‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात करोना काळात भारतासाठी व्हॅक्सिन तयार करणाऱ्या वैज्ञानिकांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘सृष्टि से पहले सत् नहीं था, असत भी नहीं, अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था’ हा संस्कृत श्लोक प्रेक्षकांना ऐकायला मिळतो. १९८८ मध्ये, श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘भारत एक खोज’ हा कार्यक्रम दर रविवारी दूरदर्शनवर प्रसारित व्हायचा. हा कार्यक्रम भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित होता. या माध्यमातून भारताचा जवळपास ५ हजार वर्षांचा इतिहास ५३ भागांमध्ये चित्रित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं शीर्षक गीत ‘सृष्टि से पहले सत् नहीं था…’ असं होतं. त्याच प्रकारचं गीत ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटात वापरण्यात आलं आहे. ‘भारत एक खोज’ कार्यक्रमाचं ‘सृष्टि से पहले सत् नहीं था…’ हे शीर्षकगीत ऋग्वेद ग्रंथातील नासदीय सूक्तातील पहिल्या श्लोकाचं हिंदी भाषांतर आहे. आता हा श्लोक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात रिक्रिएट करून वापरण्यात आला आहे. लवकरच न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर ‘सृष्टि से पहले’ हे रिक्रिएट केलेलं गाणं प्रदर्शित करण्यात येईल, अशी माहिती विवेक अग्निहोत्री यांनी एनआयशी संवाद साधताना दिली आहे.
परंतु, यानिमित्ताने सृष्टीच्या मुळाचा विचार करणारा विचार बाहेर आला आहे. कोविडच्या काळात भयावह स्थिती असताना, जग थांबू पाहत असताना सृष्टिनिर्मितीचा विचार करणारा हा श्लोक या चित्रपटात वापरण्यात आला आहे. या श्लोकाच्या निमित्ताने सृष्टिनिर्मितीच्या संकल्पना जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा : सहीऐवजी अंगठ्याचे ठसे घेण्याची पद्धत कधीपासून सुरू झाली ? जाणून घ्या अंगठाछाप पद्धतीचा इतिहास…
नासदीय सूक्तातील विश्वनिर्मिती…
नासदीय सूक्त हे ऋग्वेदातील दहाव्या मंडळातील १२९ वे सूक्त आहे. ‘नासदासीन्नो सदासीत्तदानीं’ ही या सूक्ताची सुरुवात आहे. या ‘नासदासीन्नो’ या या शब्दावरून हे नासदीय सूक्त म्हणून ओळखले जाते. हे सूक्त विश्वाच्या उत्पत्तीसंदर्भात मांडलेले प्राचीन अनुमान आहे असे विश्वाच्या उत्पत्तीचे हे मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन अनुमान आहे. यात एकूण सात ऋचा आहेत. या सूक्ताची रचना त्रिष्टुप् या छंदात झाली आहे. यामध्ये सृष्टी उत्पत्ती ही कोणत्याही देवतेने केलेली नसून तिच्या निर्मितीविषयी अनेक शंका मांडण्यात आल्या आहेत.
