विश्वास पुरोहित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीची धामधूम संपून मतदानाची घटका काही दिवसांवर आली होती. संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत दुसरा कसला विचार करायला पोपटरावांना उसंतच मिळाली नव्हती. परंतु पत्नीनं अहो, त्या तुमच्या विरोधकाची मुलाखत बघितली मी टिव्हीवर असं सांगितलं नी खाडकन पोपटरावांना जाणीव झाली की अरे आपण अजून एकही मुलाखतच दिलेली नाही. नुसत्या प्रचारसभा घेऊन नी मतदारांच्या घरोघरी जाऊन हल्ली भागत नाही तर टिव्हीवर मुलाखती यायला लागतात, फेसबुक लाइव्ह करायला लागतं तरच नवमतदार किंमत देतो हे मीडिया सल्लागाराचे बोल त्यांच्या कानात घुमायला लागले. खुर्चीवर निवांत बसून पोपटराव गेल्या दोन महिन्यांचा काळ आठवत होते.. उमेदवारी अर्ज भरताना उडालेली तारांबळ आणि मग मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत यातच त्यांचे दोन महिने गेले.. या नादात या मुलाखतींच्या अँगलकडे आपण दुर्लक्ष केल्याचे आणि हातात आता फार कमी वेळ उरल्याचंही त्यांना जाणवलं. पण ही कसर भरून काढायचा आणि मुलाखतीचा धडाका द्यायचा त्यांनी चंगच बांधला आणि मग त्यांनी मुलाखत देणे आहे अशी एक जाहिरातच सोशल मीडियावर पोस्ट करायची ठरवले.

भक्त नी रूग्ण अशा दोन गटांमध्येच राजकीय स्पेस विभागली जाऊ नये अशा मताच्या असलेल्या पोपटरावांनी स्वबळावरच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरवले होते. तिसरी तटस्थ अशीही भूमिका असू शकते हे व या भूमिकेला मानणाराही वर्ग असतो हे भक्त व रूग्ण अशा दोघांना दाखवून देण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. त्यासाठी घेतलेल्या कष्टाचं शेवटचं चरण आता मुलाखतीच्या माध्यमातून करण्याचं त्यांनी ठरवलं खरं, पण मुलाखत कोणाला द्यायची व प्रसारमाध्यमांशी संपर्क कसा साधायचा याचा गंध नसल्याने त्यांनी जाहिरातीचा पर्याय निवडला. प्रस्थापितांच्या युट्यूबवरील मुलाखत बघण्यात अख्खी रात्र घालवल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर जाहिरातीचा मसूदा आला. सध्याच्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती बघून जाहिरात तयार केली असल्यानं यामध्ये केवळ अटींचाच समावेश होता हे सांगायला नकोच.

पोपटरावांची अटीबहुल जाहिरात पुढीलप्रमाणे…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत देणे आहे. मुलाखतीत राजकीय आणि अराजकीय दोन्ही प्रश्न विचारलेत तरी चालतील. तुमच्या असंबंद्ध प्रश्नांशी काहीही संबंध नसलेले उत्तर दिले तर मुलाखत वृत्तवाहिनी, फेसबुक, युट्यूब किंवा किमान व्हॉट्स अॅपवर क्लिपच्या माध्यमातून व्हायरल होते हे माहित असल्यामुळे तशीच उत्तरे मिळतील याची खात्री बाळगावी.

अट क्रमांक १. मुलाखत घेणाऱ्यांना तुम्हाला आंबा खायला आवडतो का असा प्रश्न विचारायचा असेल तर सोबत आंब्याची पेटीही आणावी. मुलाखत आंबा खात खातच देऊ.

अट क्रमांक २. देशाचा विकास, बेरोजगारी, कृषी समस्या, दुष्काळ या देशांतर्गत फुटकळ मुद्द्यांवर प्रश्न विचारण्याऐवजी सैन्य, सर्जिकल स्ट्राइक आणि शेजारी राष्ट्राला कसा धडा शिकवाल, असेच प्रश्न विचारावेत.

