Mountain who kill Hindus भारताच्या वायव्य सरहद्दीवर असलेल्या पाकिस्तानमुळे या भागात नेहमीच तणावग्रस्त स्थिती असते. इतिहासातही काहीशी अशीच परिस्थिती होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. भारतीय इतिहासातील काही प्रमुख आक्रमक याच भागातून भारतात आले. अलेक्झांडर द ग्रेट, कुशाण यांचाही त्यात समावेश होता. परंतु कुशाणांसारखे परकीय भारतीय भूमीत आले आणि इथलेच होऊन गेले, हेही तितकेच खरे आहे. एकूणच भारतीय संस्कृतीत अनेक बाह्यप्रवाह आले आणि नंतर इथल्याच मातीत मिसळले. असे असले तरी प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. याच सीमेतून मध्ययुगीन कालखंडात रानटी आक्रमकांनी प्रवेश केला आणि इथला इतिहास रक्तरंजित केला. याच इतिहासाची साक्ष देणारा एक पर्वतरूपी शिलेदार आजही उभा आहे, किंबहुना अनेकांनी या शिलेदारालाच ‘हिंदूंचा खुनी’ अशी उपमा दिली. नेमका हा शिलेदार कोण आणि याला हिंदूंचा खुनी का म्हटले जाते हे जाणून घेणे माहितीपूर्ण ठरणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: विश्लेषण: ‘इंडिया’ म्हणजे भारत पण हिंदुस्थान नाही…

या पर्वताचे नाव काय?

या पर्वताचे नाव हिंदुकुश असे आहे. हिंदुकुश हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पसरलेल्या एका प्रमुख पर्वतरांगेचे नाव आहे. वैदिक- पौराणिक साहित्यात या पर्वताचा उल्लेख उपरिश्येन, निषाद, माल्यवत असा करण्यात आलेला आहे. या पर्वताला ‘माऊंटन्स ऑफ द मून’ म्हणजेच चंद्राचा पर्वत असेही म्हणतात. असे असले तरी ही पर्वतश्रेणी हिंदुकुश याच नावाने ओळखली जाते. भारताच्या वायव्य प्रदेशात हिमालय पर्वत जिथे संपतो, तिथूनच हिंदुकुशाला प्रारंभ होतो. हिंदूकुशच्या अनेक पर्वतश्रेणी आहेत. या पर्वताला हिमालयाची एक शाखा मानले जाते. सिंधू नदीमुळे ही पर्वतश्रेणी हिमालयापासून विलग झाली. अफगाणिस्तानची दक्षिण सरहद्द हिंदूकुशातच आहे.

ऐतिहासिक महत्त्व

प्राचीन व्यापारामध्ये या पर्वताला अनन्यसाधारण महत्त्व होते. भारतीय उपखंड, चीन आणि अफगाणिस्तान यांना जोडणारा हा प्रमुख व्यापारी मार्ग होता. हिंदुकुशच्या दक्षिण आणि पश्चिम पायथ्यालगतच्या टेकड्यांत प्राचीन बौद्ध संस्कृतीचे पुरातत्त्वीय अवशेष आढळतात. येथील खडकांत कोरलेल्या बौद्ध मूर्ती तालिबानी दहशतवाद्यांनी उध्वस्त केल्या. प्राचीन कालखंडापासून लष्करीदृष्ट्या हिंदुकुश पर्वतरांगेतील खिंडी महत्त्वाच्या होत्या. इसवी सनाच्या सातव्या शतकात चिनी प्रवासी ह्यूएनत्संग भारतातील बौद्ध स्थळांना भेट देण्याकरिता हिंदुकुश ओलांडून भारतात आला होता. त्याच्या प्रवास वर्णनात त्याने या पर्वताचा उल्लेख हिमपर्वत-बर्फाने आच्छादलेला असा केला आहे.

