डॉ. नीरज देव
सावरकर बहुरंगी व्यक्तित्व होते. ते जसे व जितके कट्टर हिंदुत्ववादी होते तितके नि तेवढेच विज्ञाननिष्ठ होते. ही बाब त्यांच्या विरोधकांना तर पचनी पडतच नाही पण त्यांच्या अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांच्याही पचनी पडत नाही. पुरोगामी जगाला हे पटतच नाही की हिंदुहृदयसम्राट म्हणविले जाणारे सावरकर उच्च प्रतीचे बुद्धिनिष्ठही आहेत.बुद्धिनिष्ठ हा शब्द मी हेतुपूर्वक वापरतो आहे.
बुद्धिजीवी, बुद्धिवादी व बुद्धिनिष्ठ असे तीन शब्द आपल्या पाहण्यात येतात. या शब्दांच्या अर्थाकडे पाहू जाता असे दिसते कि, बुद्धिजीवी म्हणजे ते जे उदरनिर्वाहासाठी बुद्धीचा वापर करतात मात्र व्यक्तीगत जीवनात ते बुद्धीपासून दूर अशा रुढी, परंपरा व अंधविश्वासाचा उपयोग करतात. विधिज्ञ, वैद्य, प्राध्यापक इत्यादिंचा समावेश या गटात होत असतो. बुद्धीवादी त्यांना म्हणतात जे वादविवाद, चर्चा आदिंसाठी बुद्धीचा पूरेपूर वापर करतात पण व्यक्तीगत जीवनात मात्र हे लोक धर्मश्रद्धा, रुढी, परंपरा इत्यादिंना महत्वपूर्ण स्थान देतात. पुरोगामी विद्वान, पत्रकार, समाजसेवक यांचा समावेश या गटात करता येतो. बुद्धीनिष्ठ त्यांना म्हणतात ज्यांच्या विचारात व व्यवहारात बुद्धीनिष्ठा दिसत असते. सार्वजनिक जीवनात असो वा व्यक्तीगत जीवनात त्यांचे बहुतेक निर्णय हे बुद्धीनेच घेतलेले असतात. सावरकरांचे जीवन या तिस-या प्रकारात मोडते.
सावरकरांच्या बुद्धीनिष्ठेचा जन्मः
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेड्यात ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या विनायकाचे धार्मिक असणे स्वाभाविकच होते. बालपणी ते जगदंबेचे भक्त होते. तास न् तास ते देवीची पूजा करायचे. जात्याच कमालीची एकाग्रता व तीव्र भावनिकता असल्यामुळे कधी कधी त्यांना देवीचे दर्शन व्हायचे, देवीचा आवाज ऐकू यायचा।कित्येकवेळा आई भगवती आपल्याला सहाय्य करते असेही त्यांना वाटायचे. सावरकर जितके संवेदशील, भावनाप्रधान होते तितकेच बुद्धीनिष्ठ व तर्ककठोर असल्याने जीवनभर भक्ताची ही अवस्था राहणे संभवनीय नव्हते. ती वेळ लवकरच आली, त्यांच्या वडिलांना काहीतरी मोठे कर्ज द्यायचे होते त्यामुळे ते फार चिंतित होते. त्यांना एका देणकऱ्यांकडून पैसे येणार होते त्यावर त्यांची भिस्त होती. पण देणेकरी आज उद्या करायला लागला तशी अण्णांची तगमग वाढू लागली. हे पाहून लहानग्या विनायकाला काही सूचेनासे झाले. त्याने लगेच जगदंबेची आराधना केली. पूर्ण भक्तीभावाने व आंतरिक तळमळीने तिला प्रार्थिले. त्याला शतप्रतिशत विश्वास होता, आई जगदंबा काहीतरी चमत्कार करुन मार्ग काढेल. पण झाले उलटेच घेणेकरी आले पण देणेकरी आलाच नाही.
