-सॅबी परेरा

बॉम्बे टॉकीज हा हिंदी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्वाचा स्टुडिओ. हिमांशू रॉय आणि देविका रानी हे जोडपे जर्मनीत जाऊन सिनेमा बनविण्याची कला शिकले आणि मुंबईत मालाडमध्ये आपला बॉम्बे टॉकीज हा स्टुडिओ सुरु करून त्यांनी सिनेमे बनविले. ह्याच बॉम्बे टॉकीजच्या सिनेमांमुळे अशोक कुमार सुपरस्टार झाले आणि किशोर कुमार गायक म्हणून करियर करायला सज्ज झाले. या स्टुडिओच्या आणि त्याचवेळी नव्याने स्वतंत्र होत असलेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर एक उत्तम कथा, पटकथा रचून विक्रमादित्य मोटवाने यांची “ज्युबिली” ही वेबसिरीज अमॅझॉन प्राईमवर रुजू झाली आहे.

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
EY India , Infosys, employee , work culture,
शहरबात : ‘आयटीनगरी’ची कथा अन् व्यथा : ईवाय इंडिया ते इन्फोसिस…
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Regional office of Agriculture and Processed Food Products Export Development Authority APEDA opened in Nagpur Mumbai print news
नागपुरात होणार ‘अपेडा’चे प्रादेशिक कार्यालय; जाणून घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा पुढाकार घेतला
IIT Mumbai launched e postgraduate degree course for advanced education
आयआयटी मुंबईचा ‘ई-मोबिलिटी’अंतर्गत ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू
Mumbai municipal administration has cancelled the project to build an underground parking lot near Amarsons Park along the coastal road Mumbai
नागरिकांच्या विरोधानंतर सागरी किनारा प्रकल्पालगतचे वाहनतळ गुंडाळले ; चार वाहनतळांपैकी अमरसन्सचा प्रकल्प रद्द
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

रॉय टॉकीजमधे काम करणाऱ्या बिनोद नावाच्या हरकाम्या युवकाच्या सुपरस्टार मदन कुमार होण्याची ही कथा आहे. देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. रॉय टॉकीजला एका हिट सिनेमाची आणि एका सुपरस्टारची गरज आहे. त्यांच्या पुढील सिनेमासाठी त्यांनी घेतलेल्या ऑडीशन मधे जमशेद खान नावाच्या एका रंगमंच कलाकारांची निवड झाली आहे. त्याला साईन करण्यासाठी स्टुडिओची मालकीण सुमित्रा कुमारी लाखनऊला गेलेली आहे आणि तिथेच ती त्याच्या प्रेमात पडली आहे. त्या दोघांना मुंबईला घेऊन येण्यासाठी श्रीकांत रॉय आपल्या विश्वासातील बिनोदला पाठवतो. दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळते. देशाची फाळणी होते. जागोजागी दंगली सुरु होतात.

आणखी वाचा : महारानी-2: बिहारी पोलिटिकल ड्रामा

बिनोद जमशेद खानला न घेताच मुंबईला परत येतो आणि कालांतराने रॉय टॉकीजचा सुपरस्टार मदन कुमार होतो. लखनऊहून नाईलाजाने आपल्या स्टुडिओत परतलेली सुमित्रा कुमारी, बिनोदला लखनऊला जाताना ट्रेनमध्ये भेटलेला कराचीचा जय खन्ना नावाचा तरुण, जय खन्नाला लखनऊला भेटलेली नीलोफर नावाची तवायफ हे सगळे वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या परिस्थितीत मुंबईला येतात. लखनऊला नक्की काय झालं होतं आणि मुंबईला काय होतं हे जाणण्यासाठी “ज्युबिली” हे वेबसिरीज पाहायलाच हवी.

विक्रमादित्य मोटवाने, सौमिक सेन आणि अतुल सभरवाल ने लिहिलेली कथा-पटकथा हा या वेब सिरीजचा आत्मा आहे. एकीकडे नव्यानेच सुरु झालेली सिनेमाची दुनिया, त्याद्वारे आलेलं ग्लॅमर आणि दुसरीकडे फाळणीच्या जखमा काळजात घेऊन उत्कर्षाची उमेद बाळगून संघर्ष करणारी जनता ह्याचं चित्रण इतकं जिवंत केलेलं आहे की २१व्या शतकातला प्रेक्षक १९४७ च्या आसपासच्या त्या काळात बुडून जातो.

