-श्रुति गणपत्ये

जगामध्ये सर्वात जास्त कोणत्या चित्राची आजही चर्चा होत असेल तर ते म्हणजे लिओनार्दो द विन्चीच्या “मोनालिसा”चं. ते चित्र अनेकांना गूढ वाटतं, त्या चित्रातली मोनालिसा ही बाई होती की पुरुष यावर वाद होतात, वेगवेगळ्या बाजूने बघितल्यावर मोनालिसा वेगळी दिसते. सुमारे ५०० वर्षांहून अधिक काळ या चित्राने अनेकांना भुरळ घातली आहे. आपल्या कामाच्या जोरावर रेनेसाँ काळात चित्र, शिल्प, विज्ञान, शरीररचना अभ्यास अशा अनेक विषयांमध्ये ठसा उमटवणाऱ्या लिओनार्दो याचा नुकताच म्हणजे १५ एप्रिल (१४५२-१५१९) रोजी जन्म दिवस होता. जगभरातले कलाप्रेमी आपल्यापरिने त्याची आठवण काढतात. मला सांगायचं आहे ते सोनी लिव्ह वरच्या “लिओनार्दो” मालिकेबद्दल.

लिओनार्दो द विन्चीबद्दल, त्याच्या कामाबद्दल, रेनेसाँ काळातील त्याच्या योगदानाबद्दल पुष्कळ लिखाण झालं आहे. “मोनालिसा”, “द लास्ट सपर”, “वेटृविअन मॅन”, या त्याच्य प्रमुख चित्रांबद्दलही सतत चर्चा होत असते. त्याने अनेक चित्र अपूर्ण सोडली म्हणून टीकाही होते. पण या महान चित्रकाराच्या आयुष्यातील कमी चर्चिला गेलेला एक पैलू घेऊन खऱ्या आणि काल्पनिक गोष्टींचं मिश्रण करून एक सुंदर रहस्यमय घटनाक्रम या कथेमध्ये गुंफला आहे. ही मालिका बघताना लिओनार्देच्या आयुष्यातल्या बहुतेक महत्त्वाच्या घटना पुढे येतात. अगदी त्याच्या खाजगी आयुष्यापासून ते त्याच्या कलेपर्यंत. पण कथानक हे कॅथरिन नावाची एक बाई आणि लिओनार्दो यांच्या मैत्रीभोवती फिरत राहतं. कथाकारांच्या मते, या बाईचं एक चित्र उपलब्ध आहे. पण ती नक्की कोण होती हे मात्र इतिहासाच्या पानांत लुप्त झालं आहे. कदाचित त्यामुळेच कथा लिहिताना स्वातंत्र्य घेणं शक्य झालं असेल.

मालिकेची सुरुवातच होते ती लिओनार्दोवर कॅथरिनच्या खूनाचा आरोप होतो आणि त्याला तुरुंगात टाकतात. त्याच्या या गुन्ह्यासाठी फाशी निश्चित असते. पण गुन्ह्याचा तपास करणारा अधिकारी मात्र लिओनार्दोवरील प्रेमामुळे किंवा आदरामुळे हे मानायला तयार नसतो की खून त्याने केलाय. तो त्याला तपास घेत जातो आणि या महान चित्रकाराची कथा हळूहळू उलगडत जाते.

