सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रकारची उलथापालट सुरू आहे. कधी इतिहासातले, तर कधी पौराणिक संदर्भ देवून महाराष्ट्राचे विद्यमान राजकारणी एकमेकांवर चिखलफेक करण्यात स्वर्गसुख मानत आहेत. याच राजकीय रणांगणात गेल्या काही दिवसांपासून राजकीय गाडी ‘हिजडा’ या शब्दावर घसरल्याचे लक्षात येते. राजकीय रणांगणात कितीही गोंधळ असला तरी, काही वेळा वापरले जाणारे शब्द अनेकांच्या भावनिक दुखापतीस कारणीभूत ठरतात. कोणी कसं जन्माला यावं हे त्या व्यक्तीच्या हातात नसतं, परंतु कोणाचाही जन्म हा त्याच्यासाठी निश्चितच वेदनादायी ठरू नये हे मात्र नक्की. आपण सहजच एखादी शिवी, अपशब्द वापरतो. परंतु ज्याच्यासाठी वापरतो त्याच्या पेक्षाही ज्या उदाहरणाचा संदर्भ देतो, तो संदर्भ इतर कोणालातरी क्लेशदायी ठरू शकतो, याचा विचार करणे गरजेचे आहे. असेच काहीसे ‘हिजडा’ या शब्दाच्या बाबतीत घडताना दिसते. गेल्या काही शतकांच्या इतिहासात ‘हिजडा’ हा शब्द केवळ लिंग वाचक राहिला नसून शिवी ठरला आहे. यावरूनच आपला तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप नाही हे लक्षात येते. अशीच परिस्थिती प्राचीन भारतात होती का? हे या पार्श्वभूमीवर जाणून घेणे गरजेचे ठरते.
तृतीयपंथीयांसाठी ‘हिजरा’ हा शब्द दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. १८९७ साली भारतात ब्रिटिश राजवटीत तृतीयपंथीयांना गुन्हेगार मानले गेले. असे असले तरी, तृतीयपंथीयांचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दल भाष्य करणाऱ्या महाभारत तसेच वात्सायनाच्या कामसूत्रात तृतीयपंथीयांचा उल्लेख आढळतो. प्राचीन संस्कृत साहित्याचा आढावा घेतल्यास तृतीयपंथीयांसाठी ‘तृतीयप्रकृती’ हा शब्द वापरल्याचे लक्षात येते. याशिवाय विविध पौराणिक कथांमध्ये तृतीयपंथीयांशी संबंधित येणारे संदर्भ त्यांच्याविषयी समजून घेण्यास मदतनीस ठरतात.
अधिक वाचा : हिंदू पंचांगाप्रमाणे येणारा अधिक मास कसा ठरतो?
पौराणिक कथांमध्ये शिव आणि पार्वतीचे अर्धनारीश्वर रूप हे विशेष मानले जाते. खुद्द परमेश्वराचाच अर्धा भाग स्त्रीचा तर अर्धा भाग पुरुषाचा आहे. स्त्री आणि पुरुष हे या सृष्टीचे अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याच संयोगाने या सृष्टीची निर्मिती होते. तृतीयपंथीय या रूपाचे द्योतक आहेत. त्यामुळेच त्यांचा वास धार्मिक कार्यात महत्त्वाचा मानला जातो, असे धर्मशास्त्र सांगते.
बृहन्नडा
बृहन्नडा हे तृतीयपंथीयांचे पौराणिक अस्तित्त्व दर्शविणारे अगदीच प्रसिद्ध उदाहरण आहे. अर्जुन स्वर्गात नृत्य-गायन शिकण्यासाठी गेला असताना, उर्वशी अर्जुनावर भाळली होती. परंतु ‘तू मातेसमान आहेस’ असे म्हणून अर्जुनाने उर्वशीला नकार दिला होता. त्यावेळी उर्वशीने अर्जुनाला शाप दिला होता; की तू तुझे पुरुषत्त्व गमावून बसशील. परंतु इंद्राच्या मध्यस्थीमुळे अर्जुनाच्या शापाची दाहकता कमी झाली. त्यानुसार अर्जुनाला त्याच्या मर्जीने कधीही फक्त एक वर्ष हा शाप भोगावा लागणार होता. त्याप्रमाणे १२ वर्षांच्या वनवासानंतर येणाऱ्या एका वर्षाच्या अज्ञातवासात विराट राजाच्या नगरीत बृहन्नडा म्हणून त्याने हा काळ व्यतीत केला. बृहन्नडा ही विराट राजाच्या मुलीची उत्तराची नृत्य-गायनाची गुरु होती. पुढे उत्तरा अर्जुनाची सून झाली.
