Chandrayaan-3 Moon Mission : दि. १४ जुलै, २०२३ रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण झाले. चांद्रयान ३ हा नक्कीच सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. भारताने या आधीही चांद्रमोहिमा केल्या आहेत. भारतासह बाकीचीही राष्ट्रे याकरिता प्रयत्नशील आहेत. परंतु, सर्वांनाच यश आले नाही. चांद्रयान मोहिमेच्या आधी नासा या संस्थेनेही ‘अपोलो ११’ प्रक्षेपित केले होते. ‘अपोलो ११’ला चंद्रावर जाण्यासाठी ४ दिवसांचा कालावधी लागला होता, तर चांद्रयान-२ ला ४८ दिवस आणि चांद्रयान-३ ला ४० दिवसांचा कालावधी लागणार आहे. ‘नासा’ला केवळ ४ दिवस लागले तिथे ‘इस्रो’ला ४० दिवस का लागणार आहेत, ‘इस्रो’ची यामागील संकल्पना काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


‘इस्रो’कडून आजवर राबवण्यात आलेल्या मोहिमा

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) शुक्रवार, दि. १४ जुलै, २०२३ रोजी चांद्रयान-३ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. भारताच्या एलव्हीएम ३ या शक्तीशाली रॉकेटने चांद्रयान-३ चे अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर नेले. २३ ऑगस्ट, २०२३ रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ चे लँडिग होईल, अशी माहिती इस्रोच्या अध्यक्षांनी दिली. जर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले, तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर यशस्वी कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरणार आहे. इस्रोने उपग्रह प्रक्षेपण करण्याची सुरुवात १९६९ साली केली होती. तेव्हापासून आतापर्यंत ८९ प्रक्षेपण मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत.

चांद्रयान आणि ‘अपोलो ११’ मोहीम

चांद्रयान-३ चे दि. १४ जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले. ते ४० दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. मागील मोहिमांशी तुलना करायची झाल्यास, याआधीची चांद्रयान-२ मोहीम २२ जुलै, २०१९ रोजी सुरू झाली आणि ६ सप्टेंबर, २०१९ ला त्याचा विक्रम लँडर वेगळा होऊन चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झाला. म्हणजे चांद्रयान-२ मोहिमेला ४८ दिवस लागले होते. चांद्रयान-१ ही मोहीम २८ ऑगस्ट, २००८ ला सुरू झाली होती आणि त्याचा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत १२ नोव्हेंबर, २००८ रोजी दाखल झाला होता, म्हणजे सुमारे ७७ दिवसांचा कालावधी त्याला लागला. मागील मोहिमांच्या तुलनेत ‘इस्रो’ला चंद्रावर पोहोचण्यास कमी दिवस लागत आहेत.

‘नासा’चे ‘अपोलो-११’ हे यान चंद्राकडे १६ जुलै, १९६९ रोजी प्रक्षेपित झाले. ‘अपोलो-११’ ही ‘नासा’ची मानवाला यशस्वीरीत्या चंद्रावर पाठवणारी मोहीम ठरली होती. १६ जुलै, १९६९ रोजी ‘नासा’चे ‘अपोलो-११’ हे अंतराळयान नील आर्मस्ट्राँग, बझ ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स या तीन अंतराळवीरांना घेऊन प्रक्षेपित झाले. या यानाला ‘सॅटर्न फाईव्ह SA506 या रॉकेटच्या मदतीने केनडी स्पेस सेंटरमधून अंतराळात सोडण्यात आले. १०२ तास आणि ४५ मिनिटांनी दि. २० जुलै रोजी या यानाचा लँडर ‘ईगल’ चंद्रावर उतरला. यानंतर नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास घडवला. त्यांनी तिथे अमेरिकेचा झेंडा रोवला.
यादरम्यान तिसरे अंतराळवीर मायकल कॉलिन्स यांनी अवकाशात कमांड मॉड्यूलमध्ये बसून या संपूर्ण मोहिमेची जबाबदारी हाताळली होती. त्यानंतर ‘ईगल’ लँडर पुन्हा कमांड मॉड्यूलला जोडून या तिघांनी एकत्र दि. २१ जुलै रोजी पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. दि. २४ जुलै रोजी ते पृथ्वीवर उतरले. या मोहिमेला पृथ्वीपासून चंद्रापर्यंत जाण्यास ४ दिवस आणि मोहीम पूर्ण करण्यास ८ दिवस ३ तास लागले.

हेही वाचा : राजकीय नेते ‘बडव्यां’चा उल्लेख करतात, हे ‘बडवे’ म्हणजे कोण ? काय आहे बडव्यांचा इतिहास

‘अपोलो-११’ ४ दिवसात, तर चांद्रयान-३ ला ४० दिवसांचा कालावधी का ?

चांद्रयान-३च्या लांब प्रवासासाठी अनेक बारीकसारीक तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. १९६९ मधील ‘नासा’चे ‘अपोलो-११’ यानाचे इंधनासह वजन २८०० टन होते. ‘एलव्हीएम ३’ रॉकेटने ‘इस्रो’ चांद्रयान ३ प्रक्षेपित करणार आहे, त्याचे वजन ६४० टन आहे. चांद्रयानच्या प्रपल्शन मॉड्यूलचे वजन आहे २१४८ किलो, तर या यानातल्या लँडर आणि रोव्हरचे वजन १,७५२ किलो. एकूण चांद्रयानाचे वजन ४ टन आहे. ‘इस्रो’कडे असलेल्या रॉकेट्सपैकी ‘एलव्हीएम ३’ या रॉकेटमध्ये एवढे वजन पेलवण्याची क्षमता आहे. हे रॉकेट आधी ‘GSLV MK ३’ म्हणूनही ओळखले जायचे.

