स्वप्निल घंगाळे
तो कधी कुठे कोणाला कसा भेटेल सांगता येत नाही असं अनेकांच्या तोंडून ऐकलंय पण खरंच तो भेटला मला त्या दिवशी. ते पण माझ्या सगळ्यात आवडत्या जागांपैकी एक असणाऱ्या चहाच्या टपरीवर. पाऊस, तिची वाट पाहत उभा असलेला मी, कटिंग चहा आणि गप्पा मारायला मंडपातून कंटाळून बाहेर आलेला बाप्पा. वा अजून काय हवं नाही का? लोकांना बप्पाबरोबरची साधी स्वप्नही नाही पडत आणि मला चक्क त्याची कंपनी मिळाली आणि ती पण कटिंग प्यायला. भरून पावलो. नास्तिक माणासालाही देव पावतो यावर विश्वास बसला. त्याच भेटीचा हा लेखाजोखा…
ठिकाण – स्टेशनजवळील चहाची टपरी
वेळ – संध्याकाळी साडे सहा – पावणे सात दरम्यान
‘एक कटींग द्या…’
पुढच्या क्षणाला कटिंगचा काचेचा ग्लास हातात टेकवला चहावाल्याने. घरातल्या बॉक्सर्स आणि टी-शर्टवर मी स्टेशनजवळच्या चहाच्या टपरीवर तिची वाट पाहत उभा होतो. पावसाची रिपरिप सुरुच होती. गणपतीचा दुसरा दिवस होता. समोरच्याच रस्त्यावर अर्ध्या भागावर गणपतीचा मंडप होता आणि स्थानिक परिसराच्या नावापुढे राजा लावून ती पाटी मंडपाच्या एन्ट्रसवर झळकत होती. तर, त्याच्या मागून दिड दिवसाचे बाप्पा घरी निघाले होते. तसा त्यांचाही मुक्काम ऑलमोस्ट दोन दिवस झाला होता म्हणा तरी ते घाईत नव्हते निवांत होते. समोरून मागाशीच एका हातगाडीवर चार-पाच छोटे बाप्पा ‘गणपती गेले गावाचा चैन पडेना आम्हाला’च्या जयघोषात त्यांच्या घरच्या वाटेने निघून गेले होते. पावसाचा जोर तेव्हा जास्त होता पण भक्तीचाही जोर काही कमी नव्हता. ‘देवा श्रीगणेशा’पासून सुरु झालेल्या बॅन्जोची गाडी मग हळूहळू ‘जपून दांडा’, ‘आला बाबुराव’ पासून ते ‘तूने मारी एन्ट्री’ आणि ‘दिले मे बजी गिटार’पर्यंत सरकली. गणपती पण हसत असेल नाही या गोंधळावर. डांबरी रस्त्यावर पडलेला पाऊस त्यात चपाचप पाय देऊन विक्षिप्त हावभाव करुन नाचणारी पोरं बाप्पाला सोडायला आलेली की पार्टीत नाचायला असा प्रश्न पडला. त्यात तो फटाक्यांचा धूर आणि डीजेचा आवाज. तेव्हा नेमका हिचा फोन आला.
‘काही ऐकू येत नाहीय नेहमीच्या जागेवर भेट… मी व्हॉट्सअप करतो थांब काहीच कळत नाहीय तू काय बोलतेय…’
मग व्हॉट्सअपवर ‘नेहमीच्या जागी आहे लवकर ये’ असा मी समोरुन मेसेज केला. समोरून रिप्लाय आला ‘आत्ता भांडूपला पोहचतेय आलेच पंधरा वीस मिनिटांमध्ये.’ मी न आवडणारं ‘हम्मम्ममम…’ टाकलं आणि चहा घेऊ म्हटलं तेव्हा ‘एक कटींग द्या…’ची ऑर्डर दिली.
मी चहाचा पहिला घोट घेण्यासाठी ग्लास तोंडाला लावणार तोच मागून आवाज आला, ‘एक कटिंग द्या’
आवाज जरा भारदस्त असल्याने मी मागे वळून पाहिलं तर चक्क बाप्पा होते ते. मी हातभर उडालोच. काही क्षण असतात ना आपल्याला कळतं नाही खरं चालूय हे की खोटं?, हे स्वप्नय की खरं घडतं असं होतं ना तसं झालं. बाप्पा मात्र मानेवरून डाव्या हातावरुन खाली पावसाने भिजलेल्या जमिनीवर जाऊ पाहणारा शेला सरळं केला आणि सुळ्याच्या इथं हाताने काहीतरी करतं होता. थोडी मान वाकडी केली. ‘आ… ऊ…’ आवाज करत होता. मला कळेना काय झालं. मीच त्याला इन्टरप्ट करायचं ठरवलं.
