मयूरेश गद्रे

नुकताच १० वी चा निकाल जाहीर झाला. यंदा काही मुलांनी चक्क १००% मार्क मिळवण्याचा पराक्रम केला. या यशोगाथा वाचताना आपण आश्चर्यचकित होतो . इतकं घवघवीत यश यांनी कसं काय मिळवलं असेल? असाही प्रश्न आपल्या मनात येत असतो. ओजस म्हणजे माझा मुलगाही असेच भरघोस मार्क मिळवून उत्तीर्ण झाला होता. त्यासाठी स्मिताने आणि त्याने जे परिश्रम घेतले होते त्याचाही मी साक्षीदार होतोच. त्यामुळे या मुलांच्या यशाबद्दल किंवा त्यांनी हा टप्पा गाठण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं मलाही निश्चितच कौतुक आहे. पण आज मला जो अनुभव शेअर करावासा वाटतोय तो अगदी वेगळा आहे.

बालक मंदिर संस्थेच्या चार शाळा

मी ज्या बद्दल सांगतोय तिथे मार्कांचा पाऊस पडलेला नाही की कुणी एकजण ट्रॉफी उंचावत इतरांच्या खांद्यावर बसलेला नाही . पण तरीही इथला निकाल शंभर टक्के आहे आणि त्यामागची कमिटमेंट. तीदेखील तितकीच अस्सल आहे. आमच्या बालक मंदिर संस्थेच्या कल्याण मध्ये दोन माध्यमिक शाळा, एक म्हणजे आमची कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल आणि दुसरी आमची इंग्लिश मिडीयमची BMS सेकंडरी स्कूल . याशिवाय डहाणूजवळ चिंचला इथे आमची १ली ते १० वी आदिवासी आश्रमशाळा आहे आणि चौथी शाळा म्हणजे तलासरीच्या पुढे गुजरातच्या बॉर्डरवर असलेली गिरगाव या छोट्याशा गावातील “गिरगांव माध्यमिक विद्यालय” ही आमची शाळा. या चारही शाळांचे दहावीचे निकाल दरवर्षी उत्तम लागतात .

गिरगाव शाळेचा निकाल १०० टक्के लागला त्यामागची खास गोष्ट

यंदा गिरगांव शाळेचा निकाल १००% लागला आणि त्यामागे घडलेली एक, म्हटलं तर तशी छोटीशी पण जरूर सांगावी अशी घटना आहे. गुजरात सीमेला लागून असलेला हा भाग म्हणजे आदिवासी-वनवासी बहुल पट्टा ! धोडी , वारली , दुबळा, कातकरी या इथल्या काही प्रमुख जमाती. यापैकी धोडी , वारली , दुबळा या समाजातील मुलं आमच्याकडे प्रामुख्याने असतात. त्यांच्या भाषा म्हणजे गुजराती , हिंदी , मराठी अशा वेगवेगळ्या भाषांमधील शब्दांचं मिश्रण असलेल्या आदिवासी बोलीभाषा. आमची ही शाळा आठवी पासूनची माध्यमिक शाळा आणि त्याला जोडून कनिष्ठ महाविद्यालय. सातवीपर्यंत मुलं-मुली जवळच्या जिल्हा परिषद शाळेत शिकतात आणि आमची शाळा ही जरा कडक शिस्तीची म्हणून बरेच पालक आठवीला मुलांना इथे पाठवतात. पण त्यामुळे आठवीत सुरुवातीचे काही महिने एक वेगळाच संघर्ष असतो. अनेक मुलांना प्रमाण मराठी भाषा माहीतच नसते . म्हणजे असं की सातवीपर्यंत कुणीच नापास झालेलं नसल्याने एकंदर अक्षरओळख, शब्द-वाचन, वाक्यरचना, गणितातल्या मूलभूत संकल्पना , विज्ञानाचे साधे-सुधे नियम …..असा सगळ्याच बाबतीत सगळाच आनंदी-आनंद असतो . त्यामुळे आठवीचे पहिले चार-सहा महिने मुलांपेक्षा शिक्षकांचीच मोठी परीक्षा असते.

हे पण वाचा- उलगड ताणाची: अपेक्षांचे ओझे उतरवा

शिक्षकांसाठी आठवतली मुलं का असतात आव्हान?

