समीर जावळे
१४ ऑगस्ट १९४७ हा तो दिवस होता ज्या दिवशी आपल्या अखंड भारताची फाळणी झाली. देशाला स्वातंत्र्य मिळालं ते १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी. मात्र भारताची फाळणी होऊन पाकिस्तान जन्माला आला. ब्रिटिशांनी फाळणी केल्यानंतरच आपला देश सोडला. भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे. तर भारतात सर्वधर्मीय. मात्र फाळणीच्या या जखमा आजही आपल्या मनात आहेत. तशाच त्या कागदावरही उतरत असतात. त्यामुळेच कवी सुरेश भट हे त्यांच्या ‘उषःकाल होता होता..’ या गाण्यात लिहितात की ‘आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंटो यांना लागली होती फाळणीची टोचणी

फाळणीच्या असह्य जखमा भोगलेला त्या काळातला साहित्यिक जो आजही आपलासा वाटतो तो म्हणजे सआदत हसन मंटो. मंटो यांनी आपल्या आयुष्यातला बराच काळ मुंबईत घालवला. मात्र त्यांना फाळणीनंतर लाहोरला जावं लागलं. फाळणीची जखम त्यांच्या मनात घर करुन गेली होती. त्यामुळेच मंटोच्या लेखणीतून कागदावर उतरली ती टोबा टेक सिंगची कथा. १९५५ मध्ये म्हणजेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सात वर्षांनी त्यांनी ही कथा लिहिली. मात्र ही कथा आपल्याला आजही अस्वस्थ करुन जाते हे वास्तव आहे.

काय आहे टोबा टेक सिंगची कथा?

मंटो यांच्या गोष्टीचं मुख्य पात्र असलेला बिशन सिंग याला टोबा टेक सिंग याच ठिकाणी राहायचं आहे. मात्र त्याला अचानक एक दिवस कळतं की त्याला भारतात धाडण्यात येणार आहे कारण तो शिख आहे. भारत सरकारने निर्णय घेतला असतो की ज्या प्रमाणे भारताच्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे कैदी हे पाकिस्तानात पाठवले पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय कैदी भारतात आणले तसेच मनोरुग्णही आणले पाहिजेत. बिशन सिंग हा मनोरुग्णच असतो. त्याला जेव्हा सांगितलं जातं की तुला भारतात जायचं आहे त्यावेळी तो तयार होत नाही. तो मनोरुग्ण असल्याने त्याला कुणीही मारत नाही. त्याची खूप समजूत घातली जाते की तुला भारतात जावंच लागेल. पण तो ऐकत नाही.

…आणि बिशन सिंहचा शेवट

त्यानंतर तो अशा ठिकाणी उभा राहतो जी जागा नो मॅन्स लँड असते. भारत आणि पाकिस्तान अशा दोन सीमांच्या बरोबर मधे जाऊन बिशन सिंग उभा राहतो. त्याला तिथून हटवण्याचा प्रयत्न होतो. पण तो अगदीच ठामपणे उभा राहतो. कुठलाही उपद्रव न करता तो उभा आहे म्हटल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यानंतर जे इतर मनोरुग्ण आहेत त्यांची अदलाबदली सुरु राहते. दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवण्याच्या आधी बिशन सिंग याच्या तोंडून एक आर्त किंकाळी निघते आणि बिशन सिंग खाली कोसळतो. त्याची किंकाळी ऐकून सगळेच त्याला काय झालं ते बघायला धावतात. पण तोपर्यंत बिशन सिंह याचा मृत्यू झालेला असतो. भारत आणि पाकिस्तान दोन सीमा रेषांच्या मधे बिशन सिंग मरुन पडतो.

मंटो यांनी लिहिलेली वाक्यं आजही अस्वस्थ करतात

बिशन सिंगच्या मृत्यूचं वर्णन करताना मंटो लिहितात, ‘सूरज निकलने से पहले उस स्थान पर शांत , स्थिर खडे बिशन सिंह के मुंह से एक भयानक चीख निकली। इधर-उधर से कई अफसर दौड़े आए और देखा कि वह आदमी, जो अपनी टांगों पर खड़ा रहा था , औंधे मुंह पड़ा है। उसकी टांगों के पीछे हिन्दुस्तान के पागलों का दायरा था और उसके सिर की ओर पाकिस्तान के पागलों का दायरा था ; और बीच की भूमि में ,जिसका कोई नाम न था , टोबा टेकसिंह पड़ा था ।’ या घटनेनंतर ही कथा संपते. बिशन सिंगचं असं प्रचंड अस्वस्थ होऊन मरुन पडणं आणि कथेचा शेवट अशा पद्धतीने होणं हे आपल्यालाही अनपेक्षित असतं. ही कथा संपते तेव्हा नकळत डोळ्यात अश्रू उभे राहतात.

फाळणीच्या जखमा एखाद्या मनोरुग्णाच्या मनातही किती मोठं वादळ तयार करु शकतात आणि त्याचा शेवट काय करु शकतात हे सांगणारी ही कथा मंटो यांनी १९५५ मध्ये लिहिली आहे. या कथेवर आधारित नाटकही सादर झालं आहे, शॉर्ट फिल्म्सही आणि मंटो या सिनेमातही ही कथा दाखवण्यात आली आहे.

टोबा टेक सिंग या जागेची थोडक्यात माहिती

मंटो यांनी लिहिलेली ही कथा काल्पनिक आहे. मात्र ही कथा त्यांना सुचली ती टोबा टेक सिंग या नावावरुन. पाकिस्तानात टेक सिंग हे गाव तर आहेच पण ते नाव कसं पडलं याचीही एक गोष्ट आहे. टेक सिंह नावाचा एक माणूस होता, जो यात्रेकरुंना पाणी पाजण्याचं काम करत असे. टेक सिंह हा त्याच्या जवळ असलेल्या मडक्यातलं पाणी संपलं की ते तलावातून भरुन आणून पुन्हा तिथे थांबत असे. उर्दूमध्ये मडक्याला टोबा असं म्हटलं जातं. त्यामुळे टेक सिंगचं नाव पडलं टोबा टेक सिंग. हे गाव आजही पाकिस्तानात आहे. या नावावरुन मंटो यांना कथा सुचली जी मनोरुग्णाची असली तरीही वाचल्यानंतर आपल्याला प्रचंड अस्वस्थ करुन जाते. फाळणीच्या टोचणीवर कथा लिहिणाऱ्यांमध्ये मंटो अग्रेसर होते. त्यांनी लिहिलेल्या कथा या वास्तववादी वाटत. त्यांनी कायमच अंतर्मुख करणारं लिखाण केलं होतं. त्यामुळेच ही कथा काल्पनिक असली तरीही फाळणीची दाहकता किती प्रचंड होती हे सांगून जाते.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mind wounds of partition manto and his story toba tek singh read the blog on it scj