आज दि. १२ जुलै रोजी गुगलने पाणीपुरीचा खेळ गुगल डुडलसाठी ठेवले आहे. अनेकांनी पाणीपुरीचा खेळ खेळून त्याचा आनंदही लुटला. भारतीयांसाठी पाणीपुरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. परंतु, गुगलने आज हे डुडल का ठेवले आणि पाणीपुरी हा पदार्थ निर्माण कधी झाला, पाणीपुरीचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणे रंजक ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज गुगलने पाणीपुरीचे डुडल का ठेवले ?

गुगलचे आजचे डुडल हे पाणीपुरीशी संदर्भित आहे. पाणीपुरीप्रेमींसाठी गुगलने खास खेळसुद्धा ठेवला आहे. कुरकुरीत पुरी, बटाटे, चणे, मिरची आणि तिखट-गोड अशा पाण्याने पाणीपुरी सर्व्ह केली जाते. प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पाणीपुरी मिळतात. १२ जुलै, २०१५ मध्ये इंदौर, मध्य प्रदेशमध्ये मास्टरशेफ नेहा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ विविध प्रकारच्या पाणीपुरी सर्व्ह करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या जागतिक विक्रमानिमित्त गुगलने हे खास पाणीपुरीचे डुडल ठेवले आहे.

हेही वाचा : मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा आहेत तरी कोण ? ‘शकुनीमामा’ला नकारात्मक वलय का मिळाले ?

पाणीपुरीचे विविध प्रांतांमधील वैशिष्ट्ये

पाणीपुरी हा भारतातील तसेच दक्षिण आशियाई प्रदेशांमध्ये मिळणारा खास पदार्थ आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश प्रांतात कुरकुरीत पुरीसह उकडलेले चणे, बटाटा, तिखट, मसालेदार पाणी, चिंचेची चटणी यासह सर्व्ह केल्या जाणाऱ्या पदार्थाला ‘पाणीपुरी’ म्हणतात. पंजाब, जम्मू-काश्मीर, नवी दिल्ली या उत्तरेकडील भारतीय राज्यांमध्ये बटाटा आणि चणे यांनी भरलेल्या पुरीला जिऱ्याचा पाण्यासह सर्व्ह केले जाते, त्याला ‘गोलगप्पा’ असेही म्हणतात. ‘पुचका’ किंवा ‘फुचका’ असेही पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये म्हटले जाते. पश्चिम बंगालमध्ये चिंचेचा मुख्यत्वे वापर केला जातो. परंतु, मिरची, चाट मसाला, कुस्करलेला बटाटा, कांदा किंवा चणे हे पाणीपुरीमध्ये सर्वत्र आढळणारे पदार्थ आहे. पाणीपुरीचे नाव प्रदेशानुसार बदलते. महाराष्ट्रात ती ‘पाणीपुरी’ म्हणून ओळखली जाते. हरियाणात ती ‘पाणीपतशी’, मध्य प्रदेशात ‘फुलकी’, उत्तर प्रदेशात ‘पानी के बताशे’, आसाममध्ये ‘फुस्का’/’पुस्का’, गुजरातच्या काही भागांत ‘पकोडी’, ओडिशा, आंध्र प्रदेश, दक्षिण झारखंड, छत्तीसगड, बंगाल, बिहार आणि नेपाळमध्ये ‘गुप-चूप’, ‘गोल गप्पा’ या नावाने ती उत्तर भारतातील काही भागांमध्ये आणि पाकिस्तानमध्ये लोकप्रिय आहे. १० मार्च, २००५ मध्ये ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशामध्ये ‘पाणीपुरी’ हा शब्द जोडण्यात आला.

पाणीपुरीचा इतिहास

पाकशास्त्र निपुण कुरुश दलाल यांच्या मते, पाणीपुरीची निर्मिती उत्तर प्रदेश, बिहार या प्रांतात झाली असावी. राज-कचोरी या पदार्थापासून पाणीपुरी या पदार्थाची निर्मिती झाली असावी. लोकांच्या स्थलांतरणामुळे हा पदार्थ भारतभर विस्ताराला. Faxian आणि Xuanzang यांच्या प्रवासवर्णनांमध्ये पाणीपुरीशी साधर्म्य साधणाऱ्या पदार्थाचा उल्लेख सापडतो.
काही इतिहासकारांच्या मते, पाणीपुरीचा उगम मुघल काळात झाला. पाणीपुरीच्या संदर्भात एक दंतकथाही सांगितली जाते. ही कथा महाभारतात सापडते. द्रौपदी विवाह होऊन सासरी आल्यावर कुंतीने कमी घटकांमध्ये एक पदार्थ तयार करण्यास सांगितले. कारण, पांडव वनवासात असताना कमीत कमी घटकांमध्ये द्रौपदीला पदार्थ करता आले पाहिजे, असे कुंतीला वाटत होते. तिने कणिक आणि काही भाज्या द्रौपदीला दिल्या. तेव्हा कणकेपासून पुरी आणि काही पालेभाज्यांचा वापर करून द्रौपदीने एक पदार्थ बनवला. हा पदार्थ पाणीपुरीशी साधर्म्य साधणारा होता.

पाणीपुरीचा विकास

सुरुवातीला बटाटे, चणे आणि मसालेदार पाणी यांच्यापुरता मर्यादित असणारा पदार्थ नंतर प्रदेशांनुसार विकसित होत गेला. पुदिना चटणी, चिंचेची चटणी, मिरची, टोमॅटो-कांदा-कोथिंबीर यांचा वापर, केवळ कुस्करलेला बटाटा, जलजिरा पाणी, वेगवेगळ्या ‘फ्लेव्हर्स’ ची पाणीपुरी असे पाणीपुरीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. चॉकलेट पाणीपुरी, फायर पाणीपुरी, चटपटा पाणीपुरी असेही काहीसे वेगळे पाणीपुरीचे प्रकार आपल्याला दिसतात. पाण्याऐवजी अल्कोहोलिक द्रव्यांचा वापर करण्यात येत आहे. सध्या पाणीपुरी टकीला शॉट हा पदार्थ ट्रेंडिंगमध्ये आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Todays google doodle and the interesting history of panipuri where did panipuri food come from vvk
Show comments