मोहिनी
मोहिनी हा विष्णूचा अवतार आहे. विष्णूच्या या अवताराचा संदर्भ महाभारतात येतो. मोहिनीचा संबंध समुद्र मंथनाशी आहे. समुद्र मंथनातून ज्या काही मौल्यवान वस्तू बाहेर आल्या, त्याची समसमान वाटणी देव आणि असुर यांच्यात करण्यात आली होती. परंतु ज्यावेळी अमृत बाहेर आले, त्यावेळी ते कोणाला मिळावे यावरून सूर- असुर असे द्वंद्व पेटले. त्यावेळी खुद्द भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला. विष्णू पुराणात येणाऱ्या कथेनुसार मोहिनीने भगवान शंकराला भस्मासुरा पासून वाचविले होते. लिंग पुराणात शिव आणि विष्णू यांच्या हरिहराच्या एकत्रित स्वरूपात जो संदर्भ येतो, त्यानुसार हरिहर हे शिव आणि मोहिनीच्या एकसंगाचे प्रतीक आहे. या कथेचा संबंध दक्षिणेकडील प्रसिद्ध देवता अय्यपाशी देखील आहे. प्रचलित कथेनुसार अय्यप्पा हा हरिहरपुत्र आहे.
मोहिनी ही स्त्री होती की पुरुष यावरून आजही मतभिन्नता आढळून येत असली तरी भगवान विष्णूंचे स्त्री रूपातील प्रकटन भारतीय मिथकशास्त्रातील तृतीयपंथाच्या अस्तित्त्वाकडे लक्ष वेधून घेते. याशिवाय तामिळ महाभारतात एक महत्त्वाचा संदर्भ सापडतो. अर्जुन आणि उलुपी यांचा मुलगा अरवण याचा. उलुपी ही सर्प राजकन्या होती. पांडवांच्या कुरुक्षेत्रातील विजयासाठी अरवण आपला स्वतःचा बळी काली देवीला देणार होता. त्यापूर्वी त्याने शेवटची रात्र विवाहित पुरुषाप्रमाणे घालविणे आवश्यक होते. आपला पती दुसऱ्या दिवशी मरणार म्हणून त्याच्याशी विवाह करण्यास कोणीही मुलगी तयार होईना. म्हणूनच साक्षात श्री कृष्णाने मोहिनी रूप धारण करून अरवणाशी विवाह केला. म्हणूनच तामिळ भाषेत तृतीयपंथीयांना अरवण असे संबोधतात. कूवागम या गावात दरवर्षी तृतीयपंथी अरवणाच्या स्त्रीचा वेश धारण करून त्याच्या मृत्यूचे १८ दिवसांचे दुःख करतात.
अधिक वाचा : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)
इला
इला ही वैवस्वत मनू आणि त्याची पत्नी श्रद्धा यांची कन्या होती. मनू आणि श्रद्धा यांनी मुलीचे मुलामध्ये परिवर्तन होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती. त्यामुळे इलाचे रूपांतर सुद्युम्म नावाच्या मुलात झाले. याशिवाय एक कथा सापडते त्यानुसार सुद्युम्म हा वनात गेला असता त्याला मिळालेल्या शापामुळे त्याचे स्त्री मध्ये परिवर्तन होते. परंतु शंकराच्या कृपेमुळे तो प्रत्येक दुसऱ्या महिन्यात पुरुष म्हणून वावरू शकणार होता. स्त्री रुपी इलाचा विवाह हा बुधाशी झाला होता आणि बुधाला तिच्यापासून पुरुरवा नावाचा पुत्र झाला.
शिखंडी
महाभारतातील अंबा ही द्रुपद राजाच्या घरी शिखंडी म्हणून जन्माला आली होती. शिखंडीविषयी माहिती देणाऱ्या अनेक कथा आहेत. भीष्मांनी अंबा, अंबिका, अंबालिका या काशी नरेशाच्या तीन मुलींना स्वयंवरातून विचित्रवीर्यासाठी पळवून आणले होते. अंबा हिचे शल्व राजावर प्रेम होते आणि स्वयंवराच्या वेळेस त्यालाच ती निवडणार होती. तिने हे जेंव्हा भीष्माचार्यांना सांगितले त्यावेळेस त्यांनी तिला मुक्त केले. परंतु शल्व राजाने तिचा स्वीकार केला नाही. परत आलेल्या अंबाने विचित्रवीर्यास लग्न करण्यास सांगितले, त्यानेही नकार दिला. अंबा भीष्माचार्यांकडे गेली. त्यांना तिने विवाहाचा आग्रह केला, परंतु त्यांनी ब्रह्मचर्याची शपथ घेतल्याने त्यांनीही नकार दिला. क्रोधिष्ट अंबाने शिव तपश्चर्या करून द्रुपद राजाच्या घरी जन्म घेतला. हा जन्म स्त्रीचा होता, परंतु तिच्या मातेने द्रुपद राजापासून हे सत्य लपवून शिखंडीला पुरुषाप्रमाणे वाढविले. नंतरच्या कथेत एका यक्षाकडून शिखंडीला पुरुष होण्याचे वरदान मिळाले होते.
एकूणच पौराणिक कथांनुसार भारतीय संस्कृतीत तृतीयपंथीयांना नेहमीच विशेष स्थान असल्याचे लक्षात येते. मात्र आज २१ व्या शतकात राजकारण्यांकडून त्यांचा वापर शिवीसारखा केला जात आहे.