भारतीय संस्कृतीत पुरुष देवतांपेक्षाही अंमळ अधिक महत्त्व मातृशक्तीच्या उपासनेला आहे. देवीच्या नानाविध रूपांनी भारतीय श्रद्धा परंपरा व्यापलेल्या आहेत. याच देवीच्या अनेक रूपांमधील थोडेसे वेगळे रूप लज्जागौरीच्या रूपात आढळते. या देवीच्या भिन्न स्वरूपामुळे तिला ‘विचित्रा देवी’ असे ही संबोधले जात होते. पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे या देवीच्या प्रतिमांची भरभराट इसवी सन दुसऱ्या ते अकराव्या शतकात अधिक झाली असे दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लज्जागौरी ही मातृदेवता आहे. सृजनाची देवता म्हणून साऱ्या भारतात तिची उपासना वेदपूर्व काळापासून चालू होती. या शक्ती परंपरेचा नेमका उगम कधी झाला. या प्रश्नाचे उत्तर मानवी उत्क्रांतीत सापडते. जगातील कुठलाही प्रदेश असो, मानवी उत्क्रांतीच्या प्रथम टप्प्यात मानवाने त्याला वाटलेल्या अकलनीय घटनांना देवत्त्व दिले. या प्रक्रियेत त्याच्या दृष्टीस पडलेला चमत्कार म्हणजे ‘जन्म’ आणि ‘मृत्यू’. जन्म स्त्री पासून होतो.. ही बाब नक्कीच मानवा करिता कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हती. यातूनच त्याने मातृपूजनाला सुरुवात केली. आणि यातून लज्जागौरीच्या प्रतिमा पूजनास प्रारंभ झाला, असे अभ्यासक मानतात. भारतातील या मातृपूजनाचे सर्वात जुने पुरावे इसवी सन पूर्व ९००० या कालखंडातील आहेत. 

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठवाड्यात तगरपूर येथे उत्खननात याच आगळ्या वेगळ्या देवीच्या प्रतिमा समोर आल्या. या प्रतिमा भाजलेल्या सपाट मुद्रेवर तयार केलेल्या आहेत. या प्रतिमांमध्ये देवीच्या नाभी प्रदेशापासून खालील भागाचे अंकन केलेले असते. या प्रतिमा नग्न असतात. योनीला उत्फुल्लता येण्यासाठी लज्जागौरी या देवीच्या प्रतिमेत दोन्ही पाय बाजूला गुडघ्यात वाकलेले दाखवलेले असतात, काही वेळेस शरीर झुकलेले असते, शिरहीन प्रतिमा असते, ही मूर्ती प्रामुख्याने योनी किंवा गर्भाचे प्रतिनिधित्व करते. या देवीच्या मूर्ती योनी या मातृदर्शक इंद्रियांना उठाव देणाऱ्या आहेत.

आणखी वाचा: भारतीय संस्कृतीत रजस्वला देवीची उपासना सर्वश्रेष्ठ का मानली जाते? आणि कुठे?

कॅरोल रॅडक्लिफ बोलोन (आर्थर एम सॅकलर गॅलरी आणि फ्रीर गॅलरी ऑफ आर्टमधील दक्षिण आणि आग्नेय आशियाई कलेच्या माजी सहाय्यक क्युरेटर) यांनी आपल्या Forms of the Goddess Lajjā Gaurī in Indian Art या १९९२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लज्जा गौरीच्या प्रतिमांविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यांच्या संशोधनानुसार, लज्जा गौरीच्या प्रतिमा भारतात मुख्यतः कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र येथे मोठ्या आढळून आलेल्या आहेत. विशेषत: तेर, नागपूर, कोंडापूर, कौसंबी आणि भिटा या ठिकाणी सापडलेल्या प्रतिमांचे महत्त्व अधिक आहे. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे भारतातील लज्जा गौरी प्रतिमा तयार करण्यासाठी प्रामुख्याने दोन पद्धतींचा वापर केला जात असे, एक म्हणजे मातीच्या साहाय्याने किंवा दगडात कोरलेल्या हाताने बनविलेल्या प्रतिमा असतात तर दुसऱ्या पद्धतीत साच्याचा वापर केलेला असे.

या अशा प्रकारच्या प्रतिमांचा उद्देश काय होता?