यानंतर सावरकरांच्या जीवनातला देवीभक्तीचा अध्याय थांबून गेला. त्यांचे बुद्धीचे तर्करुपी डोळे खाडकन उघडले. आजवर ज्या पोथ्या ते निखळ भक्तीभावाने वाचीत त्या बुद्धीचे डोळे लावून वाचताच त्या पोथ्यांतील विसंगती त्यांना दिसू लागली. परमेश्वर भक्तांना सहाय्यता करतो असेच नाही तर तो नुकसान ही करत असतो हे तथ्य त्यांना त्याच पोथ्यात दिसू लागले. ज्याप्रमाणे महादेवाच्या पिंडीवर बसलेला उंदीर पाहून मूळशंकराचे डोळे उघडले त्याचप्रमाणे वडीलांवरील उपरोल्लेखित प्रसंगामुळे विनायकाच्या तर्क बुद्धीचा जन्म झाला. आधी त्यांची बुद्धी भक्ती कडून तत्वजिज्ञासेकडे व नंतर तत्वचिंतनातून बुद्धीनिष्ठेकडे वळली व अंतत; सावरकरांना उच्च कोटीच्या बुद्धीनिष्ठांत विराजमान करती झाली.
समाज उभारणीचा आधारः वेद नाही विज्ञान !
हिंदुत्ववादी सावरकर समाजाची उभारणी वेद-उपनिषद आदि कोणत्याही धर्मग्रंथावर नाही तर विज्ञानावर करु इच्छित होते. त्यांचे असे स्पष्ट मत होते कि, कोणताही धर्मग्रंथ वेद, बायबल, कुरान, अवेस्ता वा एंजिल ईश्वर प्रणित व अपौरुषेय नाही. या सर्व धर्मग्रंथांचा उपयोग काल काय झाले होते ते सांगण्याचा आहे, आज काय करावे हे सांगण्याचा नाही आणि उद्या काय करावे हे सांगण्याचा तर मूळीच नाही. त्यामुळेच ते लिहितात, ‘’आम्ही कोणत्याही धर्मग्रंथाला अपरिवर्तनीय व त्रिकालाबाधित मानत नाही. श्रृति स्मृति, पुराण इ धर्मग्रंथांना आम्ही कृतज्ञतापूर्वक आदराने व आत्मीतयतेने सन्मानतो. परंतु ते ऐतिहासिक ग्रंथ म्हणून, अनुलंघनीय धर्मग्रंथ म्हणून नव्हे.
‘’त्यांची ही धारणा सरळसरळ धर्मग्रंथांना निरोप देणारी आहे. जगातील सर्व धर्मग्रंथांची निर्मिती ज्याकाळी झाली असेल त्या त्याकाळी ते उपयुक्त असतील, आजवर मनुष्यजातीचा जो जो विकास झाला त्यात त्यांचेही यथायोग्य योगदान आहे त्यामुळे त्यांना कृतज्ञतापूर्वक आदराने बोळवले पाहिजे असा त्यांचा भाव होता. त्यामुळे एके ठिकाणी ते म्हणतात, ‘कोणताही धर्मग्रंथ वाचण्याची योग्य पद्धति म्हणजे ‘अथश्री’ पासून नव्हे तर ‘इतिश्री’ पासून होय.’ त्यांच्या याच विचारांमुळे बायबलला त्यागून विज्ञानाच्या आधारावर उभया असलेल्या युरोपचे त्यांना कौतुक वाटत होते. तत्कालीन रुढीग्रस्त भारताची दयनीय स्थिती पाहून व्यथित अंतःकरणाने ते लिहितात, ‘’ ते (युरोपियन) पूजक ‘आजचे’ आम्ही कालचे! ते नव्याचे, आम्ही जुन्याचे ! ते ताज्याचे भोक्ते आम्ही ‘शिळ्या’चे! एकंदरीत पाहता त्यांची संस्कृति अद्यावती, आमची पुरातनी’’ (विज्ञाननिष्ठ निबंध ८२)या पुरातनी प्रवृत्तीचा उल्लेख ते ‘अडाणी’, ‘सडलेली’, ‘अडगळीची’ या शब्दात करुन वेदस्मृति इत्यादिक हिंदुंना प्रमाणभूत असणा-या ग्रंथांच्या संदर्भात स्पष्टपणे लिहितात, ‘’आम्ही ज्यास अपौरुषेय नि त्रिकालाबाधित मानीत आलो, तो धर्मग्रंथ आजच्या सा-या उपलब्ध धर्मग्रंथांत पुरातन – पाच हजार वर्षांपूर्वीचा धरला तरीहि (तो) पाच हजार वर्ष मागासलेला ! जग पाच हजार वर्षे पुढे गेलेले !! ‘’ (विज्ञाननिष्ठ निबंध ८३)आज युरोपात १९३६ साल चाललय तर आमच्याकडे प्रगतिचे १७३६ चाललंय, आम्ही युरोपपेक्षा २०० वर्षे मागासलेले आहोत. अशी व्यथा व्यक्त करीत ते हिंदू समाजाला अपरिवर्तनीय धर्मग्रंथाच्या विळख्यातून सोडवून परिवर्तनशील विज्ञानाच्या पायावर उभे करु इच्छितात.
