शनिवारी संध्याकाळी झी मराठी वाहिनीवर उत्सव नात्यांचा हा घरगुती पुरस्कार सोहळा झाला. घरगुती म्हटलं यासाठी कारण झी मराठी वाहिनीवरील मालिकांमधील कलाकारांमध्येच पुरस्कार दिले जातात. आपलेच नातेवाईक, आपलेच पुरस्कार. उदाहरणार्थ ५ मालिका आहेत. आईची भूमिका करणाऱ्या पाच कलाकार निवडतात. त्यातून एका आईला पुरस्कार दिला जातो. मुख्य पात्रांच्या बरोबरीने लहान भूमिका करणाऱ्या मंडळींनाही गौरवण्यात येतं हा चांगला मुददा पण शनिवारी या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट विनोदी पात्र म्हणून एका मुख्याध्यापकांची निवड करण्यात आली.
भुवनेश्वरी बाई, अधिपती आणि अक्षरा मुख्य पात्रं असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या लोकप्रिय आहे. गडगंज पैसा पण शिक्षण शून्य अशा भुवनेश्वरी बाईंचं साम्राज्य आहे. त्यांचे चिरंजीव अधिपती मनाने चांगले आहेत पण त्यांचीही शिक्षणाची पाटी कोरी आहे. भुवनेश्वरी बाईंची एक शाळाही आहे. स्वत: शिकलेल्या नसताना शाळा चालवणं हा मोठा नेक विचार. या शाळेत अक्षराताई शिक्षिका म्हणून काम करतात. याच शाळेचे मुख्याध्यापक फुलपगारे सर आहेत. धनाढ्य लब्धप्रतिष्ठित अशा भुवनेश्वरी बाईंच्या साम्राज्यातील मुख्याध्यापक पिचलेला, दबलेला असणं साहजिक. तसंच हे पात्र आहे. विजय गोखले हे ज्येष्ठ कलाकार हे काम उत्तम करतात.
सर्वसाधारण पद्धतीनुसार मुख्याध्यापक हे अतिशय प्रतिष्ठेचं पद मानलं जातं. त्यांच्या हातात शाळेची सूत्रं असतात. विविध वर्ग, त्यांचे शिक्षक, मुलं, नॉन टिचिंग स्टाफ, परीक्षा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा हे सगळं मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात चालतं. शाळेचा स्तर उंचावण्याचं महत्त्वाचं काम मुख्याध्यापक करतात. सर्वसाधारणपणे शहरात असो, गावी असो किंवा निमशहरात असो- मुख्याध्यापक हा शाळेचा चेहरा असतो. मुलांना जसं शिक्षकांचा धाक असतो. त्याहीपेक्षा जास्त धाक मुख्याध्यापकांचा असतो. त्यांचा एक राऊंड मुलांना चळचळा कापायला लावतो. मुख्याध्यापक हा स्वत: शिक्षकच असतो. कारकीर्द पुढे सरकते तसं शिक्षणाच्या बरोबरीने व्यवस्थापनाच्या भूमिकेत तो जातो. मुख्याध्यापक शाळेचं ध्येयधोरण ठरवतो. कुठल्या तुकडीला कुठल्या शिक्षकाची आवश्यकता आहे. कुठल्या वर्गाला शिस्तीचे धडे देण्याची गरज आहे, कोणते विद्यार्थी जिल्हा पातळीवर-राष्ट्रीय पातळीवर शाळेचं प्रतिनिधित्व करणार हे मुख्याध्यापक ठरवतो. शाळेत गेलेल्या प्रत्येकाला आपले मुख्याध्यापक ठसठशीत लक्षात राहतात. काहींना मुख्याध्यापकांनी दिलेला मारही लक्षात असेल. पण तो मार आकसातून नसून चांगले संस्कार व्हावेत, शिस्त लागावी यासाठी दिलेला असतो. पण शिकवीन चांगलाच धडा आणि वाहिनीने मुख्याध्यापकांनाच विनोदी करुन टाकलं आहे. ज्या मुख्याध्यापकांना विनोदी पुरस्कार मिळतो त्यांच्या शाळेतील मुलं त्यांचा आदर ठेवतील का? एवढा साधा विचार वाहिनीने केलेला नाही.
मालिकेतील कथानकाच्या वळणानुसार अक्षराताईंना अधिपती दादांशी लग्न करावं लागलं आहे. अक्षराताई एकदम मध्यमवर्गीय घरातल्या. शिक्षणाची आस असणाऱ्या. पण परिस्थितीपुढे कोणाचं काही चालत नाही. माझ्यापेक्षा जास्त शिक्षण असणाऱ्या मुलाशी लग्न करेन असा त्यांचा निर्धार असतो. पण नियतीने म्हणजे कथानक लिहिणाऱ्याने त्यांचं लग्न अधिपतीदादांशी लावून दिलंय. अक्षराताई आणि अधिपतींचं लग्न जुळण्यात फुलपगारे सरांचीही भूमिका महत्त्वाची आहे. अक्षराताईंसाठी फुलपगारे सर केवळ वरिष्ठ अधिकारी नसून वडीलधारं व्यक्तिमत्व आहे. सदरहू सोहळ्याचं अँकरिंग करायला खुद्द अधिपतीदादा आणि अक्षराताईच होत्या. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा हा पुरस्कार मिळत असताना अक्षराताई व्यासपीठावरच निवेदिकेच्या भूमिकेत होत्या. मालिकेत त्यांना मुलं, शिक्षण यांच्याविषयी प्रचंड कणव आहे. पण पुरस्कार सोहळ्यात आपले सर विनोदी ठरलेत याचं त्यांना फारसं काही वाटलेलं नाही.
मालिकेत समाजाचं प्रतिबिंब दिसतं असं म्हणतात. ते खरंही आहे. पण आमचे मुख्याध्यापक विनोदी आहेत असं म्हणणारी मुलं आम्ही तरी पाहिली नाहीत. मालिकेत दाखवल्याप्रमाणे भुवनेश्वरी बाईंना शाळेवर बुलडोझर चालवून तिथे मॉल उघडायचा आहे. त्या महत्वाकांक्षी आहेत, त्यांना शिक्षणापेक्षा व्यवहार महत्त्वाचं आहे. अजूनतरी मालिकेतली शाळा आहे, फुलपगारे सरही आहेत. फुलपगारे सर हसून खेळून असतात. मुलांचं भलं चिंततात. शाळेचं भलं बघतात. पण ते विनोदी असल्याचं आमच्या तरी लक्षात आलं नाही बुवा. फुलपगारे सरांना हा पुरस्कार मिळाल्याच्या पोस्टखाली प्रेक्षकांनीही यांचं पात्र विनोदी आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.
मुख्याध्यापक म्हटलं की करडी नजर, ठाशीव भाषा आणि शाळा नियंत्रणात ठेवणारे गुरुजी असं आम्हाला वाटायचं. पण झी वाहिनीने मुख्याध्यापकांना विनोदी करून एक नवाच पायंडा पाडलेला आहे. वाहिनीवरच्या गाण्याच्या रिअॅलिटी शो मध्ये निवेदिकेपासून परीक्षकांपर्यंत सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं विपणन करावं लागतं. ते एकवेळ समजू शकतो पण आदरणीय मुख्याध्यापक विनोदी होणं ही आपल्या शिक्षणव्यवस्थेची मोठीच चेष्टा म्हणायला हवी. मुख्याध्यापक मग ते रिअल असोत की रीलमधले- आदरणीयच हवेत ना… प्रेक्षक मायबाप असतो. मायबापा, तूच ठरव विनोदी ठरवताना कोणाचं हसं होतंय….