– शरद कदम

‘वारी’ हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळा आहे. तोंडाने विठ्ठल नामाचा गजर करीत आणि मनात ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ हा भाव ठेवत दरवर्षी लाखो लोक या सोहळ्यात सामील होतात. कुठल्याही लाभाच्या अपेक्षेने नव्हे, तर एका निर्मळ आणि डोळस भावनेने भक्ती परंपरेशी नाते जोडण्यासाठी हा सहभाग असतो.

bse sensex declined by 236 points
सेन्सेक्सची २३६ अंशांनी माघार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Moshi International Exhibition Center, garbage dump,
पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
international standard exhibition center in Moshi empire of garbage created along boundary walls on all sides of this center
मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?

यंदाची माझी वारी चुकली कारण दोन महिन्यापूर्वी मी माझ्या मुलाकडे इंग्लंडला आलो आहे. इथे बसून ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडीचे’ व्हॉट्सअपद्वारे संयोजन करतो आहे. मी जरी संयोजनात असलो, तरी प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही याची रुखरुख आहेच. माझीही धडपड माझा मुंबईतला मित्र आणि सध्या लंडनला रहात असलेला संतोष पारकर सोशल मीडियातून बघत होता. वारीबद्दलची माझी तळमळ बघून त्याने मला एके दिवशी फोन करून ‘ग्लोबल वारीची’ माहिती दिली आणि इथल्या गटाशी जोडून दिले. यानंतर इंग्लंडमधून माझी ग्लोबल वारी सुरू झाली…

देहूहून तुकोबारायांची आणि आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीची पालखी पंढरीच्या दिशेने निघाली आहे. विठ्ठल हे कष्टकऱ्यांचे दैवत, इतर देव देवतांसारखा नवस ज्याला कधीही बोलला जात नाही. संत परंपरेने उपासना पद्धतीतील कर्मकांडांचे अवडंबर नाकारले. मध्यस्थ नाकारत भक्त आणि पांडुरंगाचे थेट नाते जोडले. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ असे म्हणत ‘कर्म हीच भक्ती’ ही साधी सोपी, पण अतिशय महत्वाची शिकवणही रुजवली.

माणसाने ‘एकदा तरी वारी अनुभवावी’ असे सांगितले जाते. महाराष्ट्रीयन माणूस या वारीत सामील होतोच, पण तो शिक्षण, नोकरीच्यानिमित्ताने महाराष्ट्र सोडून जेव्हा परदेशात जातो तेव्हा त्याला महाराष्ट्रीय सणाचे आणि वारीचे वेध लागतात. दिवाळी, गुडीपाडवा आदी सण इथे परदेशात साजरे होतातच, पण त्याचबरोबर पंढरीची वारी पंढरपूरच्या दिशेने सुरू होते तशी परदेशस्थ महाराष्ट्रीय माणसाची तगमग सुरू होते.

या तगमगीतूनच पुण्यात असताना आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या अनिल खेडकर यांच्या मनात मग ग्लोबल वारीची कल्पना रुंजी घालते आणि ती ग्लोबल वारी इंग्लंडमधल्या आपल्या सहकाऱ्यांबरोबर घेत लंडन शहरात चार वर्षापूर्वी प्रत्यक्षात सुरूही होते.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील अनिल खेडकर हे आता इंग्लडमधील ‘स्टेंस’ येथे राहतात. फार्मास्युटिकल, रेस्टॉरंट आणि रियल इस्टेटच्या व्यवसायात ते आहेत. पंढरपूरचे डॉ. शिवानंद जाधव हे गेली चार वर्ष लंडनमध्ये राहतात. ते आयटी क्षेत्रात काम करतात. संत तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानाची सद्यकालीन प्रस्तुतता या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठातून पी.एच.डी. केली आहे. डॉ. जाधव हे उत्तम पखवाजही वाजवतात. संतोष पारकर हे मूळचे मुंबईकर, गेली २० वर्षे ते लंडनमध्ये राहतात. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याशिवाय लक्ष्मण खाडे, अरुण पालवे, रुस्तम खेडकर, निलेश देशपांडे आणि इतर समवयस्क मित्रांनीही ग्लोबल वारी सुरू करण्यात पुढाकार घेतला आहे.

युके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, केनिया, कतार, कॅनडा, बयुनायटेड अमीरात सारख्या जगभरातील मराठी भाषिक माणसे ग्लोबल वारीच्या माध्यमातून वारीच्या काळात चालत असतात. माझ्यासारखी काही काळापुरती परदेशात आलेली माणसे यात सहभागी होत असतात. मीही पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिवसापासून ‘वॉरीक’ या शहरात दररोज काही किलोमीटर अंतर चालत आहे.

आळंदी ते पंढरपूर हे अंतर २१० किलोमीटरच्या आसपास आहे. ‘कर्म हीच भक्ती’ ही संताची शिकवण अंगी बाणवत आपापली दररोजची कामे करीत, या ग्लोबल वारीमधील सदस्य जिथे राहतात त्या आपापल्या देशात, आपल्या परिसरात दररोज शरीराला जमेल तसे किमान एक किलोमीटर ते कमाल १३ किलोमीटर अंतर ‘हरी मुखे म्हणा’ असा हरिनामाचा उच्चार करीत चालत असतात. यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

दररोज चालणाऱ्या सदस्याची नावे आणि त्यांचे अंतर एका एक्सलशीटमध्ये गोळा केली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी इंग्लंडमधील ग्लोबल वारीचे सदस्य प्रत्यक्ष आणि ऑनलाईनच्या माध्यमातून लंडन सारख्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र जमून वारीचा समारोप करतात. यावेळी इथे जन्मलेल्या आपल्या मुलांसोबत आणून संतांचा समतेचा विचार या तरुण मुलांना समजावून देण्याचा प्रयत्न करतात. संत विचारातील मानवी मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे वारी हे साधन आहे, असे इथल्या बहुसंख्य लोकांना वाटते.

हेही वाचा : VIDEO : महाराष्ट्राची अनोखी परंपरा, वारीत मुस्लीम व्यक्तीने धरला विठ्ठलाच्या भजनावर ठेका अन्…

महाराष्ट्रातील कित्येक वर्षाची वारीची ही परंपरा आता सातासमुद्राच्या पलीकडे नव्या स्वरूपात रुजू पहातेय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर हे पाश्चिमात्य देश पुढे जात आहेत. ‘भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे’ असे विश्वाचे पसायदान मागणारे ज्ञानदेव, ‘सकळांसी आहे येथे अधिकार’ असे ठणकावून सांगणारे संत तुकाराम, ‘काय कवे कैलास’ म्हणजे काम करीत राहिल्याने मोक्ष मिळतो असे सांगणारे बसवण्णा, ‘स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास’ हा विश्वास देणाऱ्या संत जनाबाई या साऱ्या संतांनी मानवी मूल्यांची जोपासना करण्याचा आग्रह धरला. वारीच्या निमित्ताने या परदेशातील महाराष्ट्रीयन माणसांची उजळणी झाली. इथल्या वैज्ञानिक विचारांची जोड देता आली तरी ही वारी सार्थकी लागली.

शरद कदम (वॉरीक, यूके)
संपर्क क्रमांक – ९२२४५७६७०२ (व्हॉट्सअप)

Story img Loader