युद्ध मग ते कोणत्याही स्वरुपातील का असेना ते कधी विध्वंस करणारं असतं, कधी सत्तापालट करणारं असतं तर कधी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारं असतं. अनेक युद्धांमध्ये सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. तर अनेक युद्धांच्या निमित्ताने थक्क करणारे अनेक तंत्रज्ञानाचे शोध लागले आहेत. युद्धामधील जय-पराजय हा युद्धाचे नेतृत्व करणाऱ्यांवर अवलंबून असतो. निर्णय घेण्याची क्षमता, परिस्थितीनुसार बदल करण्याची मानसिकता, संवादकौशल्य, बाणेदारपणा आणि आवश्यकता वाटेल तिथे एक पाऊल मागे घेण्याची असे विविध गुण नेतृत्व करणाऱ्यांमध्ये असावे लागतात.
पूर्वीच्या काळी राजे-महाराजे हेच अनेकदा लष्कराचे नेतृत्व करणारे आणि राजकीय निर्णय घेणारे असायचे. गेल्या काही दशकांत ही परिस्थिती बदलली आहे. सध्या साधारण दोन पातळीवर यु्द्धनेतृत्व केलं जातं. एक राजकीय आणि दुसरं लष्करी.
गेल्या दीड-दोनशे वर्षात जग असंख्य छोट्या,-मोठ्या युद्धांना सामोरं गेलं. आता तर युद्धाची भाषाच बदलली आहे. अशा वेळी काही नेत्यांची नावे प्रामुख्याने सांगता येतील ज्यांनी युद्धावर प्रभाव टाकला, युद्धकाळात प्रभावी नेतृत्व केलं. विशेषतः दुसऱ्या महायुद्धातील विन्स्टन चर्चिल, रुझवेल्ट, जोसेफ स्टॅलिन अशी काही नेत्यांची नावे चटकन समोर येतात. तर युद्धकाळातील लष्करी नेृत्वत्व करणारी गेल्या काही दशकातील ड्वाईट आयसेनहॉवर, डग्लस मॅकआर्थर, इरविन रोमेल, बर्नार्ड माँटगोमेरी, जॉर्ज पॅटन, झुकोव्ह अशी काही प्रामुख्याने नावे घेता येतील. ही सर्व पार्श्वभूमी सांगायचे कारण हेच यामध्ये आणखी एक नाव आवर्जून जोडले पाहिजे ते म्हणजे १९७१ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात निर्णायक नेतृत्व करणारे देशाचे लष्कर प्रमुख जनरल सॅम माणेकशा ( Sam Manekshaw ).
सॅम माणेकशा यांना सॅम बहादुर या नावानेही ओळखले जाते. ज्या परिस्थितीत सॅम माणेकशा यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्व केलं त्यामुळे ते जगात अद्वितीय लष्करी अधिकारी ठरतात. पाकिस्तानशी दोन फ्रंटवर करावे लागलेले युद्ध, युद्ध दिर्घकाळ लांबल्यास चीनची युद्धातील प्रवेशाची भिती, अमेरिकेचा वाढता दबाव अशा परिस्थितीत प्रभावी-तगडे नेतृत्व करणाऱ्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विश्वास सार्थ ठरवत माणकेशा यांनी पाकिस्तानविरुद्धचे युद्ध अवघ्या १४ दिवसांत संपवले आणि सर्व संभाव्य भिती – शक्यतांचा विषयच संपवला.
