दिलीप ठाकूर
काही वेळा एखादी मोठी स्पर्धा जिंकण्यापेक्षा त्यात सहभागी होण्याचाही आनंद खूप मोठा असतो. ऑस्करसाठीची भारताची प्रवेशिका म्हणून निवड होणारा चित्रपट याच कॅटेगरीत अजून राहिलाय काय असा प्रश्न अगदी प्रामाणिकपणे पडू शकतो, पण त्याच चौकटीत तो फिरत राहू नये असेही आपल्या चित्रपटावरील प्रेमापोटी मनोमन वाटतं. मराठी अथवा हिंदी तर झालेच पण आपल्या देशातील लहान मोठ्या अनेक प्रादेशिक चित्रपटाच्या आजच्या ग्लोबल युगातील शौकिनांनाही अगदी असेच वाटतेय. २०१९ च्या ऑस्करसाठी तर ‘द व्हिलेज राॅकस्टार ‘ या आसामी चित्रपटाची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने निवड करुन काहीशा दुर्लक्षित प्रादेशिक चित्रपटाला मुख्य प्रवाहात आणले तर आता २०२० च्या ऑस्करसाठी झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बाॅय’ची निवड झाली आहे. या चित्रपटाला ऑस्करच्या विदेशी चित्रपट विभागात नामांकन तर मिळावेच, पण त्याने ऑस्कर पुरस्कार पटकावून भारतात फक्त संख्याबळाने चित्रपट निर्मिती वाढलीय असे नव्हे तर येथे क्लासिक चित्रपटही निर्माण होत असतात हे जगभरातील चित्रपट रसिकांना समजेल. भारतीय चित्रपट म्हणजे फक्त आणि फक्त गीत संगीत व नृत्य यांची रेलचेल असलेले पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपट नव्हे तर येथे आता जागतिक सिनेमाच्या स्तरावरचेही चित्रपट पडद्यावर येतात हेही अधोरेखित होईल. आज त्याचीच जास्त गरज आहे. गेली अनेक वर्षे आपण आपल्याकडचा हिंदी अथवा मराठी अन्यथा इतर भाषेतील चित्रपट ऑस्करसाठीची भारताची प्रवेशिका म्हणून पाठवतो. यावर्षी ऑस्करसाठीच्या आपल्या अंतिम निवडीतील २८ चित्रपटात आनंदी गोपाळ, बाबा, बंदीशाळा आणि माय घाट- क्राईम 103/2005 या मराठी चित्रपटांना स्थान मिळाले हेही सांगायला हवं. पण ऑस्करसाठी आपला ‘गली बाॅय ‘सारखा यशस्वी चित्रपट निवडला जाताच सर्वत्र सकारात्मक वातावरण निर्माण होते, मिडियात चर्चा होते, संबंधित चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ उचंबळून येत मुलाखती देतात, पूर्वी म्हणजे, संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास ‘ ( २००३) ची निवड झाली तेव्हा मराठी वृत्तपत्रांतून अग्रलेख लिहिले गेले, अमित मसुरकर दिग्दर्शित ‘न्यूटन ‘ ( २०१७) ची निवड होईपर्यंत आपण डिजिटल युगात पोहचल्याने अशा वेळी ट्वीट केले गेले. पण पुढे काय? हा शो येथेच संपतो की काय?
एक काळ असा होता की, ऑस्कर पुरस्काराबाबत आपल्याकडे फक्त एलिट क्लासमध्ये कुतूहल आणि कौतुक होते. त्यांना मराठी व हिंदी चित्रपट म्हणजे डाऊन मार्केट वाटे. तो कसला हो सिनेमा अशा तुच्छ दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले जाई. त्या काळात ऑस्करबाबत विशेषतः विदेशी चित्रपट आणि आपल्याकडचा कलात्मक अथवा समांतर चित्रपटाच्या रसिकांना त्याची महती आणि माहिती होती. आपल्याकडचा ‘चित्रपट गर्दीत एन्जाॅय करणारा मास’ मात्र हा पुरस्कार आपला नाही अशाच मानसिकतेत होता. याला पहिला छेद दिला आमिर खान निर्मित आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान ‘ ( २००१) ने! या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत आमिर खानने मुलाखती देताना ‘या चित्रपटाचे बजेट पंचवीस कोटी आहे ‘ हे खरं तर चर्चेत आणण्याची गरज नव्हती. आशुतोष गोवारीकरने पटकथेवर सखोल मेहनत घेऊन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आणि म्हणूनच समिक्षक आणि रसिकांची दाद मिळाली. अशातच भारतीय चित्रपटसृष्टीची ऑस्करसाठीची प्रवेशिका म्हणून ‘लगान ‘ची निवड झाली आणि पहिल्यांदाच हिंदी चित्रपटाच्या रसिकांना आपला चित्रपट अशा स्पर्धेयोग्य ठरु शकतो काय हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. एक सकारात्मक बदल झाला. आशुतोष गोवारीकरने अमेरिकेत जाऊन या स्पर्धेचे नियम, कार्यशैली, परीक्षकांसाठीचे