चंदन हायगुंडे
पुण्यातील ‘स्व’-रूपवर्धिनी या शैक्षणिक सामाजिक संस्थेचे कार्यवाह ज्ञानेश पुरंदरे (वय ४९) यांचे २२ जुलै, २०२० रोजी कोरोनामुळे निधन झाले. १९७९ साली जेष्ठ समाज सेवक किशाभाऊ पटवर्धन यांनी पुण्यातील पूर्व भागात मंगळवार पेठे येथे वस्ती परिसरात वंचित गटातील मुलांच्या विकासासाठी ‘स्व’-रूपवर्धिनीची स्थापना केली. दैनंदिन शाखा म्हणजेच एकात्मिक बालविकास प्रकल्प आणि विविध क्षेत्रांशी संबंधित अन्य विभागांच्या माध्यमातून चालणाऱ्या संस्थेच्या कामाचा आता मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. यात ज्ञानेश पुरंदरेंचा वाट खूप मोठा आहे.
१९९२च्या सुमारास इयत्ता पाचवीत असताना ‘स्व’-रूपवर्धिनीत जाऊ लागलो तेंव्हा पहिल्या दिवसापासून ज्ञानेश पुरंदरेंचा सहवास लाभला. त्यांना आम्ही सर्वजण प्रेमाने “ज्ञापू” म्हणतो. किशाभाऊंच्या तालमीत तयार झालेले ज्ञापू बालपणापासून ‘स्व’-रूपवर्धिनीच्या कामात सक्रिय. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी काही काळ बजाज ऑटोमध्ये नोकरी केली. मोठ्या कंपनीत, चांगल्या पगाराच्या नोकरीत त्यांना समाधान वाटले नाही. मग १९९६ मध्ये त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ ‘स्व’-रूपवर्धिनीचे काम सुरु केले. आणि “विकसित व्हावे, अर्पित होऊनी जावे” या ‘स्व’-रूपवर्धिनीच्या ब्रीद वाक्यानुसार त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केले.
पोरांमध्ये पोरांसारखे आणि थोरांमध्ये थोरांसारखे मिसळून जाणारे ज्ञापू म्हणजे एक अजब रसायन. अत्यंत प्रसन्न, उत्साही व्यक्तिमत्व. दिसायला रुबाबदार पण कायम साधी राहणी स्वीकारली. बालवाडीतली मुले असो किंवा तरुणाई असो किंवा जेष्ठ मंडळी. ज्ञापू यापैकी सर्वांनाच पटकन आपलेसे करून घ्यायचे. त्यांना वाचनाचीही आवड होती. वक्तृत्व कलेत ही ते पारंगत. विद्यार्थी, युवक गटासाठी एकामागून एक असे सामाजिक उपक्रम, कृती सत्र, सायकल सहली, अभ्यास दौरे, शैक्षणिक शिबिरांचे नियोजन करणे, त्यांना घेऊन शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात ट्रेकला जाणे आणि मग शिवचरित्र असो किंवा अन्य विषय, ज्ञापू बोलायला लागले कि ऐकणारे प्रेरित होणारच. कारण ज्ञापू जे सांगायचे तसे स्वतः जगायचे.
शालेय जीवनातील प्रसंग आठवतो. ज्ञापू असे समोरून चालत आले. कुर्ता-पायजमा आणि शबनम घातलेल्या ज्ञापूंचा हसरा चेहरा पाहून छान वाटल्याने आम्ही मुले म्हणालो “ज्ञापू आज तुम्ही मस्त… भारी दिसत आहात.” ज्ञापू आपल्या खास शैलीत म्हणाले “अरे बाळांनो, कायम लक्षात ठेवा…दिसण्या पेक्षा असण्याला महत्व आहे..” ज्ञापुंचे ते वाक्य कायमचे लक्षात राहिले. ज्ञापू जगले ही तसेच. “दिसण्या”पेक्षा कायम देशसेवेत “असण्याला” त्यांनी महत्व दिले. इतरांच्या जीवनात सकारात्मकता यावी म्हणून स्वतःला झिजवित दिवस-रात्र झोकून देऊन अविश्रांत काम केले. ‘स्व’-रूपवर्धिनीच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांचे त्यांनी जीवन घडविले. या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे ते सदस्य, आधार झाले. अडी-अडचणीत ज्ञापूंची भक्कम साथ, चुकलो तर त्यांचे हक्काने रागवणे आणि चांगले काम केले कि त्यांनी मायेने दिलेली कौतुकाची थाप कधीच विसरू शकत नाही.