१९७१ च्या सुरुवातीपासून तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानाच परिस्थिती अधिक चिघळली होती. पूर्व पाकिस्तानमधून निर्वासितांचे लोंढे हे भारतात धडकत होते. हा आकडा काही लाखांच्या घरात होता. एवढ्या लोकांना सांभाळणे अशक्य कोटीतील गोष्ट होती. पण त्यापेक्षा पूर्व पाकिस्तानात लष्कराकडून नागरिकांवर अनन्वित अत्याचारांचा कळस गाठला गेला होता. तेव्हा याचा सोक्षमोक्ष लावणे आवश्यक होत आणि यासाठी लष्करी कारवाईच्या माध्यमातून हस्तक्षेपाशिवाय म्हणजेच युद्धाशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. १९७१ च्या एप्रिल महिन्यात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत लष्करप्रमुख आणि तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांचे अध्यक्ष असलेल्या जनरल माणेकशा यांनी लगेच अपेक्षित असलेल्या लष्करी कारवाईला स्पष्ट नकार दिला. सैन्याला तयारीकरता पुरेसा वेळ आवश्यक असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. त्यात लवकरच येणारा पावसाळा ही सर्वात मोठी अडचण होती. लष्कराने वाहतुकीची रेल्वेसह सर्व साधने ताब्यात घेतली तर धान्य वाहून नेण्यात अडचण येईल असंही सांगितलं. या रोखठोक मतांमुळे पंतप्रधानांनी युद्ध पुढे ढकलले. एवढंच नाही तर पूर्व पाकिस्तानमधील चिघळलेल्या परिस्थितीची जाणीव इंदिरा गांधी यांनी जगाला करून दिल्यावर जेव्हा प्रत्यक्ष डिसेंबरमध्ये युद्धाची वेळ आली तेव्हा निर्णयप्रक्रियेत कोणताही ( संरक्षण दल प्रमुख, वित्त प्रमुख, गृह विभाग प्रमुख यांसह अन्य विभाग… ) हस्तक्षेप नसेल हे माणेकशा यांचे म्हणणे मान्य केले. यामुळे माणेकशा यांना युद्धकाळात थेट निर्णय सुलभतेने घेता आले आणि धडक कारवाई करत १४ दिवसांत पूर्व पाकिस्तानमधील लष्कराला गुडघे टेकायला लावले. बांगलादेश या देशाची निर्मिती झाली. महत्त्वाचे म्हणजे पूर्व पाकिस्तानच्या लष्कराने शरणागती पत्करली, तेव्हा आयोजित कार्यक्रमाला त्यांनी स्वतःला कटाक्षाने दूर ठेवले आणि लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजीत सिंह अरोरा यांना तो मान दिला.
८ जून १९६९ ला लष्करप्रमुख झालेले माणेकशा हे एप्रिल १९७२ ला निवृत्त होणार होते. मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली. आणि त्यानंतर जानेवारी १९७३ ला लष्करातील सर्वोच्च पद ‘फिल्ड मार्शल ‘ हे बहाल करण्यात आले. माणेकशा हे भारताचे पहिले फिल्ड मार्शल ठरले. अशी उंची गाठणाऱ्या माणेकशा यांची लष्करी कारकीर्द ही लक्षवेधीच अशीच होती.
सॅम माणेकशा यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ ला अमृतसर इथे पारशी कुटुंबात झाला. त्यांचे पुर्ण नाव सॅम हॉर्मूसजी फर्मजी जमशेदजी माणेकशा . १९३२ च्या सुमारास British Indian Army ची पुर्नरचना झाली. त्यातील एक भाग म्हणून डेहराडून इथे Indian Military Academy ची स्थापना करण्यात आली ज्यायोगे भारतीयांना लष्करात अधिकारी म्हणून प्रवेश दिला जाणार होता. या अकादमीच्या पहिल्या बॅचचे माणेकशा हे स्नातक होते आणि पुढे लष्करप्रमुख झालेले पहिले अधिकारी ठरले. फेब्रुवारी १९३५ ला सेकंड लेफ्टनंट या पदावर ते लष्करात दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात फेब्रुवारी १९४२ मध्ये तेव्हाच्या बर्मा देशातील Sittang Bridge च्या लढाईत माणकेशा जबर जखमी झाले. जबर म्हणजे किती त्यांना तब्बल ९ गोळ्या लागल्या होत्या. ते वाचण्याची शक्यता नव्हतीच. तेव्हा एक किस्सा माणेकशा यांच्या बाबतीत सांगितला जातो. जखमी अवस्थेत लष्करी रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी सहज पहिला प्रश्न विचारला काय झाले आहे यांना ? तेव्हा शुद्धीत आलेल्या माणेकशा यांनी…” गाढवाने लाथ मारली” असे उत्तर देत विनोदबुद्धी कायम जागृत असल्याचा परिचय करुन दिला.
