२७ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय कथाकथन दिवस म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, स्कॉटलंड आणि युनायटेड किंगडम या देशांमध्ये साजरा केला जातो. २००९ पासून साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचा मुख्य उद्देश हा आपल्याकडील ज्ञान, अनुभव दुसऱ्याला सांगणे आणि अन्य लोकांचे अनुभव, कथा ऐकणे.  कथा सांगणे हेही एक कौशल्य आहे. कथा तयार करणे, ती व्यवस्थित रित्या मांडता येणे आणि समोरच्याला ती ऐकावीशी वाटणे, हा खरंतर कौशल्याचा भाग असतो. या कथा मग आपल्या जीवनातील असतील, पुस्तकातील असतील, साठवणीतल्या असतील. कथांद्वारे प्रबोधन आणि एकत्रित वेळ देणे हे या दिवसाचे प्रयोजन म्हणता येईल. आता हा दिवस जरी परदेशात साजरा होत असला तरी या अनुषंगाने कथाकथनाच्या विस्तृत इतिहास समजून घेणे, औत्सुक्याचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कथेचा उगम

कथेचे मूळ उगमस्थान हे भारतातच आढळते. सर्वसामान्यपणे वैदिक साहित्य हे प्राचीन आणि सर्वात पहिले साहित्य मानले जाते. ऋग्वेद हा आद्य वेद असून त्याला प्रथम साहित्यकृतीचा मान आहे. ऋग्वेदापासून कथेचा जन्म झालेला दिसतो. ऋग्वेदामध्ये आढळणारी संवादसूक्त ही कथाबीजे आहेत. यम-यामी संवादसूक्त, सरमा-पणि संवादसूक्त, विश्वामित्र-नदी संवादसूक्त हे संवाद कथेची उगमस्थाने आहेत. आख्यानकाव्यांची परंपराही ऋग्वेदापासून सुरू झालेली दिसते. इंद्राच्या पराक्रमाचे वर्णन करणारी सूक्ते, वरूण देवतेची महती सांगणारी सूक्ते ही आख्यानकाव्याची सुरुवात आहे. संवादसूक्तांचे विस्तृत स्वरूप म्हणजे ही  सूक्ते आहेत. या सूक्तांमध्ये काही सामाजिक सूक्तेही दिसतात. जसे अक्षसूक्त (१०.३४) द्यूत खेळून ओढवणाऱ्या सामाजिक आणि वैयक्तिक आपत्तींवर हे सूक्त भाष्य करते. यामध्ये सूक्त रचणारा स्वानुभव कथन करून लोकांनी द्यूत खेळू नये, यासाठी विनंती करत आहे.

आख्यानकाव्यांमध्ये कथेला वा मूळ विषयाला रंजक, रोमांचकारी, अद्भुत, प्रशंसापर असे स्वरूप दिले जाते. अशा प्रकारच्या आख्यानकाव्यांना पुराकथेचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामध्ये लोककथा, मिथक यांचे मिश्रण आढळते. उदाहरणार्थ – ऋग्वेदामध्ये पुरुरवा-उर्वशी सूक्त आढळते. हे मुख्यतः संवादसूक्त आहे. याचे अधिक व्यापक स्वरूप शतपथब्राह्मण ग्रंथामध्ये आलेले आहे. पुरुरवा आणि उर्वशी कथेला मिथकाचे स्वरूप यामध्ये दिलेले आहे. त्याच्या पुढे जाऊन कविकुलगुरू कालिदासाने ‘विक्रमोवर्शीयम्’ या नाटकाची रचना केली. या नाटकाची मूळ कथा ही ऋग्वेदातील सूक्तावर आधारित आहे.

ऋग्वेदानंतर कथेची बीजे ही अथर्ववेदामध्ये दिसतात. अथर्ववेदामध्ये इतिहास सांगणारी, मिथक वाटणारी आणि  गाथा या प्रकारची कथासूक्ते आहेत. मनुष्याच्या रोजच्या जीवनावर ही सूक्ते भाष्य करतात. मग, भूमीचे महत्त्व सांगणारे भूमिसूक्त, औषधीवनस्पतींचे महत्त्व सांगणारे सूक्त, जारणमारण सूक्ते, विश्वाची उत्पत्ती सांगणारी सूक्ते आपल्याला अथर्ववेदामध्ये दिसू लागतात.