‘एक्सक्युज मी… आपण गणपती का?’
‘हम्ममम…’ असं केलं त्याने चक्क… मला फुल इग्नोर मारला.
मी पण नास्तिक असल्याने अक्कल आल्यापासून बाप्पाला इग्नोर मारायचो आज फक्त देव बदला घेत होता. पण देव असा काही रोज रोज भेटत नाही तो पण टपरीवर आणि तो पण आपल्या सारख्या नास्तिकाला असा विचार करुन पुन्हा त्याला हटकले
‘नाही तुम्हाला होतंय काय नक्की?’
‘अरे दुपारी नैवद्य म्हणून मोदक खाल्ले मी तर तो खोबऱ्याच्या किसाचा एक तुकडा अडकलाय सुळ्यात’
‘तुकडा अडकलाय दातात’ ऐकण्याची सवय असणाऱ्या माझ्यासारख्या टुकार माणसाला ‘तुकडा अडकलाय सुळ्यात’ जरा विचित्र वाटलं मी स्वत:शीच हसलो असं मला वाटलं पण मी हे विसरलो की समोरचा देव आहे. त्याच्या नजरेतून काही सुटणार नाही. जसा मगासपासून पडणार पाऊस सगळ्यांना भिजवतो तसा देवही सगळ्यांनाच पाहतो.
‘हाआआआआ निघाला. हा बोल का हसलास तू?’, बाप्पाने विचारले.
मी थोडा कॉन्शियस झालो. मला वाटलं आपण आपले हसलोय, ‘नाही ते सुळ्यात अडकलाय थोडं ऑकवर्ड साऊण्ड झालं बाकी काही नाही.’
‘ओहहह… It’s Ok…’
गणपती आणि इंग्लिश. मी उडालो यावेळी मात्र काही फूटभर. पण आईकडून ऐकलेलं तसं विद्येची देवता ही तर. हिला इंग्लिश काय हिब्रू, पाली, मागधी, अर्ध मागधी, युगांडा- क्रोएशिया वगैरे देशातली कोणतीही अलाना फलाना भाषाच काय अगदी काहीही येऊ शकतं ना? तो देवच शेवटी. असं काहीतरी झालं.
तोपर्यंत माझा चहा संपलेला पण बाप्पाचा आलेला चहा. मी आणखीन एक कटिंग सांगितला. रोज रोज थोडी बाप्पाबरोबर कटिंग प्यायला मिळणार असतो. चहा गरम गरम असल्याने बाप्पाच्या चहाला वेळ लागला तरी मला बाप्पाबरोबर लगेचच दहाव्या सेकंदाला चहाचा ग्लास मिळाला.
आता मला उत्सुकता होती हा सोंडेवाला देव चहा तरी कसा पितो? हे बघायची.
गाप्पाने चहाचा कप हातात घेतला. आणि सोंडेच्या खाली ठेवला आणि मस्त एक सुर्रर्रर्रर्रर्र… करुन सुरका मारला. मला वाटलं होतं सोंडेने पिणार हा चहा. पण तसं झालं नाही. हे सगळं मला नवं होतं कारण बाप्पाला आत्तापर्यंत लोकांनी प्रसाद ते पण पंचपक्वान्न वगैरे देताना पाहिलयं चहा पिणारा पण बाप्पा असू शकतो हे ‘आऊट ऑफ द बॉक्स’ आहे म्हणून त्याचा विचारही सामान्यांच्या मनाला शिवणार नाही ना तसंच झालं होतं माझं. विचारच कधी वाढलेल्या संपूर्ण ताटाच्या पुढे गेले नाही तर काय करणार आपण. परंपरागत चालत आलेली वैचारिक गरिबी बाकी काय म्हणणार ना याला?
समोरचा पाऊस वाढला. टपरीच्या पत्र्यावर टीपटीप पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचे धबधब्यात रुपांतर झाले. बाप्पा थोडा आत टपरीच्या शेडखाली सरकला. म्हणजे मला चिटकलाच ऑलमोस्ट. आणि अचानक म्हणाला,
‘ऊपस्ससस लागला का तुला माझा हा बाजूबंद?’
