कर्नल शशिकांत दळवी (निवृत्त)
प्रत्येक वर्षी सर्वांना लोकांना पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी, २२ मार्च रोजी जगभर “जागतिक जल दिवस” साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक विषय अथवा थिम घेतली जाते.२ ०२५ च्या जागतिक जल दिनाची थीम “हिमनदी संवर्धन ” आहे, जगातील हिमनद्यांचे संरक्षण करण्याची तातडीची गरज अधोरेखित करण्यासाठी या थिमची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण पृथ्वीचे जलचक्र राखण्यात हिमनद्यांची भूमिका महत्त्वाची असते.
जगभरातील तीन अब्जांहून अधिक लोक राष्ट्रीय सीमा ओलांडणाऱ्या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तरीही, १५३ देशांपैकी फक्त २४ देशांनी त्यांच्या सर्व सामायिक पाण्यासाठी शेजारच्या राष्ट्रांशी सहकार्य करार केल्याची नोंद आहे.
भारतात आपण नद्यांना देवीचा अथवा आईचा दर्जा देतो, पण आपण याच नद्यांमध्ये सर्व प्रकारचा कचरा, सांडपाणी, मलमूत्र विसर्जन करतो, तसेच सामाजिकदृष्ट्या आपण आपल्या पाण्यावर हक्क सांगतो पण त्याची हवी तशी काळजी घेत नाही, पर्यावरणाच्या बाबतीत तर भूजलासह सर्वच पाण्याचा आपण वारेमाप वापर करून त्याची उपलब्धता कमी करीत चाललो आहोत.
आपली पृथ्वी ही ‘पाणी’दार ग्रह असली तरी संपूर्ण पाण्याच्या फक्त एकच टक्का शुद्ध पाणी आहे. भारताकडे या एक टक्क्यापैकी फक्त चारच टक्केच पाणी आहे, शिवाय आपली लोकसंख्या मात्र जगाच्या लोकसंख्येच्या १८ टक्के आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा तुटवडा आणखी जाणवतो. भारताची लोकसंख्या प्रत्येक वर्षी जवळपास ११० लाखांनी वाढत आहे. या वाढत्या जनतेसाठी रोजची जवळपास १५० कोटी लिटरहून अधिक पाण्याची गरज भासते. तापमान वाढीमुळे आपल्या ऋतुचक्रावर खूप मोठा परिणाम झालेला दिसून येतो. मोसमी पाऊस अलीकडे विलंबाने येतो. अतिवृष्टीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातच सुका व ओला दुष्काळ यांचे प्रमाणही वाढते आहे.
पुणे शहरामध्ये मागील काही वर्षांपूर्वी जवळपास १३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, शहराची सरासरी मात्र ७७० मिलिमीटर इतकी आहे. त्याच्या आधी काही वर्षे सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडला. या सर्वाचा परिणाम पाण्याच्या उपब्धतेवर होतो. वाढत्या लोकंख्येसाठी पाणी कमी उपलब्ध होऊ लागले आहे.
१. आजमितीस जवळ्पास ६६ कोटी भारतीयांना स्वच्छ पाणी मिळत नाही. जगभरातील ८५ कोटी लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही.
२. अपुऱ्या व अस्वच्छ पाणीपुरवठ्यामुळे, प्रत्येक वर्षी भारतामध्ये जवळपास १५ लाख नागरिक मृत्युमखी पडतात, त्यातच सहा लाख लहान मुलांचा समावेश असतो.
३. मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड , भूजलातील पाण्याचा प्रचंड उपसा, भूजल भरणीबाबत असणारी उदासीनता यामुळे भूजलाची पातळी वेगाने खाली जात आहे. नीति आयोगाच्या रिपोर्टप्रमाणे यावर्षी २१ मोठ्या शहरात भूजलाची पातळी शून्यावर जाईल असे वर्तवले आहे. हीच परिस्थिती देशातील इतर छोट्या मोठ्या शहरांचीदेखील आहे.
४ .स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या जवळपास १०० कोटींनी वाढली आहे. या वाढत्या लोकसंख्येला स्वच्छ पाण्याची गरज आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येला अन्नाची गरज लागते, या वाढत्या अन्नासाठी पाण्याची गरज लागते. उपलब्ध पाण्याच्या ७० टक्के पाणी हे शेतीसाठी लागते. तसेच जवळपास २२ टक्के पाणी हे उद्योग क्षेत्राला लागते. दिवसेंदिवस जागतिक तापमानवाढीमुळे पाण्याची उपलब्धता सर्वच क्षेत्रात कमी होत चालली आहे.
५.गेल्या शतकापर्यंत हवामानबदलाचे प्रमाण कमी होते व आपले ऋतूचक्र नैसर्गिक नियमाप्रमाणे चालू होते, जसजसे जागतिक तापमान वाढत जाईल तसतसे समुद्राच्या पाण्याचे तापमानदेखील वाढत चालले आहे. यामुळे मान्सूनचे चक्र बदलत चालले आहे, याचा आपल्या पाण्याच्या उपलब्धतेवर खूप विपरीत परिणाम होत आहे.
६. कमी पाण्याचा परिणाम अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, औद्योगिक सुरक्षेवरही होतो. त्यामुळे देशाचा सर्वांगिण विकास खंडित होतो.
यावर्षी जागतिक जल दिवस साजरा करताना हाच संदेश दिला जात आहे की ,
१. जागतिक तामानवाढीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
२. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे.
३. पाण्याचे सर्व स्त्रोत्र, नद्या, तलाव वगैरे प्रदूषणमुक्त करून पाण्याची उपलब्धता वाढवणे गरजेचे आहे.
४.भूजल भरणी करून भूजलाची पातळी वाढवायला हवी.
५. शेती व उद्योग क्षेत्रात पाण्याचा कमी वापर करून उत्पादन वाढवता येईल अशा तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे.
६. जनतेने पाण्याची नासाडी कमी करून आपल्या पाण्याची उपलब्धता वाढवणे महत्त्वाचे ठरेल.
निसर्गाचा समतोल विकास करून हवामान पूर्ववत करणे व त्यासाठी लागणारे सर्व उपाय जगभरातील सर्व लोकांनी, सरकारांनी अमलांत आणणे अत्यंत गरजेचे आहे . तसेच पाण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनदेखील बदलायला हवा. पर्यावरण, सामाजिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या पूर्वापार चालत आलेला संदेश या वर्षीच्या जल दिनातून दिला जात आहे. उत्तर भारतातील सर्व नद्या या हिमालयातून उगम पावतात. उन्हाळ्यामध्ये तापमान वाढते आणि हिमनद्या ( Glaciers) विरघळून त्यांना उन्हाळ्यात भरपूर पाणी मिळते, त्यामुळे त्या भागातील लोकांना पिण्यासाठी तसेच उन्हाळी शेतीसाठीह पाणी उपलब्ध होते. भारतातील इतर नद्या मात्र उन्हाळ्यात आटत जातात. त्यामुळे हिमनद्यांचे संरक्षण हे अत्यंत महत्वाचे तसेच गरजेचे आहे.
एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या पाण्याच्या गंभीर परिस्थितीला फक्त आपणच जबाबदार आहोत, आपण फक्त आपलाच विचार केला, निसर्गाचा विचारच केला नाही, पाण्याची किंमतच आपल्याला अजूनही कळलेली नाही; ती किंमत कळली तरच फक्त आणि फक्त आपणच या भयंकर संकटातून बाहेर येऊ शकतो!