कादर खान आणि जॉनी लिव्हर या दोघांनी सिनेसृष्टीमध्ये जवळजवळ एक संपूर्ण दशक गाजवलं. ‘विनोद म्हणजे कादर खान आणि जॉनी लिव्हर’ असं सरळ सरळ समिकरण होतं त्यावेळी. कादर खान आणि जॉनी लिव्हर असणाऱ्या सिनेमांची मध्यंतरी लाट आली होती. हे दोघे किंवा दोघांपैकी एखादा नसणारा सिनेमा सिनेमाच नाही असं होतं ते. समकालीन असूनही दोघांची विनोदाची शैली अगदी वेगळी. कादर खान हळूच चिमटा कढणार आणि अगदी एफर्टलेसली विनोद करणारे तर जॉनी म्हणजे देहबोली आणि लाऊड अभिनयातून विनोद साकारण्यात हातखंड असणारा. या दोघांपैकी सरस कोणं असं विचारणं म्हणजे डावा हात की उजवा हात विचारण्यासारखचं झालं.
कादर खान यांच्या भूमिकेंची नाव लक्षात नसली तरी बऱ्याच भूमिका सहज आठवतात. छोट्या छोट्या सीन्सला या माणसानं कायमच अजरामर केलं आहे. बरं अश्लीलतेचा कुठेही टच नाही. टायमिंग, शब्दात पकडणं, प्रासंगिक विनोद, शारिरीक हलचालीच्या आधारावर केलेले विनोद बस्स… फूल ऑन फॅमेली मॅन… आजच्या स्टॅण्डअप कॉमेडीन्स सारखा त्यांना शिव्यांचा आधार कधीच घ्यावासा वाटला नाही… आजचे कॉमेडीन्स आवडतात लोकांना पण कुठे तरी चर्चेत ‘किती शिव्या देतो उगाचं तो’ असं एखादं वाक्य मिठाचा खडा घालतातच. पण जुन्या विनोदवीरांबरोबर हे होत नाही. कारण त्यांनी नेहमी निर्मळ विनोद केले. अर्थात त्यावेळेचे समाज आणि सिनेमेही तसेच होते. स्क्रिप्ट इतक्या बोल्ड नसायच्या आणि असत्या जरी तरी यांनी अभिनयावरच वेळ मारून नेली असती ‘प्रो लोकां’प्रमाणे…
एकेकाळी सिव्हील इंजिनियरींगच्या प्रोफेसर म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या या व्यक्तीला अभिनय श्रेत्रात उडी घेतल्यानंतर ४० वर्षांनी म्हणजेच २०१३ साली साहित्य शिरोमणी पुरस्कार देऊन सिनेसृष्टीतील योगदानासाठी गौरवण्यात. तीन फिल्मफेअर या व्यक्तीनं जिंकले. तर एकूण १२ फिल्मफेअरमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं त्यांना.
‘राजाबाबू’, ‘कुली नंबर वन’, ‘जुडावा’मधला करिष्मा कपूरचा बाप, ‘हिरो नंबर वन’, ‘मिस्टर अण्ड मिस खिलाडी’मधला जुहीचा खूप श्रीमंत बाप, ‘आंटी नंबर वन’मधील राय बहादूर, ‘दुल्हे राजा’, ‘हिरो हिंदुस्तानी’, ‘जोरु का गुलाम’मधला चार मुलींचा बाप, ‘मुझसे शादी करोगी’ मधला कधीही काहीही होणारा दुग्गल अंकल अशा अनेक भूमिकांमधून यांनी आपल्याला हसवले. अर्थात त्यांची फिल्मोग्राफी पाहिल्यावर ती १९७३ पासून सुरु होते. पण आजच्या इंटरनेटच्या युगात वावरणाऱ्या माझ्यासारख्यांना लक्षात राहणारे त्यांचे सिनेमे म्हणजे हसवणारे सिनेमेच.
गोविंदा आणि कादर खान यांची जोडी तर काटा की छापा प्रकारातली. गिव्ह आणि टेक कसं असावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे या दोघांचे केमिस्ट्री. हा माणूस गेल्याच्या मध्यंतरी खूप जास्त अफवा उटल्या पण अखेर खरोखर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा हसवणारा माणूस रडवून गेला. जाता जाता एकच जसा लक्षा सोडून गेल्यानंतर अशोक सराफ अपूर्णच वाटतात तसंच गोविंदाचं आहे कादर खान यांच्याशिवाय… (अर्थात हे दोघेही अनेक वर्षे कोणत्याही सिनेमात आले नाही पण गोविंदाचा सिनेमातील सासरा किंवा असं काही म्हटल्यावर हाच माणूस डोळ्यासमोर येतो) अर्थात कादर खान यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. पण ९० च्या शेवटच्या दशकात जन्मलेल्यांसाठी ते कायमच एक विनोदवीर म्हणून लक्षात राहतील.
स्वप्नील घंगाळे
swapnil.ghangale@loksatta.com