‘नाही नाही इटस् ओके’
समोरच्या मंडपाकडे पाहात मला वाटले लोकं ज्याच्या स्पर्शाला तरसतात तो स्वत: माझ्या बाजूला उभा राहून मला त्याचा स्पर्श झाल्याबद्दल सॉरी वगैरे म्हणतं होता. भाग्य लागतं नाही म्हणता येणार याला काहीतरी नक्कीच जास्त लागतं देवाकडून धक्का लावून घ्यायला आणि त्याबद्दल देवालाच ऑकवर्ड वाटून द्यायला. आता पुढे संवाद कसा साधावा मला प्रश्न पडला. म्हणजे मी अगदी देवभोळा नसल्याने हायपर झालो नाही पण नास्तिक असलो तरी समोरचा देव होता. तसं मला देव आणि देव माणूस दोन्ही सारखेच. तरी जो काही ऑरा असतो ना त्याने आपण प्रभावित होतो. इथे देव पार हाताच्या अतंरावर पण लांब वाटेल इतक्या जवळ उभा होता का तर पाऊस वाढला म्हणून. इंद्र आणि बाप्पाचं वर कसं नातंय मला ठाऊक नाही पण मनातल्या मनात इंद्राला थँक्य यू म्हणून घेतलं. आणि मी पुढे काही बोलणार तोच तो माणूस वाजा देव म्हणाला.
‘काय मग इथे कसा?’
आता याला याचं उत्तर ठाऊक असणार तरी मुद्दाम प्रश्न विचारतोय का असं मनात आलं माझ्या पण मी उत्तर दिलं, ‘काही नाही तिला पिकअप करायला आलोय.’
‘आज ट्रॅफिक जॅम नाही… दर वर्षीप्रमाणे’
‘नाही आहे थोडं ते दीड दिवसाचे गणपती.’ मध्येच मी थांबलो. जो जातोय त्यालाच काय सांगतोय मी की तो जातोय अशी बावळट शंका मनात आली आणि मी सावरून घेत म्हटले, ‘म्हणजे तू ज्यांच्याकडे दीड दिवसासाठी आलेला तिथून निघतोयस ना आज.’
‘हो म्हणूनच विचारलं मी ट्रॅफिकचं. दरवर्षीचं आहे येताना खड्डे आणि जाताना ट्रॅफीक.’
‘पण तू असा इन्स्टॉलमेन्टमध्ये का येतो रे? काहींकडे दीड, काहींकडे पाच, काहींकडे तुला आई घ्यायला येते तर काहींकडे पूर्ण मुक्काम करतो दहा दिवसाचा. असं का? म्हणजे तू ते ठरवतो कशावर?’
गालात हसत, ‘अरे मी कोण ठरवणार. तुम्हीच मला बनवला तुम्हीच उत्सव सुरु केला. तुम्हीच आणता तुम्हीच मला विसर्जित करता. आणि तू मला विचरतो. वा रे वा…’
‘म्हणजे?’
‘म्हणजे मी आहे की नाही हे अद्याप विज्ञानाला सिद्ध करता आले नाही आणि आज तुझ्यासारखे अनेक नास्तिक माझं अस्तित्व मानत नाही थोडं क्लियर सांगायचं तर दिसतं आणि जे सिद्ध होतं त्याचं अस्तित्व मानतात. तो विज्ञानाचा नियमच आहे म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल टाइप’
आनंदाच्या देवतेच्या तोंडून ‘श्राद्ध’ शब्द जरा विरोधाभासाचा वाटला. पण आता मात्र मी तोंडावर काही येऊ दिलं नाही तरी देव म्हणालाच… ‘चालायचंच अरे, माझ्या तोंडी श्राद्ध शब्द आला त्याचा काय एवढा विचार करतोस?’
याच्यासमोर उभं रहावं की नको असं झालं मला क्षणभर. त्यामुळे आता थेट बाप्पाची मुलाखत घ्यायचं ठरवलं मी.
‘माझ्याबद्दल तुला ठाऊक असेलच सगळं पण तू इथे काय करतोय?’
‘अऱे काही नाही रे. वैतागलो जरा मंडपात. आल्यापासून तो दाणदाण आवाज. त्यात समोरचा भक्त कोणता ओळखून चार मनातल्या गोष्टींची देवाणघेवाण करेपर्यंत माझ्या येण्याचा ठेका घेतलेले त्यांना माझ्या चरणातून हकलतात. असं वाटतं ना हे हातातल्या पाश, अंकुश, परशु कशाने तरी टोचावं त्याला आणि सांगावं बाबा हे तुझ्यासाठी आलेत की माझ्यासाठी जरा थांब ना कोणयं काय मागतंय जरा कळू तरी दे. पण मला ते करता आलं नाही पाया पडायला येणार माझच लेकरु आणि त्याला हकलवणारा तेही माझच लेकरू.’
