डॉ. नीरज देव

श्रीरामाचे गुणवर्णन महर्षी वाल्मिकींपासून गदिमांपर्यत अनेक कवींनी अनेक भाषांतून केलेले आहे. भारतासह श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, कंबोडिया आदी सतरा राष्ट्रे रामाला आदर्श मानतात. श्रीराम तर भारताचा आत्मा होय. रामाला वगळले तर भारतीयांच्या जीवनात ‘राम’च रहाणार नाही. येथील माणूस रामाशी एकरुप झालाय. जन्मापासून मृत्यूपावेतो रामच त्याचा विश्राम आहे, म्हणून तर बोलीभाषेत स्मशानाला ‘रामकूंड’ म्हणतात. भगवान बुध्द, भगवान महावीर, गुरु नानक देव नि गुरु गोविंदसिंह या भारतातील चारही प्रख्यात धर्मात्म्यांचे घराणे श्रीरामांचेच वंशज होते. आज साडेपाच शतकानंतर अयोध्येत श्रीरामाचे पुनरागमन होते आहे, हा राष्ट्रीय उत्सव होय. या शुभपर्वावर आधुनिक भारताचे प्रेरणास्रोत असलेल्या वीर सावरकरांच्या काव्यातून होणारे श्रीरामदर्शन आपण समजून घेणार आहोत.

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Satish Wagh Murder Case
Satish Wagh Murder Case : पूर्वीच्या भाडेकरूनेच दिली ५ लाखांची सुपारी; सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांकडून मोठा खुलासा
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
ram gopal verma pushpa 2 review
राम गोपाल वर्मा यांनी सांगितला ‘पुष्पा २’चा अनुभव; पोस्ट शेअर करत म्हणाले, “त्याची प्रतिमा…”

वीर सावरकरांच्या काव्याचा विचार करता श्रीरामांचा उल्लेख प्रामुख्याने ‘सांत्वन’, ‘माझे मृत्युपत्र’ या दोन कवितात सापडतो. शिवाय ‘श्रीमान राजे कृष्णशहा यांस’, ‘तारकास पाहून’, ‘सप्तर्षि’, ‘गोमांतक’, ‘विरहोच्छ्वास’, ‘श्रीशिवगीत’, ‘शिववीर’, ‘पहिला हप्ता’, ‘हिंदूंचे एकतागान’, ‘हिंद सुंदरा ती’, ‘बालविधवा-दुःस्थितिकथन’, ‘कमला’ आदी कवितांत कारणपरत्वे उल्लेख येतात. बहुतेक कवितांत श्रीराम हे प्रामुख्याने प्रेरणापुरुष या रुपातच आढळतात. प्रेरणापुरष श्रीराम कधी सेनानी होऊन लढण्याची स्फूर्ती देतात, कधी राजत्याग स्वीकारुन वनवासी होत त्यागाची दीक्षा देतात तर कधी विरहव्याकूळ होऊन विरहात धीर देऊन जातात. एका कवितेत ते राजास आदर्शभूत कसे आहेत ते सांगण्याच्या ओघात प्रकटले आहेत, तर दूसऱ्या एका कवितेत रामचरित्राचा प्रसंग आलेला आहे. अगदी घाईत लेख तयार होत असल्याने एखादा संदर्भ सुटलेला असू शकतो याची नोंद असू द्यावी.

श्रीशिवगीत या १९०० साली लिहिलेल्या आर्यावृत्तातील कवितेत चवथ्या कडव्यात शिवबाचे वर्णन करताना १७ वर्षीय सावरकर लिहितात,

श्रीमद्भारत रामायण रम्य कथा-सुधा सदा पीतो
श्रीरामकृष्णसा मग अधमां, रक्षुनि बुधांस, दापीतो

बाल शिवाजी श्रीरामायण कथारुपी अमृत पितो आणि युवापणी श्रीरामकृष्णासारखा अधमांचे दमन करून सज्जनांचे रक्षण करतो. बाल शिववीर तर

श्रीरामें राक्षस-हननासी केलें
यवनांना नाशीन तैसे मी बोले

असे आश्वासन देताना सापडतो. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये सावरकरांना श्रीरामाचे दर्शन होते. शिवरायांच्या हातातील तलवारसुध्दा श्रीरामांचीच आहे.