ऋषी म्हणतात, सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी सत् किंवा असत् दोन्ही नव्हते. अंतरिक्ष आणि आकाशही नव्हते. मृत्यूही नव्हता आणि अमृतत्वही नव्हते. रात्र आणि दिवस असा भेद नव्हता. सर्वांना आवरण घालणारे असे एक तत्त्व होते. संपूर्ण जग अंधाराने वेढलेले होते, सर्वत्र पाणी होते. त्या वेळी स्वतःच्या तपःसामर्थ्यावर एक तत्त्व जन्माला आले. ते वायूखेरीजच श्वसन करीत होते. सृष्ट्युत्पत्तीची इच्छा ही सर्वांत पहिली निर्मिती होती.हा सर्व पसारा कसा उत्पन्न झाला, हे कोणी निश्चितपणे जाणत नाही. कारण, सर्वांची निर्मिती नंतर झालेली आहे, सर्व देवताही त्यानंतरच जन्मलेल्या आहेत. सर्वांचा अधिष्ठाता जो सर्वोच्च स्थानी आहे, तो तरी हे रहस्य जाणतो का, हे नक्की सांगता येत नाही. सृष्टिनिर्मिती कोणत्याही देवतेने केलेली नसून एक परमश्रेष्ठ तत्त्व होते, त्या तत्त्वानेच स्वतःच्या सामर्थ्याने एक असे तत्त्व तयार केले, जे श्वासोच्छ्वास करण्यास समर्थ होते. त्याच्या मनामध्ये सृष्टीनिर्माण करण्यासाठी पहिली ‘काम’ ही इच्छा निर्माण झाली. या इच्छेमुळे सूर्याच्या किरणांप्रमाणे तेजस्वी अशा घटकांपासून सृष्टीची निर्मिती केली असावी, पण याबाबत कोणीच जाणत नाही, असे या सूक्तामध्ये दिले आहे. कारण, देव, वनस्पती, इतर सजीव हे नंतर निर्माण झाले.
हे सूक्त उपनिषदांतील ब्रह्मविद्येचा आधार आहे, असे लोकमान्य टिळकांचे मत आहे. त्यांच्या मते इंद्रियगोचर गोष्टींच्या पलीकडचे असे एकमेव अमृतत्व आहे, हे ओळखणे हेच वेदांतशास्त्राचे रहस्य आहे. सायणाचार्यांनीही आपल्या भाष्यात सूक्ताचा ब्रह्मपरच अर्थ लावला आहे. विश्वनिर्मिती होण्यापूर्वीच्या परिस्थितीबद्दल सूक्तात नोंदवलेल्या अंधार, पाणी, स्फुरण पावणारे तत्त्व, तेजोशलाका इत्यादिकांचे संदर्भ जगभरातील सृष्ट्युत्पत्तिविषयक पुराणकथांमध्येही दिसतात.
नासदीयसूक्ताप्रमाणेच हिरण्यगर्भ सूक्तही महत्त्वपूर्ण आहे. हिरण्यगर्भ सुक्तामध्ये सृष्टिनिर्मितीविषयी चर्चा केलेली आहे. यामध्ये कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत.
हेही वाचा : चांगला नवरा मिळवण्यासाठी उपवास का ?
हिरण्यगर्भ सूक्तातील विश्वनिर्मिती…
ऋग्वेदात दार्शनिक किंवा तत्त्वज्ञानपर विचार मांडणारी सूक्ते आढळतात. पुरुषसूक्त, नासदीय सूक्त, वागाम्भृणीय सूक्त या सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार मांडणार्या सूक्तांमध्ये हिरण्यगर्भ सूक्ताचाही समावेश होतो. हे सूक्त प्रजापतिसूक्त या नावानेही प्रसिद्ध आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील १२१ वे सूक्त आहे. ‘कस्मै देवाय हविषा विधेम’ म्हणजे त्या सुखस्वरूपी परमेश्वराला आम्ही हवी अर्पण करतो, हे या सूक्ताचे ध्रुवपद असून हिरण्यगर्भ प्राजापत्य हा या सूक्ताचा ऋषी होय.
या संपूर्ण सृष्टीचे निर्माण होण्याच्या आधी परमात्मा अस्तित्वात होता. आणि त्यानेच या सृष्टीचे निर्माण केलेले आहे, अशी हे सूक्त रचणाऱ्या ऋषींची धारणा आहे. वेगवेगळ्या देवतांच्या वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण ज्यात झालेले आहे असा देवांचा देव कोण बरे आहे, असा प्रश्न ऋषी करतात. हा देव इतर कोणी नसून प्रजापती किंवा परमात्मा आहे, असे उत्तर सूक्ताच्या शेवटी मिळते.