आणखी वाचा : पुनःश्च हनिमून : नवरा-बायकोच्या नातेसंबंधातील गुंतागुंत दाखवणारं नाटक!

आजवर आपला थोरला बंधू आयुष्मान खुरानाच्या सावलीत दबला गेलेला अपारशक्ति खुराना विक्रमादित्य मोटवानेच्या दिग्दर्शनाखाली अगदी खुलून आला असून स्टाफ क्वार्टर से निकलकर स्टार क्वार्टर पर्यंतचा हरकाम्या बिनोद ते सुपरस्टार मदन कुमार हा प्रवास त्याने आपल्या अभिनयाने जिवंत करून प्रेक्षकांना आणि सिनेमावाल्यांना आपली दखल घेणे भाग पाडले आहे. ‘यहां सबको बड़ा बड़ा बोलने में बहुत मजा आता है लेकिन जो चुप रहता है, वह लंबा चलता है।’ हा या सिनेमातील डायलॉग अपारशक्ति खुरानाच्या आजवरच्या फिल्मी करियरला देखील लागू पडतो.

कलंदर आणि बंडखोर वृत्तीचा कलाकार, फाळणीमुळे निर्वासित होऊन मुंबईत येऊन रिफ्यूजी कॅम्प मधे राहणारा, मोठमोठी स्वप्ने पाहणारा, आपल्यावर प्रेम करणारी नर्स आणि आपण जिच्यावर प्रेम करतोय ती सिनेतारका होऊ घातलेली तवायफ या भावनिक हिंदोळ्यावर झुलणाऱ्या जय खन्नाच्या भूमिकेत सिद्धांत गुप्ताने अपारशक्ती खुरानाला कांटे कि टक्कर दिलेली आहे.

स्वतःच्या करिष्म्यावर सिनेमा हिट करणारी स्टार ऍक्ट्रेस, रॉय टॉकीजचा कारभार सांभाळणारी व्यवहारकुशल मालकीण, एक बंडखोर पत्नी, दुखावलेली प्रेमिका आणि आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या व्यक्तीला बरबाद करण्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार असणारी स्त्री आदिती राव हैदरीने कमीत कमी संवादातून आपल्या नजरेतून आणि देहबोलीतून सुंदर दाखवली आहे.

आणखी वाचा : भाऊबळी: वर्गसंघर्षाची खुमासदार लढत

प्रॅक्टिकल विचार करणारी, कोठ्यावर नाचणारी एक वेश्या ते स्टार ऍक्ट्रेस बनण्यापर्यंतचा निलुफर कुरेशीचा प्रवास वामिका गब्बीने आपल्या शानदार अभिनयाने जिवंत केलेला आहे. याव्यतिरिक्त श्रीकांत रॉय झालेला प्रोसेनजित चटर्जी, जय खन्नाच्या वडिलांच्या भूमिकेतील अरुण गोविल आणि फिल्म फायनान्सर झालेला राम कपूर यांच्याही भूमिका दखलपात्र झाल्या आहेत. वेबसीरीज आहे म्हणजे त्यात शिव्या असायलाच हव्यात असा आपल्याकडे एक दंडक निर्माण झाला आहे. “ज्युबिली” या वेबसीरीजमधे शिव्यांचा संपूर्ण कोटा राम कपूरच्या वाट्याला आलेला आहे. केवळ त्या शिव्यांमुळे या वेबसीरीजला कौटुंबिक वेबसिरीज म्हणता येत नाहीये.

संगीतकार अमित त्रिवेदीच्या संगीताने भारतीय सिनेमाच्या सोनेरी काळातील आठवणी जाग्या होतात. एक सशक्त कथा, पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, संगीत, संकलन या सगळ्यांचा उत्तम मेळ जमून आलेली ही वेबसिरीज, १९५० च्या दशकातील जुनी मुंबई, भव्य फिल्म स्टुडिओ आणि एकंदरीतच जुना काळ हुबेहूब उभा करते. पार्श्वसंगीत देखील उत्तम आहे. भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळाच्या आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेला शुद्ध देशी मातीचा सुगंध असल्याने आणि तो अनुभव गडद करण्याचं काम दिग्दर्शक, कलाकार, संगीतकार, तंत्रज्ञ या सर्वांनी अतिशय उत्तम केलेलं असल्याने “ज्युबिली” चुकवूच नये अशी वेबसीरीज झालेली आहे.

Story img Loader