कलाकार आणि ट्रोलिंग ही गोष्ट सध्या फारच किरकोळ झाली आहे. सोशल मीडियावर असा एकही सेलिब्रिटी आढळणार नाही ज्याच्याबद्दल काही विचित्र लिहिलं किंवा बोललं गेलं नसेल. जवळपास प्रत्येक कलाकाराला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोच. काही कलाकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात तर काही कलाकार ही गोष्ट फार मनावर घेतात. अर्थात यात सुवर्णमध्य साधून ह्या ट्रोलिंगला स्पोर्टिंगली घेणारेही कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. पण एकूणच बहुतांश कलाकार हे या गोष्टीला फारच मनावर घेतात असं चित्र सध्या जाणवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किमान मराठी चित्रपटसृष्टीत तरी काही कलाकार या गोष्टी फार मनाला लावून घेतात असं माझं निरीक्षण आहे. कदाचित ते चुकीचं असेलही पण मला आलेल्या काही अनुभवांवरून तरी मी हाच अंदाज लावला आहे. इथे मी कुणाचं नाव घेऊन काहीच लिहिणार नाहीये, पण ज्या कलाकारांपर्यंत हा मेसेज जाणार आहे त्या कलाकारांपर्यंत तो पोहोचावा आणि त्यांनी यावर थोडा विचार करावा ही माझी माफक अपेक्षा आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार हे अजूनही स्वतःच्या कोषातून बाहेर आलेले नाहीत. मी करतो ते सगळंच चांगलं, त्याला लोकांनी उत्तमच म्हंटलं पाहिजे हा जो काही अट्टहास कलाकार आणि त्यांचे नखरे पुरवणाऱ्या काही कंपन्यांचा असतो तो अनाठायी आहे असं मला वाटतं. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा एखादा कलाकार रोमॅंटिक भूमिकेत पारंगत होतो आणि मग तो वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत त्याच साच्यातील भूमिका करतो तसंच बहुतेक कलाकारांचं झालं आहे. कलाकारांना स्वतःचा कम्फर्ट झोन सोडायचा नसतो आणि मग त्याचं खापर ते प्रेक्षकांवर फोडतात की त्यांच्यामुळे आम्ही स्टीरियोटाइप होतो. पण जेव्हा हाच प्रेक्षक एकमुखाने एखाद्या कलाकाराच्या भूमिकेवर टीका करतो तेव्हा मात्र ती टीका ते फारच मनाला लावून घेतात.

आणखी वाचा : “भारतीय प्रेक्षक खूप…” अभिनेता, दिग्दर्शक रिषभ शेट्टीने उलगडलं ‘कांतारा’च्या यशामागील रहस्य

आज बॉलिवूडमध्येही हीच अवस्था आहे. वयाच्या ५० मध्येसुद्धा तरुण अभिनेत्रींबरोबर रोमान्स करण्याचा अट्टहास करणाऱ्या किंग खानला प्रेक्षकांनी नाकारला आणि म्हणूनच त्याने स्वतः काही वर्षं या इंडस्ट्रीपासून फारकत घेतली होती. अर्थात आता पुढेही जर तो तेच करणार असेल तर प्रेक्षक नक्कीच त्याचा समाचार घेतील. अहो या दशकातील महानायक आणि बॉलिवूडच्या पहिल्या सुपरस्टारलाही याच प्रेक्षकांनी एका काळानंतर त्याच साचेबद्धपणामुळे नाकारलं होतं. त्यापैकी एकाने स्वतःचा मनमानी कारभार सुरू ठेवला तर दुसऱ्याने प्रेक्षकांची नस अचूक ओळखून त्यांना काय हवं आहे ते द्यायचा प्रयत्न केला. याचे परिणाम आपण आज बघतो आहोत, आज त्याच महानायकाची ८० वर्षं आपण साजरी केली आहेत. याला म्हणतात कलाकार. त्याकाळात ट्रोलिंग हा भाग नसला तरी त्यांच्यावर टीका होतच असतील पण जर या महानायकाने त्या टीका मनाला लावून घेतल्या असत्या तर आज करोडो भारतीयांच्या मनातील स्थान त्यांना मिळवता आलं असतं का?