अट क्रमांक ३. आई, कुटुंब, शाळा, लहानपणी काय केले, असे प्रश्न जास्त विचारावेत. मी निवडून आलो तर काय करणार हे विचारु नये. कारण मी काय करणार आणि कसे करणार यापेक्षा मी भूतकाळात किती गरीब होतो, हे सांगण्यात मला व ऐकण्यात लोकांना जास्त रस आहे. (मला धक्के द्यायला आवडत असल्याने मी काय बोलणार हे मुलाखत देतानाच कळेल, पण जे काही बोलेन ते व्हायरल मटेरियल असेल याबद्दल निश्चिंत असावे)

अट क्रमांक ४. तुम्ही मराठी पत्रकार असाल आणि तुम्ही अडचणीत आणणारे प्रश्न विचारले तर तुमचा तिथल्या अपमान केला जाईन, तुमची लायकी काढली जाईल इतकंच नाही तर तुमचा कितीही पाणउतारा केला तरी तुम्हाला हा अपमान हसत मुखाने सहनही करावा लागेल कारण हे व्हायरल सत्य आहे.

अट क्रमांक ५. भविष्यकाळात तुमची राजकीय भूमिका काय, असे प्रश्न विचारल्यास चॅनल सोडून जाताय का असं विचारून तुम्हाला मी वर्तमान काळात फरपटत आणिन आणि, भविष्यकाळाची उत्तरं भविष्यातच देईन असं सांगून तुमचा पाणउतारा करु. पत्रकारांची विशेषत: मराठी पत्रकारांची लक्तरं काढलेली लोकांना आवडतात कारण प्रत्येक मराठी माणसाला असं वाटतंच की तो पत्रकारांपेक्षा जास्त चांगला पत्रकार आहे, त्यामुळे त्यांचा पाणउतारा झाल्यावर सगळ्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात… या सीनच्या क्लिप्स सगळ्यात जास्त व्हायरल होतात व त्या अन्य पत्रकारच करतात हे ही लिहून ठेवा.

अट क्रमांक ६. वर इतकं सगळं सांगुनही चिवटपणे जास्तच कोंडी करणारे प्रश्न विचारलेत तर तुम्हीच किती दुटप्पी आहात, तुम्हीच विरोधकांकडून कशी सुपारी घेतलीये, तुम्ही निष्पक्ष पत्रकारिताच करत नाही, अशी आगपाखड करु नी माझ्याबरोबर तुम्हीदेखील कसे हिट व्हाल याची काळजी घेऊच. सकारात्मक वा नकारात्मक प्रसिद्धी महत्त्वाची हे तत्व राजकारणातच नाही तर पत्रकारितेतही लागू पडते हे तुमच्या गेल्या काही वर्षात लक्षात आले असेलच, नसेल आले तर येईल लक्षात!

अट क्रमांक ७. अगदीच शॉक ट्रीटमेंटची गरज आहे, विरोधकांपेक्षा काहीतरी हटके करायलाच पाहिजे अशी वेळ आल्याचं लक्षात आलंच तर प्रसंगी अत्यंत संतापल्याचा अभिनय करत, कॉलर माईकशी ओढाताण केल्याचं नाटक करत मुलाखतीतून निघून जाऊ. निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळी केलेलं पहिलं काम म्हणजे एक महिन्याचा अॅक्टिंगचा क्रॅश कोर्सही मी केलाय. काही राजकारण व अभिनय ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांत इतकी मिसळली आहेत की दोघांना एकमेकांपासून वेगळं करण अशक्य व्हावं… असो तर असा मुलाखतीतून मी निघून गेलोच… तर तोच सीन, तीच वाक्यं, तोच स्टेज केलेला आपल्या वादाचा प्रसंग मुलाखतीचा उर्वरीत काळ दाखवत रहावा… मूळ मुलाखतीपेक्षा अशी मुलाखत जास्त गाजते असा पूर्वानुभव आहे. फक्त यातली एकमेव अट म्हणजे मी कितीही पाणउतारा केला तरी तुम्ही मुलाखत थांबवू शकत नाही कारण त्यामुळे तुमची किंमत कमी होते नी त्यामुळे तिची व्हायरल व्हॅल्यूच कमी होते…

