-दिलीप ठाकूर
आपल्या सिनेमावेड्या देशात ‘दीर्घकाळ थिएटर बंद ‘ ही कल्पनाच कधी कोणी केली नव्हती. पण हिंदी चित्रपटातच एक टाळीबाज डायलॉग असतो ना, ‘होनी को कौन टाल सकता है?’ आणि अगदी तसेच झालेय. करोना प्रतिबंधक उपाय म्हणून १४ मार्चपासून राज्यातील चित्रपटगृहाचे दरवाजे बंद झाले. काही दिवसांतच देशभरातील सर्वच चित्रपटगृहांना ‘नो शो ‘ अथवा ‘आज खेळ नाही ‘ असा पवित्रा घ्यावा लागला आणि राज्य स्तरांवर असो अथवा देशपातळीवर ‘या पडद्यावर कधी बरे खेळ रंगणार’ याची तूर्त कल्पना नाही. बरं जेव्हा कधी दोन चार महिन्यांनी ‘तिकीट विंडो ‘ उघडेल अथवा ऑनलाईन तिकीट विक्री सुरू होईल तेव्हा ‘सुरक्षित अंतर ठेवा ‘ या धोरणानुसार ‘एक खुर्ची रिकामी ‘ यानुसार आखणी होईल वगैरे वगैरे गोष्टी त्या त्या वेळी समोर येतीलच. तूर्तास, ‘सिनेमा थिएटरवर पडदा पडलाय’ हा रिअॅलिटी शो आहे.
सहज आठवण म्हणून सांगतो, राज्य शासनाने मनोरंजन करात कपात करावी आणि वाढत्या व्हिडिओ चोरीला आळा घालावा यासाठी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने १९८६ साली शूटिंग, पार्ट्या, थिएटर बंद असा जोरदार संप केला, बड्या हिंदी स्टार्सनी चक्क मोर्चे काढले आणि तो संप १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा महिनाभर चालला. तेव्हा सुनील दत्त व अमिताभ बच्चन खासदार होते, त्यांनी पुढाकार घेतला आणि राज्य शासनाकडून आश्वासन मिळताच संप मिटला आणि थिएटरचा पडदा उघडला. तेव्हा मल्टिप्लेक्स नव्हती. त्यानंतर अधेमधे एकपडदा थिएटर अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स काही ना काही कारणास्तव एक दिवसाचा अथवा आठवड्याचा बंद करतात. पण यावेळचा बंद चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील खूप वेगळा आहे. असा बंद ही सामाजिक गरज आहे. त्यामुळे थिएटर बंदने किती कोटीचे नुकसान झाले असा व्यवहार चुकीचा ठरतो. पण या दशकात खास करुन कार्पोरेट युगात प्रत्येक गोष्ट पैशातच मोजायची सवय लागल्याने थिएटर बंदवरची पहिली प्रतिक्रिया ‘यामुळे चित्रपट निर्मितीत किती कोटी अडकले ‘ याची ‘ब्रेकिंग न्यूज’ झाली. हळूहळू लक्षात यायला लागले की, थिएटर बंद असणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. आर्थिक नुकसानीपलिकडची गोष्ट आहे. थिएटर बंद राहिल्याने मल्टिप्लेक्सच्या पाॅपकाॅर्न, शीतपेय, कार पार्किंग यांचे तर सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या चहा, वडापाव आणि ग्रामीण भागातील सायकल स्टॅंडचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे असे दिसते की, थिएटर बंद असली तरी सोशल मिडिया, उपग्रह वाहिनी आणि ओटीटी या माध्यमातून भरपूर मनोरंजन होत आहे. जुने चित्रपट आणि मालिका तसेच नवीन वेबसिरिज मनोरंजनाची ‘चोवीस तास ‘ भूक भागवत आहेत.