धर्मस्थापना त्याची, त्याचि दुष्कृतनाशना
महाराष्ट्र उभा आजी रणा भारततारणा
त्याकार्याची तयाची श्रीरामाची तरवार ती
ये शिवापासुनी आजी बाजीराय कराप्रती

धर्मसंस्थापनेसाठी छत्रपती शिवाजी ते पहिले बाजीराव यांनी उपसलेली तलवार प्रभू रामचंद्रांची आहे, असे महाकवी सावरकरांना वाटते. येथे तलवार म्हणजे खरीखुरी दृश्य तलवार नसून तलवारीमागील तत्व असते, हे सांगणे नलगे !

हेही वाचा : आसा नही था ‘मुनव्वर’ होना…!

सावरकरांनी धारण केलेले व्रत ‘आम्ही दिवस चांगला पहायला जन्मलो नाही’ चे अर्थात ‘अच्छे दिन की आस नही’ चे होते. म्हणूनच त्यांना श्रीरामाची वनवास कथा अनुकरणीय वाटते. लंडनवरून वंदनीय वहिनींना पाठवलेल्या ‘माझे मृत्युपत्र’ कवितेत ते लिहितात, ‘वहिनी, तुम्हाला स्मरते कां, आपण सर्वजण चांदण्यात जेवायला बसायचो. जेवता जेवता गप्पा चालायच्या त्यात, श्रीरामचंद्र- वनवासकथा रसाला हटकून असायची. ‘रसाला’ म्हणजे रसपूर्ण होय. माणसाला त्याच गोष्टीत रस वाटतो, ज्या गोष्टींशी त्याला घेणे- देणे असते. बघा नं, आजार झाला की, माणसं त्या आजाराची माहिती गोळा करु लागतात. सावरकरांना वनवाससमोर दिसत होता. विशेषतः वहिनींना ज्यावेळी ते हे पत्र लिहित होते, त्यावेळी तर तीव्रतेने दिसत होता. म्हणून ते श्रीरामचंद्राच्या वनवास कथेला ‘रसाला’ म्हणतात, नि वहिनींना आठवण करुन देतात –

‘बाजीप्रभू ठरुं’ वदे युवसंघ सर्व
‘आम्ही चितोरयुवती’ युवती सगर्व

पावनखिंडीतला मरणातूर बाजीप्रभू काय की चितोडगडच्या जोहारात विसर्जित होणाऱ्या त्या वीरांगना काय आमरण वनवास स्वीकारायला तयार त्यांच्याहून श्रीराम – श्रीसीतेचे खरे अंतेवासी कोण असू शकणार? तोच मरणवास आपल्याला भोगायचाय याचेच स्मरण देतात. हे स्मरण केवळ वहिनीसाठीच नाही, तर पत्नी, बंधू, मित्र, सहकारी, देशवासी नि स्वतःसाठी सुध्दा असते.

प्रत्यक्ष वनवास भोगताना… तिथेही सावरकरांना श्रीराम भेटतात. त्यांचे वर्णन करताना सावरकर नकळत त्यांच्या वनवासाशी स्वतःच्या कैदेची तुलना करु लागतात.

वर्णित राम विवासन मंत्रहि तो म्यां पुनः पुन्हा जपला।
चळत्या धैर्यासहची उलटुनि वदली स्मृतीहि परि चपला।।

सावरकर तुरुंगात मनाला समजावतात, ‘प्रभू राम भगवंत नि राजपूत्र असूनही त्यांना नाही का वनवास भोगावा लागला!’ तितक्यात त्या अवश अवस्थेतही त्यांची स्मृती त्यांना चटकन म्हणाली, ‘अरे! वनात राम एकटे कोठे होते? सोबत माता सीताही होतीच की!’ येथे सावरकरांना लक्ष्मणाचे स्मरण होत नाही. कारण अग्रज असूनही लक्ष्मण झालेला त्यांचा थोरला भाऊ अंदमानांत आधीच जाऊन पोहोचलाय. पन्नास वर्षांची श्रीरामाहूनही तीनपटीपेक्षा जास्त शिक्षा भोगायचीय, हा विचार त्यांच्या अडिग धैर्याला चळवू लागला. त्यांच्या मनाला ते डाचते न डाचते तोच बुध्दी सांगू लागली –

सीतेसंगे ऐशा अविकृत रामेंहि तव अहा कां ना।
जाता सीता व्याकुल केलें वन देत करुण हाकांना !।।

ते मनाला सांगू लागले, ‘अरे! अशा विपत्तीत धीरांचेही मन कंपित नि चलित होते. बघ ना! सीताहरणानंतर अविकृत रामही नाही का ‘सीते! सीते!’ च्या करुण हाका मारत वनात फिरत होते.’ हाच भाव अधिक स्पष्ट करताना विरहोच्छ्वास कवितेत ते लिहितात,

हा सीते! अजि हा सीते! –
क्रंदत कवळी! रघुवर वेली!

