-वीरेंद्र विसाळ
श्री गणेश हे आपले आराध्य दैवत. विघ्नविनाशक श्री गणेशाचे स्मरण करूनच कोणत्याही मंगल कार्यास प्रारंभ केला जातो. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घराघरांतून श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रत्येकाकडे प्रथेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस मूर्तीचे पूजन केले जाते.
मात्र, या पूजनाची आणि पूजा साहित्य खरेदीची तयारी होते ती महिनाभर आधीपासून. शहराच्या मध्यवस्तीत आणि आता वाढत्या उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पूजा साहित्याची दुकाने झाली असून बॉक्समध्ये एकत्रितपणे साहित्य मिळू लागल्याने गणेशभक्तांना पूजा साहित्य खरेदी काही प्रमाणात सोपी झाली आहे. तरी देखील त्या पूजासाहित्याचे महत्त्व, साहित्य यादी आणि खरेदीच्या ठिकाणांविषयी…
प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्ये हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, शेंदूर, गंध, रांगोळी हे पूजेला आवश्यक साहित्य असतेच. तरी देखील गणेशोत्सवात हळद-कुंकवाच्या खरेदीपासूनच पूजा साहित्याच्या खरेदीची सुरुवात होते. महात्मा फुले मंडईतील पूजा साहित्याच्या बैठ्या दुकानांमध्ये कुंकवाचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. उपनगरांचा विस्तार झाला असला, तरी देखील याठिकाणी आजही आवर्जून खरेदी करण्याकरिता येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
पूजा करताना फुलांच्या सुगंधाची साथ असणे तितकेच महत्त्वाचे –
गणरायाची पूजा करताना फुलांच्या सुगंधाची साथ असणे तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे पूजेकरिता लागणारी विविध फुले, दूर्वा, तुळस, बेल, विड्याची पाने, नारळ, लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक अशा फुला-पानांची खरेदी केली जाते. दूर्वा ही गणपतीला सगळ्यात आवडणारी वनस्पती सांगितली जाते. त्यामुळे या वनस्पतीला गणपतीच्या पूजेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. दूर्वा ही अतिशय थंड गुणधर्माची वनस्पती आहे. बगिच्यामध्ये गवतात या दुर्वा असतात. आयुर्वेदामध्ये देखील दूर्वांचे अनेक फायदे सांगितले आहेत. या दूर्वांची खरेदी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवात होते. काही जण दूर्वा दररोज गणेशाला वाहण्याकरिता घेतात, तर काही जण या दूर्वांचे मोठे हार करून उत्सवात दररोज गणरायाला अर्पण करतात.
हुतात्मा बाबू गेनू चौकातील फुलांच्या व्यापाऱ्यांकडून किरकोळ प्रमाणात,तर मार्केटयार्ड येथे घाऊक प्रमाणात फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री होत असते. फुलांमधील वैविध्य, ताजेपणा आणि सुगंध गणरायाच्या स्वागतासाठी प्रत्येक घरामध्ये असायलाच हवा.
अनेक पिढ्यांपासून ठरलेल्या दुकानांमधून खरेदी –
महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर असलेल्या सुगंधी व पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये जानवे, कापूर, उदबत्ती, कापसाची वस्त्रे यांसह गूळ, खोबरे, खारीक, बदाम असे साहित्य मिळते. याशिवाय सुगंधी अत्तरे, उदबत्या, कापूर, धूप यांचे मुबलक प्रकार येथे उपलब्ध आहेत. अनेक कुटुंबे अनेक पिढ्यांपासून ठरावीक दुकानांमधूनच सुगंधी साहित्याची खरेदी करतात. आता मेट्रोच्या कामामुळे या भागातील अनेक दुकानांचे आजूबाजूला स्थलांतर झाले असले, तरी देखील अनेक पिढ्यांपासून ठरलेल्या दुकानांमधून खरेदी करणारी कुटुंबे ते दुकान शोधून तेथूनच साहित्य घेतात, हे विशेष.
महिनाभर आधीपासून या पत्रींचे आगाऊ आरक्षण –
सुवासिक फुले, अत्तर, धूप यांसारख्या साहित्याप्रमाणेच गणेशाच्या पूजेमध्ये अनन्यसाधरण महत्त्व असते, ते २१ प्रकारच्या पत्रींचे. पूर्वीच्याकाळी गावागावातून असलेल्या झाडांवरून या पत्री घरामध्ये सहज उपलब्ध होत होत्या. मात्र, आता वाढत्या शहरीकरणामुळे या पत्री सहजपणे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये २१ पत्रींची तयार पाकिटे मिळत आहेत. मोगरी, माका, बेलाचे पान, दूर्वा, बोरीचे पान, धोत्र्याचे पान, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुनसादडा, विष्णुकांता, डाळिंब, पांढरा मारवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्तिपत्र आदींचा या पत्रीमध्ये समावेश होतो. सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या पत्री नसल्यामुळे महिनाभर आधीपासून या पत्रींचे आगाऊ आरक्षण गणेशभक्तांकडून केले जाते.
सजावट आणि प्रवेशद्वाराची आरास देखील तितकीच पारंपरिक पद्धतीने –
गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. त्यामुळे प्रत्यक्ष पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याप्रमाणे घरातील सजावट आणि प्रवेशद्वाराची आरास देखील तितकीच पारंपरिक पद्धतीने केली जाते. अगदी आंब्याच्या डहाळींपासून ते कापडी, मोत्याच्या तोरणांपर्यंत अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. घरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन होणार असल्याने घराच्या प्रवेशद्वारापासून सर्व गोष्टी सुसज्ज असाव्यात,यासाठी तयारी केली जाते. पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तयार कापडी, कागदी आणि मोत्याची तोरणे उपलब्ध आहेत. विविध प्रकारची तोरणे लावून प्रवेशद्वारात प्रत्यक्ष रंगावली काढण्याऐवजी रंगावलीचे स्टिकर्स लावण्याची पद्धत देखील सध्या रूढ होत आहे. प्रसाद म्हणून उकडीचे मोदक, माव्याचे मोदक,पेढे, साखरफुटाणे यांसारखे गोड पदार्थ देखील गणरायासमोर ठेवले जातात. त्याची खरेदी किंबहुना उकडीच्या मोदकांचे आगाऊ आरक्षण अनेकांकडून केले जाते.
…तर गणेश भक्तीचा सुगंधही आपल्या अवतीभवती दरवळेल –
अध्यात्मात भाव तेथे देव हे तत्त्व महत्त्वाचे आहे. त्यामुळे गणरायाचे पूजन करताना अंत:करणात भाव नसेल, तर पूजेचा लाभ होत नाही. श्री गणेशाची पूजा करताना प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आले आहेत, या भावनेने आपण पूजा करायला हवी. तसेच, या वेळी आवश्यक असे सर्व पूजा साहित्य आवर्जून तयार ठेवून मगच गणेशाची पूजा करावी. यामुळे पूजा साहित्याच्या सुगंधाप्रमाणेच गणेश भक्तीचा सुगंधही आपल्या अवतीभवती दरवळेल.