‘बरं पण मग इथे का असा आलाय आणि तिकडे आलेत त्यांना कोण आशीर्वाद देताय?’
‘अरे सकाळीच चहाचा मस्त सुगंध आला. गवती चहा, आलं, वेलची असं सगळंच एकदम. त्यात तुझ्या हाताच्या लांबी एवढं माझं नाक कित्तीसारा सुगंध भरून राहिला असेल तू विचार कर. आज दिवसभर त्या आगरबत्त्या धुपाच्या सुगंधाऐवजी हाच वास सोंडेत भरून राहिलेला बघं. म्हणून आलो जरा कटिंग प्यायला. आणि आत्ता का तर इथे लोकांना थांबून माझ्या दिसणाऱ्या रुपावर नवा शालू वगैरे चढवला जातोय म्हणून. म्हटलं यावं तोपर्यंत जाऊन नाक्यावरचा चहा पिऊन. आणि त्या मंडपाला ना एक छिद्रय रे. पावसाचा थेंब थेट मांडीवर पडतो. असं इरिटेट होतं ना. पण काय करणार ना? देव असलो तरी भक्तानी बांधून ठेवलाय मंडपात. कोणत्या येड्याने समज पसरवलाय काय ठाऊक इथला मी पावतो आणि तिथला नवस ऐकतो. मी सगळीकडे एकसारखाच आहे. सगळ्यांवर एकसारखीच आशीर्वादाची उधळणं करत असतो. आता कोणाला किती घ्यायचं हे त्याच्या घेण्याच्या ऐपतीवर असते. माझं की नाही पावसासारखं आहे. मी पावसासारखा सगळ्यांवर पडतो तो त्यात मग गरीब- श्रीमंत, डांबरी-मातीचा रस्ता वगैरे फरक पाहात नाही. तसंच माझं आहे. सगळ्यांवर उधळत राहायचं सगळं ज्याला जे ज्याच्या ऐपतीप्रमाणे घेता येईल ते घ्यावं. आशीर्वाद काय वेड्या तुझ्यासारख्या नास्तिकांच्या पाठिशी पण आहेत रे. तुझाही तसा माझ्यावर थोडा विश्वास आहेच म्हणा.’
‘नाही नाही. चुकतोय तू. विश्वास वगैरे काही नाही. आई-बाबा बळजबरी करतात म्हणून मी मंदिरात जातो आणि मित्रांना भेटायला मिळतं म्हणून काही मित्रांच्या घरी जातो तुझ्या दर्शनाच्या नावाखाली त्याला भक्ती हा अंश खूप अल्प किंवा नगण्य असतो.’
‘नाही मी भक्तीचं नाही म्हणतंय मी नास्तिक म्हणून घेणाऱ्या तुझ्याबद्दल बोलतोय. कळलं नाही तुला मी काय म्हणतोय’
‘नाही आता तू मला समजवचं कासा आहे माझा तुझ्यावर विश्वास म्हणजे मला पण ऐकायचंय काय आहे या मागचं लॉजिक’
‘चिडतो काय रे तू?, आणि नीट बोल जरा मी देव आहे, विसरू नकोस कळलं ना?’ देव उगच रागवण्याचं नाटक करतं म्हणाला.
‘बरं बरं.. बोलं काय सांगत होता ते नास्तिकबद्दल’
‘हा जर नास्तिक या शब्दातच आस्तिक शब्द दडलाय. नास्तिक कसं विज्ञानाने पुरवा दिलेली गोष्ट मानतो म्हणजे त्याचा विज्ञानावर विश्वास आहे. मग त्यात दिसणाऱ्या सिद्ध होणाऱ्या सगळ्याच गोष्टी आल्या. बरोबर? आणि मी सगळीकडे आहे. म्हणजे मी विज्ञानात पण आहे. एखाद्या गोष्टीवर तुझा विश्वास नाही हे सांगायला तुला त्या गोष्टीचाच आधार घ्यावा लागतो म्हणजे त्या गोष्टीचं अस्तित्व तू एकाप्रकारे मान्यच करत असतो नाही का? म्हणजे आधी आस्तिकतेचा पाया आहे आणि त्याच पायावर मोठा भाग भक्तीचा आहे तर काही भाग तुमच्यासारख्यांचा म्हणजे खालच्या पायावर उभं राहून त्याचा पुरावा मागणारे आहेत’
‘म्हणजे आम्ही वेडे?’