सीतेचा विरह त्यांना इतका व्याकूळ करीत होता की ‘हा सीते! हा सीते !’ असा विलाप करीत श्रीरामासारखा नरपुंगव सीता समजून वेलींनाच कवळत होता. नीट पाहिले तर वरील पंक्तीत ते श्रीरामांना अविकृत म्हणतात. अविकृतता हे धीरपुरुषाचे लक्षण असते. धीरपुरूष सोसावी लागणारी दुःखे नि भोगाव्या लागणाऱ्या तीव्र व्यथा एकट्यात उत्कटतेने अनुभवतात. पण इतरांसमोर त्या अजिबात दिसू देत नाहीत. सावरकर हेच असिधाराव्रत आचरत होते. ‘रामासारखा वनवास भोगायचाय’ हे इतरांस सांगताना आधी स्वतः भोगत होते, नि भोगताना होणाऱ्या वेदना इतरांपासून लपवत होते.

हेही वाचा : डेव्हिड वॉर्नर- सळसळत्या ऊर्जेचा आणि निष्ठेचा कर्मयोगी

सावरकरांचे वडील बंधू क्रांतिवीर बाबाराव सावरकरांना जन्मठेप नि धाकटे बंधू नारायणरावांना इंग्रजांनी तुरुंगात कोंडले होते. तेव्हा वहिनींवर कोसळलेली आपदा भयानक होती. साऱ्या घराचे अरण्य झाले होते. त्यावेळी तिची समजूत घालताना सावरकरांना ‘श्रीराम’च आठवतात. ते तिला ‘सांत्वन’ नावाचे पद्यात्मक पत्र पाठवितात. सावरकरांची एवढी एकच कविता रामभक्तीने ओतप्रोत आहे. अर्थात संपूर्ण कवितेत राम उपमान म्हणून वापरलेले आहे, हे सुज्ञास सांगणे न लगे!

धन्य धन्य आपुला वंश । सुनिश्चयें ईश्वरी अंश
कीं रामसेवा-पुण्य-लेश । आपुल्या भाग्यीं लाधला

सावरकरांनी देशसेवेसाठी इष्टमित्र सहकुटुंब सपरिवारसह यज्ञ आरंभिला होता. या यज्ञाची समिधा त्याग आणि फळ वेदना, अवहेलनांनी भरलेले होते. सावरकर जाणतेपणे हे करीत होते. पण वहिनी, पत्नी, सहकाऱ्यांना ते हे सारे आपण श्रीरामासाठी; ईश्वरासाठी भोगतो आहोत असे सांगतात. त्याला ते ‘ईश्वरी’ म्हणत, त्यांच्यातील ‘ईश्वरीय’ भावही जागवत होते. जो तीव्र संकटांत, आपत्तीत उपयुक्त ठरणारा होता.

वर घडलेली घटना ही येणाऱ्या आपत्तींची फक्त पूर्वसूचना होती. त्यामुळे सावरकर ‘लेश’ शब्द हेतुतः योजतात. त्यांना वाटते, देशासाठी न म्हणता रामासाठी, ईश्वरासाठी म्हटले तर आपल्या देवभोळ्या वहिनींच्या असह वेदना आपोआप सहनीय होतील. हीच बाब आणखीन खोलवर रुजावी, म्हणून ते लिहितात, ‘वहिनी जगात अनेक जण जन्मतात नि मरतात. पण जे ईश्वरीय काजासाठी मरतात तेच मोक्षाला पावतात. बघ ना! गजेंद्राने श्रीहरिसाठी तोडलेले ते कमलफूल नाही का अमर झाले!’ गजेंद्रमोक्षाची पुराणकथा दोन पंक्तीत लीलया गोवून ते वहिनींना सांगतात, ‘भारताची स्थिती त्या गजेंद्रासारखीच झालीये. गजेंद्राने कमळ पुष्प वाहून स्वतःची मुक्तता करून घेतली. पण भारताची मुक्तता कमळ फुलाच्या अर्पणाने नाही तर शीर-कमळांच्या समर्पणानेच होईल.’ तेंव्हा

स्वोद्यानी तिने यावे । आपुल्या फुलास भुलावें
खुडोनिया अर्पण करावे । श्रीरामचरणां

भारतमातेला वाटेल त्या मुलाला फूल करीत तिने श्रीरामचरणावर अर्पण करावे. गरज तर, सारे कूळच्या कूळ ध्वस्त करीत तिने श्रीरामाला अर्पावे. हे अर्पण म्हणजे दूसरे तिसरे काही नसून जीवनाची सार्थकता आहे.

