– अक्षय नाईकधुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका प्रतिष्ठित कॉलेजमधील सात विद्यार्थी आणि त्यांचे एक शिक्षक अशा जणांचा एक व्हाट्सऍप ग्रुप. या ग्रुपमधील एक विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी रविवारी ट्रेकिंगला जातो. तो जिथे ट्रेकिंगला जातो त्या भागात नेटवर्क वगैरे काहीही नसते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये होणाऱ्या लेक्चरबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्याच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर तो एक मेसेज टाकून ठेवतो. पण नेटवर्क नसल्याने तो सेंड होत नाही. जेव्हा केव्हा फोनला नेटवर्क येईल तेव्हा तो मेसेज आपोआप सेंड होईल अशा विचाराने तो मेसेज त्या ग्रुपवर पाठवून ठेवतो. त्याचदिवशी संध्याकाळी त्या व्हॉट्स अॅप ग्रुपमधले शिक्षक उद्याची असाईनमेंट झाली का असा मेसेज ग्रुपवर टाकतात. आणि नेमका त्याचवेळी ट्रेकला गेलेल्या विद्यार्थ्याने केलेला तो मेसेज ग्रुपवर सेंड होतो. ग्रुपमधील उरलेले सहाजण त्या ट्रेकला गेलेल्या विद्यार्थ्याच्या मेसेजला रिप्लाय देतात. पण शिक्षकाने पाठवलेल्या मेसेजकडे कोणाचे लक्ष जात नाही. आपल्या बोलण्याला, मेसेजला काही किंमत नाही, कोणी कधीच रिप्लाय देत नाही असे समजून ते शिक्षक रागारागात ग्रुपमधून लेफ्ट होतात. दुसऱ्या दिवशी ट्रेकवरून परतलेल्या मुलाला उरलेले सहाजण कॉलेजमध्ये भेटतात आणि चांगलाच क्लास घेतात. तुला अक्कल आहे का? कधीही मेसेज काय टाकतोस? सरांनी मेसेज टाकला असताना तुला मेसेज टाकायची गरज काय? असे प्रश्न विचारून सर्व खापर त्याच्यावर फोडतात. सर्वजण रागावलेल्या शिक्षकाची समजूत काढायला जातात. पण तोपर्यंत शिक्षकाने त्या विद्यार्थ्याबद्दल आपले मत तयार केलेले असते. सर्वात हास्यास्पद बाब म्हणजे हे विद्यार्थी आणि शिक्षक मास मीडिया आणि कम्युनिकेशन कोर्सचे भाग असतात. आता ह्या सर्व प्रकारात चूक नेमकी कोणाची?

दुसरे एक उदाहरण म्हणजे एकत्र सुशिक्षित कुटुंबाचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप असतो. दरदिवशी नित्यनियमाने शुभ सकाळ, शुभ रात्री, चांगले विचार असे मेसेज त्यांच्या ग्रुपमध्ये पाठवले जात असतात. ‘हम साथ साथ है’ हा सिनेमा कोणाला आठवत असेल तर जवळपास तशीच परिस्थिती ग्रुपवर असते. एके दिवशी त्या कुटूंबातील एक तरुण सदस्य त्याचे एका विषयासंबंधी मत ग्रुपवर प्रकट करतो. त्या मतावर त्याचे चुलत काका आक्षेप व्यक्त करतात आणि त्या संबंधित विषयावरून ग्रुपमध्ये खडाजंगी सुरू होते. ज्याला विषयाचे ज्ञान नाही तोसुद्धा त्या भांडणात तेल ओततो. शेवटी भांडणाचा परिणाम असा होतो की ते सर्वजण ग्रुप तर सोडतातच आणि एकत्र कुटुंबाचा विचार सुद्धा. एका क्षुल्लक गोष्टीवरून संपूर्ण कुटूंब उद्ध्वस्त होते. सांगायला एकदम अजब वाटेल परंतु आजही त्या कुटुंबातील सदस्य एकमेकांचा चेहरा बघत नाहीत.

तुम्ही विचार करत असाल या गोष्टी अशाच हवेत तयार केलेल्या असतील.पण वास्तवत: अशा गोष्टी समाजात घडल्या आहेत आणि घडत आहेत. व्हाट्सऍपचा वापर संभाषण साधण्यासाठी आहे हे मान्य परंतु त्यामुळे वाढणाऱ्या गैरसमजुतींचे काय? एका व्यक्तीने दुसऱ्याला मेसेज केला आणि त्याने लगेच रिप्लाय दिला नाही तर त्या व्यक्तीचा जीव वरखाली होतो. काहींना रागसुद्धा येतो. “माझा मेसेज बघूनसुद्धा रिप्लाय देत नाही म्हणजे काय?”, “कोण समजतो कोण स्वतःला?”, मी काय इथे फुकट म्हणून मेसेज करतोय का?” अशा रागीट भावना मनात तात्काळ जागृत होतात. पण ज्याला मेसेज पाठवलाय तो कुठे असेल, काय करत असेल, तो उपलब्ध असेल का, त्याच्याकडे टाईप करण्याइतपत वेळ आणि संधी असेल का याचा तीळमात्र विचार मेसेज पाठवणारी व्यक्ती करत नाही. एका-एका शब्दावरून व्हॉट्स अॅपलर भांडणे होतात. समोरच्याचा विचार न करता त्याला लगेच दोष देणे हा या व्हॉट्स अॅपमुळे वाढलेल्या गैरसजुतींचे कारण आहे.

इंटरनेटचा शोध ही खरच क्रांती का मानतो आपण? कारण या क्रांतीने सर्वांना जवळ केले. ते इतके जवळ केले की आपल्याला मैलभर लांब असणाऱ्या माणसाचीसुद्धा किंमत उरली नाही. टुजी,थ्रीजी,फोरजी आणि आता येऊ घातलेले फाइवजी फक्त आणि फक्त मोबाईलचा वेग वाढवत आहेत. आपला नाही. आता एक माणूस त्या फोनमधून प्रत्यक्ष बाहेर कसा येईल हे शोधणे फक्त बाकी राहिले आहे. गरज ही शोधाची जननी नक्कीच आहे. पण हा सुविचार आजच्या काळात उलटा करायला हवा. नवनवीन संशोधन करून ते जगापुढे मांडण्याला काही विरोध नाही आणि दुमतही नाही. परंतु या सर्वांमुळे माणसांची किंमत कमी होत असेल तर त्या शोधाचा उपयोग काय? आजचा दोष हा व्हॉट्स अॅपपुरता सीमित नाही परंतु त्याचा वापर इतका आहे की त्याच्याकडे बोट दाखवण्याखेरीज पर्याय नाही. मराठीमध्ये सोशल मीडियाचा अर्थ समाजमाध्यम असला तरी तो ‘समाज-तुटण्याचे -माध्यम’ होऊ नये हीच माफक अपेक्षा!