शफी पठाण, लोकसत्ता
इलाहाबादच्या मैदानात माघ महिन्यातल्या एका झाकोळलेल्या संध्याकाळी कथावाचक संत अंगद शरण जी महाराजांनी अर्पणा भारतींची भागवत कथा ठेवली होती… कथेनंतर त्याच मंडपात एका पुस्तकाचे प्रकाशन होणार होते… त्यासाठी अंगदजींनी एका तरुणाला बोलावले होते… तो मोठा प्रवास करून पोहोचला आणि पायातले त्राण हरवल्याने अर्पणा भारतींच्या सिंहासनावर नकळत बसला… डोळयात ‘सुरमा’ घालून तोंडात पान चघळणारा मुस्लीम तरुण गुरुमातेच्या गादीवर बसल्याने कथा ऐकायला आलेले भाविक संतापले… हा संताप उग्र रुप घेणार इतक्यात अंगद महाराज तिथे आले आणि म्हणाले, अरे, रागाऊ नका…हा तो शायर आहे जो लिहितो,
मामूली एक कलम से कहां तक घसीट लाए?
हम इस ग़ज़ल को कोठे से मां तक घसीट लाए….
याने जर प्रेमापुरत्या मर्यादित असलेल्या गझलेच्या ‘प्रणयउत्सुक’ नायिकेला ‘वात्सल्यमूर्ती’ आई बनवले असेल तर त्याला बाळ म्हणून आईच्या सिंहासनावर बसण्याचा पूर्ण हक्क आहे. हे ऐकून भाविक नरमले आणि पुढचे अडीच तास ते त्याच डोळयात ‘सुरमा भरलेल्या मुस्लीम तरुणाची शायरी रामकथेइतक्याच तन्मयतेने ऐकत राहिले. तो तरुण अर्थातच मुनव्वर राणा होते!
आणखी वाचा-लाल अंतर्वस्त्रं ते मसूर खाणे… काय सांगतात इटलीमधील नववर्षाच्या परंपरा?
‘मुनव्वर’चा अर्थ होतो प्रकाश. हदयात उसळणाऱ्या असंख्य भावनांना शब्दांत बांधून उर्दू शायरीला जगभर ‘मुनव्वर’ करणारे राणा काल गेले. ७१ वर्षांच्या आयुष्याचा पूर्वार्ध शब्दांच्या वादळांनी आणि उत्तरार्ध वैचारिक भूमिकांमुळे निर्माण झालेल्या वादळांनी गाजवून राणा गेले. त्यांचे हे जाणे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर….
ऐसा लगता है कि जैसे खत्म मेला हो गया,
उड़ गई आंगन से चिड़िया घर अकेला हो गया.
खरं तर, आपल्यामागे उर्दू शायरीचे हे घर एकटे पडू नये म्हणून जॉन एलिया, राहत इंदोरी आणि स्वत: मुनव्वर राणा यांनी जगभर पायपीट केली. उर्दू परकी नाही, तिचा जन्मच भारतातला आहे, हे ते आजन्म सांगत राहिले.
फेंकी न ‘मुनव्वर’ ने बुज़ुर्गों की निशानी
दस्तार पुरानी है मगर बाँधे हुए है….
ख़ुद से चल के नहीं ये तर्ज़ ए सुखन आया है
पांव दाबे हैं बुजुर्गों के तो ये फ़न आया है…
यातली माथ्यावर सजवलेली ‘दस्तार’ आणि लेखनीला लाभलेला ‘फन’ अर्थातच उर्दू शायरी होती. पण, त्यांच्या हयातीत तरी उर्दूवरचा विशिष्ट जातीचा ठपका मिटू शकला नाही, ही खंत मुनव्वर राणा यांना आयुष्यभर राहिली. कायम प्रसिद्धीच्या झगमगणाऱ्या वलयात जगणारा राणा ते औषधांच्या पैशासाठीही विवश झालेला माणूस असे एकाच आयुष्याचे दोन विसंगत रुप राणा यांनी अनुभवले. ही व्यथा कशी विचलित करणारी आहे, हे सांगताना ते लिहायचे…
आणखी वाचा-केकचा शोध कोणी लावला; हे कसे घडले?
दुनिया तेरी रौनक़ से मैं अब ऊब रहा हूं
तू चांद मुझे कहती थी. ले फीर मैं डूब रहा हूं.
हा ‘चांद देहरुपाने आज अस्तास गेला असला तरी मनाने तो कधीचाच मावळला होता. जाती धर्माच्या नावावर एकमेकांच्या जीवावर उठलेला अस्वस्थ भोवताल, दिवसढवळया होणारी न्यायाची गळचेपी या शब्दाच्या सरदाराला सुन्न करून टाकायची. ती सुन्नता कधीबधी शब्दात उतरायची ती अशी…
अदालतों ही से इंसाफ़ सुर्ख़-रू है मगर
अदालतों ही में इंसाफ़ हार जाता है….
न्यायलयांची अशी ‘नाइन्साफी’ परक्यांच्या याचिकांवर झेलावी लागली तोपर्यंत राणा फार डगमगले नाहीत. चुकीच्या गोष्टींवर त्यांनी सत्तेच्या तख्तालाही आव्हान दिले. पण, भावाचा दावा करणाऱ्या रक्तातल्याच लोकांनी त्यांना वारशाच्या वाटयासाठी छळले तेव्हा मात्र ते हळहळले. याच हळहळीतून आजार बळावले आणि राणा गेले… कायमचे. जाताना लिहून गेले….
बहुत दिन रह लिए दुनिया के सर्कस में तुम ऐ राना,
चलो अब उठ लिया जाए तमाशा खत्म होता है।