अशीच सर्व फुलें खुडावीं । श्रीरामचरणीं अर्पण व्हावीं
कांही सार्थकता घडावी । या नश्वर देहाची

येथे ते हटकून ‘नश्वर देह’ शब्द वापरतात. जेणेकरुन जीवनाची अनिश्चितता सहज ध्यानी यावी. तितक्यात त्यांना ध्यानी येते की, या साऱ्या धामधुमीत सावरकर वंशच बहुधा निर्वंश होईल. हा ही विचार कदाचित वहिनींच्याही मनीमानसी घोळत असेल. इतर सहकाऱ्यांच्या मनांतही आपापल्या कुलाविषयी असाच विचार येत असेल. त्यावर उपाय योजताना ते लिहितात,

अमर होय ती वंशलता । निर्वंश जीचा देवांकरितां

‘देवासाठी, रामासाठी ज्यांचा वंश निर्वंश होतो, तो निर्वंश होण्यानेच अखंड वंश होत असतो’ हे वहिनींना ते ठामपणे सांगतात. नीट पाहिले तर, ते देशसेवेला रामसेवेचे रुप देतात. ‘माझे मृत्युपत्र’ मध्ये हीच बाब व्यक्तविताना…
तत्सेवनींच गमली रघुवीर सेवा
असे लिहितात. खरे सांगायचे तर, देशसेवा नि श्रीरामसेवा त्यांच्यासाठी एकच होती. सारा देशच त्यांच्यासाठी अयोध्या नि वाराणसी झाला होता. इतकेच कशाला ‘देश स्वातंत्र्यासाठी पराक्रमाचे नि बलिदानाचे आवाहन प्रत्यक्ष रामच देतात’ असे वहिनीला सूचविताना ते लिहितात,

‘‘विश्वाचिया अखिल मंगल धारणाला
बोला असे कवण भक्ष्य हुताशनाला?’’

आमंत्रण प्रभु रघुत्तम सोडितां हें
दिव्यार्थ, देव ! अमुचें कुल सज्ज आहे
हे साध्वि, गर्जुनि असे पहिल्या हवीचा
हा ईश्वरी मिळविला अम्हिं मान साचा

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांची तुलना शिशुपालाबरोबर; कोण होता शिशुपाल? काय आहे त्याच्या १०० अपराधांची कथा? 

आपण हे जे व्रत आचरत आहोत, ते दुसरे तिसरे काही नसून प्रभू रामचंद्रांच्या आवाहनाला दिलेला प्रतिसाद आहे. या कवितेतून सावरकर सामान्यांनाही मोठमोठ्या त्यागासाठी नि बलिदानासाठी कसे सिध्द नि उद्युक्त करीत तेच दिसून येते. वहिनींची गोष्ट सोडा, हुतात्मा मदनलालसाठी तयार केलेल्या अंतिम निवेदनात ते लिहितात,

“I feel that a wrong done to my country is an insult to God …Her cause is the cause of Shri Ram.”

कारण ‘देव’ हाच देशाचा सर्वोत्तम प्रतीक होऊ शकतो. त्यामुळेच मदनलालजींचे हे उद्गार चर्चिलसारख्या कट्टर साम्राज्यनिष्ठालासुध्दा देशभक्तीसंदर्भात तेजस्वी नि सर्वोत्तम वाटले.

