शाळेतला एक हुशार मुलगा काही दांडगट मुलांच्या नादी लागतो…त्यांच्या संगतीत राहून नववीच्या परीक्षेत कॉपी करतो,चिटींग करतो…पकडला जातो. बाकीच्यांकडून अपेक्षित असलं तरी शिक्षक,पालक,मित्र ह्यांना त्या मुलाकडून हे असं वागणं अजिबात अपेक्षित नसतं. साहजिकच एक प्रकारच्या निराशेने भरलेला राग सर्वत्र पसरला जातो, गुन्हा केला-शाळेचं नाव खराब केलं म्हणून त्याला एक वर्षभराची शिक्षा देखील होते. सर्व स्तरातून होत असलेली बोचरी टीका तो शांतपणे बघत असतो, न राहवून सर्वांसमोर उभा राहतो आणि धैर्याने सामोरा जातो. नजर खाली असते, मी चुकलो हे तो सांगतो. सांगता-सांगता डोळ्यात पाण्याची धार सुरू होते. ती ओली नजर त्याच्या पालकांना शोधत असते, त्या नजरेत फक्त आणि फक्त पश्चाताप असतो.

शिक्षेचा पूर्ण काळ तो जगापासून लांब असतो. त्याच्या पालकांना, मित्रांना तो पुन्हा उभा राहू शकेल की नाही अशी भीती वाटू लागते. सर्व पूर्ण ताकदीने त्याच्या मागे उभं राहतात. वर्ष संपत आणि दहावीची प्रिलीम परीक्षा सुरू होते, तो येत आणि परत येतो. सगळीकडे चर्चेचा विषय होतो..वर्गात शिरल्या शिरल्या ‘चीटर चीटर’च्या गजरात त्याचं स्वागत केलं जातं. त्याचा आत्मविश्वास ढासळण्याची शक्यता वाढते, पण गेल्या वर्षभरात तो बराच काही शिकलेला असतो, त्याचा निश्चय ठाम असतो…त्याला पुन्हा उभं राहायचं असतं, तेवढ्यावरच थांबायचं नसतं. त्याचा हाच निश्चय त्याला आत्मविश्वास देतो. सर्व पेपर मस्त जातात आणि त्याची हुशारी पुन्हा सर्वांसमोर येते.

टीकेच्या जागी आता कौतुक होतं,पण सर्व काही सुरळीत सुरू झालंय असं वाटत असतानाच घात होतो. वर्षभर मनावर आघात झाल्याने तो जखमी होतो, पण मन एकदम खंबीर असतं. तो जिद्दीने पेटून उठतो, पुढच्या परीक्षेला बसतो. मन आणि शरीर दोन्ही आता जखमेवर औषध मारून आलेले असतं, पण वर्षभरापूर्वी रागावलेल्या जवळच्या लोकांची प्रेमाची फुंकर त्याच्या जखमा दूर करते. त्यांचं ते पुन्हा मिळालेलं प्रेम त्याला स्फूर्ती देऊन जातं…अमृतासारखं काम करत हा जोमाने परीक्षेला बसतो. त्याच्या गुणवत्तेला न्याय देतो, भूतकाळातील चुकांना, दुःखाला त्याच्या मनावरचा ताबा मिळवून देत नाही. इथेच तो लढाई जिंकतो, गुणवत्ता आणि कष्टाच्या जोरावर तो झेप घेतो आणि दहावीच्या परीक्षेत पहिला नंबर मिळवतो.

गुन्हा करणं हा मानवी आयुष्याचा भाग आहे, पण ती चूक मान्य करून कायद्याप्रमाणे शिक्षा भोगून जगापासून अलिप्त रहात असताना एक-एक दिवस पुन्हा उभारी घ्यायची स्वप्न पाहणं खूप महत्वाचं असतं. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हेच आपल्याला शिकवतो, खचून जायचं नसतं. मनावर, शरीरावर कितीही जखमा झाल्या तरीही केलेली चूक सुधारायला स्वतःला पुन्हा संधी द्यायची असते. कितीही काहीही झालं तरी पून्हा झेप घ्यायची जिद्द अंगी बाळगायची असते.

Story img Loader