ईश्वरवाद विरुद्ध विज्ञानवाद
सावरकरांची अशी धारणा होती कि, हिंदुंना विकास करुन घ्यायचा असेल तर त्यांनी दैववाद वा ईश्वरवाद त्यागून विज्ञानवादाची कास धरायला हवी. ते कुराणीय, पुराणीय व बायबलीय सा-या ईश्वरवादाच्या विरोधात होते. ईश्वरवादाला ते देवभोळेपणा असे संबोधतात. ईश्वरवादाची व्याख्या करताना ते लिहितात,‘’देवभोळेपणा म्हणजे प्रत्येक गोष्टीचे कारण देवाची लहर, राग वा लोभ; आणि त्या घटनांपैकी संकटघटना टाळण्याचा उपाय म्हणजे देवाला प्रसादविणे! अर्थात् त्याचे यंत्र म्हणजे प्रार्थना, पूजा, सत्यनारायण, जपजाप्य, छा छू !…प्लेग आला बहिरोबापुढे बोकड मारा ! नाहीतर ईदला गाईची कुरबानी करा; खुदा भला करेगा !’’ (विज्ञाननिष्ठ निबंध १०६)
ईश्वरवादाचा बनावटपणा त्यांनी केवळ लेखातूनच नाही तर अनेक कथातून चितारला आहे. बकरीचा बळी दिला नाही म्हणून कोप करणा-या देवाची गोष्ट वर्णन करुन ते बुद्धीला धक्का देणारा प्रश्न विचारतात कि एखाद्या बोकडाचा बळी दिला नाही म्हणून महामारी पसरवून हजारो बालकांना, स्त्री-पुरुषांना मारणा-या ईश्वराला क्रूर म्हणायचे की लाचखाऊ लालची म्हणायचे? पूजेचा प्रसाद ग्रहण केला नाही या क्षुल्लक कारणासाठी कोप करणा-या देवाला देव तरी म्हणता येईल का? एवढेच नाही पुढे जाऊन ते विचारतात, जर देव आपल्याला एखाद्या संकटातून वाचवतो म्हणून आपण त्याची पूजा-प्रार्थना करीत असू तर त्या संकटात त्यानेच आपल्याला ढकलले म्हणून त्याची यथेच्छ शोभा करायला नको का? मात्र या दोन्ही बाबी त्यांना अर्थहीन वाटतात. मनुष्याला केंद्रस्थानी ठेवून या विश्वाची निर्मिती झाली या आपल्या भोळेपणामुळे अशी भावना उपजते व ती पूर्णपणे खोटी व तथ्यहीन आहे असे त्यांचे प्रतिपादन आहे.
