भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी आज एक वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य आहे ते थेट भीमरूपी महारूद्र समजल्या जाणाऱ्या मारूतीयाबद्दल, बजरंगाबद्दल! भाजपा आमदार बुक्कल नवाब म्हणतात की मुस्लिमांची नावे रहमान, रमजान, फरमान, झीशान, कुर्बान अशी ठेवली जातात. त्याचे मूळ कारण हनुमान हे नावच आहे. हनुमान म्हणजे शक्तीची देवता, रामरायाचा दूत, सखा, भक्त मानला जातो. राजकारण्यांनी तर त्याला जातींमध्ये आणि धर्मांमध्ये विभागून टाकले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाला थेट आदिवासी ठरवून टाकलं. हनुमान जंगलात राहात होता, वंचित होता म्हणून त्याला आदिवासी ठरवून योगी आदित्यनाथ मोकळे झाले. त्यानंतर निवडणुकांमध्ये जो पराभव सहन करावा लागला त्यानंतर योगी आदित्यनाथांनी आपले वक्तव्य मागे घेत मी तसे बोललोच नाही असे म्हणून यू टर्न घेतला. जे उपेक्षित आहेत, वंचित आहेत त्यांना बजरंगबली शक्ती देतो असे मी म्हटले होते त्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे म्हणत योगी आदित्यनाथांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली.
निवडणुका आल्या की भाजपाला राम आठवतो अशी टीका कायम विरोधक करतात.एव्हाना हे जनतेलाही समजलं आहे. धर्माचं राजकारण करायचं आणि राजकारणाचा धर्म बाजूला ठेवायचा. रामाच्या जोडीला त्याच्या परमभक्तालाही म्हणजेच मारुतीरायालाही निवडणुकीच्या मैदानात आणलं. हनुमानाला धर्मांमध्ये, जातींमध्ये वाटून या लोकांनी काय मिळवलं? तर काहीही नाही फक्त धर्माचं राजकारण केलं, बाकी काहीही नाही. राजस्थानचे भाजपाचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनीही हनुमानाला दलित ठरवलं. माणसाने देवाला जाती धर्मात वाटू नये, सगळ्यांचा देव एकच ही शिकवण हे महाशय अगदी सहज विसरले. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम, तेलंगण या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांनी हनुमानाला अचानक इतकं आपलंसं केलं आणि राजकारणासाठी या देवाचाही वापरच केला. हनुमानाला दलित असं संबोधण्यात आल्यावर भीम आर्मीने हनुमानाची सगळी मंदिरं ताब्यात घेण्याची घोषणा केली. त्यानंतर काय होणार? हा प्रश्न निर्माण झालेला असतानाच निवडणुका पार पडल्या आणि त्यांचा निकालही आला. हनुमानाच्या गदेच्या प्रहारात जसा शत्रू चीतपट व्हायचा तशीच अवस्था भाजपाची झाली.
भाजपाला जनतेने असा धोबीपछाड दिला की सगळ्या राज्यात पराभवाची नामुष्की सहन करण्याची वेळ भाजपावर आली. एवढं सगळं घडल्यावर निदान भाजपाच्या नेत्यांना अक्कल येईल असे वाटले होते. मात्र तसे काहीही घडले नाही हेच आजचे बुक्कल नवाब यांचे वक्तव्य दाखवून देते आहे. भाजपामध्ये वाचाळवीरांची अजिबात कमतरता नाही. आमच्या नेत्यांनी थोडा जीभेवर ताबा ठेवला पाहिजे असे वक्तव्य आजच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले. त्याला काही तास उलटत नाहीत तोच हे वक्तव्य समोर आले आहे.
खरंतर मारूती, हनुमान, बजरंगबली म्हटलं की आपल्या समोर येतं ते त्याचं मोहक आणि लोभस रुप, सूर्याला फळ समजून गिळायला निघालेला भोळा लहानगा. रामाची भक्ती किती आहे हे छाती फाडून दाखवणारा भक्त. रावणाचे गर्वहरण करून लंकादहन करणारा मारूती. रामपंचायतनात रामाच्या पायाशी बसून त्याची सेवा करणारा हनुमान. या भीमरुपी महारूद्राला शंकराचाही अवतार मानलं जातं. सीतेला मातेसमान मानणाऱ्या आणि रामाला सखा, मित्र आणि सर्वस्व मानणाऱ्या या मारूतीला भाजपाच्या नेत्यांनी जाती धर्मात अडकवलं. कशासाठी हा अट्टाहास तर मतं मिळवण्यासाठी? बाजारात देव असतो हे आपण अनेकदा पाहिलं आहे. देव सगळीकडेच असतो अशी आपली सगळ्यांचीच श्रद्धा आहे. मात्र या नेत्यांनी तर देवाचाच बाजार मांडला. भीमाला जेव्हा गर्व झाला आणि मीच शक्तीशाली आहे असं वाटू लागलं तेव्हा त्याचं गर्वहरण हनुमानानेच केलं. आता भाजपा नेत्यांना पराभवाचा धडा पुरेसा नाही त्यांचा गर्व अजून कमी झालेला नाही. तो कमी करण्यासाठी बहुदा या चिरंजिवालाच त्यांना धडा शिकवावा लागणार आहे. तरच या नेत्यांच्या जीभेवर लगाम बसण्यास मदत होईल.
मध्यंतरी सलमान खानचा एक सिनेमा आला होता ज्यामध्ये चल बेटा सेल्फी लेले रे.. हे गाणे होते. त्यात मारूतीसोबत सेल्फी घेताना अनेक लोक दाखवण्यात आले आहेत. या लोकांनी मात्र मारूतीसोबत नुसता सेल्फी काढला नाही तर त्याला या निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं. याच सिनेमातला बजरंगी भाईजान बनून एका हरवलेल्या मुक्या मुलीला तिच्या घरी म्हणजे थेट पाकिस्तानात पोहचवतो… त्यावेळी त्याला सगळे दुवा देतात, आपला बजरंगी त्यांचा भाईजान होतो. इथे खऱ्याखुऱ्या हनुमानाला आदिवासी, दलित, भाईजान ठरवलं जातं आहे. तो क्षमाशील आहे म्हणून गप्प आहे. पण खरंच तो कोपला आणि त्याने त्याच्या गदेची झलक दाखवली भाजपा नेत्यांना पुन्हा एकदा तोंडघशी पडावं लागेल यात शंका नाही. त्यामुळे निदान गडकरींचा सल्ला ऐकून तरी भाजपाच्या वाचाळवीरांनी गप्प बसावं किमान हनुमानाला या राजकारणात खेचू नये नाहीतर असा पराभवाचा असा फटका बसेल की कितीही भाईजान भाईजान ओरडलात तरीही बजरंगबली धावून येणार नाही, हा धडा भाजपा नेत्यांनी आत्ताच गिरवून ठेवावा.
समीर जावळे
sameer.jawale@gmail.com