– राजेंद्र जाधव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आज मराठी भाषा दिन. बायकोचा वाढदिवस सोडला तर दुसरा कुठलाही दिवस लक्षात ठेऊ नये असा माझा समज. मात्र सकाळी – सकाळी WhatsApp वर मराठी भाषा दिनाच्या संदेशांचा भडीमार झाला. ते वाचून मराठी दरिद्री होत असल्याचही लक्षात आलं. तेच तेच संदेश चार-पाच लोकांनी पाठवलेले. हेच पुन्हा पुढल्या वर्षीही मिळतील याची खात्री. असो.
मराठीचं भवितव्य काय, ती कशी टिकणार, इंग्रजीच आक्रमण या आशयाची चर्चा सतत होत असतेच. आज तर अशी चर्चा करण्याचा गोरज मुहर्त. इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे राज्याच्या ७/१२ वर नाव लागलेली मराठी मरतेय असा सर्वसाधारण सूर. खरं तरं भाषा किंवा अन्य दिन साजरे करणा-या शहरातील संस्कृती रक्षकांसाठी मराठी केव्हाच कालबाह्य झालीय. वातानुकुलीत कार्यालयात, पंचतारांकीत हॉटेलमध्ये त्यांना मराठी बोलण्याची लाज वाटते. यांनीच मागील काही दशकात प्रमाण भाषेचं भुत तयार करून गावाकुसातल्या मराठीला दुय्यम भाषेचा दर्जा दिला. ग्रामीण भागातील लोकांना मराठीला अडगळीत टाकण्याची प्रेरणा दिली. असो.
मराठी येवढया सहजासहजी कालबाह्य़ होईल? खरंच स्थिती एवढी वाईट आहे?
थोडं मागं जाऊन पाहली तरं लक्षात येतं ही भीती अनाठायी आहे. 14 व्या शतकात दिल्लीच्या सुलतानाच्या अधिपात्याखाली राज्य गेलं. तेव्हा मराठी बोलणारे लोक राज्यात अत्यल्प होते (आजच्या तुलनेत). त्यांची नक्की संख्या किती याचा अंदाज बांधण कठीण आहे, मात्र ते सहा लाखांपेक्षाही कमी होते. मुद्रणाची यांत्रिक साधणं अपलब्ध नव्हती. साक्षरता नगण्य होती. यातच आदिलशाही, निजामशाहीच्या वरंवट्याखाली राज्य भरडलं जातं होत. सरकारी व्यवहार मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतून होई. अशाही परिस्थितीत पुढील चार शतकात संत परंपरा बहरली. अनेक उत्तम अशा ग्रथांची निर्मित्ती झाली. मोखिक पंरपरेनं जतन केलेल्या ग्रंथांच पुढे मोठ्या प्रमाणावर मुद्रन होऊ लागलं.
मग सध्या मराठीला कशाचं ग्रहण लागलं आहे?
सध्या राज्यात किमान ६ कोटी लोक मराठी बोलतात. मुद्रणाची साधणं लहान-लहान गावात उपलब्ध आहेत. मराठी ही राज्यभाषा आहे. टीव्ही, रेडीओ आहे. त्यावर अनेक मराठी वाहिन्या आहेत. मोबाईलचा प्रसार सर्वदूर झालाय. त्यावर अनेकांना मराठीतून संदेश लिहता येतात. मग
सहा कोटी लोक जी भाषा बोलतात ती कशी नामशेष होईल?
खरं तरं मराठी समाजाला नुन्यगडांन ग्रासलं आहे. आपली बलस्थानं काय आहेतं याची त्याला जाणीव नाही. उद्यमशीलता नसल्यांन बहुतांशी समाज नोकदार आहे किंवा शेतीवर अवलंबून आहे. इग्रंजी आलं तर नोकरीची कवाड उघडी होतीत या समजातून तो इंग्रजीच्या मागे धावतोय. पण हेच चित्र कायमस्वरूपी राहणारं नाही. काही दशकापूर्वी टंकलेखनाच्या जोरावर नोक-या मिळत होत्या. तो कालखंड मागे पडला. तसाच हा सध्याचा कालखंडही मागे पडेल. किंबहुना त्याची सुरूवातही झाली आहे. इंग्रजी येत असूनही अनेकजण बेरोजगार आहेत. इंग्रजी म्हणजेच नोकरी या समजाला जसा छेद जाईल तसे मराठी भाषेची पिछेहाट थांबेल.
गरज आहे ती विविध क्षेत्रांमध्ये प्रस्थापित झालेल्या लोकांनी मराठी बोलण्याची. त्यांच्या बोलण्याने सामान्य जणांना आधार मिळेल. श्रीमंत इंग्रजी बोलतात हे पाहतं गरीब, मध्यमवर्ग त्यांच अनुकरण करू लागला. त्याची नेमकी उलटी प्रक्रिया सुरू केली गेली पाहीजे. ती मराठी भाषकांना आत्मविश्वास देईल. त्याच्यातून पुन्हा भाषा बहरू लागेल. कारण भाषेच्या प्रसारासाठी आवश्यक असणार तंत्रज्ञान उपलब्ध आहे व स्वस्तही.