त्यामुळेच ‘अस्पृश्यता पाळल्याने बिहार मध्ये भूकंप झाला’ या म गांधींच्या वक्तव्याला व ‘अस्पृश्यता न पाळल्याने अधर्म होऊन क्वेटात भूकंप झाला’ या शंकराचार्याच्या वक्तव्याला ते ईश्वरवादरुपी नाण्याच्या दोन बाजू मानतात व दोनही वक्तव्याचा कडक निषेध करतात.भारताच्या अवनतीचे, पारतंत्र्याचे कारण ईश्वरवाद आहे तर युरोपाच्या उन्नतीचे व विकासाचे कारण विज्ञानवाद आहे अशी त्यांची सुस्पष्ट धारणा होती. ईश्वरवादामुळे माणसाला तर्कशुद्ध सारासार विचार करता येत नाही असे त्यांचे म्हणणे होते.त्यामुळेच असेल; बायबल नाकारुन विज्ञानवादाची कास धरणा-या युरोपचे, धर्म अजिबात न मानणा-या रशियाचे इतकेच नव्हे तर मुसलमान असलेल्या पण कुराणप्रामाण्य नाकारणाऱ्या केमालपाशाचे ही त्यांना कौतुक वाटते. त्यांची मुक्तकंठाने स्तुती करताना ते आढळतात. कोणी युरोप अमेरिकेत ईश्वरवाद पाळतात याचे एखादे उदाहरण देऊन ईश्वरवादाचे समर्थन करु लागला तर, ‘युरोप- अमेरिकेत पागलखाने नाहीत का?’ असा खोचक सवाल करायला ते मागेपुढे पहात नाहीत.
ईश्वरवादावर कठोर प्रहार
समाजात विज्ञानवाद रुजवायचा असेल तर आधी ईश्वरवादाला मूळापासून उपटावे लागते हे सावरकरांना पक्के ठाऊक होते म्हणून विचार प्रवर्तक विज्ञाननिष्ठ निबंध, ईश्वरवादावर प्रहार करणारे क्ष किरणात्मक लेख व भावनांना आंदोलित करणा-या अंधःश्रद्धा निर्मूलक कथा त्यांनी लिहिल्या. हिंदूंना श्रद्धास्थान असलेल्या यज्ञ, गाय, अंत्येष्टी इत्यादि बाबींना लक्ष्य करुन तर्ककठोर प्रहार त्यांनी केले. त्यांच्या या विचारांनी केवळ महाराष्ट्रच नाही तर भारतातील अन्य प्रांतातही गदारोळ उठला.यज्ञात् भवति पर्जन्यः या वचनाचा समाचार घेताना सावकर विचारतात जर यज्ञाने पाऊस पडत असता तर वर्षानुवर्षे इतके यज्ञ करणा-या भारतात वारंवार दुष्काळ का पडतात? आणि एकदाही यज्ञ न करणा-या, इतकेच कशाला पाऊस पाडणाऱ्या मरुत देवाला न विचारणाऱ्या रशिया व युरोपात एवढा पाऊस कसा काय पडतो? सटीची पूजा करणा-या भारतात बालमृत्युचे प्रमाण सटीला न मानणा-या युरोपच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे, हे सर्व काय दर्शवते? या साऱ्यातून इतकाच अर्थ निघतो कि या सर्व बाबी तथ्यहीन व खोट्या आहेत, लगेच सोडाव्या अशा आहेत.
‘गाईला आई मानणारा तो हिंदू’ अशी हिंदुची व्याख्या आचार्य धमेंर्द्रादि काहीजण करतात, जी जवळपास सर्वच संत महात्म्यांना मान्य आहे. गोरक्षण, गो-पूजनावर आज एकविसाव्या शतकात ही हिंदू मानस ठाम आहे, गो हत्येवर ते आज ही प्रक्षुब्ध होताना दिसते. यावर सावरकर जवळपास नव्वद वर्षांपूर्वी तर्ककठोर प्रहार करताना ते विचारतात गाय कोणाची माता ?बैलाची !…माणसाची नाही !!गाय कोणाची देवता?कदाचित गाढवाची ! मानवाची नाहीच नाही !!मानव विकसित प्राणी आहे, त्याला गौरवचिन्ह म्हणून कोणत्याही प्राण्याचे प्रतीक घेण्याची आवश्यकता नाही. गोमांस भक्षणावर ते लिहितात ज्याला ते आवडत असेल व वैद्यकीयदृष्या हितकर असेल त्याने ते खावे. या सा-याचा उद्देश हिंदुंमध्ये वसणाऱ्या गाईत देवांचा वास असतो, गाय पवित्र असते, तिची हत्या घडली तर पाप लागते, तिची पूजा करणे, तिला नैवेद्य (गोग्रास) देणे परमकर्तव्य आहे ईश्वरवादी भावना मूळातून उपटण्यासाठीच होता.
