धवल कुलकर्णी 

अवघ्या औट घटकेच्या मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घर करू लागला. या अवघ्या काही दिवसांच्या सत्तानाट्यातून भारतीय जनता पक्ष व फडणवीस यांनी नेमकं साधलं तरी काय?

आपण एका सत्योत्तर (post-truth) कालखंडात जगत असल्यामुळे, या शक्यता सत्याच्या किंवा तर्काच्या आधारावर सध्यातरी तोलून पाहता येणार नाहीत. पण, या चार दिवसाच्या तमाशा मुळे भाजपाने आपला उरलासुरला नैतिक अधिकार गमावला.

हे नेमके काय झाले? कशामुळे झाले? नेमक्या आकड्यांची शाश्वती नसतानाही, भाजपाने व पर्यायाने फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेऊन सत्तास्थापनेचा अगोचरपणा का केला असावा? हा नुसता सत्तेचा मोह होता का अजून काही? भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला फडणवीसांची गोची करायची होती का? असे तर झाले नसेल ना, की राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी सुरुवातीला होकार देऊन नंतर ऐन वेळेला पाऊल मागे घेतलं असावं? अर्थात काही प्रश्नांची उत्तरं काळाच्या ओघात मिळत राहतील, तरीही काही कळीचे प्रश्न असेच त्याच काळाच्या पोटात दडून राहतील…एक गोष्ट मात्र नक्की आहे,  शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस प्रणित महाआघाडी सत्तेवर आली तरी त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल.

स्पष्टच बोलायचं झालं तर ताटात अन्न कमी आणि खाणारी तोंडे जास्त… मंत्रीपद व महामंडळं कमी व इच्छुक अक्षरशः खंडीभर. शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यामध्ये म्हणाल तर सैद्धांतिक राजकीय पातळीवर प्रचंड मतभेद आहेत. दीर्घकाळात बघायचं झालं तर शिवसेनेशी गट्टी करणं राष्ट्रवादीलाही परवडणार नाही. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची प्रभावक्षेत्रं मिळतीजुळती आहेत. दुसरीकडे हिंदुत्व वादाचा व मराठी विरोधी असल्याचा शिक्का लागलेल्या शिवसेनेसोबत जाणं, काँग्रेसला सुद्धा इतर राज्यात परवडणार नाही. विशेषतः उत्तर भारतातील हिंदी भाषिक प्रदेशात. शिवसेनेला सुद्धा कुठेतरी स्वतः हिंदुत्व  बाजूला ठेवावं लागेल.

हिंदुत्वाच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्ष कुठेतरी शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सततच करत राहणार. त्यामुळे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजलखानाची कबर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न असे अनेक मुद्दे येत्या काळात चर्चेत राहतील हे नक्की. उद्धव ठाकरे यांचं नाव जरी मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलं तरी सुद्धा या खिचडी सरकारचे नेते म्हणून त्यांना तारेवरची कसरतच करावी लागेल. या पक्षांना एकत्र ठेवणारं फेविकॉल म्हणजे तात्कालिक सत्तेची गरज, व भाजप ल दूर ठेवण्याची इच्छा. थोडक्यात सांगायचं झालं तर, ह्या सरकारला तीन पायांची लंगडी करावी लागेल.

हा प्रयोग यशस्वी होऊ नये म्हणून भाजपा नक्कीच जंगजंग पछाडलं. वैचारिक व राजकीय पातळीवर पूर्णपणे भिन्न असलेल्या या पक्षांनी एकत्र येऊन काही काळ का होईना सरकार यशस्वीपणे चालवलं तर असे अनेक प्रयोग इतर राज्यात सुद्धा होऊ शकतात. अगदी १९६९ च्या काँग्रेस विरोधी संयुक्त विधायक दलाच्या सरकार प्रमाणे एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की, आज भाजप विरोधात खऱ्या अर्थाने संघर्ष करणाऱ्या शक्ती म्हणजे प्रादेशिक पक्ष आहेत. काँग्रेस नाही, जर या सर्व शक्ती व काँग्रेस एकत्र झाल्या त्यांच्या एकतेची वज्रमूठ भाजपाला फार भारी पडू शकतं. त्यामुळे हा प्रयोग फसावा, म्हणून भारतीय जनता पक्ष जंग जंग पछाडलं हे वेगळे सांगायला नको. त्यात परत हे सरकार कमकुवत पायावर उभे आहे हेही तितकेच खरे.

त्यामुळे या सत्ता नाट्याचा शेवटचा अंक अजून लिहिला जायचा आहे…

पण शेवटी म्हणतात ना बूँद से गयी वो हौद से नही आती…

 

Story img Loader