अट क्रमांक ८. या वरच्या गोष्टी सांगितल्यावर हुकूम केल्या की हमखास होणारी गोष्ट म्हणजे मग राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांना एकदम चेव येतो आणि ते ही मुलाखत मागतात. याचा संबंध काय, याचा या निवडणुकीशी तरी संबंध आहे का याचाही विचार न करता ते मुलाखत घेतात कारण मुलाखत ही मुद्याला किती धरून आहे हे या युगात महत्त्वाचं नसून सोशल मीडियावर पसरण्याइतका तित मसाला आहे की नाही हे या राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांना कळलंय हे एक आणखी व्हायरल सत्य… तर अशा राष्ट्रीय स्तरावरील माझ्यासारख्याच साइडिंगला पडलेल्यांनाही मी हसतमुखाने आणि सौम्य शब्दात उत्तर द्यायला तयार आहे. त्यांचा मराठी पत्रकारांप्रमाणे पाणउतारा करणार नाही हे ‘मनसे’ आश्वासनच देतो की. ही मुलाखत हिंदीतून देईन हे वेगळं सांगायला नको.

पोपटरावांनी यशस्वी मुलाखतीच्या यशाचा हमखास मार्ग असलेली ही जाहिरात पोस्ट करुनही दोन दिवस काही प्रतिसाद मिळाला नाही… त्यांनी जेव्हा त्यांच्या मीडिया अॅडव्हायजरला विचारलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अंजनच घातलं गेलं… तो म्हणाला, डर्टी पिक्चरमधला डायलॉग आठवतोय का तुम्हाला पोपटराव…. शरीफोंकी जब इज्जत जाती है, तो सबसे मजा शरीफोंको होता है…. तर मुलाखत यशस्वी होण्याचा हा हमखास मार्ग तुम्ही सांगितलात तो बरोबरच आहे पण तो तुमच्यासाठी नाही तर प्रस्थापितांसाठीच… प्रस्थापित जेव्हा मूर्खासारखे वागतात तेव्हा चर्चेच्या फैरी झडतात, माणूस जेव्हा माकडचेष्टा करतो तेव्हा त्याचं हसं होतं नी माकड जेव्हा माणसासारखं वागतो तेव्हा त्याचं कौतुक होतं. तस्मात, तुमच्यासारख्या भक्त वा रूग्ण यापैकी काहीही नसलेल्या अपक्षानं अशी काही आशा बाळगणंच गैर आहे… मोठमोठ्या चॅनेल्सना मुलाखत देत असल्याची स्वप्न बघणारे पोपटराव एकदम जमिनीवरच आले नी त्यांनी हिरमुसल्या अवस्थेत विचारलं मी मग करू तरी काय आता?

मीडिया अॅडव्हायजर शांतपणे म्हणाला… गेल्या दोन महिन्यांत तुम्ही घेतलेल्या कष्टांची माती झालेली बघण्यासाठी तुम्हाला मतमोजणीच्या दिवसापर्यंत थांबण्याची गरज पडणार नाही ती तुम्हाला मतदानाच्या दिवशीच बघायला मिळेल… तर माझं ऐका! मतदान, सुट्टीला जोडून सोमवारी आलंय… शुक्रवारी वहिनींना घेऊन कुठेतरी फिरायला जा, आणि मीसुद्धा एकदा निवडणुकीला उभा राहिलो होतो आणि जगातल्या या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या जडणघडणीच्या प्रक्रियेत मीदेखील माझं काम केलंय या समाधानात उर्वरीत आयुष्य सुखात घालवा…