मात्र केवळ हिंदूंना चिडवायचे या दुष्ट हेतुने जर कोणी गो-हत्या करीत असेल तर सावरकर त्याच्या कडक विरोधात होते. एका ठिकाणी ते विचारतात जर ईश्वर सर्वशक्तीमान असेल तो तुकाराम, नामदेव, जनाबाई इ संतांना वारंवार भेटत होता, त्यांचे छोटे छोटे कामं करीत होता, त्यांच्या किर्तनात येऊन नाचत होता तर मग तो म्लेच्छांचा नाश का नाही करु शकला? निदान जेंव्हा मुस्लिम राजे त्याच्या भक्तांना छळायचे तेंव्हा तरी त्याने त्यांना वाचवायला यायला हवे होते ! या पद्धतीने विचारुन हिंदू भक्तीमानसाला धक्का देत खडबडून जागे करण्यासाठी ते विचारतात,‘’रेड्याच्या मुखे ते (ज्ञानेश्वर) वेद बोलवू शकले, पण ‘रामदेवराजा, अल्लाउद्दीन तुझ्यावर चाल करुन येतो आहे बघ म्हणून टपालवाल्यास जी सूचना देता आली असती ती मात्र ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून वा स्वतःच्या तोंडून रामदेवराजास देता आली नाही !!
ज्ञानेश्वर निर्जीव भिंत चालवू शकले, पण सजीव माणसे आपल्या मंत्रबळे चालवून विंध्याद्रीच्या खिंडीत अल्लाउद्दीनचा मार्ग रोखण्यासाठी उभी करु शकले नाहीत !! ‘’ (विज्ञाननिष्ठ निबंध १३)याचे कारण देताना सावरकर भौतिक चळवळीचे यश वा अपयश ईश्वरी अधिष्ठानावर बहुधा मूळीच अवलंबून नसते; तर ते मुख्यतः भौतिक सामर्थ्यावर अवलंबून असते असा सरळ सिद्धांत मांडतात ही बाब केवळ हिंदूंना लागू नसून मुसलमान,ख्रिश्चन, यहुदी सा-यांना लागू असते असे सावरकरांचे प्रतिपादन आहे.
यंत्रः विज्ञानवादाचे प्रतीक
विज्ञानाने निर्मिलेले यंत्र त्यांना मोहित करत होते. यंत्रानेच माणूस बलवान होत असतो ह्यावर त्यांचा भर होता. यंत्राचा उपयोग मानव पूर्वीपासून करत आला याचे प्रतिपादन करताना ते दुस-यावर भिरकावलेला दगड वा अग्नि निर्माण करताना वापरलेले दगड हे ही यंत्रच होत असे सांगतात. आधुनिक विज्ञानामुळे जी यंत्रे मानवाला मिळाली त्याचे महत्व सांगताना ते लिहितात, ‘’विज्ञानाची आराधना करताच जे वेद पुराणांचे ऋषि, पैगंबर मनुष्याला देऊ शकले नाहीत असे वरदान मनुष्याला मिळाले आहेत. साक्षात गरुडाच्या बापाला मिळाले नाही असे प्रचंड शक्तिशाली पंख मनुष्याला लाभलेत ते म्हणजे विमान’’ अशा कौतुकभरल्या शब्दात करतात.दूरदर्शन, दूर श्रवण, दूरभाष इ बाबी पुरातन काळी सिद्धी मानल्या जात व कोणाकोणालाच फार मोठ्या तपस्येने त्या साध्य होत असे सांगत विज्ञानामुळे त्या कवडीमोल भावाने कोणाला मिळतात असे गौरवोद्गार ते काढतात.
या यंत्रांची पूजा करण्याची, त्याला प्रसन्न करण्याची वा प्रसाद चढविण्याची मूळीच आवश्यकता नाही. अगदी पायाने जरी विजेचे बटण दाबले तरी दिवा लागणारच. हे सर्व ईश्वरवादाचे नाही तर विज्ञानवादाचे परीणाम आहेत.पण मनुष्यनिर्मित या यंत्रांनाही देव समजून पूजणारे लोक सापडतात. सावरकरांना हा नवा ईश्वरवादच वाटतो. यामुळे कदाचित जितके यंत्र तितक्या देवता होतील की काय अशी शंका ते व्यक्त करतात.