यामधून बरे झाल्यावर त्यांची नेमणूक ( आता पाकिस्तानात असलेल्या ) क्वेट्टा इथे करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्कराची विभागणी झाली. त्यावेळी माणेकशा हे Military Operations (MO) Directorate मध्ये कार्यरत होते, काही महिने त्यांनी ऑस्ट्रेलियामध्येही काम करावे लागले. Military Operations (MO) Directorate या विभागात कार्यरत असतांना काश्मीर संस्थान भारतात सामिल होणे, हैद्राबाद कारवाई अशा घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग होता, या घडामोडींचे जवळून साक्षिदार होते.
त्यानंतर माणेकशा यांची Director of Military Training at Army Headquarters मध्ये बदली झाली. तिथे सैन्य प्रशिक्षणाचे नवे आयामही तयार केले. १९६२ च्या चीन युद्धात पराभवाने खचलेल्या आसाम-अरुणाचल प्रदेशमधील लष्कराचे मनोधैर्य उंचावण्याचे काम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. पूर्व विभागाचे प्रमुख झाल्यावर नागालँड इथली परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कारकिर्दीत तब्बल पाच युद्धांचा ( दुसरं महायुद्ध, १९४७ पाक युद्ध, १९६२ चीन युद्ध, १९६५ पाक युद्ध आणि अर्थात १९७१ चे पाक युद्ध) अनुभव असलेल्या माणेकशा यांचा स्वभाव आणि कार्यपद्धत ही सर्वात जमेची बाजू होती. जिथे जिथे माणेकशा यांची नेमणूक झाली तिथे ते लष्करात लोकप्रिय झाले. निर्णय प्रक्रियेत आणि अंमलबजावणीत पारदर्शकता, स्पष्ट मते व्यक्त करण्याची जाण पण याचबरोबर शांत स्वभाव, तल्लख विनोदबुद्धी, लष्करातील सर्व स्तरातील जवान-अधिकाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधण्याची हातोटी, बडेजावपणाचा अभाव यामुळे सर्वांना हवेहवेसे वाटणारे माणेकशा यांचे व्यक्तिमत्व होते.
निवृत्तीनंतरही केंद्र सरकारने राज्यपालांपासून प्रदेशातील उच्चायुक्त वगैरे अशी विविध पदे देऊ केली पण माणेकशा यांनी ती नम्रपणे नाकारली. उलट देशातील मानांकित १० पेक्षा अधिक खाजगी संस्थाच्या संचालक मंडळांवर किंवा अध्यधपदांवर कार्यरत राहत त्यांनी त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याच्या अनुभवाचे धडे दिले.
सर्वात महत्त्वाचे निवृत्त झाल्यावर कोणतेही वादग्रस्त, संशय निर्माण करेल असे व्यक्तव्य त्यांनी केले नाही. संपुर्ण लष्करी कारकीर्दीतच काय आणि निवृत्त झाल्यावरही एकही आरोपाचा डाग त्यांच्यावर लागला नाही.
अशी भव्य कारकिर्द असलेल्या माणेकशा यांनी २७ जून २००८ ला जगाचा निरोप घेतला. माणेकशा यांचा परिचय हा विविध पुस्तक रुपाने आणि असंख्य लेखांच्या माध्यमातून जरी झाला असला तरी चित्रफितीच्या माध्यमातून आपण त्यांना मोजकंच पाहू शकतो.
पण दुर्देवाने म्हणावे लागेल की हे नाव अजुनही सर्वसामान्यांमध्ये म्हणावे तेवढे परिचित नाही. आता विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाच्या रुपाने नव्या पिढीला फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांची ओळख होईलच आणि पण त्यापेक्षा लष्कराचे नेृत्वत्व केलेल्या लोकप्रिय अशा सॅम बहादुर यांना जवळून बघण्याची संधी सर्वांना मिळणार आहे हे जमेची बाजू आहे.