‘शुक्रतारा मंदवारा’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘सूर मागू तुला मी कसा’, ‘डोळे कशासाठी’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘स्वरगंगेच्या काठावरती’, आजही या भावगीतांभोवती रसिकांचं भावजीवन गुंफलं गेलंय. रसिकांच्या मनात प्रेमाची आनंददायी भावना घोळवणारी, आठवणींचे मधुर झंकार फुलवणारी आणि विरह वेदना प्रकट करणारी ही भावगीतं आपल्या तरल, हळुवार, मर्मज्ञ आवाजात अजरामर करणारे ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते होत. १९६२च्या सुमारास ‘शुक्रतारा मंदवारा’ हे पहिलं भावगीत त्यांनी गायलं. त्यानंतर ‘शुक्रतारा’ या कार्यक्रमाच्या २७५० हून अधिक प्रयोगांद्वारे त्यांनी आपली भावगीतं रसिकांपर्यंत पोहोचवली.

प्रत्येक पिढीतल्या रसिकांवर आपल्या मृदू, तरल स्वरांनी भारावणारी, भावनांची पखरण करणारी त्यांनी गायलेली भावगीतं आजही नाविन्याचा अनुभव देतात. तब्बल सहा दशकांची सांगितिक कारकीर्द लाभलेली ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या भावगीतांची स्वरगंगा ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाच्या रुपात त्यांचा मुलगा अतुल अरुण दाते यांनी जिवंत ठेवली आहे. गेल्या सात वर्षांपासून रसिकांसाठी होणाऱ्या ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाने आता शंभरीत पदार्पण केले आहे. यानिमित्त अरुण दाते यांनी सादर केलेला ‘शुक्रतारा’ आणि अतुल अरुण दाते यांची निर्मिती असलेला ‘नवा शुक्रतारा’ या दोन्ही कार्यक्रमांचा ज्यांनी आनंद अनुभवला असे जाणकार रसिक शशांक मुधोळकर आपल्या भावना व्यक्त करताना सांगतात, ‘शुक्रतारा’ हा ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचा कार्यक्रम माझ्या आईवडिलांनीसुद्धा पाहिला होता. त्यांच्यासोबत या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग लहानपणीच साधारण १२-१५ वर्षांचा असताना पाहण्याचा योग आला. त्यानंतर महाविद्यालयात असताना आणि त्यानंतर माझ्या पत्नीबरोबर पाहिला. अरुण दाते यांच्यानंतर माझ्या रसिक मनात खंत निर्माण झाली होती की, आता मराठी भावसंगीताचं काय होणार? पण साधारण वर्षभरानंतरच आम्हाला असं कळलं की, त्यांचे सुपुत्र अतुल अरुण दाते हे ‘नवा शुक्रतारा’ नावाचा कार्यक्रम घेऊन आले आहेत आणि तो अरुण दाते यांच्या अजरामर गाण्यांचाच आहे. हे कळल्यावर आनंदाने आम्ही तो पाहायला गेलो आणि पाहून सुखावलो. कारण कार्यक्रमात अरुण दाते यांची गाणी जशीच्या तशी रसिकांसमोर सादर होत होती. शिवाय असे काही किस्से कळले जे आम्ही ‘शुक्रतारा’ कार्यक्रमातसुद्धा कधीही ऐकले नव्हते, तेही ऐकायला मिळाले. त्यामुळे ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रमाचा आमचा अनुभवही तितकाच मजेदार होता. ‘शुक्रतारा’ची पुनरावृत्ती कधीच होऊ शकत नसली तरीही एखाद्या मोठ्या कलाकाराचा मुलगा न गाता हा वारसा कसा पुढे नेऊ शकतो, याचीही जाणीव झाली.

