– शेखर जोशी

मुंबईत १२ मार्च १९९३ या दिवशी बारा बाॅम्बस्फोट झालेले असताना ते तेरा झाल्याचे खोटे सांगणारे आता हवाई हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले? ती संख्या किती खरी आहे? त्यावरुन राजकारण करत आहेत.
ज्यांची विश्वासार्हता कधीच रसातळाला गेली आणि सर्वसामान्य जनतेत ज्यांच्याविषयी कायम संशयाची भावनाच आहे ते आता हवाई हल्ल्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत.

मुंबईत खरे तर बाराच बाॅम्बस्फोट झाले होते, पण तेरावा बाॅम्बस्फोट मुस्लिम वस्तीत झाल्याचे आपण त्यावेळी मुद्दामहून सांगितले, अशीही शेखीही ते मिरवतात. कशासाठी हा खोटारडेपणा? हे सांगितल्यामुळे सगळे मुस्लिम दहशतवादी किंवा पाकिस्तान सुधारणार होते का? साहेबांनी आपला हा खोटारडेपणा जाहीर केल्यानंतर राज्यातील तथाकथित बुद्धीवंत, पुरोगामी आणि प्रसारमाध्यमांनी या खोटेपणाचा जाब त्यांना विचारला नाही.
खरे तर साहेबांच्या जवळ असणारे ‘भाई’, ‘पप्पू’ यांचा गळा आवळायला राज्याच्या तेव्हाच्या ‘नाईकां’नी सुरुवात केली होती. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण याच्या विरोधात त्या ‘नाईकां’ ने दंड थोपटले होते.

पुढे ६ डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशिद पाडली गेली आणि मुंबईत दंगल उसळली. यातून राज्याच्या ‘नाईका’ची उचलबांगडी झाली
आणि राज्याची बिघडलेली (की बिघडवलेली) घडी बसवायला ६ मार्च १९९३ रोजी साहेब दिल्लीतून पुन्हा राज्यात परतले आणि १२ मार्च १९९३ ला मुंबईत साखळी बाॅम्बस्फोट झाले.

पण तेव्हाही हे सगळे घडले की घडवून आणले या प्रश्नावरुन साहेबांना कोणी संशयाच्या पिंज-यात उभे केले नाही. या साहेबांना तेल लावलेला पैलवान असे म्हणतात म्हणे, आणि त्यामुळेच हा पैलवान कधीही, कोणाच्याही जाळ्यात सापडत नाही बुवा. खरे काय आणि खोटे काय? ते साहेबांनाच माहिती.
ताजा कलम- राज्याचे आणि देशाचेही सध्याचे ‘नाईक’ या साहेबांना कधी आंजारतात, गोंजारतात. त्यांना जवळ करतात तर कधी दूर लोटतात. स्वतःला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवून घेणारे हे साहेबांबरोबर खेळतात की साहेबांना खेळवतात? कळेल लवकरच.

Story img Loader