त्याच्या पुढे ब्राह्मण ग्रंथांमध्ये येणारे कथासाहित्य दिसते. हे साहित्य मुख्यत्वे यज्ञाशी संबंधित होते. त्यातलीच एक कथा ही पुरुरवा-उर्वशी कथा होय. कथेचे दहा प्रकार ब्राह्मण ग्रंथांमध्ये दिसतात. त्यात रात्र आणि पर्वतांसंबंधित कथा खूपच मोहक वाटतात. त्यातील एक कथा ही मैत्रायणी संहितेत दिसते. रात्रीची निर्मिती कशी झाली, हे ही कथा सांगते. एकदा ‘यमा’चा मृत्यू होतो. काही केल्या ‘यमी’ त्याला विसरू शकत नाही. (वेदांमध्ये यम-यमी हे भाऊ-बहीण आहेत.) सर्व देवता अनेक प्रकारे प्रयत्न करतात, परंतु, यमी ‘आजच यमाचा मृत्यू झाला आहे,’ असे सांगून शोक करत असते. तेव्हा देवतांनी रात्रीची निर्मिती केली आणि रात्रीनंतर दुसरा दिवस आला. हळूहळू यमी दुःख विसरली. त्यामुळे ‘दिवस जसे पुढे जातील तसे दुःख कमी होते’ हा मतप्रवाह तेव्हापासून आल्याचे दिसते. पुढे उपनिषद कथा येतात. उपनिषदांमध्ये ज्ञानविचार, ज्ञान मार्ग सांगताना ‘कथा’ हा प्रबोधनाचा मार्ग निवडलेला दिसतो.

रामायण, महाभारत आणि पुराणे यांच्या निर्मितीमध्ये आख्यान, आख्यायिका आणि उपाख्याने यांची निर्मिती झालेली दिसते. लव आणि कुश यांनी प्रभू रामचंद्रांसमोर रामायण गायले, असे म्हटले जाते.  हे आख्यानकाव्यामध्ये येते. सर्वांसमोर कथाकथन करणे, आख्यान आहे. या आख्यान, आख्यायिका आणि उपाख्यांना परिष्कृत रूप  अभिजात संस्कृत साहित्याने दिले. ‘महाभारत’ हा तर उपाख्यानांचा महास्रोत आहे. उपाख्याने म्हणजे एकाच कथेमध्ये अनेक उपकथा येणे. नलोपख्यान, सावित्र्युप्यखान, शकुंतलोपख्यान अशा कथा महाभारतामध्ये येतात. गुणाढ्याची बृहत्कथा हे तर कथेचे आविष्कृत स्वरूप आहे. गुणाढ्याने पैशाची भाषेत बृहत्कथा लिहिल्या, असे उल्लेख सापडतात. ही भाषा पशु-पक्ष्यांनाही समजत असे. त्यामुळे त्याने लिहिलेल्या कथा तो जंगलातील पशु-पक्ष्यांना वाचून दाखवत असे. त्याचे पुढील संस्कृतरूप म्हणजे कथासरित्सागर हे होय. यामध्ये अनेक कथांचा संग्रह दिसून येतो.  इसवी सनाच्या पाचव्या शतकात पंचतंत्र, हितोपदेश यांचीही निर्मिती झाली. नैतिक मूल्ये प्रस्थापित करणे, व्यवहारचतुर बनवणे, समृद्ध बनवणे हे या कथांचे मूळ उद्दिष्ट आहे. इथून कथांचा सुरू झालेला प्रवाह आजही चांदोबा, संभाषणसंदेश, तसेच अन्य संस्कृत मासिकांमध्ये कथालेखन करून अविरत सुरू आहे.