खेळ हे सगळेच व्यवस्थित समजून घेतले. तशी मेहनत घेतली आणि त्याचे चांगले फळ त्यास मिळाले, ‘लगान ‘ला विदेशी चित्रपटाच्या नामांकनात स्थान मिळाले आणि हिंदी चित्रपटसृष्टी, मिडिया, रसिकांत नवचैतन्य निर्माण झाले. तत्पूर्वी, मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया ‘ ( १९५८) आणि मीरा नायर दिग्दर्शित ‘सलाम बाॅम्बे ‘( १९८९) या चित्रपटांनाही असेच नामांकन मिळाले पण ऑस्कर पुरस्कार मात्र प्राप्त झाला नाही. फरक इतकाच की ‘लगान ‘चा काळ हा हिंदी चित्रपट कूस बदलत असल्याचा, समांतर आणि व्यावसायिक असा भेद कमी होत चालल्याच्या वळणावरचा होता. आणि हिंदी चित्रपट पलायनवादाकडून अर्थपूर्ण चित्रपटाकडे चाललाय असा प्रेक्षकांना विश्वास असल्याचा होता. प्रेक्षकांना आपला चित्रपट ऑस्करसाठी योग्य आहे असे वाटणे ही ‘लगान ‘ने दिलेली मोठी देणगीच आहे. आणि मग संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास ‘( २००३) ची अशीच निवड झाल्याची भर पडली. यावेळी प्रामुख्याने मराठी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात प्रचंड प्रमाणात आनंददायक वातावरण निर्माण झाले. इतके की, मराठी चित्रपटाच्या प्रवासाची दिशाच बदलली. साठ आणि सत्तरच्या दशकातील आशयघन कसदार मराठी चित्रपटाचे ‘श्वास ‘नंतर पुनर्जीवन झाले. आज मराठी चित्रपटाला आलेल्या चांगले दिवस, प्रतिष्ठा, प्रयोगशीलता आणि पैसा याची मूळे ‘श्वास ‘चे ऑस्करला एण्ट्री यात आहेत. यात पैसा अशासाठी म्हटलं की, नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने शंभर कोटीचा व्यवसाय केल्याची ब्रेकिंग न्यूज झालीय. तर परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी ‘, चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ असे मराठी तसेच ‘पहेली’, ‘देवदास’ वगैरे हिंदी आणि कधी गुजराती वगैरे प्रादेशिक चित्रपट आपण ऑस्करला पाठवला. पण या मुख्य प्रवाहातील चित्रपट अद्याप आपल्याला जगभरातील सर्वाधिक मानाचा ‘ऑस्कर पुरस्कार’ मात्र मिळवू देऊ शकले नाहीत. त्या योग्यतेच्या आपण किती आणि कसे जवळ आहोत याचा विचार करताना विदेशी चित्रपटाचा दर्जा पहावा असा एक मुद्दा कायमच समोर येतो. पण त्यापेक्षा आपल्या बहुसांस्कृतिक, बहुभाषिक अशा देशाची आपली एक वेगळी चित्रपट संस्कृती आहे, आपल्या चित्रपटात भावना, गीत, संगीत व नृत्य हे हुकमी एक्के असतात, असेच चित्रपट आपल्या समाजात खोलवर पोहचतोय हे मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया ‘( १९५८), रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले ‘( १९७५), सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित “हम आपके है कौन”( १९९४) आणि आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ‘( १९९५) या आणि इतरही मराठी इत्यादी प्रादेशिक चित्रपटांनी सिध्द झाले आहे, हा ‘रियॅलिटी शो’ ऑस्करमध्ये आपल्याला फळेल का? खास ऑस्कर पुरस्कारासाठी एखाद्या चित्रपटाची निर्मिती असे जगात कुठेही ठरवून होत नाही, खरं तर अगदी ठरवून क्लासिक चित्रपट पडद्यावर आणतो येतो हे शंभर टक्के खात्रीने सांगता येत नाही. त्यासाठी अधिकाधिक प्रयत्न मात्र होत असतात.
आपला चित्रपट ऑस्करसाठीची भारताची प्रवेशिका म्हणून निवड होते तेव्हा अशा अनेक गोष्टींवर फोकस टाकला जातो. कधी आपल्याकडील निवड प्रक्रिया आणि निवडलेला चित्रपट यावर मतमतांतरे असतात, तर कधी फेब्रुवारीत अमेरिकेत ऑस्कर सोहळा साजरा होत असताना त्यात आपल्या चित्रपटांना स्थान ते कुठेय अशी टीका होते. पण आज ज्या पद्धतीने आपला चित्रपट बदलतोय ( खास करुन हिंदी , आणि काही प्रमाणात मराठी ) ते पाहता आपला चित्रपट एक दिवस नक्कीच ऑस्कर पुरस्कार पटकावून भारतात फक्त संख्येने चित्रपटांची वाढ होत नाही तर गुणात्मक वाढही होतेय याला जगमान्यता मिळेल….आपण सकारात्मक असावे ही आपल्या चित्रपटाची शिकवण आहे.