साधा “मना सज्जना भक्तीपंथेचि जावे” हा एक श्लोक शिकवायला घड्याळी दोन तास म्हणजे शालेय परिभाषेत चार तासिका लागू शकतात. तीन चार आकडी संख्यांच्या बेरजा वजाबाक्या शिकवणं ही तारेवरची कसरत असते. पण आमचे सगळे शिक्षक यासाठी प्रचंड मेहनत घेतात. त्यातील दोघे तर याच शाळेत शिकून , मग महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून इथेच शिक्षक म्हणून रूजू झाले आहेत . इतरही सर्वाना या बोलीभाषा व्यवस्थित अवगत आहेत. त्यामुळे मुलांच्या कलाकलाने घेत शिकवलं जातं. त्यांचा सातत्याने सराव घेतला जातो तेव्हा कुठे पहिल्या सहामाही परीक्षेनंतर हळूहळू या मुलांची गाडी रुळावर येऊ लागते . ( अनेकदा दहावी-बारावीत या मुलांना त्यांचं आठवीतलं सुरुवातीचं लेखन दाखवलं की “आम्ही असं लिहित होतो ??? ” अशी त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया असते !) आठवीत जर एवढी मेहनत घेतली जात असेल तर दहावीलाही अर्थातच खूप जीव लावून शिकवलं जातं. ज्यांना गणित , विज्ञान जड जात असेल त्यांच्यावर विशेष लक्ष दिलं जातं. भाषेच्या बाबतीतही खूप काळजी घेतली जाते.

कसं होतं नुकतंच संपलेलं शैक्षणिक वर्ष?

नुकत्याच संपलेल्या २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षाची सुरुवातही अशीच होती. दहावीच्या मुला-मुलींवर खूप लक्ष दिलं जातं तसं याही वर्षी सुरू होतं. पण तरीही कुठेतरी काहीतरी गडबड झाली. ऑगस्टमध्ये पहिली चाचणी झाली. तोपर्यंत दोन तीन धडे शिकवून झाले होते. दहावीच्या वर्गात बऱ्याच मुलांना गणितात तीसपैकी दोन तीन ( २ -३) असे मार्क होते. स्वतः मुख्याध्यापिका खोत मॅडम आणि थोरात सर यांचे हे विषय. त्यांनाही खूपच आश्चर्य वाटलं. एरवी वर्गात ‘शिकवलेलं समजतंय का ?’ असं विचारल्यावर सगळे होकारार्थी माना डोलवायचे ! पण परीक्षेत बहुतेक सगळ्यांची दांडी गुल !

हे पण वाचा- वडिलांचं छत्र हरपलं, मुलानं रांगोळी, पणत्या विकल्या अन् दहावीत असे गुण मिळवले की सर्वांना अश्रू अनावर झाले

जालीम उपाय पण खास कमिटमेंटसाठीच!

यानंतर मॅडमनी आणि सर्व शिक्षकांनी एक वेगळाच उपाय योजला. एक दिवस सगळ्या मुलांना त्यांच्या गणिताच्या वह्या घेऊन बोलवलं. पावसाळा संपला होता. शाळेला भलंमोठं मैदान आहे. तर सगळ्यांच्या वह्या शिक्षकांनी एकत्र केल्या आणि सर्वांच्या साक्षीनं त्या वह्यांची चक्क होळी केली. आधीचं शिकवलेलं परत बघून लिहून काढतो म्हणायला कुणाला वावच ठेवला नाही ! परत पहिल्या धड्यापासून शिकवायला सुरुवात केली. त्यासाठी विशेष जादा तास घेतले. मुलांनाही बहुधा ते आतपर्यंत बोचलं असणार. उपायच इतका जालीम होता की प्रत्येकानं सुधारणा करायचं मनावर घेतलं.यंदाच्या मे महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला याचा परिणाम बघायला मिळाला शाळेचा निकाल १००% लागला !

‘कमिटमेंट’ या शब्दाची याहून अधिक चांगली व्याख्या मलातरी करता येणार नाही. केवळ खोत मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं अभिनंदन पुरेसं नाही. आमचे हे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हेही तितकेच कौतुक-पात्र आहेत !!
या यशाचं मनोमन कौतुक करावंसं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच !

(लेखक मयूरेश गद्रे, बालक मंदिर संस्था (कल्याण) चे कार्याध्यक्ष आहेत)

Story img Loader