हिंदुकुश नावामागील अर्थ

हिंदुकुश या पर्वताच्या नावामागे एक गूढार्थ सांगितला जातो. कुश म्हणजे मृत्यू. हिंदुकुश या नामाचा शब्दश: अर्थ ‘हिंदू नाशक’ (किलर ऑफ हिंदू) असा केला गेला आहे. या पर्वतश्रेणीतील अतिशय धोकादायक खिंडींमुळे कुश हा शब्द वापरला गेला असावा, असे सांगितले जाते. प्रचलित आख्यायिकेनुसार मध्ययुगीन कालखंडात भारतीय उपखंडातील गुलामांना घेऊन जात असताना या पर्वतश्रेणीतील प्रतिकूल वातावरणामुळे अनेकजण मृत्युमुखी पडले. त्यावरूनच या पर्वताला हे नाव देण्यात आले असावे, असे मानले जाते. किंबहुना इसवी सन १३३३ मध्ये हिंदुकुश मार्गे भारताला भेट देऊ केलेल्या इब्न बतूताने या पर्वताच्या नावाचा उल्लेख आपल्या प्रवास वर्णनात हिंदूंना मारणारा असे वर्णन केलेले आहे (The Adventures of Ibn Battuta, Dunn, Ross E. 2005). यानंतर अनेक पर्शियन-फारसी भाषा तज्ज्ञांनी इब्न बतूताचाच संदर्भ देत, हिंदुकुश या शब्दाची फोड केली आहे. John Andrew Boyle याने A Practical Dictionary of the Persian Language by John Andrew Boyle शब्दकोशात कुश या शब्दाचा अर्थ ‘मारणे’ असा दिला आहे. तर भाषातज्ज्ञ फ्रान्सिस जोसेफ स्टीनगास यांच्या मते, कुश प्रत्यय म्हणजे ‘एक मारेकरी’ होय. त्यामुळे हिंदुकुश या पर्वताच्या नावाचा अर्थ हिंदूंना मारणारा असाच घेण्यात आला.

कुश म्हणजे पाण्याचा पर्वत

अनेक भाषातज्ज्ञांनी कुश या शब्दाचा संबंध प्राचीन अवेस्ताशी जोडला आहे. प्राचीन फारसी भाषेत कुश म्हणजे पाण्याचा डोंगर असा अर्थ होतो. निगेल ॲलन (Defining Place and People in Afghanistan, २०१३) यांच्या मते कुश हा शब्द पर्शियन कुह या शब्दावरून आलेला आहे. ज्याचा अर्थ पर्वत असा होतो. भारतीय सीमेवर असलेल्या पर्वतासाठी हिंदुकुश हा शब्द वापरण्यात आल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. एकूणच हिंदुकुश हा शब्द फारसी भाषेतून आला आहे, असे मानले जाते. पर्शियन भाषेतील हिंदू म्हणजे सिंधू नदीच्या प्रदेशात वास्तव्यास असणारे आणि कुश म्हणजे पर्वत. म्हणून, हिंदुकुश या नावाचा अर्थ हिंदूंचा पर्वत असा होतो.

अधिक वाचा: आधी वटवाघळं, आता गाढवं; चीनची भूक आफ्रिका खंडासाठी का ठरत आहे डोकेदुखी?

इसवी सनपूर्व पाचव्या शतकात पर्शियन साम्राज्यातील डरायस या राजाने सिंधू नदीच्या खोऱ्यात आपले राज्य स्थापन केले होते. त्याच्या इराण मधील शिलालेखात तो या भागाचा उल्लेख ‘हिंदुश’असा करतो. हिंदुश हा भाग सिंधू नदीच्या खोऱ्यात असल्याचेही तो नमूद करतो. जुन्या पर्शियन भाषेत ‘स’ चा उच्चार ‘ह’ करत असल्याने, सिंधू नदीचा उल्लेख हिंदू असा करण्यात आला होता. आणि नदीच्या सभोवतालच्या प्रदेशाचा उल्लेख हिंडस असा करण्यात आला. त्यामुळेच सिंधूचे हिंदू झाले; त्यापुढे ‘स्थान’ हे प्रत्यय लागून ‘हिंदुस्थान’ नाव तयार झाले. हिंदुस्थान ही संज्ञा अरबांनी प्रथम वापरली असा एक समज आहे. मात्र, इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील ससानियन साम्राज्याच्या शापूर पहिला याने ती वापरली. अरबांच्या दस्तऐवजांमध्ये भारतासाठी अल-ए-हिंद ही संज्ञा वापरण्यात आली आहे (‘इंडिया’ म्हणजे भारत पण हिंदुस्थान नाही, २०२३ लोकसत्ता). त्यामुळे हिंदुकुश या नावाचा अर्थ हिंदूंना मारणारा अशी शंका निर्माण करणारा आहे. या अर्थामागे ऐतिहासिक भाषाशास्त्राचा कुठलाही आधार मात्र नाही!

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the history behind the name hindu kush did hindus die on this mountain svs
Show comments