ज्ञापूंचा जनसंपर्क प्रचंड. कामानिमित्त आणि सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी देशभरात विविध राज्यांमध्ये प्रवास केला, विदेशातही त्यांचे जाणे झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे ते मार्गदर्शक होते. आपल्या सेवा कार्यातून, संघटनात्मक कामातून, प्रेरणादायी व्याख्यानांमधून, प्रत्यक्ष संवादातून ज्ञापूंनी महाराष्ट्रभरात हजारोंच्या मनात जाती, धर्म, पंथाचे भेद सोडून राष्ट्रप्रेमाची, बंधुत्वाची, राष्ट्रसेवेची प्रेरणा जागृत केली. आणि असे करताना स्वतःच्या जीवनात कितीही चढ-उतार आले तरी स्वभावातला आपलेपणा आणि कामातली जिद्द कधीही कमी होऊ दिली नाही.
दगडातल्या देवापेक्षा माणसातल्या देवाला त्यांनी महत्व दिले. आपल्या समस्या घेऊन ज्ञापूंकडे गेलेला माणूस, मग तो कोणीही असो, त्याचा त्रास आपला मानून ते दूर करण्यासाठी जे जे शक्य ते ते करायचे, त्याच्यासोबाबत खंबीरपणे उभे राहायचे, हे त्यांचे ठरलेले. समाजात घडणाऱ्या कोठेवाडी सामूहिक बलात्कार सारख्या घटना असोत किंवा भूंकप, त्सुनामी, महापूर सारख्या नैसर्गिक आपत्ती, ज्ञापू आपल्या कार्यकर्त्यांसह सेवाकार्यास हजर. कोरोनाचे संकट आल्यावरही ‘स्व’-रूपवर्धिनीच्या माध्यमातून पुणे शहरातील शेकडो गरजवंतांना जीवनवश्यक वस्तू व आरोग्य सुविधा देण्यासाठी ते अखंड कार्य करीत होते. परंतु दुर्दैवाने कोरोनाने त्यांच्यावरच हल्ला केला….आणि अखेर पर्यंत मनुष्य सेवेत व्यस्त असणारे तपस्वी जीवन, हे ज्ञानेश पुरंदरे नावाचे निस्वार्थ सेवेचे वादळ शांत झाले. संपूर्ण ‘स्व’-रूपवर्धिनी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्ञापूंच्या आठवणींनी मन अस्वस्थ होते. कोरोनामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली कि एकत्र येऊन एक-मेकांना मिठी मारून, रडून, बोलून, दुःख वाटून घेण्याचीही सोय राहिली नाही. ज्या माणसाने आपले जीवन घडविण्यासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण केले त्याला शेवटचा निरोप देण्यासाठीही कोरोनामुळे जाता आले नाही ही सल सर्वांच्या मनात कायमची राहणार आहे.
परंतु ज्ञापू सदैव स्मरणात राहतील. “दिसण्यापेक्षा असण्याला महत्व आहे” या विचाराने जगणाऱ्या ज्ञापुंना कोरोना पराभूत करू शकला नाही. कारण कोरोनाने त्यांचे दिसणे संपविले, त्यांचे असणे संपवू शकला नाही. ज्ञापुंचे फक्त शरीर इथून पुढे दिसणार नाही. निस्वार्थ देशसेवेची प्रेरणा बनून ते कायम मनात असतील. त्यांचे सहकारी आणि त्यांनी घडविलेले सर्व सेवेकरी त्यांचे कार्य पुढे घेऊन जातील.
सत्कर्म हातूनी व्हावे
मम मना जडो हा छंद,
कर्तव्य पाडता पार
दरवळो यशाचा गंध…
ज्ञानेश पुरंदरेंना भावपूर्ण श्रद्धांजली….
जय हिंद !