लिओनार्दोने शालेय शिक्षण फारसं घेतलं नव्हतं, पण चित्रकलेच्या शिक्षणाला मात्र त्याने खूप लवकर सुरुवात केली. त्यावेळी मोठा चित्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वराकिओकडे त्याने रितसर चित्रकलेचे धडे घेतले. केवळ चित्र काढणं आणि रंगवणं एवढं हे ज्ञान मर्यादीत नव्हतं त्यात प्रकाश आणि छाया, रसायनशास्त्र, धातूशास्त्र, शरीरशास्त्र अशा विविध गोष्टींचा अभ्यास त्याने केला. त्याला स्वतःला अभियंता आणि वास्तूविशारद म्हणवून घ्यायला आवडायचं. आपल्या गुरुबरोबर त्याने “बाप्तिझम ऑफ क्राइस्ट” हे चित्र काढून कलेच्या दुनियेत आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर त्याने स्वतःचं काम सुरू केलं. “मोनालिसा” हे चित्र त्याने १५०३ मध्ये सुरू केलं आणि काहींच्या मते त्याच्या मृत्यूच्या दोन वर्ष आधी १५१७ मध्ये पूर्ण केलं. “द लास्ट सपर” हे लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे त्यातून एक गोष्ट उलगडत जाते. त्याच्या चित्रातली माणसं खरी असावीत म्हणून तो बाजारात, रस्त्यावर विशिष्टं माणसं शोधत फिरायचा, त्यांच्या चेहऱ्यावरच्या भाव-भावना टिपायचा. मानवी शरीररचनेचा अभ्यास करण्यासाठी त्याने देह विच्छेदनही केलं आणि शरिराच्या आतल्या अवयवांचा अभ्यास केला, त्यांची चित्रं काढली. पक्षांच्या उडण्यावरून कल्पना करून फ्लाईंग मशीनची पहिली रचना त्याने बनवली. त्याशिवाय हेलिकॉप्टर स्क्रू, पॅराशूट, मशीनगन अशा कितीतरी मशीनच्या रचना त्याने १५ व्या शतकात रेखाटल्या होत्या.

या काळामध्ये युरोपमध्ये कला, राजकारण, विज्ञान, धर्म, गणित, संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या उलाढाली झाल्या, शोध लागले. त्यातून आज प्रगत असलेला युरोप आपल्याला दिसतो. या काळामध्ये गॅलिलिओ, थॉमस हॉब्स, चॉसर, मॅकेवेली, कोपर्निकस, शेक्सपीअर, ख्रिस्तोफर कोलंबस, वास्को द गामा, मार्को पोलो, मार्टिन ल्यूथर, रॉबर्ट रेकॉर्ड, मेडिची, थॉमस मोर, मायकलअँजलो असे अनेक बुद्धिवंत, कलाकार, प्रवासी पुढे आले. त्यांनी जगाबद्दल त्या काळी असलेलं आकलन, चर्चच्या परिघाच्या बाहेर जाऊन शोधलं. माणसाला केंद्रस्थानी ठेवून घटनांचे अर्थ लावले, कलांना परिमाण दिलं म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. या चळवळीची सुरुवात इटलीमधील फ्लोरेन्स येथून १३ व्या शतकाच्या सुरुवातीला झाल्याचं मानलं जातं. आजही या काळातील विचारवंतांचा प्रभाव सर्व क्षेत्रांमध्ये दिसून येतो.

या काळामध्ये इटलीमध्येच लिओनार्दोने आपलं काम केल्याने त्याची लोकप्रियता, त्याच्या कामाची चर्चा खूप होती. या मालिकेमध्ये त्याच्या प्रमुख चित्रांमागची कथा, त्याचा कलाकार म्हणून असलेला विचित्रपणा, त्यावेळची राजकीय परिस्थिती, त्याचं वैयक्तिक जीवन हे खूप छान उलगडून दाखवले आहेत. एका प्रसंगामध्ये लिओनार्दो आणि त्याच्याहून थोडा तरुण असणारा आणखी एक महान चित्रकार मायकलअँजलो यांच्यामध्ये चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येते. दोघांचाही अहम् खूप जास्त असतो. शेवटी दोघंही ते चित्र अपूर्ण सोडून देतात. पण हा प्रसंग खूप मस्त रंगवलाय. चित्र काढण्याची लिओनार्दोची पूर्वतयारी, लोकांच्या भावना चित्रात उतरवण्याची धडपड, चित्र काढल्यावर एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करणं, अपेक्षित दृश्य परिणाम साधण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणं, भोवतालच्या जगाबद्दल सातत्याने उत्सुकता बाळगणं, सतत नव्याचा शोध घेत राहणं अशा कितीतरी पैलू मलिकेमध्ये अलगदपणे गुंफले आहेत. काल्पनिक कथा लिहितानाही इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतली आहे. कॅथरिन खरी असेल किंवा खोटी पण लिओनार्दोचा जीवनपट मात्र नक्कीच त्याच्या चित्रांप्रमाणे विविध पैलू दाखवून जातो.

shruti.sg@gmail.com