बुद्धिनिष्ठेने परिपूर्ण जीवन
हे सारे काही केवळ पुस्तकात लिखाणासाठी वा भाषणात टाळ्या मिळविण्यासाठी नसते तर जीवनात उतरविण्यासाठी असते. याच धारणेमुळे असेल हजारो पृष्ठांचे वाङ्मय लिहिणा-या हिंदुत्ववादी सावरकरांनी वेद, उपनिषद, गीता इ वर कोणतेही भाष्य लिहिले नाही. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे टिळक, गांधी, श्रीअरविंद इतकेच नाही तर आंबेडकरादि सुधारक ही या ना त्या प्रकारे धर्मावर लिहितात पण हिंदुत्ववादी सावरकरांना धर्माची आवश्यकताच वाटत नव्हती. वेद, बायबल,कुराण या साऱ्या धर्मग्रंथांना सावरकर एकाच दृष्टीतून पहात होते त्यांचा असा विचार होता कि या सर्व धर्मग्रंथांची आता आवश्यकता नाही यांना बंद करुन कपाटात ठेऊन दिले पाहिजे ज्याप्रमाणे युरोपने बायबल बंद करुन आपली प्रगति करुन घेतली तसेच हिंदूंनी वेदादि धर्मग्रंथ तर मुसलमानांनी कुराण तर ख्रिश्चनांनी बायबल कुलूपबंद करुन आपापली प्रगति करुन घेतली पाहिजे.
याच विज्ञाननिष्ठेतून पत्नीच्या निधनानंतर त्यांनी श्राद्धकर्मादि कोणतेही धार्मिक विधी केले नाहीत. इतकेच नव्हे तर आपल्या मृत्यूनंतर आपले शव मनुष्याच्या खांद्यांवर वाहून नेऊ नये तर स्वयंचलित यांत्रिक वाहनातून न्यावे, ते विद्युत दाहिनीच जाळले जावे, अस्थि व राख जे अवशेष उरतील त्याचे काय करावे याविषयी काही सांगण्याची गरज त्यांना वाटत नाही. मात्र आपल्या मृत्यूपश्चात कोणतेही धार्मिक विधी – पिंडदान, काकस्पर्श, श्राद्ध, सूतक इ वा सामाजिक शोक हरताळ, बंद पाळले जाऊ नये असे स्पष्टपणे निर्देशित करतात.
जातीयवादी, संकुचित, प्रतिगामी म्हणून हिणविल्या जाणा-या सावरकरांच्या या अंतिम इच्छेची तुलना स्वतःला अपघाताने हिंदू म्हणविणा-या, जन्मभर बुद्धिजीवी म्हणून मिरविणा-या प्रगतिशील नेहरुंच्या अंतिम इच्छेशी केली तर चटकन ध्यानात येईल कि खरा बुद्धिनिष्ठ व वैज्ञानिक मानस असलेला कोण आहे ते !
प्रखर व सर्वंकष बुद्धिवाद
सामान्यपणे पाहता बुद्धीनिष्ठ व्यक्ती धर्मादि बाबींचे अवडंबर मानीत नसली तरी न्याय, नीती, सत्य, तितिक्षा इ चे सामर्थ्य स्वीकारीत असते. सावरकरांच्या प्रखर बुद्धिवादाला हे मान्य नाही. त्यांच्यामते न्याय, सत्य इत्यादिंचे सामर्थ्य शस्त्रसापेक्ष असते एका ठिकाणी ते म्हणतात, ‘’न्याय झाला तरी तो समर्थ नसेल तर व्यर्थ होय, समर्थ अन्याय त्याच्यावर कुरघोडी केल्याशिवाय राहणार नाही दुर्बळ पुण्याईही पंगू होय हे विसरु नये ‘’ (विज्ञाननिष्ठ निबंध पृ १६) याचा अर्थ सामर्थ्य येताच अन्यायी, परोपद्रवी व्हावे असा होत नाही हे सांगायला ते विसरत नाहीत.
