नारळी पोफळीच्या बागांचे पांघरूण घेऊन निळ्याशार सागराची गाज लाभलेल्या कोकणातील टुमदार गाव म्हणजे ‘मुरूड जंजिरा’. सुंदर निसर्ग, अभेद्य जंजिरा, ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ला, जागृत देवस्थाने लाभलेल्या या गावाच्या रक्षणास सदैव सज्ज असते ती म्हणजे या गावची ग्रामदेवता ‘कोटेश्वरी माता’. मुरूड या गावात अनेक प्रसिद्ध आणि जागृत देवदेवतांची मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या कोटेश्वरी मातेचे मंदिर आपल्याला गावाच्या वेशीवर पाहायला मिळते. कोटेश्वरी देवी ही मुरुडमधील अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोटेश्वरी देवीच्या मंदिराची रचना

सध्या कोटेश्वरी देवीचे जे मंदिर आपण पाहतो, ते नवीन बांधकाम आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर ही नवीन रचना मंदिराला मिळाली. या मंदिराची जुनी रचना लाकडी बांधकाम असलेली तसेच कौलारू रचना होती, पूर्वी देवीचे पुजन ‘तांदळा’च्या स्वरूपात होत असे. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही कोटेश्वरी आणि कोळेश्वरी देवीचा तांदळा आणि अलिकडच्या काळात स्थापन केलेली देवीची संगमरवरी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मंदिराबाहेर दीपस्तंभ, तुळशी वृंदावन आणि वधस्तंभाचा काही भाग आपल्याला पाहायला मिळतो. मंदिरात प्रवेश केल्यावर एका कोपऱ्यात आणखी एका देवीचे स्थान आहे. त्या देवीचे नाव अज्ञात असून स्थायिक परंपरेनुसार कांजण्या, गोवर या रोगांपासून रक्षण करणारी ही देवी आहे. तसेच या देवीचे नाव घेतलं जात नाही, असे स्थानिक सांगतात.

आणखी वाचा: Shardiya Navratri 2023: भारतातील शक्ती पूजेचा (देवी) सर्वात प्राचीन पुरावा कोणत्या शतकातील?

कोटेश्वरी देवीचे आगमन

कोटेश्वरी देवीचा उगम कोणत्या काळात आणि कसा झाला हे निश्चित सांगता येत नाही. परंतु या देवीचे मूळस्थान ‘कासा’ म्हणजेच ‘पद्मदुर्ग किल्ला’ आहे. या किल्ल्यातून देवी लाकडी खांबावर बसून समुद्रमार्गे मुरूडमध्ये आली, असे ग्रामस्थ सांगतात. ज्या किनारी भागाजवळ खांब वाहत आला तिथे देवीची स्थापना करण्यात आली, आजही एक लाकडी खांब आपल्याला मंदिराबाहेर पाहायला मिळतो. तर श्रीछत्रपतींच्या पद्मदुर्ग किल्ल्यात जे देवीचे स्थान आहे तिथेसुद्धा एका खांबाचा बुंधा आपल्याला पाहायला मिळतो. काही ग्रामस्थ देवी गावच्या वेशीवर तांदळ्याच्या स्वरूपात प्रकट झाली, असे सांगतात. मंदिरात आपल्याला मुखवटा लावलेला कोटेश्वरी तसेच कोळेश्वरी देवीचा तांदळा पाहायला मिळतो. ही देवी नवसाला पावणारी आणि रोगराई नष्ट करणारी अशी मान्यता आहे.

देवीचा उत्सव

नवरात्र उत्सव तसेच चैत्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने कोटेश्वरी देवीच्या मंदिरात साजरा केला जातो. भजन कीर्तन करून देवीची प्रार्थना केली जाते. श्रावणात देवीचा सप्ताह भरविला जातो. नवरात्री उत्सवादरम्यान गावातील विवाहित स्त्रिया कुमारिका पूजन करून त्या कुमारिकांना लाह्या आणि फळांची खिरापत देऊन मग देवीची ओटी भरण्यासाठी आणि देवीला खिरापत अर्पण करण्यासाठी मंदिरात येतात. देवीला डाळ, भात, भेंडी -पोकळा भाजी, खीर वडे असा नैवेद्य दाखविला जातो. मुरूडमध्ये कोटेश्वरी मातेचा चैत्रीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या चैत्रीच्या उत्सवाला मोठी जत्रा भरविली जाते. या जत्रेला मुरूडमधीलच नव्हे तर मुरूडच्या आसपासच्या गावातील ग्रामस्थदेखील उपस्थिती लावतात. या चैत्रीच्या उत्सवाचा उल्लेख आपल्याला कुलाबा गॅझेटियरमध्ये सुद्धा सापडतो.