हिरण्यगर्भ ही या सूक्ताची देवता होय. हा हिरण्यगर्भ म्हणजेच प्रजापती किंवा ब्रह्मा होय. या प्रजापतीचा निर्देश येथे ‘क’ या गूढरम्य अक्षराने केलेला दिसून येतो. हा प्रजापती जसा संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे, तसाच तो आत्मज्ञान प्रदान करणाराही आहे. या हिरण्यगर्भ प्रजापतीपूर्वी काहीही नव्हते. तोच सृष्टीच्या पूर्वकाली होता. ही अशी संकल्पना शुक्ल यजुर्वेद, मनुस्मृती, शतपथ ब्राह्मण, बृहदारण्यकोपनिषद यांमध्येही दिसून येते.
‘कस्मै देवाय हविषा विधेम’ असे प्रश्नवाचक चरण जरी या सूक्तात असले, तरी ते केवळ देवतेच्या नावासंदर्भात शंका उत्पन्न करणारे वाक्य आहे; मुळातच देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेणारे नव्हे. त्यामुळे कालांतराने या सूक्तातील ‘क’ हा प्रश्नवाचक न मानता प्रजापती या देवतेला समानार्थक शब्द म्हणून मानण्याचा प्रघात पडला, असे प्रसिद्ध वेदाभ्यासक हरी दामोदर वेलणकर यांचे निरीक्षण आहे.
हिरण्यगर्भ या शब्दाचे विविध अर्थ सांगितले जातात. हिरण्यमय: गर्भ: म्हणजेच हिरण्याने युक्त गर्भ किंवा विज्ञानमय: गर्भ: म्हणजेच ज्ञानस्वरूप गर्भ. वेदांचे व्याख्याकार सायणाचार्यांच्या मते, ‘हिरण्मयस्य अण्डस्य गर्भभूत: प्रजापति:।’ म्हणजेच सोन्याच्या अंड्यात गर्भरूपाने असणारा प्रजापती. वैदिक साहित्याचे अभ्यासक सदाशिव डांगे यांनी हिरण्यगर्भ ही संकल्पना सूर्याच्या सुवर्णगोलावरून सुचली असावी, असा विचार मांडला आहे. वैदिक काळातील ही हिरण्यगर्भ संकल्पना पुढे पुराणकाळात ब्रह्मा किंवा ब्रह्मदेव या नावाने प्रसिद्ध झाली असे निरीक्षण महादेवशास्त्री जोशी नोंदवितात. काहीसा गूढरम्य आशय मांडणारी अशा प्रकारची वैदिक सूक्ते ही पुढील काळातील भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलाधार ठरली.
भारत एक खोज मालिकेच्या शीर्षकगीतामुळे वैदिक तत्त्वज्ञानाविषयी चर्चा होऊ लागली. ते गीत हे नासदीयसूक्ताचा हिंदी भावानुवादच होता. या सूक्ताप्रमाणेच ऋग्वेदात अन्यही काही सूक्ते विश्वनिर्मितीची चर्चा करतात. पुरुषसूक्तात परमपुरुष असणाऱ्या देवतेच्या शरीरापासून सृष्टिनिर्मिती सांगितली आहे. जसे, सूर्यापासून डोळे, मनापासून चंद्र, कानापासून आकाश यांची निर्मिती सांगितली आहे. वागाम्भृणीय सुक्तामध्ये वाणीच्या निर्मितीविषयी भाष्य केले आहे.
विज्ञानकाळामध्ये नक्कीच सृष्टीच्या निर्मितीचा वैज्ञानिक अंगाने अभ्यास झाला. परंतु, इ. स. पू. ६ हजार ते इ. स. पू. २ हजार पर्यंत काळ असणाऱ्या वेदांमध्येही विश्वनिर्मितीची चर्चा झालेली दिसते. ज्याचे गेय स्वरूप ‘द व्हॅक्सिन वॉर’ मध्ये दिसेल.