साधारणपणे असे दिसते की, पुरोगामी वा सुधारक हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर टिका टिपणी करताना मुस्लिम, ख्रिश्चनांच्या तितक्याच बाष्कळ वा कधी कधी घातक धर्ममतांकडे कानाडोळा करताना दिसतात. याची खंत मुस्लिम सत्यशोधक हमीद दलवाईंनी अनेकदा व्यक्त केली होती. या सुधारकांत सुधारक सावरकर हे अपवाद आहेत त्यांच्या बुद्धिवादाच्या तडाख्यातून कोणत्याही धर्मांतील देवभोळेपणा व विसंगतपणा सुटला नाही एका लेखात ते म्हणतात, “हीच गोष्ट जगातील पारशी, ख्रिस्ती, मुसलमानी, यहुदी प्रभृति यच्चयावत धर्मग्रंथातील वचनांची नि इतिहासाची आहे…त्यातला एकाचा देव तो दुसऱ्याचा राक्षसही असू शके…मनुष्यांनी आपापल्या लहरीप्रमाणे ज्या धर्माधर्माच्या, न्याया-न्यायाच्या, पापपुण्याच्या बऱ्यावाईट कल्पना केल्याबल कुणाच्याही देवाने दखल घेतली नाही.
इतकेच काय देव स्वतःलाही वाचवू शकले नाहीत. श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली; प्रत्यक्ष मदिनेतील मुहंमदाची मशीद घोडशाळा बनली; ‘जेहोवा’ चे सुवर्णमंदिर तडकले; जीजसला रोमने फाशी दिले – कृसिफाय केले !!! (वि नि पृ १५-१६)या सर्वंकष बुद्धिवादामुळेच त्यांनी मुस्लिमांचे प्रबोधन करण्यासाठी लेख व कथा लिहिल्या. या सा-यांचा हेतु विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीचाच होता, हिंदू व मुस्लिम दोघेही विज्ञाननिष्ठ बनले तरच त्यांच्यातील शतकानुशतके चालत आलेले वैर संपू शकते हा त्यामागील रास्त विचार होता.
बुद्धिनिष्ठेला उपयुक्तततेची मर्यादा
कोणताही बुद्धिनिष्ठ शतप्रतिशत निखळ बुद्धिनिष्ठ राहू शकत नाही मात्रं प्राप्त परिस्थितीत काय हिताचे व काय अहिताचे याचा विवेक करुन तो त्यावेळी जे उपयुक्त ते वापरतो तोच खरा बुद्धिनिष्ठ होय. सावरकर जसे प्रखर बुद्धिनिष्ठ होते तसेच ते कृतीशील राजकारणी होते भारत देश, हिंदू समाज (यात महार,मांगादि सर्व जाती व जैन,बुद्ध,शीख, लिंगायत व नवबौद्धादि सर्व धर्म समाविष्ट होतात) हेच त्यांच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांच्या उन्नती नि हितावरच त्यांचा भर होता त्यालाच त्यांनी ‘हिंदुत्व’ म्हटले होते. त्याच्याच कल्याणाची मर्यादा त्यांनी त्यांच्या बुद्धिवादाला घालून घेतली होती.
थोडक्यात चिंतन व जीवन या दोहोंना व्यापणा-या सावरकरांच्या प्रखर व सर्वंकष बुद्धिनिष्ठेमुळे व तिला उपयुक्ततेच्या विवेकी कसोटीस जोडल्यामुळे सावरकरांचे चरित्रकार धनंजय किर सावरकरांना ‘विज्ञानेश्वर’म्हणतात, डॉ. पु ग सहस्त्रबुद्ध्यांसारखा विचारक सावरकरांना ‘इहवादाचा आचार्य’ म्हणतो तर सोबतकार ग वा बेहेरेंसारखा विचक्षण संपादक सावरकरांना ‘पाखंडी व नास्तिक’ संबोधतो. धर्म नि धार्मिकता याच दोन अतिंना या किंवा त्या बाजूला पकडून चालणा-या भारतासारख्या देशात सावरकरांसारखा बुद्धिनिष्ठ जन्माला येणे हेच एक अघटीत होते, आश्चर्य होते यात शंकाच नाही.
(ब्लॉग लेखक डॉ. नीरज देव मनोचिकित्सा तज्ज्ञ व दशग्रंथी सावरकरने सन्मानित आहेत)