कोटेश्वरी देवीच्या आगळ्या वेगळ्या प्रथा

पूर्वी कोटेश्वरी देवीला चैत्रीच्या उत्सवाला रेडा बळी देण्याची प्रथा होती. ही जबाबदारी गुरव समाजाकडे असे. मुरूडच्या आसपासच्या प्रदेशातून हा रेडा आणला जाई. उत्सवाच्या दिवशी रेड्याचे पाय रांगोळी स्वरूपात जमिनीवर काढून पुजले जात. तसेच उत्सवाच्या एक दिवस आधी हा रेडा संपूर्ण मुरूडमध्ये फिरवला जाई आणि ग्रामस्थ गाव भैरी… धाव भैरी… अशा घोषणा देत. नंतर हा रेडा मुरूडमध्ये दिंडीचा तळा या ठिकाणी सोडला जाई. ग्रामस्थांच्या श्रद्धेनुसार या रेड्याची देवीच्या अदृश्य खुलग्यासोबत झुंज होत असे, किंबहुना आख्यायिकेनुसार त्यांची शिंगे एकमेकांवर आदळण्याचा आवाज येत असे. नंतर हा रेडा मंदिराजवळ आणून त्याचा बळी देऊन प्रसाद तीन समाजात वाटला जाई. १९३५ सालच्या आसपास जंजिरा संस्थानाचे दिवाण कोटक, तसेच ग्रामस्थ श्री.रामचंद्र कार्लेकर, श्री.रामजी दिवेकर यांच्या पुढाकाराने ही प्रथा बंद झाली. पुढे रेडा बळी बंद झाल्यावर चैत्रीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी कोटेश्वरी देवीला पद्मदुर्ग किल्ल्यात जाऊन उत्सवासाठी आमंत्रित करून देवीचा मुखवटा असलेली पालखी संपूर्ण मुरूडभर फिरविण्याची प्रथा रूढ झाली. तसेच मुरूडमधील विविध ठिकाणांहून महादेवाच्या काठ्या मोठ्या दिमाखात सजवून नाचत-गाजत आणून मंदिरासमोरील पटांगणात हातावर नाचविल्या जात आणि आजही ही प्रथा अखंड सुरू आहे.

आणखी वाचा: Sharadiya Navaratra 2023: भारतीय संस्कृतीत रजस्वला देवीची उपासना सर्वश्रेष्ठ का मानली जाते? आणि कुठे?

कोटेश्वरी देवीची हातकोडा प्रथा

या प्रथेप्रमाणेच पूर्वी हातकोडा ही देखील एक प्रथा रूढ होती. जी व्यक्ती देवीला नवस करीत असे, त्या व्यक्तीच्या हातात हातकोडे घालून हातात नारळ पकडण्यासाठी दिला जात असे आणि त्या नंतर देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यास सांगितले जाई. प्रदक्षिणा घालीत असताना हातातील नारळ जिथे पडेल तिथे तो फोडला जाई आणि देवीला अर्पण केला जाई.

कोटेश्वरी देवीच्या मंदिराला नवाबाकडून देणगी

या मंदिरातील पुजारी गुरव समाजाचे असून मंदिराची देखभाल कोटेश्वरी देवस्थान ट्रस्ट करीत आहे. या मंदिराला भाविक विविध स्वरूपात देणगी देतात. पुर्वी मुरूड संस्थानाचे नवाबसुद्धा इतर मुरूडमधील ठिकाणांप्रमाणे या मंदिराला देखील दरमहा २ रुपये देणगी देत होते. पुढे संस्थानाच्या विलणीकरणानंतर देखील ही देणगी देण्याची प्रथा कायम असून, दर महिन्याला मंदिराच्या ट्रस्टकडे तहसील कार्यालयातून सुपूर्त केली जाते.

अशी ही भक्तांच्या नवसाला पावणारी आणि रोगराई पासून बचाव करून मनोकामना पूर्ण करणारी मुरूडची ग्रामदेवता आजही मुरूडच्या वेशीवर मुरूडचे रक्षण करत आहे.

(लेखिका: प्रितम वाळंज, प्राध्यापिका, नज ॲकेडमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स, मुरुड)

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the glory and history of koteswari devi hindu temple of murud janjira of konkan maharashtra with nawab svs
Show comments