(शेखर जोशी)
विजय चव्हाण यांचा बहुदा तो अखेरचा जाहीर कार्यक्रम असावा. राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा ३० एप्रिल २०१८ रोजी मुंबईत वरळी येथे पार पडला. या सोहळ्यात विजय चव्हाण यांना राज्य शासनाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आजारी असूनही विजय चव्हाण व्हिल चेअरवर बसून आणि ऑक्सिजनच्या नळ्या लावलेल्या अवस्थेतही उपस्थित होते.
अभिनयाची आवड नसताना बदली कलाकार म्हणून
महाविद्यालयात एका नाटकात काम केले. तिथे पहिला हशा, टाळ्या घेतल्या आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारही मिळविला. तिथून माझा अभिनय प्रवास सुरु झाला आणि आजही तो संपलेला नाही, असे त्यांनी पुरस्कार स्वीकारल्या नंतर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले होते. जीवनगौरव मिळाला असला तरी माझा प्रवास संपला नाही. प्रवास सुरूच राहणार अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केली होती. पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करायचे असल्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. ती मात्र आता अपूर्णच राहिली.
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी ते व्हीलचेअरवर बसून व्यासपीठावर आले आणि उभे राहिले. चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर रसिकांनी उभे राहून मानवंदना दिली होती.
‘मोरुची मावशी’मुळे विजय चव्हाण यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली होती.
लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय चव्हाण चांगले मित्र. लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर त्यांनी ‘टुरटुर’ हे नाटक केले होते. ‘मोरुची मावशी’ नाटकासाठी आधी बेर्डे यांनाच विचारण्यात आले होते. पण ते खूप व्यग्र असल्याने त्यांनी नाटकाचे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांना विजय चव्हाण यांचे नाव सुचवले आणि विजय चव्हाण यांना ही भूमिका मिळाली. चव्हाण यांनी या संधीचे अक्षरशः सोने केले. मोरुची मावशी या नाटकाने त्यांच्या आयुष्याला आणि अभिनय प्रवासालाही कलाटणी मिळाली.
नाटकातील ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणे आणि त्यावरील नाच नाटकाचा महत्वाचा भाग होता. रेशमी साडी सहजपणे सावरत चव्हाण घालत असलेला पिंगा आणि कोंबडा कधीही न विसरता येणारा. या नाचासाठी त्यांना वन्समोअर मिळायचाच आणि विजय चव्हाणही वन्समोअर घेऊन त्याच उत्साहाने पुन्हा पिंगा आणि कोंबडा घालायचे.
वाचा : ‘आण्णां’च्या जाण्यानं ‘दामू’ही गहिवरला, म्हणाला….
चार्लीज आन्ट’ हे ब्रॅन्डन टॉमस लिखित एक इंग्रजी प्रहसनवजा नाटक आचार्य अत्रे यांच्या वाचनात आले. यापूर्वी ‘टी.डी.’ ही पदवी मिळवण्यासाठी अत्रे इंग्लंडला गेले असताना ‘चार्लीज आन्ट’ या नाटकाचा प्रयोगही त्यांनी पाहिला होता. या धमाल नाटकाच्या कथेवरून आचार्य अत्रे यांनी ‘मोरूची मावशी’ हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शितही केला होता. पुढे काही वर्षांनी आचार्य अत्रे यांनीच ‘मोरुची मावशी’ हे नाटक लिहिले.
आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या ‘मोरुची मावशी’ या नाटकात या आधी अभिनेते बापुराव माने यांनी ही मावशी साकारली होती. १ मे १९६३ रोजी महाराष्ट्र दिनी ‘मोरूची मावशी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात मोठ्या साजरा झाला. पुढे दीड महिन्यात या नाटकाचे सतत हाऊसफुल्ल असे २५ प्रयोग झाले. अत्रे थिएटर्स’ ने हे नाटक सादर केले होते.
काही वर्षांनी ‘सुयोग’ ने ‘मोरुची मावशी’ हे नाटक नव्या संचात सादर केले. प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय साळवी, सुरेश टाकळे आणि विजय चव्हाण हे कलाकार होते. दीर्घ कालावधीनंतर पुनरुज्जीवीत झालेले ‘मोरुची मावशी’ नाटक रसिक प्रेक्षकांनी पुन्हा एकदा आपलेसे केले आणि विजय चव्हाण यांनी ‘मावशी’अजरामर केली.
(छायाचित्र गुगलच्या आणि टांग टिंग टिंगा…ही क्लिप यु ट्यूबच्या सौजन्याने)