मूळात आपल्याकडे सिनेमा जगताना/वाढताना/समाजाच्या खालच्या माणसापर्यंत पोहोचताना मनोरंजन हा त्याचा ठळक हेतू होता. १९७२ साली दूरदर्शन, १९८२ साली व्हिडिओ, १९९२ साली खाजगी वाहिन्या आणि या नवीन दशकात ऑनलाईन अशी माध्यमे आल्याने सिनेमाला पर्याय आले. तरीही सिनेमा जगलाय ही त्या माध्यमाची आणि काॅमन मॅनचे त्यावरचे प्रेम याची ताकद आहे. सिनेमा थिएटरचा पडदा म्हणजे, सर्वधर्मसमभाव प्रेक्षकांचा दीर्घकालीन भावबंध. कोणी त्यावर स्वप्नने पाहिली, कोणी आपली दुःखे विसरले, कोणी त्यावरुन मानसिक आनंद अथवा आधार मिळवला तर कोणी त्यावरील गीत संगीत व नृत्यात रममाण झाले, कोणी आवडता सिनेमा डोक्यावर घेतला तर कोणी कायमचा डोक्यात ठेवला, कोणी जुन्या चित्रपटाच्या फ्लॅशबॅकमध्येच रमलेत, तोच त्यांचा जगण्याचा आधार आहे, कोणी आवडता हीरो पडद्यावर दिसला रे दिसला टाळ्या शिट्या वाजवत त्याचे स्वागत केले तर कधी हाऊसफुल्ल गर्दीने आवडत्या संवादाला अशी उत्फूर्त दाद दिली की थिएटरचे छप्पर उडून जाईल असे वाटले. कडकडीत ऊन, मुसळधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीतही थिएटर गाठून सिनेमा पाहणारे अगणित आहेत. म्हणूनच तर ‘आपल्याकडच्या प्रेक्षकांना चांगला चित्रपट म्हणजे काय हे कळत नाही ‘ असे म्हणणारे अजूनही आपल्या चित्रपट प्रेक्षक संस्कृतीला अजिबात समजून घेत नाहीत असे म्हणता येईल. आवडलेल्या चित्रपटासाठी याच थिएटरवर याच रसिकांनी हाऊसफुल्लचा फलक लावला आणि न समजलेल्या आणि म्हणूनच न आवडलेल्या चित्रपटाला याच थिएटरमधील रिकाम्या खुर्च्यानी पाहिले.
सिनेमा थिएटर म्हणजे बरेच काही असते, सत्तरच्या दशकात तर लोकप्रिय चित्रपटाला थिएटरमध्ये जेवढी गर्दी तेवढेच एक्स्ट्रा तिकीटाच्या आशेने बाहेर उभे, अनेक जण मग ब्लॅक मार्केटमध्ये तिकीट घेत. त्या काळात कधीही असे वाटले नाही की, एक दिवस, खरं तर एक महिन्यापेक्षाही जास्त काळ हाच थिएटरचा पडदा सुना सुना होईल, निःशब्द राहिल, प्रेक्षक कुठे गेलेत याची वाट पाहिल. हा पडदा जुन्या सिंगल स्क्रीन थिएटरचा असो अथवा आजच्या चकाचक मल्टीप्लेक्सचा असो, तो बोलू शकत नाही. समोर प्रेक्षकच नाहीत तर बोलणार काय आणि कोणाशी? एक जुना संदर्भ यानिमित्ताने देतो, १९४२ नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या झळा आपल्याकडे जाणवू लागल्या. चित्रपटाच्या शूटिंगसाठी लागणारा राॅ स्टाॅक मिळणे तात्कालिक मराठी चित्रपटसृष्टीला अवघड झाले, त्याचे रेशनिंग सुरु झाले. चित्रपटाच्या लांबीवर मर्यादा आली. या गोष्टीचा परिणाम म्हणून १९४५ साली एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. या गोष्टीला बरोबर ७५ वर्षे झाली. त्या वर्षी हिंदी चित्रपट काही प्रमाणात प्रदर्शित झाले आणि सिनेमा थिएटर सुरु राहिली. आज कोरोना संदर्भात तिसरे महायुद्धच जणू सुरु आहे, त्याचे सर्वच क्षेत्रांवर होणारे परिणाम भविष्यात दिसतीलच. पण थिएटर बंद हा सिनेमा जगताला पहिला फटका आहे.