मागच्या आठवडयात नेटफ्लिक्सवर असलेल्या ‘फौदा’ वेबसीरीजचे दोन सीझन बघून पूर्ण झाले. ‘सिक्स डे’स हा चित्रपट पाहत असतानाच पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले ४० जवान शहीद झाल्याची बातमी आली. ही बातमी पाहून मनात प्रचंड चीड निर्माण झाली. काश्मीरमधल्या रस्त्यावर लष्कराच्या गाडीचा सांगाडा पडलेला होता. शहीदांच्या घरातला आक्रोश पाहून आपल्या देशानेही आता ‘फौदा’ आणि ‘सिक्स डे’स मध्ये दाखवल्याप्रमाणे पाकिस्तानात घुसून शत्रूंचा खात्मा केला पाहिजे असे मनोमन वाटले. ‘फौदा’ ही इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्षावर आधारीत वेबसीरीज आहे. इस्त्रायल-पॅलेस्टाइनमध्ये भारत-पाकिस्तानसारखंच नातं आहे.

आपल्याला हव्या असलेल्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला टिपण्यासाठी इस्त्रायलचं गुप्तहेर खातं कशा प्रकारची खतरनाक ऑपरेशन्स प्रत्यक्षात आणतं ते या वेबसीरीजमधून मांडलं आहे. आपल्या शेजारच्या देशाच्या कारवाया बघता चित्रपटातलं हे काल्पनिक विश्व आज खरोखर प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. खरंतर दहशतवादी हल्ल्यासारख्या मोठया घटनांनंतर विरोधी पक्ष सरकारला जाब विचारतात. पण आज पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या मागणीसाठी सर्वसामान्य जनताच रस्त्यावर उतरली आहे. पाकिस्तानबद्दल इतका प्रक्षोभ पहिल्यांदाच दिसून येत आहे.

फेसबुक, व्हॉट्स अॅपवर फिरणारे मेसेज किंवा टिव्हीवरील सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर भारताने सुद्धा इस्त्रायलच्या ‘मोसाद’ सारखी धडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच्यातल्या भावनिकतेचा भाग सोडला तर खरोखर आपण मोसाद इतके सक्षम आहोत का ? याचा विचार केला पाहिजे. एका सर्जिकल स्ट्राइकनंतर आपल्या पंतप्रधानांनी इस्त्रायल बरोबर तुलना केली होती. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. इस्त्रायल कधी वरवरची कारवाई करत नाही. ते थेट आपल्या शत्रूला संपवतात. पुलवामाचा हल्ला ज्या मसूद अजहरने केला त्याच्याच दहशतवादी गटाने ‘उरी’ येथे आपल्या लष्करी तळावर हल्ला केला होता. आपण POK मध्ये सर्जिकल स्ट्राइक करुन ‘उरी’चा बदला घेतला असे आपल्याला वाटते. पण ज्याने हा हल्ला घडवून आणला तो मोकाटच फिरत होता. त्याला आपण त्याचवेळी संपवले असते तर कदाचित पुलवामा टाळता आले असते.

इस्त्रायल आणि मोसादमध्ये परिणामांची पर्वा न करता शत्रूला संपवण्याची जी तीव्र इच्छाशक्ती आहे आणि त्याला जी राजकीय साथ मिळते. ती हिम्मत पंतप्रधान मोदी यावेळी दाखवणार का ? आज टेक्नोलॉजीमध्ये इस्त्रायल आपल्यापेक्षा बराच पुढे आहे. आपण आपल्या सुरक्षेसाठी बऱ्याचअंशी इस्त्रायलवर अवलंबून असतो. मला भारताची बाह्य सुरक्षा संभाळणारी ‘रॉ’ कुठे कमी आहे असे अजिबात म्हणायचे नाही. भारताला हवे असलेले मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहर, हाफिज सईद हे खुलेआम पाकिस्तानात फिरतात. आपल्या हेरखात्याकडे सुद्धा त्यांची खडानखडा माहिती आहे. पण त्यांना संपवण्याची धमक आपल्यात आहे का ? हा खरा प्रश्न आहे.

ब्राह्मोस किंवा अन्य शस्त्रास्त्रांचा विचार करता आपल्याला बहावलपूर उद्धवस्त करायला काही मिनिटे लागतील. पण ती राजकीय इच्छाशक्ती मोदींना दाखवावी लागेल. १९७२ साली जर्मनीतील म्युनिच ऑल्मिपिकमध्ये पॅलेस्टाइन दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या ११ खेळाडूंची हत्या केल्यानंतर इस्त्रायलने ऑपरेशन ‘रॅथ ऑफ गॉड’ केले. मोसादने पुढची २० वर्ष या हत्याकांडांशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला वेचून वेचून संपवले. अगदी परदेशात जाऊन मोसादने कारवाया केल्या. इस्त्रायलच्या नागरिकांवर हल्ले करताना दहशतवाद्यांनी दहावेळा विचार करावा हाच रॅथ ऑफ गॉड मागे उद्देश होता.

‘ऑपरेशन ऑपेरा’ तर हद्दच होती. सात जून १९८१ रोजी इस्त्रायलने इराकमध्ये हवाई हल्ला करुन फ्रान्सच्या सहकार्याने उभा राहणारा अण्वस्त्र प्रकल्पच नष्ट केला. त्यासाठी गुप्त माहिती गोळा करण्यापासून हवाई हल्ल्यासाठी खूप आधीच इस्त्रायलने तयारी केली होती. खरंतर इराक आणि इस्त्रायलमध्ये त्यावेळी कुठलीही युद्धाची स्थिती नव्हती पण इराकच्या प्रकल्पामुळे उद्या धोका निर्माण होऊ शकतो या भितीपोटी इस्त्रायलने स्वसंरक्षणार्थ हा हल्ला केला. त्यांच्यावर अमेरिकेसह संयुक्त राष्ट्राने सर्वांनी टीका केली पण त्यांनी त्याची अजिबात पर्वा केली नाही.
इस्त्रायलच्या पराक्रमाची अशी अनेक उदहारणे आहेत. भविष्यातील धोके ओळखून त्याचा सामना करण्यासाठी विकसित केलेली शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान यामुळे इस्त्रायल आपल्या शूत्रला जेरीस आणू शकते. आपल्याकडे सुद्धा तंत्रज्ञान आहे. आपण पाकिस्तानला अद्दल घडवू शकतो फक्त ती राजकीय इच्छाशक्ती आहे का ? हा महत्वाचा मुद्दा आहे.

अमेरिकेचा पहिल्यापासून इस्रायलवर वरदहस्त राहिलेला आहे. तशीच वेळ आली तर अमेरिका इस्रायलसाठी मैदानात उतरेल इतकं दोघांचं घट्ट नातं आहे. काही दशकांपूर्वी आपलं असं नातं रशियाशी होतं. रशियानं काश्मीरप्रश्नी कायम भारतावर वरदहस्त ठेवला आणि भारत त्यामुळे आपल्या भूमिकेवर ठाम राहू शकला. आज रशिया पहिल्यासारखी महासत्ता राहिली नसून चीनचा उदय झालाय आणि चीन पाकिस्तानच्या बाजुनं भक्कम उभा आहे. इतका की दोघांचे संबंध आॅल वेदर प्रूफ मानले जातात. त्यामुळे अशा स्थितीत भारताला इस्रायलसारखं कठोर आचरण करायचं असेल तर त्यासाठी अमेरिकेचं कवच आवश्यक आहे. ते कसं लाभेल हा ही या विषयातला एक पैलू आहे.

Story img Loader