या सगळ्या गोष्टींचा हे कलाकार विचार कधी करणार? ट्रोलिंग ही खरंतर कला आहे, फार शब्दबंबाळ काही न लिहिता किंवा बोलता मोजक्या शब्दांत घेतलेला समाचार किंवा टीका म्हणजेच ट्रोलिंग. पण या सगळ्याला सध्याच्या काही कलाकारांनी जे नकारात्मक स्वरूप दिलं आहे ते कुठेतरी खटकणारं आहे. जर एखाद्या भूमिकेत एखादा कलाकार प्रेक्षकांना रुचत नसेल आणि त्या बाबतीत जर प्रेक्षकांनी टीका करायला सुरुवात केली की त्या टिकांना ही कलाकार मंडळी सरसकट ट्रोलिंग हे नाव देऊन मोकळे होतात, जणू ट्रोलिंग ही जशी काही शिवीच आहे. यातील काही कलाकार तर सोशल मीडियाला घालूनपाडून बोलतात, त्यावर मनसोक्त तोंडसुख घेतात आणि मग याच सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे हे एका लहान मुलासारखे रुसून बसतात आणि मग पुन्हा हाच सोशल मीडिया कसा वाईट आहे म्हणून गळे काढताना आपल्याला दिसतात. हा कलाकारांचा दुटप्पीपणा नाही का?

बरं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तर ही मंडळी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात, तेव्हा त्यांना ट्रोलर्स वगैरे काहीच दिसत नाही. जर तुम्हाला इतकीच अलर्जी असेल सोशल मीडियाविषयी तर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याचा वापर करू नका. पूर्वीच्या काळात होता का सोशल मीडिया? त्याकाळात तर ट्रेलर टीझर, मोशन पोस्टर हे प्रकार अस्तित्वातही नव्हते. तेव्हा केवळ चित्रपटाची गाणी, पोस्टर्स आणि मासिक पेपरमधील बातम्या वाचून प्रेक्षक चित्रपट पाहायला गर्दी करायचे. सध्याच्या काळात एवढं प्रमोशन होऊनही जर एखाद्या चित्रपटाचे शो कॅन्सल होत असतील तर याचं खापर कोणावर फोडायचं प्रेक्षकांवर, सोशल मीडियावर की स्वतःवर? याचा कलाकारांनी गांभीर्याने विचार करायला हवा.

आणखी वाचा : “करीना शूटिंगला जाते आणि मी तैमूरची…” सैफ अली खानने केला खुलासा

गेल्या काही महिन्यात ज्या पद्धतीने प्रेक्षक व्यक्त होत आहे ते पाहता मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने याची दखल घेऊन त्यावर विचार करायला हवा असं माझं प्रामाणिक मत आहे. नुकतंच आदिपुरुष चित्रपटावरून झालेली टीका हे याचं ताजं उदाहरण आहे. प्रेक्षकांना गृहीत न धरता स्वतःच्या कोषातून बाहेर येऊन या कलाकारांनी आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. उगाच स्वतःची हौस भागवायची म्हणून स्वतःला योग्य वाटतील त्या भूमिका करायचे बंद करून लोकांना काय हवं आहे याचा विचार कलाकारांनी करायला हवा. कलाकार सगळेच उत्तम आहेत आणि ते मेहनती आहेत यात काहीच वाद नाही, पण एखादी भूमिका आपल्याला साजेशी आहे का यावर त्यांनी विचार करायला हवा आणि जर बहुतांश प्रेक्षकांना जर ती भूमिका रुचत नसेल आणि ते त्याबद्दल व्यक्त होत असतील तर त्याचाही आदर त्यांनी करायलाच हवा. त्या टीकेला ‘ट्रोलिंग’ हे नाव देऊन त्याकडे कानाडोळा अजिबात करू नये.

उदाहरण द्यायचं झालं तर राजपाल यादव हा एक उत्तम अभिनेता आहे, पण उद्या त्याला अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत कुणी घ्यायचं धाडस करेल का? नाही ना, तिथे रणवीर सिंगसारख्या अतरंगी कालाकारच योग्य ववाटतो. निदान ऐतिहासिक योद्धे आणि हिंदू संस्कृतीमधील पूजनीय महापुरुष यांचं सादरीकरण करताना तरी थोडी साधनशुचिता सध्याच्या कलाकारांनी पाळायला हवी, आणि जर ती पाळता येणार नसेल तर मग प्रेक्षकांकडून होणाऱ्या सो कॉल्ड ‘ट्रोलिंग’साठी त्यांनी तयार राहावं. ‘जेनू काम तेनू थाय, बिजा करे सो गोता खाय’ ही गोष्ट या कलाकारांनी आचरणात आणली तर निम्म्याहून अधिक ट्रोलिंग कमी होईल असा माझा विश्वास आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why celebrities from entertainment industry should take trolling sportingly avn
Show comments