‘नासा’ने ‘अपोलो-११’ मोहिमेसाठी सॅटर्न फाईव्ह SA506 या शक्तिशाली रॉकेटचा वापर केला होता. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर ‘अपोलो-११’चा जो भाग चंद्रापर्यंत गेला होता, त्याचे वजन ४५.७ टन होते. त्यातील ८० टक्के भाग फक्त इंधनाचा होता. चंद्रावर पोहोचून परत येण्यासाठी एवढ्या इंधनाची आवश्यकता होती.
‘अपोलो-११’ सोबत गेलेल्या यानाचे वजन ४५ टनांपेक्षाही जास्त होते. पण चांद्रयानचे प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर यांचे एकूण वजन ४ टनांपेक्षाही कमी आहे.’एलव्हीएम ३’ हे भारताकडे असलेले सर्वांत मोठे रॉकेट आहे. या रॉकेटमुळे कमीत कमी इंधनात चंद्रापर्यंत जाणे शक्य आहे. यासाठी ‘इस्रो’ने एक कल्पना योजिली आहे. जिचा वापर आपण शेतीच्या कामांमध्ये केलेला पाहतो. ‘गोफण’ पद्धतीचा वापर चांद्रयान मोहिमेमध्ये केलेला आहे. गोफण आधी गोल-गोल फिरवून मग जोरात भिरकावली जाते. यामुळे त्या दगडाला गती प्राप्त होऊन तो अधिक वेगाने फेकला जातो. ‘इस्रो’ने याच गोफणच्या तंत्रज्ञानाचा वापर करून, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने कमीत कमी इंधन खर्च करून चंद्र गाठण्याचा मार्ग आखला. थेट चंद्राच्या दिशेने सरळ प्रवास करण्याऐवजी चांद्रयान हळूहळू आपली कक्षा पृथ्वीपासून दूर वाढवत जाईल. एका ठराविक अंतरावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राबाहेर पोहोचल्यावर चांद्रयान थेट चंद्राच्या दिशेने जाऊन मग चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. त्यानंतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे कमी शक्ती आणि इंधनाचा वापर करून पण जास्त लांबचा प्रवास करून यान चंद्रावर पोहोचते.

हेही वाचा : जुलैमधील ‘ते’ २ दिवस; मुंबईकरांच्या जखमा अजूनही ताज्याच; काय घडले त्या दिवशी

चांद्रयान-२ मोहीम कशी होती ?

‘चांद्रयान-२’ मोहिमेसाठी ‘इस्रो’ने याच ‘गोफण’ पद्धतीचा वापर केला होता. २२ जुलै, २०१९ रोजी पृथ्वीवरून झेपावलेले ‘चांद्रयान-२’ चंद्रापर्यंत पोहोचण्यास ४८ दिवस लागले. यातील पहिले सुमारे २३ दिवस हे यान पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेतच फिरत होते आणि त्यानंतर ते पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत चंद्राच्या दिशेने निघालं होते. प्रवासाच्या या टप्प्याला लुनार ट्रान्सफर ट्रॅजेक्टरी (Lunar Transfer Trajectory) म्हणतात.चंद्राच्या दिशेने सात दिवस प्रवास करून ३०व्या दिवशी, म्हणजे २०ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्राच्या कक्षेत आले होते. याला ‘लुनार ऑर्बिट इन्सर्शन’ म्हणतात.(Lunar orbit insertion). चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर १३ दिवस चंद्राला प्रदक्षिणा घालून मग या यानातला विक्रम लँडर मोहिमेच्या ४८व्या दिवशी चंद्रावर उतरणे अपेक्षित होते. अखेरच्या क्षणी तांत्रिक बिघाडामुळे चांद्रयान-२ चा संपर्क तुटला आणि दुर्दैवाने ही मोहीम अयशस्वी झाली.

हेही वाचा : मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा आहेत तरी कोण ? ‘शकुनीमामा’ला नकारात्मक वलय का मिळाले ?

चांद्रयान-३ साठी ‘इस्रो’ने दक्षिण ध्रुवाची निवड का केली ?

आजवर अनेक चांद्रमोहिमा झाल्या आहेत. चांद्रयान-३ मोहीम ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारी जगातील पहिली मोहीम ठरणार आहे. आजवर चंद्राच्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या विषुववृत्ताजवळील भागात अनेक अंतराळयाने उतरली आहेत. पण दक्षिण ध्रुवावरील गडद काळोख असलेल्या प्रदेशात आजवर एकही मोहीम झालेली नाही.अतिशय खडतर वातावरण असल्यामुळे दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत चंद्रयान मोहिमा झालेल्या नाहीत. पण अनेक ऑर्बिटर मोहिमांनी पुरावे दिले आहेत की, याठिकाणी शोधमोहीम घेणे उत्कंठावर्धक असणार आहे. विवरांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवाय, अत्यंत थंड तापमान असल्यामुळे याठिकाणी अडकलेली एखादी वस्तू काहीही बदल न होता, अनेक वर्षांनंतरही गोठलेल्या अवस्थेत मिळू शकते. विवरांत जीवाश्म आढळल्यास त्यांच्या अभ्यासातून सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळातील घडामोडींवर प्रकाश टाकता येऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. २००८ साली भारताने राबविलेल्या चांद्रयान-१ मोहिमेतून चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते.

‘नासा’चे ‘अपोलो-११’ ४ दिवसात पोहोचले हे नक्की. ‘चांद्रयान-३’ला ४० दिवस लागतील. परंतु, चांद्रयान-३ मागील संकल्पना, दूरदृष्टीकोन, तंत्रज्ञान याचा विचार करता ‘चांद्रयान-३’ नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is there a difference between nasa and isro in reaching the moon why nasa in 4 days and isro in 40 days vvk