‘असं म्हणालो का मी?, मी एवढंच म्हणतोय नास्तिक शब्दात स्वत:ची ओळख करून देता तेव्हाच तुम्ही माझं अस्तित्व मान्य करता’
‘चल नाही वाद घालत तुझ्याशी. म्हणजे घालू नाही शकत. कारण तू.’
इतका मस्त संवाद रंगलेला असताना तो चहावाला मध्ये पचकला
‘अठरा रुपये हुआ साहाब’ चहावाला बोलला.
‘थांब मी देतो तुझ्या पण कटिंगचे पैसे’ मी बाप्पाला म्हणालो.
खांद्यावर हात ठेवतं तो म्हणाला, ‘तुलाच द्यावे लागतील माझ्याकडे आशीर्वाद सोडून काही नाहीय द्यायला. कारण माझ्यासमोरची दक्षिणा पण मंडळ किंवा भटजींच्या खिशात जाते. देतात लोकं मला वापरतात हे. चालायचंच. दे दे बील दे माझं तेवढंच देवाला चहा पाजल्याचं पुण्य मिळेल तुला.’
माझी छाती सहा रुपायच्या कटिंगचं बिल भरून भरून येईल असं कधी वाटलं नव्हतं. तरी तसं झालंच कारण मी देवाच्या कटिंगचे पैसे भरले होते.
‘बरं जाशील कसा की सोडू मंडपापर्यंत तुला?’
‘अरे ऐ देव आहे मी. इथून गायब तर तिथे प्रकट टाइप सिस्टीम वापरतो आम्ही. सिनेमे नाही बघत का त्यातलं सगळंच खोटं नसतं रे.’
बरं जाता जाता एक सांग ‘तुला एवढ्या थाटामाट घेऊन येतात तर असं दीड, पाच, सात, दहा दिवसात परत का पाठवतात? प्रेम संपतं का त्यांच दहा दिवसात? की आपल्याला आयुष्यभर पोसणाऱ्याचा भार दहा दिवसांनंतर जड होतो.’
‘तू वाचतोस का रे?’
‘हो व्हॉट्सअप मेसेजेस, लोकांचे चेहरे, पेपर वगैरे’
‘तू टीपी करणार असशील तर हे मी चाललो नीट विचारतोय तर सांग ना पुस्तकं वाचतोस का’
‘नाही.’
‘म्हणजे थोर पुरुषांच्या म्हणण्याशी तुझं काहीच देणं घेणं नाही बरोबर ना’
‘तसं समज हवं तर. ते मरु दे तू उत्तर दे तुला विसर्जित का करतात?’
‘अरे तेच सांगतोय. सावरकर माझ्या येण्याजाण्याबद्दल छान बोललेत. ते म्हणतात, खरं तर तो म्हणजेच मी कुठेच जात नाही. इथेच असतो. प्रतिष्ठापना विसर्जन हे आपल्या म्हणजे तुम्हा माणसांच्या मनाचे खेळ आहेत. अनादी, अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्यांना आपण म्हणजे तुम्ही मनुष्य काय बसवणार आणि विसर्जित करणार? गणेश, महादेव ही तत्वं आहेत सृष्टीतली. विसर्जन माणसाचं असतं तुमच्यासारख्या तत्व चिरंतन असतात.’
एक एक शब्द लक्षात ठेवण्याचा तो प्रयत्न करत असतानाच देव गालात हसला आणि म्हणला
‘ती बघ ती आली निघतो मी. तथाsssस्तू…’ आणि देव खरचं गायब झाला.
मागे राहिला तो फक्त पाऊस आणि समोरून येत होती ती छत्रीमध्ये स्वत:ची बॅग समोर लावून.
मी मंडपाकडे पाहिले आणि हात जोडले गेले आणि मी थोडा खाली वाकलो. हे झाले की त्याने करवून घेतले देवास म्हणजे त्यालाच ठाऊक.
ती आली आणि मला धक्का देत म्हणाली, ‘काय रे बरायंस ना? पाऊस डोक्यात गेलाय का कोणाला नमस्कार करतोयस…????’
स्वप्निल घंगाळे
swapnilghangale@loksatta.com