श्रीरामांचा हा संदर्भ राजेमहाराजाशी बोलताना अचूक बदलतो. संदर्भ बदलला तरी सूत्र मात्र बदलत नाही. ‘श्रीमान् राजे कृष्णशहा यांस’ या जव्हारच्या राजाला लिहिलेल्या काव्यमय नजराण्यात, रावणाच्या अधमतेचा नि भारतावरील छळाचा उल्लेख करीत सावरकर म्हणतात-

शत्रूवरी श्री रघुनाथ घाला
घालावयाला चिर सज्ज झाला
छाटी अरिच्या दशकंधराही
करी स्वयें मुक्त वसुंधरा ही ।।

श्रीरामाचे वर्णन करताना एकवचनी, एक पत्नीव्रती, सत्यभाषणी राम त्यांच्या कथनात नसतो तर एक बाणी रावणांतक रामच त्यांच्या दृष्टीपुढे असतो. रामाने दशमुखी रावणाचे दाही मुख छेदून वसुंधरेला मुक्त केले. अशा श्रीरामाचे रावणांतक उद्बोधक चरित्र वाचून तू ही तसाच काहीतरी पराक्रम कर, महाराणा हो! सांगताना ते,

चरित्र उद्बोधक राघवाचें
चरित्र उत्तेजक राघवाचें
चरित्र सांकेतिक राघवाचें

उद्बोधक म्हणजे दिशादर्शक, उत्तेजक म्हणजे प्रेरणास्पद नि सांकेतिक म्हणजे प्रतिकात्मक; राम व्यक्ती, समाज नि राष्ट्रजीवनासाठी दिशादर्शक आहेत, पारतंत्र्य नाशार्थच नाही तर चरित्रसंपन्न जीवनयापनार्थ प्रेरणास्पद नि प्रत्यक्ष धर्म नि राष्ट्राचे हुबेहूब प्रतीक आहेत. रामाचे खरे काम रावणवध होते व परतंत्र भारतातील सा-यांचेच मुख्य कर्तव्य स्वातंत्र्य मिळविणे हेच असले पाहिजे, हेच सावरकर वारंवार या ना त्या प्रकारे सांगतात.

संक्षेपात सावरकर काव्यात डोकावणारे श्रीराम राष्ट्रोध्दारक नि राष्ट्रोत्थानासाठी प्रेरणापुरुष म्हणूनच वारंवार भेटतात. असे असले तरी ते भारतामातेसाठी परमेश्वर नसून तिचे एक उत्तुंग कर्तृत्वाचे पुत्र आहेत. म्हणूनच ते
रघु नल दाशरथी । धर्मराज नृपती
हे मातर् ! हे मातर् ! वदुनि जिला नमिती

अशी भारतमातेची महती गौरवाने गातात. सावरकरांची ही भूमिका भारत सर्वप्रथमची ग्वाहीच देणारी आहे.
अभिनव भारत सांगता समारोहात सावरकरांना आठविणारी ‘अयोध्या’ श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या निर्माणाने खरोखर विमुक्त नि विशुध्द झालीय. त्याचा हर्ष सावरकरांना नक्कीच झाला असता. श्रीरामजन्मभूमी आंदोलनात हुतात्मा झालेल्यांच्या परिवारांना आश्वस्त करीत त्यांची विदग्ध वाणी उत्कटतेने गर्जिली असती-

अमर होय ती वंशलता । निर्वंश जीचा ‘रामा’करितां

आज अयोध्येत निर्माण होणारे श्रीरामजन्मभूमी मंदिर पाहून सा-या भारताला उचंबळून ते म्हणाले असते,

आज पाच शतकांनी विजयी मिरवित सोनेरी तोडा
आला परतुनि आला पुनरपि, श्रीरामाचा विजयिष्णू घोडा
सप्त-समुद्रा, भागीरथी ये कावेरीच्या पूत जला
सिंधु, शतद्रु, त्रिवेणी, यमुने, गोदे, कृष्णे या सकला
लगबग धावा चटकन मिसळा आज तुम्ही शरयुला
हरिव्दार, कैलास, काशिके, पुरी, व्दारके या साऱ्या
चटकन भरभर धावत यावे आज तुम्ही अयोध्येला
हे तीर्थांनो, हे क्षेत्रांनो, अखिल भारत भूमितल्या
ऐका ऐका रोमहर्षणा वार्ता विजयाच्या आल्या
उभ्या पाच शतकांनी परतले राम आज अयोध्येला

या किंवा अशाच धन्यतेच्या स्वरांत न्हात सावरकरांच्या काव्यातील श्रीरामदर्शन पुन्हा एकदा उत्कर्षाला पावले असते.

डॉ. नीरज देव

(लेखक व्यवसायाने मनोचिकित्सक असून दशग्रंथी सावरकर या पीएचडी समतुल्य सन्मानपत्राने सन्मानित आहेत.)

Story img Loader