‘थिरुचित्रंबलम’ हे सिनेमातील मुख्य पात्र असेल, त्याला ‘पाझम’ (या तामिळ शब्दाचा अर्थ आहे निष्पाप) या नावाने ओळखले जात असेल तर त्या नावाला आणि त्या नावाच्या अनुषंगाने येणाऱ्या निरागसपणाला न्याय देईल असा भारतीय सिनेमासृष्टीतील सध्याचा एकमेव चेहरा म्हणजे धनुष. ‘थिरुचित्रंबलम’ या सिनेमात धनुषसमोर मुख्य स्त्रीपात्र म्हणून नित्या मेनन आहे. त्यामुळे या सिनेमात प्रसन्न निरागसतेचा डबल-डोस आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर, ‘थिरुचित्रंबलम’ ( thiruchitrambalam ) ही रोमँटिक कॉमेडी आहे की, जीवनात बऱ्याचदा घडणाऱ्या, काखेत कळसा अन् गावाला वळसा या उक्तीला रोमँटिक कॉमेडीचा तडका दिलाय हे सांगणे कठीण आहे. सिनेमाच्या नायकामध्ये प्रेक्षकाला आपले प्रतिबिंब दिसणे हे जे पूर्वी अमोल पालेकर, फारुख शेख यांच्या सिनेमाच्या लोकप्रियतेचे गमक होते तेच कारण धनुष च्या सिनेमांना आणि विशेषतः ‘थिरुचित्रंबलम’ या सिनेमाला देखील लागू पडते.

पाझम (धनुष) हा एका पोर्टलतर्फे फूड डिलिव्हरी करणारा डिलिव्हरी बॉय आहे. पाझमचे, पोलीस अधिकारी असलेल्या आपल्या बाबांशी (प्रकाश राज) संबंध ताणलेले आहेत. त्याला त्याच्या वडिलांबद्दल राग आहे. वडील देखील प्रसंगी त्याच्यावर हात उगारायला मागेपुढे पाहत नाहीत. ते दोघे एकमेकांशी थेट बोलत नाहीत. काही बोलायचे असल्यास पाझमच्या आजोबांचा मध्यस्थ म्हणून वापर केला जातो. पाझम आणि त्याच्या आजोबांमधे (भारतीराजा) मात्र खूपच मैत्रीचे संबंध आहेत. ते एकत्र बसून बिअर पितात. कोणत्याही विषयावर गप्पा मारतात. आजोबा पाझमला आपल्या तरुणपणीच्या गोष्टी सांगतात. डेटिंगच्या टिप्स देतात. परंतु पाझमला त्याच्या आयुष्यात प्रेम सारखं हुलकावणी देत आहे. नाही म्हणायला शोभना (नित्या मेनन) नावाची पाझमची एक बालमैत्रीण आहे. त्या दोघांचे नाते दोन मित्रांइतके निकोप आणि निर्मळ आहे.

हेही वाचा : तोडी मिल फॅन्टसी

अत्यंत घाबरट आणि आयुष्यातील समस्यांना तोंड देण्याऐवजी त्यापासून दूर पळणारा नायक. आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्या बायकोच्या आणि मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची सल मनात ठेवून सतत कुढत जगणारा पोलीस अधिकारी असलेला नायकाचा बाप आणि निवृत्तीच्या काळात कुटुंबात चैतन्य टिकविण्याचा प्रयत्न करणारा नायकाचा आजोबा असं सगळं वरवर दुखी दिसणारं कथानक असलं तरी हा सिनेमा मात्र हलकाफुलका अन प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर सतत स्मित कायम ठेवणारा असा आहे.

सच्चेपणा आणि साधेपणा हा या सिनेमाचा यूएसपी आहे. यातील पात्रे साधी आहेत. त्या पात्रांना दिग्दर्शक मित्रन जवाहर यांनी दिलेली ट्रीटमेंट साधी आहे. घरातील कामे वाटून घेणे असो किंवा घरातील समस्या, तणाव असो. हे सगळंच अगदी स्वाभाविक आणि सामान्य माणूस त्याच्याशी रिलेट करू शकेल असं आहे. असलीच तर शोभना सारखी समजून घेणारी, धीर देणारी, दिशा दाखविणारी मैत्रीण (किंवा मित्र) मिळणे एव्हढी एकमेव फँटसी या सिनेमात आहे. भीतीवर मात करण्यासाठी, आपल्या आई-बहिणीचा मृत्यू स्वीकारून बापाला माफ करण्यासाठी आणि प्रेम मिळवून देण्यासाठी पाझमला शोभनाच्या रूपाने एक सशक्त सपोर्ट सिस्टम मिळालेली आहे.

हेही वाचा : मेंदू सकट “होल बॉडी मसाज”

धनुष ( thiruchitrambalam ) आणि भारतीराजाचे सीन सहजतेचा परिपाठ आहेत. धनुषचा चेहरा, देहबोली आणि एकंदर वावरच असा आहे की त्याला पाझम साकारण्यासाठी वेगळं काही करावं लागलं असेल असं वाटत नाही. नित्या मेननने आपल्या संसर्गजन्य प्रसन्न अभिव्यक्तीने सिनेमाचा लाईट टोन अधिक गुलाबी केलेला आहे. प्रकाश राजच्या अभिनयाविषयी वेगळं काही सांगायला नको. आपल्यातला कठोर बाप, कर्त्यव्यतत्पर पोलीस अधिकारी आणि दुःखी पती त्याने झकास रंगवला आहे. राशी खन्ना आणि प्रिया भवानी शंकर या दोघींना भूमिकांत फारसा वाव नसला तरी पडद्यावरील त्यांचं दिसणं मात्र वॉव आहे.

सिनेमा हलकाफुलका असूनही सिनेमात मुद्दाम घुसवलेले कॉमेडी ट्रॅक नाहीत. गाण्यांचा भरमार नाही. सिनेमाचा शेवट अगदीच प्रिडीक्टेबल असला तरी तो शेवटपर्यंत पाहत राहायला वाटावं असा गोडवा थिरुचित्रंबलम ( thiruchitrambalam ) या सिनेमात आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thiruchitrambalam romantic comedy drama film review starrer dhanush sva 00