-सॅबी परेरा
लग्नाचं बंधन नको म्हणून लिव्ह इन रिलेशिपमधे राहणारं एक जोडपं. पुढे पळून जाऊन आंतर्जातीय लग्न करतं. पण त्यांना मुलांची जबाबदारी नको असते. मुल जन्माला घालण्याबाबत घरच्यांचा दबाव आणि नातेवाईकांचे टोमणे यांच्याशी हे कपल यशस्वी सामना करीत आहे. एक वेळ अशी येते की ते सहज गंमत म्हणून एखादा प्राणी / पक्षी (Pet) पाळायचा ठरवतात. एकदा पेट पाळायचं ठरवल्या नंतर सुरु होते, काय पाळायचं त्या प्राण्याचा / पक्ष्याचा शोध, कसं पाळायचं त्याचं ट्रेनिंग, त्या प्राण्यांच्या सोयीसाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, व्यावहारिक अडचणींमुळे पेट लपविण्याची धडपड, आणि हे करता करता या स्वछंदी जोडप्याचा प्राणी पाळणाऱ्या मालकांपासून, मुक्या प्राण्यांना जीव लावणाऱ्या पालकांपर्यंत होणारा प्रवास.
सोनी लिव्हवरील ‘पेट पुराण’ या वेब सिरीजची कथा ही इतकीच साधी, सोपी, छोटीशी असली तरी तिला दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग यांनी दिलेली ट्रीटमेंट अतिशय हलकीफुलकी आणि अकृत्रिम अशी आहे. अतुलच्या भूमिकेतील ललित प्रभाकर, अदितीच्या भूमिकेतील सई या जोडीचं काम झकास झालं आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री अफलातून आहे. सर्व सह-कलाकारही आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहेत. व्यंकू नावाचा कुत्रा आणि बकू नावाची मांजर ह्यांच्याकडून जो सुंदर अभिनय करवून घेतलाय त्याबद्दल मालिकेचे पेट ट्रेनर्सचं आणि दिग्दर्शक कौतुकास पात्र आहेत.
आई, बाप, पालक होण्यासाठी आपली स्वतःची बायोलॉजिकल मुलंच जन्माला घालणे ही पूर्वअट नसून माया लावता येणे अधिक महत्वाचे आहे असा सुप्त संदेश घेऊन आलेली सहकुटुंब, सहपरिवार पाहता येईल अशी ही सिरीज जरूर पहा.