मराठी साहित्यातील कथेचा इतिहास

मराठीमध्ये कथेचा प्रवाह हा महानुभाव साहित्यापासून सुरू झालेला दिसतो. महानुभाव साहित्याला मराठीतील प्रथम साहित्य सर्वसाधारणपणे समजले जाते. महानुभाव साहित्यातील दृष्टांत पाठामध्ये पंथाचे तत्त्वज्ञान सांगताना श्रीचक्रधरस्वामींनी विविध कथास्वरूप दृष्टांत सांगितले आहेत. ‘कठियाचा दृष्टांत’, ‘जात्यंधांचा दृष्टांत’ अशा दृष्टांतांमधून चक्रधरस्वामी कथा सांगताना दिसतात. म्हाइंमभट्टांनीही कौशल्यपूर्ण कथा लीळाचरित्रात सांगितल्या आहेत. मराठीमध्ये प्रथम ‘बालबोध मुक्तावली’ हा भाषांतरित कथासंग्रह सरफोजी राजे यांनी प्रसिद्ध करवून घेतला. त्यानंतर मराठीमध्ये हरिभाऊंची कथा येईपर्यंत भाषांतरित कथांचा  कालखंड दिसतो. यामध्ये पंचतंत्र, हितोपदेश, सिंहासनबत्तीशी या कथासंग्रहांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर, वि. स. नवलकर यांनी भाषांतरित कथासंग्रह प्रसिद्ध केले. हरिभाऊंच्या आधी मराठी कथेला साचेबंद असे रूप नव्हते. सामाजिक अंगापेक्षा अद्भुत आणि नीतिपर कथा सांगण्याकडे मराठी कथेचा कल होता.

या पार्श्र्वभूमीवर हरिभाऊंची स्फूट कथा उठून दिसते. कथेला एक आकार देण्याचे काम त्यांनी केले. एका व्यक्ती, घटना, कुटुंब यावर त्यांची कथा उभी राहते. ‘अपकाराची फेड उपकारानेच’, ‘थोड्या चुकीचा घोर परिणाम’, ‘काळ तर मोठा कठीण आला’ यासारख्या दीर्घ कथा त्यांनी लिहिल्याच, तसेच दोन अंकात संपणाऱ्या पण लघुकथा नसणाऱ्याही कथा त्यांनी लिहिल्या. बोधप्रद लिहिण्यासह कथा वाचकाने आवडीने वाचली पाहिजे, ती त्याला आपलीशी वाटली पाहिजे, यावर त्यांचा भर होता.

१९१० च्या दरम्यान जसे दिवाळी अंक सुरू झाले, तसे मराठी कथेला बोधकथेतून रंजककथेकडे आणण्याचे कार्य सुरू झाले. याचे श्रेय वि. सी. गुर्जर यांना जाते. रंजक अशा दीर्घकथा त्यांनी लिहिल्या.गुर्जर यांच्या काळात अनेक कथालेखक उदयास आले. काहींनी हरिभाऊंचा वारसा पुढे चालवला. भाषांतरित कथेची परंपराही पुढे चालवली. कृ. के. गोखले यांनी रंजकता हाच विशेष आपल्या कथेत ठेवला. नारायण हरी आपटे यांनी रंजकता आणि बोधप्रदता यांचा समन्वय साधला. श्रीपाद कोल्हटकरांनी कल्पनारम्यता यावर कथेत भर दिला, तर कथेला उपरोधिकतेचे स्वरूप शिवराम परांजपे यांनी दिले. 

१९२६ च्या काळात लघुकथेला सुरूवात झाली. वि. स. खांडेकर यांनी लघुकथा लेखन केले असते तरी दिवाकर कृष्ण यांच्या लघुकथा अधिक प्रसिद्ध झाल्या.

रंजकतेला एक साचेबंद रूप लघुकथेने दिले. ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकर यांच्या युगाला ‘लघुकथायुग’ असे म्हटले जाते. पुढे १९४५ च्या काळात नवकथेला प्रारंभ झाला आणि मराठी कथा विस्तारित झाली. नवकथेमध्ये अनेक नवीन लेखक समाविष्ट झाले. ही कथा अधिक सामाजिक, राजकीय, स्त्रीजीवन, ग्रामीण जीवन या अंगांनी विकसित झालेली दिसते.

कथेचे बदलते स्वरूप

अशी प्रदीर्घ परंपरा आपल्याकडे कथेला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात कथा सांगण्याचे स्वरूपही बदलले दिसते. ‘शेअरिंग’ हे राष्ट्रीय कथाकथन दिनाचे प्रयोजन असताना या ‘शेअरिंग’ची जागा ब्लॉग्जनी घेतलेली दिसते. ऑडिओ स्वरूपातही आता कथा उपलब्ध असतात. आपले अनुभव सांगण्याचे माध्यम आता डिजिटल झालेले दिसते आणि ते स्वीकार्ह्य आहे.

राष्ट्रीय कथाकथन दिनाच्या निमित्ताने आपले अनुभव इतरांना सांगून आणि इतरांच्या कथा ऐकून समृद्ध होऊया…

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share your thoughts vvk
Show comments