भावगीत गायक अरुण दाते यांनी गायलेली सर्वच गाणी भावस्पर्शी आहेत. यापैकी ‘स्वरगंगेच्या काठावरती’ हे ‘शुक्रतारा’ कार्यक्रमात सादर होणारं दुसरं गाणं. त्यांच्या आवाजातलं हे गाणं मनाला अधिक भावतं. प्रत्येक गाण्याची कविता अप्रतिम असायची. त्यांनी गायलेल्या सगळ्या गाण्यांच्या चालीही सुंदर, कारण त्या मोठ्या संगीतकारांनी दिलेल्या चाली होत्या. मोजकीच गाणी गाऊनही इतका मोठा झालेला कलाकार आम्ही तरी पाहिला नाही. मुख्य म्हणजे त्यांनी फिल्मी गाण्यांमध्ये न पडता फक्त भावसंगीतामध्ये आपलं मन रमवलं आणि रसिकांची मन जिंकली. ‘नवा शुक्रतारा’ या कलाकृतीमध्येही नवोदित गायक-संगीतकार मंदार आपटे यांनी कुठेही अरुण दाते यांची नक्कल न करता हे गाणं गायलं आहे, असंही मुधोळकर सांगतात.

कार्यक्रमाचं सांगितिक यश

‘शुक्रतारा’ आणि ‘नवा शुक्रतारा’ या दोन्ही कार्यक्रमांचं अनोखेपण सांगताना रसिक शशांक मुधोळकर जुन्या आठवणी रंगून जातात. ते म्हणतात, भावगीत गायक अरुण दाते यांच्या कार्यक्रमाचं अनोखेपण त्यांचं कार्यक्रमात असणं याच्यातच होतं. ‘नवा शुक्रतारा’मध्ये ते या कार्यक्रमात आहेत याचा पूर्ण भास माझ्यासारख्या जुन्या रसिकाला होत राहातो. स्वतः गात नसतानाही विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रमांचं सादरणीकरण करून संगीताची सेवा करणं आणि ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रमाचा शंभरीचा टप्पा पार करणं, यामध्ये कधीही रसिकांनी ऐकले नसतील असे सांगितिक किस्से सांगून रसिकांच्या माहितीत भर घालणं, याला रसिकांची पसंती मिळणं हेच अतुल दाते यांच्या सांगितीक यशाचं श्रेय आहे.
अतुल अरुण दाते

आपले वडील ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचा ‘शुक्रतारा’ ही भावगीतांची कलाकृती ‘नवा शुक्रतारा’ या रूपाने सादर करणारे अतुल अरुण दाते सांगतात, “जे आहे ते सगळं बाबांचं आहे. आम्ही फक्त एक छोटासा प्रयत्न म्हणून इतके मोठे शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न केला. त्यामध्ये आतापर्यंत आम्ही पुरेपूर उतरलेलो नाही आहोत, हे आम्हाला माहीत आहे. पण कार्यक्रमात काही वेगळे प्रयोग करण्याच्या नादात भ्रष्ट नक्कल करून, कुठे काही बिघडू न देण्याचा कायमच प्रयत्न असतो.”

बाबा अर्थात ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचा ‘शुक्रतारा’चासुद्धा काही काळ मी निर्माता होतो. ‘नवा शुक्रतारा’चा तर आहेच. पण हे सगळं त्या ‘शुक्रतारा’पासून या ‘ नव्या शुक्रतारा’पर्यंत हे सगळं त्यांचंच (अरुण दाते) आहे, ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकरांचं आहे आणि हे सगळं त्या संगीतकारांचं आहे ज्यांनी त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलं. त्यामुळे मला असं वाटतं की, आम्ही फक्त अरुण दाते यांच्या गाण्यांची पुन्हा नव्याने ओंजळ भरून दिली आहे. त्यामुळे यामध्ये आमचं काहीच नाही. सगळे त्यांच्या आशीर्वादाने चाललेय. जे यश आम्हाला मिळालेय तेसुद्धा त्यांचेच आहे. हेच ‘शुक्रतारा’ आणि आताचा १००वा ‘नवा शुक्रतारा’ या प्रवासाने शिकवलं, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

