत किंगची म्हणजे पुरुषाची भूमिका केली होती. अनेकांच्या भूवया त्यामुळे उंचावल्या. दोन वर्षांपूर्वी तिने दिलेल्या एका मुलाखतीत यावर उत्तम उत्तर दिलं होतं. ती तेव्हा ८२ वर्षांची होती. ती म्हणाली, “बाळ जन्माला आल्यावर त्याला आपण मुलगा मुलगी असं शिकवतो. पण वय जसं वाढत जातं तसं हा लिंगभेद मिटत जातो.” दोन ऑस्कर आणि दोन एमी पुरस्कारांची ती विजेती आहे. अभिनेत्री केट ब्लँचेट, प्रसिद्ध गायक बॉब डिलनवर आधारित “आय एम नॉट देअर” या चित्रपटामध्ये बॉबची भूमिका करणाऱ्या सहा अभिनेत्यांमध्ये एक होती. या दोघींच्याही स्त्री असण्याने त्यांच्या पुरुषी भूमिकेत अडथळा आला नाही. पण हे अपवाद सहज व्हायला हवेत.

वर्ण, जाती, धर्म, लिंग अशा सगळ्या भेदांना तोडून नवीन काही होऊ पाहत असेल तर त्या बदलाचं स्वागतच करायला हवं. मनोरंजनाचे कार्यक्रम आणि चित्रपटांचा प्रभाव लोकांच्या आयुष्यावर खूप जास्त आहे. त्यातून जर पुरोगामी आणि प्रयोगात्मक भूमिका मांडली जात असेल तर त्याला पाठिंबा द्यायलाच हवा.

shruti.sg@gmail.com