राष्ट्रगीत हा देशाच्या अभिमानाचा बिंदू असतो. शाळा, चित्रपटगृह किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी राष्ट्रगीत सुरु असेल तर स्तब्ध उभे राहून त्या गीताचा मान राखला जातो. शालेय वयापासून सर्वांना तोंडपाठ असणारे राष्ट्रगीत कधी निर्माण झाले, रवींद्रनाथ टागोरांनी याची रचना कशी केली, राष्ट्रगीताचा अर्थ काय, त्यामागचा इतिहास आणि वर्तमान स्थिती काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कथा भारताच्या राष्ट्रगीताची…

आज आपण सर्व म्हणत असलेले भारताचे राष्ट्रगीत हे रवींद्र टागोर यांनी रचलेल्या ‘भारतो भाग्यो बिधाता’ या मूळ बंगाली काव्याचा भाग आहे. ‘भारतो भाग्यो बिधाता’ हे मूळ गीत हे ब्राह्मोगीत आहे. तत्वबोधिनी पत्रिकाच्या एका अंकात हे काव्य प्रथम प्रसिद्ध झाले. हे ५ कडव्यांचे काव्य होते. यामध्ये भारत देशाच्या भौगोलिक, सांस्कृतिक, प्रादेशिक अंगांचे वर्णन करण्यात आले होते. त्यातील पहिल्या कडव्याचे हिंदी अनुवाद आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला आहे. ५२ सेकंदांचे असणारे हे राष्ट्रगीत आहे. हे कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले गीत प्रथम जाहीरपणे २७ डिसेंबर १९११ रोजी काँग्रेस अधिवेशनात गायले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रगीत ठरविताना पुन्हा वादविवाद झालेच. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ‘वंदे मातरम्’ला ते स्थान मिळावे, ही सर्वसामान्यांची अपेक्षा. पाकिस्तान ‘इस्लामिक प्रजासत्ताक’ झाले, तरी भारताने ‘धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक’ पद्धती स्वीकारल्यामुळे, पं. नेहरूंनी ‘जनगणमन’ला पुष्टी दिली. २४ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय घटना परिषदेने पहिल्या कडव्याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. पहिल्या प्रजासत्ताक दिनी, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या सूचनेनुसार ‘जनगणमन’ हे राष्ट्रगीत, तर ‘वंदे मातरम्’ हे ‘राष्ट्रीय गीत’ घोषित झाले.

हेही वाचा : स्वातंत्र्य दिन विशेष : अभिव्यक्तिस्वातंत्र्य खरेच स्वातंत्र्य आहे का ? तुम्ही तुमची मते मांडू शकता का ?

काय आहे राष्ट्रगीताचा अर्थ

सर्व राष्ट्रगीत अभिमानाने म्हणतात. पण, राष्ट्रगीताचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. जन-गण-मन अधिनायक जय हैं । भारत भाग्य विधाता । तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो! पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र, द्राविड म्हणजे दक्षिण भाग, उत्कल म्हणजे आताचा ओडिशा, बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो. विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधितरंग। विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येते. गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होते. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मांगे; गाहे तव जय गाथा। जन-गण मंगलदायक जय है, भारत-भाग्य-विधाता। हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस. जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय है।। तुझा जय जयकार. त्रिवार जयजयकार असो…

भारताचे राष्ट्रगीत भारतदेशातील सार्वभौमत्वावर भाष्य करते. पण आज देशांतर्गत घडणाऱ्या घटना याच सार्वभौमत्वाला बाधा पोहोचवत आहेत. फुटीरतावादी कारवाया मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. महिलांवरील अत्याचार, देशातील राजकीय घडामोडी, देशातच राहून देशविरोधी कृत्ये, यामुळे सुजलाम सुफलाम असणाऱ्या देशाला धोका उत्पन्न होत आहे. राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवणारे राष्ट्रगीत फक्त म्हणण्यापुरते न राहता ते आचरणात आले पाहिजे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Was indias national anthem originally bengali meaning history and present of national anthem vvk