रसिकांच्या ह्रद्य आठवणी…

कार्यक्रमाला येणाऱ्या रसिकांचे डोळे अरुण दाते यांच्या आठवणीने पाणावत.’ ६ वर्षांनी पुन्हा एकदा डोळे पाणावले आनंदाश्रुंनी, कारण मनाला खात्री पटली, आमचा शुक्रतारा निखळला नाहीए तर नव्याने सज्ज झालाय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करायला, त्यांची मनं जिंकायला…! अशी प्रतिक्रिया पुण्यातील कार्यक्रमाला आलेल्या रसिका विप्रदास यांनी व्यक्त केली.

आमचं अहोभाग्य की, आम्हाला २० वर्षांपूर्वी खुद्द अरुण दाते यांचा ‘शुक्रतारा’ पहायला मिळाला आणि आज २० वर्षानंतर ‘नवा शुक्रतारा’ पाहिला’. असं वाटतं की, तोच कार्यक्रम पुढे गेलाय. सादरीकरणात तीच तन्मयता, आत्मीयता दिसते. काय लिहू, पुन्हा पुन्हा पाहावा असा हा आजच्या युगातला भावसंगीतातला सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आहे, असे मत अजय जैन यांनी व्यक्त करतात.

…आणि वडिलांची खंत दूर झाली

मराठी संगीतातला अमूल्य ठेवा असलेलं भावसंगीत ‘नवा शुक्रतारा’च्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं सौभाग्य तुम्हाला लाभलंय. त्या अनुषंगाने ‘माणिक एन्टरटेन्मेंट’चे निर्माते म्हणून भविष्यात काय योजना आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना अतुल अरुण दाते सांगतात, अरुण दाते यांची प्रकृती बिघडली तेव्हा मी त्यांना एकदा म्हटलं की, “मला ‘शुक्रतारा’ नव्या स्वरुपात सादर करायचा आहे.’’ यावर ते मला म्हणाले की, “पण हे कसं शक्य आहे तू गात नाही, मग कोण गाणार?’’ मग मी त्यांना गायक मंदार आपटे यांचा आवाज ऐकवला. त्यांना त्यांचा आवाज इतका आवडला की, त्यांनी मला लगेचंच सांगितलं की, “तू याला घेऊन ‘नवा शुक्रतारा’ कर.’’ त्यांना प्रचंड आनंद झाला की, आपला मुलगा ‘शुक्रतारा’ जिवंत ठेवणार आहे. कारण त्यांच्या डोळ्यात मला ‘मराठी भावसंगीताचं काय होणार’ ही खंत दिसत होती. त्यांनी मंदारचा आवाज ऐकला आणि माझा आत्मविश्वास बघितला. कारण त्यांच्या अनेक कार्यक्रमांचा मी संयोजक, निर्माता होतो. त्यामुळे केलं तर बहुतेक बरं करेन हे त्यांना माहीत होतं. आम्ही सादर केलेले एक-दोन कार्यक्रमसुद्धा पाहिले. ते पाहिल्यानंतर, ‘‘छान करतोयस” एवढाच आशीर्वाद त्यांनी दिला. माझ्यासाठी तो पुरला कारण, त्यांना कार्यक्रम आवडला नाही, हे सांगण्याचा पूर्ण अधिकार होता. त्यांनी तसं सांगितलं असतं, तर मी कधीही यापुढे ‘नवा शुक्रतारा’चा प्रयोग केला नसता. पण त्यांच्या आशीर्वादाने आज पुढे जात आहे.

रसिकांसाठी १००वा प्रयोग विनामूल्य

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे, येथे ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रमाचा १००वा प्रयोग सादर होणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. गायक संगीतकार मंदार आपटे, गायिका पल्लवी पारगावकर आणि वर्षा जोशी यांचा या कार्यक्रमात सहभाग असून यावेळी अतुल दाते रसिकांशी संवाद साधून सांगितिक आठवणींना उजाळा देणार आहेत.