अभ्यासकांच्या मते देवीची ही प्रतिमा प्रजननाशी संबंधित आहे. बहुतांश प्रतिमा या पाण्याच्या स्त्रोतांजवळ सापडल्या असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदविले आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्राचीन कलेमध्ये स्त्री शरीरशास्त्र बहुतेक वेळा “मातृदेवते”च्या संदर्भात अगदी सहजतेने स्पष्ट केले जाते, लज्जा गौरीची वैशिष्ट्ये बाळंतपणाशी संबंधित आहेत. भारतात या देवीच्या अनेक प्रतिमा सापडत असल्या तरी, या देवीविषयी प्रतिष्ठित ग्रंथांमध्ये संदर्भ आढळत नाहीत. या मूर्तीचे मूलतः वैशिष्ट्ये म्हणजे योनीच्या दर्शनाला उठाव देण्यासाठी पाय गुडघ्यात दुमडून बाजूला दाखविलेले असतात. या प्रतिमांमध्ये शीर मुद्दाम दाखविलेले नसते. खांद्यांपासून खालच्या भागाचे अंकन केलेले असते. आलंपूर, महाकूट, भीटा येथे सापडलेल्या प्रतिमांमध्ये शिराच्या जागी कमळ दाखविलेले आहे. तर तेर येथे मिळालेल्या एका प्रतिमे बरोबर वृषभ दर्शविलेला आहे.

आणखी वाचा: करवीरनिवासिनी महालक्ष्मीचा निस्सीम भक्त हुतात्मा मुतय्या शिलालेखातून अजरामर!

दक्षिण आशियाई कलेच्या अमेरिकन इतिहासकार स्टेला क्रॅम्रिश यांनी लज्जा गौरीवरील त्यांच्या १९५७ सालच्या शोधनिबंधात, अदितीच्या उत्तानपादा प्रतिमेचे वर्णन केलेले आहे. असे असले तरी या देवीच्या प्रतिमेतील ही अवस्था नेमकी बाळंतपणातील किंवा लैंगिक अवस्थेतील आहे हे सांगणे कठीण असल्याचे काही अभ्यासक मानतात. क्युरेटर रॉबर्ट एल ब्राउन (प्राध्यापक, UCLA ) यांनी नमूद केले आहे की, या देवीच्या प्रतिमा पुरुष जोडीदारांशिवाय दिसतात, कलाकाराचा हेतू लैंगिक कृतीचे सादरीकरण नसून योनीचे प्रदर्शन किंवा मातृत्त्व दर्शविणे हा आहे. बोलोन यांनी महाकूट मंदिराच्या संकुलात ..लज्जागौरी नावाने देवी पार्वतीची काहीशी कुप्रसिद्ध आणि अत्यंत अशोभनीय डोके नसलेली दगडी आकृती असल्याचे वर्णन केले आहे. प्रसिद्ध पुरातज्ञ एच.डी. संकलिया यांनी त्यांच्या १९६० सालच्या शोधनिबंधाच्या शीर्षकातच लज्जा गौरी या नावाचे भाषांतर “निर्लज्ज स्त्री” असे केले आहे. सांकलिया यांच्या मते बौबो नामक विदेशी देवता इजिप्तमधून रोमन संपर्काच्या काळात भारतात आली, ती म्हणजे लज्जागौरी.

प्रसिद्ध अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी नमूद केल्याप्रमाणे महाकूट आणि सिध्दनकोट्टे येथे लज्जागौरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या देवीची उपासना स्त्रिया संतान प्राप्तीच्या हेतूने करतात. वंधत्व असलेल्या स्त्रिया संततीप्राप्तीसाठी महाकुटाच्या देवीला नवस करतात, अशी माहिती देवीकोशकारांनी दिली आहे. तर सिध्दनकोट्टे येथे स्त्रिया देवीच्या योनीला आणि स्तनांना लोणी आणि शेंदूर लावून आपली कूस उजविण्यासाठी देवीची प्रार्थना करतात. नागार्जुनीकोंडा येथे अशाच स्वरूपाची देवीची संगमरवरी प्रतिमा मिळाली आहे. ज्यावर अभिलेख कोरलेला आहे. ती मूर्ती इक्ष्वाकूवंशीय राजा नेहवाल शंतमूल याची पत्नी खंदुवुला या ‘जीवत्पुत्रा आणि अविधवा’ स्त्रीने करविले, असे ब्राह्मी लिपीतील अभिलेखात म्हटले आहे. अभिलेखात ही दोन विशेषणे संतती आणि सौभाग्य यांच्याशी संबंधित आहेत. यावरूनच महाकूट आणि सिध्दनकोट्टे या ठिकाणी लज्जागौरी हे अभिधान प्राप्त झालेली ही देवी सर्वत्र संतती देणारी आणि राखणारी देवता म्हणूनच पुजली जात होती, हे स्पष्ट होते.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shardiya navratri 2023 another different form of devi is uttana mahi lajjagauri svs